Friday, January 29, 2021

 शिवजयंती उत्सव साधेपणाने साजरा करा

                     --जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

 

         पुणे,  दि. 29 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवभक्तांनी गर्दी टाळून यंदाचा शिवजयंती उत्सव साधेपणाने परंतु उत्साहात साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले.

            शिवनेरीवरील शिवजयंती उत्सवासंदर्भात जुन्नर नगरपालिकेकडून तसेच विविध विभागांकडून करण्यात आलेल्या पूर्वतयारीचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी घेतला. त्यावेळी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार अतुल बेनके, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री कटारे उपस्थित होते.

            कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. सर्व शिवभक्तांनी थर्मल स्कॅनिंग करावे, तसेच सॅनिटायझर, मास्क, सोशल डिस्टन्सिंग आदी नियमांचे पालन करुन उत्सव साजरा करावा व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी केले. नगरपरिषद, बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, वनविभाग, पुरातत्त्व विभागाने केलेल्या तयारीचा आढावा त्यांनी घेतला. विद्युत व्यवस्था, गडावर करण्यात येणारी रोषणाई, स्वच्छतागृहांची सुविधा, अग्निशमन दल, पोलीस बंदोबस्त, वाहतूक व्यवस्था, हेलीपॅडची व्यवस्था इत्यादी बाबत आढावा बैठकीत घेण्यात आला.

            दरवर्षी महाराष्ट्रातून तसेच महाराष्ट्राबाहेरुन शिवभक्त शिवज्योत घेऊन येतात. त्यामुळे गडावर मोठया प्रमाणावर गर्दी होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी शिवज्योत घेऊन जाणा-या भक्तास बनकर फाटा, आळेफाटा आदी ठिकाणी शिवज्योत उपलब्ध करुन दिल्यास एकाच वेळी एकाच ठिकाणी गडावर होणारी गर्दी टाळता येईल, असे मत पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी मांडले.

            सर्व विभागाच्या प्रमुखांनी प्रत्यक्ष शिवनेरीवर जाऊन शिवजयंतीपूर्वी पाहणी करावी, असे आवाहन आमदार अतुल बेनके यांनी केले.

            यावेळी विविध विभागांचे अधिकारी, शिवप्रेमी उपस्थित होते.

00000








 

No comments:

Post a Comment

  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेची राज्यस्तरीय बैठक पुणे जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्व...