Friday, January 29, 2021

 शिवजयंती उत्सव साधेपणाने साजरा करा

                     --जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

 

         पुणे,  दि. 29 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवभक्तांनी गर्दी टाळून यंदाचा शिवजयंती उत्सव साधेपणाने परंतु उत्साहात साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले.

            शिवनेरीवरील शिवजयंती उत्सवासंदर्भात जुन्नर नगरपालिकेकडून तसेच विविध विभागांकडून करण्यात आलेल्या पूर्वतयारीचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी घेतला. त्यावेळी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार अतुल बेनके, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री कटारे उपस्थित होते.

            कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. सर्व शिवभक्तांनी थर्मल स्कॅनिंग करावे, तसेच सॅनिटायझर, मास्क, सोशल डिस्टन्सिंग आदी नियमांचे पालन करुन उत्सव साजरा करावा व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी केले. नगरपरिषद, बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, वनविभाग, पुरातत्त्व विभागाने केलेल्या तयारीचा आढावा त्यांनी घेतला. विद्युत व्यवस्था, गडावर करण्यात येणारी रोषणाई, स्वच्छतागृहांची सुविधा, अग्निशमन दल, पोलीस बंदोबस्त, वाहतूक व्यवस्था, हेलीपॅडची व्यवस्था इत्यादी बाबत आढावा बैठकीत घेण्यात आला.

            दरवर्षी महाराष्ट्रातून तसेच महाराष्ट्राबाहेरुन शिवभक्त शिवज्योत घेऊन येतात. त्यामुळे गडावर मोठया प्रमाणावर गर्दी होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी शिवज्योत घेऊन जाणा-या भक्तास बनकर फाटा, आळेफाटा आदी ठिकाणी शिवज्योत उपलब्ध करुन दिल्यास एकाच वेळी एकाच ठिकाणी गडावर होणारी गर्दी टाळता येईल, असे मत पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी मांडले.

            सर्व विभागाच्या प्रमुखांनी प्रत्यक्ष शिवनेरीवर जाऊन शिवजयंतीपूर्वी पाहणी करावी, असे आवाहन आमदार अतुल बेनके यांनी केले.

            यावेळी विविध विभागांचे अधिकारी, शिवप्रेमी उपस्थित होते.

00000








 

 

उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मौजे कोंढवा खुर्द येथील विविध विकास कामांची आढावा बैठक

पुणे, दि. 29:- उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मौजे कोंढवा खुर्द सर्वे नं. ५ येथील नियोजित ३६ मीटर व २४ मीटर रस्त्यासाठी जागा ताब्यात घेवून रस्ता रुंदीकरणाच्या कामासंदर्भात, कोंढवा खुर्द येथील नियोजित कुमार पृथ्वी ते शिवनेरीनगर डी.पी. रस्त्याबाबत, क्रीडांगण आरक्षण तसेच पश्चिम महाराष्ट्रातील मुस्लिम समाजासाठी कोंढवा, पुणे येथे हज हाऊस उभारण्याबाबतव्हीव्हीआयपी सर्किट हाऊस येथे बैठक पार पडली. 

          यावेळी आमदार चेतन तुपे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थितीत होते
                                                                                       000





 

क्रीडा धोरणाला चालना देण्यासाठी
क्रीडा संकुलाचे काम दर्जेदार करा

- उपमुख्यमंत्री अजित पवार

 

पुणे, दि.29 :  महाराष्ट्र स्पोर्टस इंन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलेपमेंट प्लॅन अंतर्गत राज्यात क्रीडा सुविधा निर्माण करण्यात येत आहे. क्रीडा धोरणाला चालना देण्यासाठी क्रीडा संकुलाचे काम दर्जेदार करा असे, निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.

             उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय क्रीडा संकुल, येरवडा व जिल्हा क्रीडा संकुल, बारामती येथील विविध कामांचा आढावा घेण्यासाठी विभागीय व जिल्हा क्रीडा संकुल समितीची आढावा बैठक व्ही.व्ही. आय.पी. सर्कीट हाऊस येथे आयोजित करण्यात आली होती.  त्यावेळी ते बोलत होते. यावेळी  जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण, पोलीस उपायुक्त मितेश घट्टे, प्रातांधिकारी दादासाहेब कांबळे, क्रीडा व युवक सेवा उपसंचालक तथा सदस्य सचिव विजय संतान, माहिती उपसंचालक राजेंद्र सरग, बारामतीचे मुख्‍याधिकारी किरण यादव यांच्यासह  संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थितीत होते.

               बैठकीत प्रारंभी मागील बैठकीचे इतिवृत्त कायम करण्याबाबत चर्चा केली. त्यांनतर आमंत्रित सदस्य निश्चित करणे. क्रीडा संकुलाच्या जमाखर्चाचा आणि क्रीडा संकुल येथील सुविधांचा आढावा घेणे, क्रीडा संकुल येथील प्रस्तावित करण्यात आलेल्या सुविधा तसेच क्रीडा संकुलाकरीता वास्तुशास्त्रज्ञ यांच्या नियुक्ती करणे. युवा वसतिगृहाची स्थापना करणे.  क्रीडा संकुलाकरीता उर्वरीत रकमेची मागणी करण्यापुर्वी उपलब्ध जागेचा आढावा घेणे. बॅडमिंटन हॉल व जलतरण तलाव येथील प्रेक्षक गॅलरीमध्ये पायऱ्यांवर खुर्च्या बसविणे. अर्बन इन्फाकॉम या संस्थेचे कोरोना कालावधीतील भाडे शुल्क कमी करणे. प्रा. शिवाजी साळुंके यांनी सादर केलेला प्रस्ताव. योग अॅकेडमी करीता हॉल भाडे तत्वावर देण्याबाबत चर्चा करण्यात आली.

          मागील बैठकीचे इतिवृत्त व बैठकीचे प्रास्ताविक क्रीडा व युवक सेवा उपसंचालक तथा सदस्य सचिव विजय संतान यांनी सादर केले.

*****







 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत

गृह प्रकल्प योजनेची केली पाहणी

 

पुणे, दि.29 :  उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या भोसरी येथील सेक्टर क्रमांक १२ येथे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिक दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटातील गृह प्रकल्प योजनेच्या कामांची आज पाहणी केली.

             उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गृह प्रकल्पाचे काम लवकरात पूर्ण करण्याचे निर्देश संबंधितांना दिले. त्याचबरोबर भुखंडाचे एकूण क्षेत्रफळ, सदनिकेचे चटई क्षेत्र, एकूण सदनिका, गृहप्रकल्पातील एकूण व्यापारी गाळे, प्रकल्प उभारणीकरीता लागणारा खर्च, सदनिकेची विक्री किमंत तसेच रंगरंगोटी, क्रीडांगण, पार्किंग, उद्वाहिका, सोलर पॅनलची व्यवस्था, पाण्याचे नियोजन, ओला व सुका कचऱ्याचे व्यवस्थापन, क्लब हाऊस, रेन वॉटर हार्वेस्टिंग, स्वच्छतागृह, फर्निचर, अग्निशामक यंत्रणा, अग्निप्रतिबंधक दरवाजा, मैला सांडपाण्याचे वाहिन्या, वाहतूक आदि पायाभूत सोई सुविधांची माहिती जाणून घेतली. गृह प्रकल्पाची माहिती क्रिएशन्स् इंजिनिअर्स प्रा. लि.चे  रमाकांत भुतडा यांनी दिली.

         यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बन्सी गवळी, कार्यकारी अभियंता प्रभाकर वसईकर, पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या माजी महापौर मंगला कदम, संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

******






Wednesday, January 27, 2021

 

जिल्हा प्रशासनाच्यावतीने कॅमेरामन मोरे आणि खंडागळे यांचा गौरव

 

           पुणे दि. 28 :-भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा प्रशासनाच्यावतीने लोकसभा व विधानसभा निवडणुकीत चित्रीकरण व छायाचित्रण या क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल पुणे विभागीय माहिती कार्यालयातील कॅमेरामन संतोष मोरे व चंद्रकांत खंडागळे यांचा अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी गौरव केला. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत, पुणे कॅन्टोनमेंट मतदार संघाच्या उपजिल्हाधिकारी स्नेहल भोसले, भोसरी विधानसभा मतदार संघाच्या उपजिल्हाधिकारी राणी ताटे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

***

 

Friday, January 22, 2021

 


सिरमची कोरोना लस सुरक्षित, लस उत्पादनाला फटका नाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्र्यांकडून सिरम इन्स्ट्यिट्यूटला लागलेल्या आगीची  पाहणी

आग प्रकरणाच्या चौकशी अहवालानंतर कारण स्पष्ट होईल

 

            पुणे,दि. 22: सिरमची कोरोना लस सुरक्षित आहे. कोव्हीशिल्ड लस उत्पादनाला फटका नाही. आग प्रकरणाची चौकशी सुरू असून चौकशी  अहवाल प्राप्त झाल्यानंतर आगीचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले.

            सिरम इन्स्ट्यिट्यूटला लागलेल्या आगीची  पाहणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. दुर्घटनेबाबतची सविस्तर माहिती त्यांनी घेतली. तसेच सिरम इन्स्ट्यिट्यूटच्या टिमशी त्यांनी संवाद साधला.

 विधान परिषदेच्या उपसभापती निलम गो-हे,कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील

, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खा. गिरीश बापट, आ. चेतन तुपे,  सिरमचे अदर पुनावाला,  विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, मुख्यमंत्री यांचे प्रमुख सल्लागार अजोय मेहता, आरोग्य सल्लागार डॉ.दीपक म्हैसेकर, पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यावेळी उपस्थित होते.

            मुख्यमंत्री म्हणाले, संपूर्ण जगात कोविडचा हैदोस अद्यापही संपलेला नाही, गेल्या आठवडयात सिरमच्या लसीमुळे आशेचा किरण निर्माण झाला. लस बनवणाऱ्या केंद्रात आग लागली ही बातमी आली, दुदैवाने या दुर्घटनेत पाच कामगार मृत्यूमुखी पडले. लस बनवली जाते ते केंद्र साठा संपूर्णपणे सुरक्षित आहे. काल आगीचे वृत्त समजताच तातडीने संपर्क करून याबाबतची माहिती घेतली. ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली त्या इमारतीमधील पहिले दोन मजले वापरात आहेत, वरील दोन मजले जिथे नवे केंद्र सुरू केले जाणार होते, त्या ठिकाणी ही दुर्घटना घडली. लस उत्पादन केंद्रालाच आग लागली तर पुढे कसे होणार अशी सर्वांनाच भीती होती. मात्र कोविडची लस जिथे बनवली जाते, ते केंद्र अंतरावर आहे, सिरमची कोरोना लस सुरक्षित आहे. कोव्हीशिल्ड लस उत्पादनाला फटका नाही. आग प्रकरणाची चौकशी सुरू असून चौकशी पूर्ण होवून अहवाल प्राप्त झाल्यानंतर आगीचे नेमके कारण स्पष्ट होईल. मृत्यू झालेल्या कुटुंबाची जबाबदारी सिरम कंपनीने घेतली आहे. त्याशिवाय काही आवश्यकता असेल तर शासन निश्चित करेल, असे त्यांनी सांगितले.

            सिरमचे अदर पुनावाला म्हणाले, कोरोना लसीच्या पुरवठयावर कोणताही परिणाम नाही. बीसीजी आणि इतर लसीचे नुकसान झाले आहे. कोव्हिशिल्ड लसीचा पुरवठा सुरळीत असून लसीवर परिणाम नाही, मात्र आर्थिक नुकसान मोठे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

0000

Tuesday, January 19, 2021

                                    प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य

महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ

आधुनिकीकरणाकडे वाटचाल करताना मातृभूमी, मातृभाषा,सदाचार आणि संस्कृतीला विसरु नका

                                                                -राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

 

            पुणे,दि.१९:  आधुनिकीकरणाकडे वाटचाल करताना आपली मातृभूमी, मातृभाषा, सदाचार आणि आपल्या संस्कृतीला विसरु नका, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केले.

            प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी बोलत होते. यावेळी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. डॉ. नितीन करमळकर, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ.गजानन एकबोटे, संस्थेचे कार्यवाह प्रा. शामकांत देशमुख, सहकार्यवाह प्रा. ज्योत्स्ना एकबोटे, प्रा.सुरेश तोडकर, प्राचार्य डॉ. राजेंद्र झुंजारराव तसेच शिक्षण व अन्य विभागातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी सेंट्रल सॉफीस्टीकेटेड ऍनालेटिकल इन्स्ट्रुमेंटेशन फॅसिलिटी आणि प्रिन्सिपल व्हर्च्युअल केबीनचे डिजिटल स्वरुपात अनावरण व सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त विशेषांकाचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच प्रा.डॉ. गजानन एकबोटे व प्राचार्य डॉ. राजेंद्र झुंजारराव यांना राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

            राज्यपाल भगतसिंग कोश्यारी म्हणाले,  आपण सर्वजण आधुनिकीकरणाचा ध्यास घेऊन वाटचाल करत आहोत. परंतु, केवळ आधुनिक बनण्यापेक्षा आदर्श बनण्यासाठी झटणे आवश्यक आहे. सदाचार ही जीवनातील महत्वपूर्ण बाब आहे. सदाचारी व्यक्तीचा सदैव गौरव केला जातो, यासाठी सदाचारी बना. परकीय देशांच्या भाषेचे ज्ञान घेताना मातृभाषेकडे दुर्लक्ष करु नका. आपल्या मातृभूमीचा व मातृभाषेचा सदैव अभिमान बाळगा, असे त्यांनी सांगितले.

            नाविन्यपूर्ण बाबींचे अधिकाधिक ज्ञान ग्रहण करुन विद्यार्थ्यांनी विद्वान बनावे,असे सांगून राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, 'भारत' हा प्राचीन काळापासून अनेक गोष्टींमध्ये अग्रेसर देश म्हणून ओळखला जातो, भविष्यात देखील आपला देश विविध बाबींमध्ये अग्रेसर ठरण्यासाठी आपल्या ज्ञानाचा देशहितासाठी उपयोग करा आणि जगभरात चांगले नाव कमवा, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. नव्या शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी प्रयत्न करावेत, असे सांगून प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीमध्ये आजवर अनेक विद्यार्थ्यांनी नावलौकिक मिळवल्याबद्दल विद्यार्थ्यांचे व संस्थेचे कौतुक केले.

            सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर म्हणाले, विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सोयी-सुविधा उपलब्ध करुन देऊन त्यांना दर्जेदार शिक्षण देणे तसेच त्यांना आपल्या शैक्षणिक संस्थेत टिकवून ठेवणे हे आव्हान असते. विद्यार्थी हिताचे नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम तयार करुन त्यांना स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभे करणे महत्वाचे असते. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संस्थेत विविध चांगल्या संकल्पना व शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असल्याचे दिसून येते, असे त्यांनी सांगितले.

            कार्याध्यक्ष प्रा.डॉ.गजानन एकबोटे म्हणाले, दर्जेदार शिक्षण देण्यासाठी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न महाविद्यालयाने नेहमीच भर दिला आहे. भविष्यात या संस्थेचा आणखी विस्तार करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

            प्रास्ताविक संस्थेच्या सहकार्यवाह प्रा. ज्योत्स्ना एकबोटे यांनी केले. संस्थेच्या वाटचालीबाबत प्रा. डॉ. अंजली सरदेसाई यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली. आभार प्राचार्य डॉ. राजेंद्र झुंजारराव यांनी मानले. सूत्रसंचालन कार्यवाह प्रा. शामकांत देशमुख यांनी केले.

 

00000







                                       बारामती कृषी विज्ञान केंद्रामध्ये ‘कृषी तंत्रज्ञान सप्ताहास सुरुवात

उपलब्ध बाजारपेठेनुसार पिके घेऊन शेतीला चांगला दर्जा मिळवून देऊया

-ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार

 

            उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री दादाजी भुसे, मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री विश्वजित कदम यांची उपस्थिती

 

            पुणे,दि.१८:  उपलब्ध बाजारपेठेचा फायदा शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, असे सांगून उपलब्ध बाजारपेठेनुसार पिके घेऊन शेतीला चांगला दर्जा मिळवून देऊया, असे आवाहन ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी केले.

            बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये दि.18 ते 24 जानेवारी 2021 या कालावधीत "कृषिक" या कृषि तंत्रज्ञान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या कृषि तंत्रज्ञान  सप्ताहास आज ज्येष्ठ नेते तथा खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार  व अन्य मंत्री महोदयांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. यावेळी कृषिमंत्री दादाजी भुसे, मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, भारतीय अनुसंधान परिषदेचे महासंचालक त्रिलोचन मोहपात्रा(ऑनलाईन), राज्याचे कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त धीरजकुमार, उपसंचालक सुरेश चौधरी, ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट चे अध्यक्ष राजेंद्र पवार व सुनंदा पवार, बायर कंपनीचे डॉ. सुभाष जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट व सॉलिडारिडार, आशिया या संस्थांमध्ये करण्यात आलेल्या कराराच्या (एमओयु) प्रतीचे हस्तांतरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट या संस्थेच्या 50 वर्षातील वाटचालीविषयी बनविण्यात आलेल्या चित्रफितीचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

            खासदार शरद पवार म्हणाले, गहू, तांदळाच्या बाबतीत आपला देश स्वयंपूर्ण झाला आहे. बाजारपेठेनुसार शेती पिके घेतल्यास उत्पादनाला चांगला भाव मिळतो. यासाठी बाजारपेठेच्या मागणीनुसार विविध डाळी व फळपिकांचे उत्पादन देखील शेतकऱ्यांनी घ्यायला हवे.  शेतीसाठी 'पाणी' हा घटक महत्वाचा आहे. शेतीसाठी किती प्रमाणात आणि कशाप्रकारे पाण्याचा वापर करायचा याची माहिती शेतकऱ्यांना होणे आवश्यक असते. यादृष्टीने दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांवर 'कृषिक' सप्ताहाच्या माध्यमातून माहिती देण्यात आली, असे सांगून खासदार शरद पवार म्हणाले, ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विस्ताराचे काम दिवंगत आप्पासाहेब पवार यांनी केले, तर संस्थेत आधुनिकता आणण्यासाठी राजेंद्र पवार यांनी परिश्रम घेतले. संस्थेला 50 वर्षे पूर्ण होत असून  संस्थेच्या वाटचालीसाठी अनेक मान्यवरांचे सहकार्य मिळाल्याचेही खासदार श्री. पवार यांनी आवर्जून सांगितले.

 

शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद फुलविण्यासाठी राज्याचा कृषी विभाग प्रयत्नशील

-कृषी मंत्री दादाजी भुसे

              कृषी मंत्री दादाजी भुसे म्हणाले, बारामतीतील कृषी विज्ञान केंद्राद्वारे शेतकऱ्यांना शेतीविषयक नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती करुन दिली जात आहे. याच पद्धतीने राज्यातील अन्य भागातील शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने शेती उत्पादन व शेती तंत्रज्ञानाची माहिती करुन देण्यासाठी राज्यातील चारही कृषी विद्यापीठांमध्ये 'कृषी तंत्रज्ञान सप्ताह' सुरु होण्यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून प्रयत्नशील आहे. शेतकरी बांधवांच्या जीवनात आनंद फुलविण्यासाठी राज्याच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी अनेक महत्वपूर्ण योजना राबवण्यात येत आहेत. माती परीक्षण करुन त्या- त्या भागातील माती नुसार शेतीमध्ये खते वापरण्याबाबतचे फलक लावण्यात येत आहेत. यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास निश्चितच मदत होईल. महाडीबीटी पोर्टलवर एकाच अर्जाद्वारे कृषी विभागाच्या अनेक योजनांचा लाभ मिळवून देण्यात येत आहे, असे सांगून कृषी मंत्री दादाजी भुसे म्हणाले, शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्याच्या दृष्टीने "विकेल ते पिकेल" ही संकल्पना राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न ऐकून घेऊन ते गतीने सोडवण्यासाठी विविध कक्ष स्थापन करण्यात येत आहेत.

 कृषी मंत्री श्री. भुसे म्हणाले, शेतकऱ्यांबरोबरच राज्यातील शेतमजुरांना विविध कौशल्यांची माहिती देऊन कौशल्यावर आधारीत कुशल शेतमजुर बनवण्यासाठी कृषी विभागाच्यावतीने प्रयत्न करण्यात येत आहेत. कृषी विभागाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व उपक्रमांची माहिती त्यांनी यावेळी दिली.

            कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांनी सुरुवातीला कृषी विज्ञान केंद्राला भेट देवून शेतीविषयक विविध औजारे, तंत्रज्ञान व शेती उत्पादनांच्या प्रदर्शनाला भेट देऊन पाहणी केली. यानंतर डेअरी प्रकल्प केंद्राला भेट देऊन येथील विविध सोयी-सुविधांची पाहणी केली. यानंतर माळेगाव खुर्द येथील राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेला (एनआयएएसएम) भेट देऊन पाहणी केली. यावेळी खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार व अन्य मान्यवरांनी नियोजित सायन्स पार्कला भेट देऊन विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रात्याक्षिकांची पाहणी करुन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

 

दुष्काळ निवारण यंत्रणेचा आढावा

            राज्यात दुष्काळ निवारणाच्यादृष्टीने आवश्यक उपाययोजनांबाबत कार्यक्रमात तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. दुष्काळ निवारण यंत्रणेचा आढावा, भारतीय कृषी संशोधन परिषदेची दुष्काळ निवारण यंत्रणेशी प्रतिबद्धता, दुष्काळाची तीव्रता कमी करण्यासाठी भात, ऊस पिकांसाठी पाणी वाचवण्याच्या दृष्टीने लागवड तपासणी, दुष्काळ सूचक यंत्रणा, पुणे जिल्ह्यासाठी मृदा सर्वेक्षण व भूमी वापर नियोजन आदी विषयांवर  डॉ. सुहास जोशी, डॉ. हिमांशू पाठक, डॉ. सचिन नांदगुडे, डॉ. सुनील गोरांटीवार, डॉ. विवेक भोईटे, सारंग नेरकर, डॉ. बीएस द्विवेदी आदी तज्ञ मान्यवरांनी सादरीकरणाद्वारे मार्गदर्शन केले.

 

"कृषिक" कृषी तंत्रज्ञान सप्ताहाला सुरुवात

            राष्ट्रीय अजैविक स्ट्रेस प्रबंधक संस्था, अग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि बायर कंपनी यांच्या प्रयत्नातून हा कृषि तंत्रज्ञान सप्ताह  पार पडत आहे. दरवर्षीच्या कृषिक  प्रदर्शनातील प्रक्षेत्र भेटीसह  फूड प्रोसेसिंग, डेअरी टेक्नॉलॉजी, प्रक्रिया उद्योग, मार्केटिंग ब्रँडिंग आदी तंत्रज्ञानाचा यात समावेश आहे. याशिवाय वैशिष्ट्यपूर्ण  खाद्य पदार्थांच्या प्रक्रिया उद्योगांचे लाईव्ह डेमो पाहता येत आहेत. याठिकाणी कृषी तंत्रज्ञानासह  शेतीविषयक विविध प्रयोगांचा समावेश आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क, सॅनिटायझर आदी खबरदारी घेऊन याठिकाणी शेतकऱ्यांना प्रवेश देण्यात येत आहे.

0000000








Monday, January 18, 2021

 खेळ हा सर्वसामान्‍यांच्‍या जीवनशैलीचा भाग व्‍हायला हवा

                                             - केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री किरेन रिजिजू

 

            पुणे, दिनांक 18- खेळ हा सर्वसामान्‍यांच्‍या जीवनशैलीचा भाग व्‍हायला हवा, असे प्रतिपादन केंद्रीय क्रीडा कार्यक्रम आणि युवा मंत्रालयाचे राज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी केले.             

            म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलामध्‍ये खेलो इंडिया राज्य निपुणता केंद्राचे लोकार्पण झाले. त्‍यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार, राज्यमंत्री आदिती तटकरे, पिंपरी-चिंचवडच्‍या महापौर उषा ढोरे, खासदार गिरीश बापट, क्रीडा आयुक्‍त ओम प्रकाश बकोरिया यांची प्रमुख उपस्थिती होती.   

            राज्‍यमंत्री किरेन रिजीजू म्‍हणाले, देशात क्रीडा संस्‍कृती पुरातन कालापासून आहे. तिची जोपासना होण्‍याची गरज आहे. खेळ हा आपल्‍या जीवनशैलीचा भाग झाला पाहिजे. देशात आणि राज्‍यातही क्रिडा क्षेत्राची वाढ होण्‍यासाठी केंद्र शासनाच्‍यावतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. आजी आणि माजी खेळाडूंना आर्थिक मदत करणे, हाही त्‍या प्रयत्‍नांचा एक भाग आहे. महाराष्‍ट्राला क्रीडा क्षेत्रासाठी केंद्र शासन सर्वतोपरी मदत करेल,असेही त्‍यांनी सांगितले.

            राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार म्‍हणाले, राज्‍य शासन विद्यार्थ्‍यांमध्‍ये खेळांची आवड निर्माण व्‍हावी, 

म्‍हणून व्‍यापक प्रयत्‍न करत आहे. खेळ आणि खेळाडू यांच्‍या पाठीशी राज्‍य शासन खंबीरपणे उभे आहे. केंद्र शासनाने क्रीडा क्षेत्रासाठी भरीव मदत करावी, असे आवाहनही त्‍यांनी केले.

            राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी राज्‍य शासन क्रीडा क्षेत्रात राबवत असलेल्‍या योजनांची माहिती दिली. पुण्‍यातील शिवछत्रपती क्रीडा संकुलाने क्रीडा क्षेत्राच्या इतिहासात प्रभावशाली भूमिका बजावलेली आहे. १५१ एकर परिसरात वसलेल्या या क्रीडा संकुलाची सुरुवात १९९४ साली राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या निमित्ताने झाली, त्यानंतर सन २००८ मध्ये या संकुलातील क्रीडा सुविधांमध्ये भर घालून व अद्ययावत करुन, याठिकाणी तिसऱ्या राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्‍याचे त्‍यांनी सांगितले. याशिवाय या क्रीडा संकुलामध्ये ब्राझिलने विजेतेपद संपादन केलेल्या आंतरराष्ट्रीय कनिष्ठ गट पुरुष जागतिक अजिंक्यपद स्पर्धा, ग्रॅण्ड प्रिक्स, टेबल-टेनिस सर्किट स्पर्धा, आशियाई कॅडेट कुस्ती स्पर्धा, आशियाई बास्केटबॉल स्पर्धा (१६ वर्षाखालील मुली) आणि २०१९ मध्ये दुस-या खेलो इंडिया स्पर्धांचे यशस्वी आयोजन करण्यात आल्‍याचेही राज्‍यमंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.  

            कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक क्रीडा व युवक सेवा विभागाचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी तर आभार प्रदर्शन उपसंचालक सुधीर मोरे यांनी केले. यावेळी अंजली भागवत, राही सरनोबत, तेजस्‍वीनी सावंत, स्‍वरुप नारकर, विजय संतान, अनिल चोरमले आदींसह क्रीडापटू उपस्थित होते.

            पार्श्‍वभूमी- भारताच्या क्रीडा संस्कृतीत वाढ करणे, त्याद्वारे क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्टतेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी केंद्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाने भारतीय खेळ प्राधिकरणासह खेलो इंडिया ही योजना अंमलात आणलेली आहे. या योजनेद्वारे मुलांचा व तरुणांचा समग्र विकास, समुदाय विकास, सामाजिक एकता, लिंग समानता, निरोगी जीवनशैली, राष्ट्राभिमान आणि खेळाच्या विकासाशी संबंधित आर्थिक संधीद्वारे व खेळाच्या सामर्थ्यामुळे लोकसंख्येला याचा लाभ होऊ शकेल, हे उद्दिष्‍ट साधण्याचे ठरविलेले आहे. खेलो इंडिया योजनेंतर्गत  १ ऑक्टोबर, २०१७ च्या अधिसूचनेद्वारे भारत सरकारच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाने राज्यस्तरीय खेलो इंडिया केंद्रे अधिसूचित केलेली आहेत. याही पुढे जाऊन राज्यस्तरीय खेलो इंडिया केंद्र योजनेंतर्गत राज्य व केंद्र शासित प्रदेशातील पायाभूत क्रीडा सुविधांचा योग्य व इष्टतम वापर करण्याच्या दृष्टिने "खेलो इंडिया राज्य निपुणता केंद्र" स्थापन करण्याचे प्रस्तावित केलेले आहे.

            क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने "खेलो इंडिया राज्य निपुणता केंद्र" या योजनेसाठी ॲथलेटिक्स, सायकलिंग आणि शुटींग या खेळांची सन २०२४ व २०२८ चे ऑलिम्पिक डोळ्यासमोर ठेवून निवड केलेली असून, या खेळांमध्ये "खेलो इंडिया राज्य निपुणता केंद्र" राज्यासाठी उपलब्ध करुन देण्याबाबत प्रस्ताव केंद्र शासनास सादर केला. हा प्रस्ताव शिवछत्रपती क्रीडा संकुलातील उपलब्ध सुविधा पाहून केंद्र शासनाद्वारे मंजूर केला आहे. "खेलो इंडिया राज्य निपुणता केंद्र" हे राज्य शासनाच्या क्रीडा विभागामार्फत

चालविले जाणार असून, भारतीय खेळ प्राधिकरण या केंद्रासाठी क्रीडा विज्ञान केंद्र, 

क्रीडा मार्गदर्शन इत्‍यादी बाबींसाठी सहकार्य करणार आहे.

            या केंद्रासाठी ॲथलेटिक्स, सायकलिंग व शुटींग या खेळासाठी प्रत्येकी ३० प्रमाणे ९० खेळाडूंना प्रवेश दिल्या जाईल, या खेळाडूंच्या निवास व भोजनाचा खर्च राज्य शासनामार्फत करण्यात येईल. या केंद्रासाठी केंद्र शासनामार्फत आवर्ती खर्चांतर्गत क्रीडा मार्गदर्शक, सहाय्यक क्रीडा मार्गदर्शक, स्पोर्टस् सायन्स सेंटरसाठी कर्मचारी वर्ग, 

खेळाडूंना क्रीडा गणवेश व क्रीडा विषयक वैयक्तिक साहित्य, आवश्यक क्रीडा साहित्य पुरवठा करण्यासाठी निधी उपलब्ध होणार आहे. याशिवाय अनावर्ती खर्चामध्ये केंद्र शासनामार्फत स्पोर्टस् मेडिसीन सेंटर उभारणी करणे व शुटींग खेळाचे टारगेट सिस्टीम यासाठी निधी उपलब्ध होणार आहे. राज्य शासनास या केंद्रासाठी खेळाडूंच्या निवास व भोजन व्यवस्थेसाठीचा खर्च करावा लागणार आहे. या केंद्रासाठी केंद्र शासनामार्फत चार वर्षांसाठी आवर्ती खर्चासाठी ११ कोटी रुपये व अनावर्ती खर्चासाठी ५ कोटी रुपये इतकी रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे.

 

000000







  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेची राज्यस्तरीय बैठक पुणे जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्व...