Friday, February 12, 2021

 



उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेची राज्यस्तरीय बैठक

पुणे जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्वसाधारण आराखड्यात १५९.२२ कोटी रुपयांची वाढ

६८० कोटी रुपयांच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्वसाधारण प्रारुप आरखड्यास मंजुरी

ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यावर भर द्या

                                                                     -उपमुख्यमंत्री अजित पवार

            पुणे,दि. १२: जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्वसाधारण आराखड्यात आज १५९.२२ कोटी रुपयांची वाढ करुन पुणे जिल्ह्यासाठी एकूण ६८० कोटी रुपयांच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्वसाधारण प्रारुप आरखड्यास  राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी मंजूरी दिली. जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्वसाधारण प्रारुप आराखड्यासाठी ५२०.७८ कोटी रुपयांची मर्यादा ठरवून देण्यात आली होती, यात वाढ होवून ६८० कोटी रुपयांचा जिल्हा वार्षिक योजनेचा सर्वसाधारण प्रारुप आरखडा आज मंजूर करण्यात आला. जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून दर्जेदार कामे करावीत, असे सांगून ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यावर भर द्या, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी केल्या.

            उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज पुणे विभागातील पुणे,सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर या पाचही जिल्ह्यांची सन २०२१-२२ चा सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनांचा प्रारुप आराखडा अंतिम करण्यासाठी राज्यस्तरीय बैठक घेण्यात आली. पुण्यातील विधानभवन सभागृहात झालेल्या पुणे जिल्ह्याच्या बैठकीत जिल्ह्याच्या वार्षिक योजनांच्या प्रारुप आराखड्यावर चर्चा करुन मंजुरी देण्यात आली. यावेळी वित्त व नियोजन राज्यमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, आमदार सर्वश्री मुक्ता टिळक, सुनील शेळके, सुनील टिंगरे, दिलीप मोहिते, अतुल बेनके, अशोक पवार, अतिरिक्त मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रमकुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, उपायुक्त(नियोजन) राजेश तितर, जिल्हा नियोजन अधिकारी संजय मरकळ तसेच पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, जिल्हा वार्षिक योजनेचा निधी खर्च करुन उत्कृष्ट काम करणाऱ्या प्रत्येक महसूल विभागातील उत्कृष्ट जिल्ह्याला ५० कोटींचा अतिरिक्त निधी "आव्हान निधी" म्हणून देण्यात येईल. यासाठी निकष ठरवण्यात येणार असून त्यात आय-पास प्रणालीचा शंभर टक्के वापर करणे, जिल्हा नियोजन समितीच्या वेळेत बैठका घेणे

, प्रशासकीय मान्यता वेळेत देणे, अखर्चित निधी कमीत कमी ठेवणे, शाश्वत विकास ध्येयांबाबतची प्रगती, नाविन्यपूर्ण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे आदी बाबींचा आढावा विभागीय आयुक्त घेतील. यातून उत्कृष्ट जिल्ह्याची निवड करुन या जिल्ह्याला ५० कोटींचा "आव्हान निधी" देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

            उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, जिल्ह्यांच्या विकासासाठी असणारा निधी वेळेत खर्च होणे आवश्यक आहे.  या निधीतून कामे करताना कामांचा दर्जा चांगला ठेवा. कामे गतीने पूर्ण करा. शाळांच्या इमारतींचे बांधकाम, पाझर तलाव बांधकाम, पाणंद रस्त्यांची कामे उत्तम दर्जाची करा.

            ग्रामीण भागातील नागरिकांना त्याच ठिकाणी चांगल्या आरोग्य सुविधा मिळवून देणे आवश्यक आहे. यासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून ग्रामीण भागातील शासकीय रुग्णालयांमध्ये आवश्यक त्या सोयी-सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, अशा सूचना त्यांनी केल्या.

                विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे म्हणाल्या, जिल्ह्यात अष्टविनायकाची तीर्थक्षेत्रे आहेत. या तीर्थक्षेत्रांच्या मार्गावरील रस्त्यांची कामे होणे आवश्यक आहे. तसेच मुख्य रस्त्यांची कामे करताना स्वछतागृहांचे बांधकाम होणे गरजेचे आहे, यादृष्टीने संबंधित विभागांनी दक्षता घ्यावी.

                लोकप्रतिनिधींनी आवश्यक असणाऱ्या विकासकामांबाबत माहिती दिली.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जिल्ह्याची सर्वांगीण माहिती, विविध स्रोतांमधून प्राप्त होणारा निधी व प्रस्तावित असणाऱ्या जिल्हास्तरीय योजनांबाबत सादरीकरण केले.

 

000000000

Wednesday, February 10, 2021

 



जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या हस्ते ई-फेरफार सातबाऱ्याचे वाटप

            पुणे, दि.१०:- महसूल विभागाचे महाराजस्व अभियान हे महत्वाचे अभियान असून याअंतर्गत लोकाभिमुख प्रशासनाच्या संकल्पनेतून  मंडळ स्तरावर दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी फेरफार अदालती घेऊन जनतेच्या प्रलंबित साध्या/वारस/तक्रारी नोंदी निर्गत करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. फेरफार अदालतीत नोंद करण्यात आलेल्या जनतेच्या प्रलंबित तक्रारी निर्गत करुन ई-फेरफार  सातबाऱ्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या हस्ते वाटप करण्यात केले.

              जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी फेरफार अदालतीच्या राजगुरुनगर, खेड आणि मंचर येथील मंडळ अधिकारी कार्यालयास प्रत्यक्ष भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. यावेळी उपजिल्हाधिकारी संजय तेली, उप विभागीय अधिकारी विक्रांत चव्हाण, सारंग कोडलकर, तहसीलदार वैशाली वाघमारे, रमा जोशी यांच्यासह संबंधित मंडळातील मंडळ अधिकारी, तलाठी, कर्मचारी, शेतकरी उपस्थित होते.

             जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, फेरफार अदालतीत जनतेच्या नोंदीत प्रलंबित तक्रारी तातडीने सुनावणी घेऊन निर्गत करा. या माध्यमातून शेतकऱ्यांना सेवा तात्काळ उपलब्ध करुन द्या. कामाचा वेग वाढवून प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करण्याच्या जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी  सूचना दिल्या.

             शासनाची योजना यशस्वी होण्यासाठी नागरीकांचा सहभाग  खूप महत्त्वपूर्ण बाब आहे. त्यामुळे नागरिकांनी फेरफार अदालतीत जास्तीत जास्त प्रमाणात सहभागी व्हावे. महसूल विभागाच्या समन्वयाने आपल्या गावातील इतर नागरिकांना याबाबत माहिती देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले आहे.

***

Monday, February 8, 2021

 जीवनात चांगला मनुष्य होण्यासाठी योग एक उत्तम मार्ग-राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

 

स्वामी कुवलयानंद योग पुरस्कार २०२० वितरण समारंभ

 

पुणेदि. ८: संपूर्ण जग योगाकडे आकर्षित झाले आहे. मन नियंत्रित करण्यासाठी योगदर्शनशास्त्राची गरज आहे असे सांगून जीवनात चांगला मनुष्य होण्यासाठी योग एक उत्तम मार्ग असल्याचे मत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले.

            राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते लोणावळा येथील कैवल्यधाम योगा संस्थेच्यावतीने देण्यात येणारा स्वामी कुवलयानंद योग पुरस्कार २०२० चे वितरण करण्यात आले. अपर पोलीस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांना योगाच्या प्रोत्साहन व विकासासाठी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल तर योगाचार्या संध्या दिक्षीत यांना कैवल्यधाम योगा संस्थेतील सेवा व योगाच्या प्रसाराबद्दल सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले.  यावेळी कैवल्यधाम संस्थेचे अध्यक्ष महेशानंदसचिव ओमप्रकाश तिवारी
मुख्य कार्यकारी अधिकारी सुबोध तिवारी
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुखप्राध्यापक आर.एस. भोगल यांच्यासह संस्थेतील योगा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीविद्यार्थी उपस्थित होते.

         राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणालेमनुष्य जीवनात विचार करत असतांना त्याला कोणत्याही शिक्षणाची गरज नसते. मनुष्य जसा विचार करतो तसे त्याचे मन कार्य करते. त्यामुळे चांगले विचार करा व त्या विचारानुसार कृती करा. जीवनात वाटचाल करतांना जो मार्ग तुम्ही निवडाल तो मार्ग सत्य आहे असे समजून त्यानुसार कर्म करणे आपला अधिकार आहेअसे राज्यपाल श्री कोश्यारी यांनी म्हटले.

            अपर पोलीस महासंचालक डॉ. उपाध्याय म्हणालेयोग ही देशविश्व आणि संस्कृतीची ताकद आहे. योगामुळे शरीरमनचेतनांचा विकास होतो. वैद्यकीय विज्ञान क्षेत्रात योगाला महत्त्वाचे स्थान आहे. योग ही प्राणाची शक्ती आहेअसे डॉ. उपाध्याय यांनी म्हटले. योगाचार्या संध्या दिक्षीत यांनी पुरस्कार प्रदान केल्याबद्दल संस्थेचे आभार मानले.

              राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी संस्थेतील दार्शनिक साहित्य संशोधन विभागाच्या ग्रंथालयाची पाहणी करुन विभाग प्रमुख डॉ. राजेश्वर मुखर्जी यांच्याकडून ग्रंथालयाबाबत माहिती जाणून घेतली. त्यानंतर संस्थेतील परिसराची पाहणी केली तसेच स्वामी कुवलयानंद यांच्या समाधीचे दर्शन घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल त्रिवेदी यांनी केले तर आभार सुबोध तिवारी यांनी मानले.

*****













  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेची राज्यस्तरीय बैठक पुणे जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्व...