Saturday, December 24, 2016

शैक्षणिक, सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे मेट्रोचे काम गतीने पूर्ण होईल - पंतप्रधान नरेंद्र मोदी

शैक्षणिक, सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या
जाणाऱ्या पुणे मेट्रोचे काम गतीने पूर्ण होईल
                        - पंतप्रधान नरेंद्र मोदी

पुणे दि. २४ (विमाका) : पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत असतानाच भविष्याचा विचार करून २५ वर्षाचे नियोजन केले पाहिजे. पुणे हे सांस्कृतिक, शैक्षणिक व औद्योगिक राजधानी म्हणून देशात ओळखले जाते. येथील वाढती लोकसंख्या पाहता मेट्रो कार्यान्वित होणे आवश्यक होते. आज पुणेकरांचे स्वप्न पूर्ण होत असून मेट्रो प्रकल्पाचे काम अधिक गतीने सुरु करून कालमर्यादेत त्याचे काम पूर्ण होईल, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पुणे मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. त्यावेळी ते बोलत होते. शेती महाविद्यालयाजवळील मैदानावर हा कार्यक्रम झाला. यावेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरद पवार, पालकमंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री दिलीप कांबळे, पुण्याचे महापौर प्रशांत जगताप, पिंपरी-चिंचवडच्या महापौर शकुंतला धराडे, खासदार अनिल शिरोळे, श्रीरंग बारणे, शिवाजीराव आढळराव पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, ‘पुणे शहराची गेल्या काही वर्षात खूप मोठी वाढ झाली आहे. औद्योगीकरण आणि माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्राच्या विकासामुळे पुण्यात रोजगारासाठी देशभरातून लोक येतात. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा विकास होण्याची आवश्यकता आहे. पुणे मेट्रो हे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था विकसीत करण्यासाठी उचलले महत्वाचे पाऊल आहे.
पुणे मेट्रो प्रकल्प विविध कारणांमुळे रेंगाळला गेला पण केंद्रात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी सरकार असल्यामुळे पुणे मेट्रो प्रकल्पास मंजुरी देणे आणि आज या प्रकल्पाचे भूमिपूजन करणे शक्य झाले. मेट्रो  प्रकल्प गतीने पूर्ण करून पुण्याच्या विकासाला अधिक गती देऊ, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, देशात नागरीकरणाचा वेग अतिशय झपाट्याने वाढला आहे. शहरावरील ताण कमी होण्यासाठी गावांचाही विकास होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी रुर्बन अभियान राबवले जात आहे. यामुळे ग्रामीण भागात शहरातील सुविधा, संधी उपलब्ध होतील. त्याच बरोबर रोजगारांची संधीही वाढतील. यामुळे गावांकडून शहरांकडे येणाऱ्या नागरिकांचा लोंढा कमी होईल. विकासाचा विचार करताना तात्कालिक फायद्यांचा विचार न करता दूरगामी विकासाचा विचार करायला हवा.’
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, ‘देशातील केवळ शहरांचा विकास चाललेला नाही तर ग्रामीण भागांचाही विकास सुरु आहे. त्यासाठी देशातील अडीच लाख ग्रामपंचायती ऑप्टीकल फायबरने जोडल्या जाणार आहेत. आता विकासाच्या संकल्पना बदलत आहेत. त्यामुळे विकासाची परिमाणेही बदलण्याची आवश्यकता आहे.
निश्चलीकरण करण्याचा घेतलेल्या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या खात्यात मोठ्या प्रमाणात निधी जमा झाला आहे. त्यामुळे हा निर्णय योग्य ठरला असल्याचे सांगून  पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, देशातील काळे धन, भ्रष्टाचार आणि दहशतवादाविरुद्धची ही लढाई आहे. यापुढेही याबाबत अधिक कठोर निर्णय घेतले जातील. या निर्णयामुळे त्रास जरूर झाला पण, भविष्यात त्रास होणार नाही. ज्यांनी अद्यापही काळे धन लपवून ठेवले आहे, त्यांनी नियमांचे पालन न केल्यास त्यांना कठोर परिणामांना सामोरे जावे लागणार आहे.
पुण्यात माहिती तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे पुण्यात डिजिटल आणि कॅशलेस व्यवहार मोठ्या प्रमाणावर होतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, देशभरातील शहरांमध्ये पुणे आंतरराष्ट्रीय शहर आहे. जगभरातील उद्योजकांची गुंतवणुकीसाठी पुणे शहराला पहिली पसंती असते. पुणे शहर लवकरच स्टार्ट-अप कॅपिटल होणार आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी स्मार्ट सिटी सारख्या महत्वकांक्षी योजनेच्या अभियानाची सुरवात पुणे शहरापासून केली. पुणे शहराच्या औद्योगिक विकासासाठी पुरंदर येथे छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधण्यात येणार आहे, त्याच्या कामाला लवकरच सुरवात करण्यात येणार आहे. मेट्रोच्या माध्यमातून पुणे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारणार आहे.
आजचा दिवस हा महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा दिवस असून आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजाच्या स्मारकाचे भूमिपूजन झाले तर दुसरीकडे बऱ्याच वर्षापासून थांबलेले पुण्याच्या मेट्रोचे भूमिपूजनही पंतप्रधानांच्या हस्ते झाले आहे. येत्या मार्चपर्यंत शिवाजीनगर ते हिंजेवाडी मेट्रो मार्गालाही मंजुरी देऊन त्याचेही भूमिपूजन पंतप्रधानाच्या हस्ते करण्यात येणार आहे. पुणे शहराच्या जीवनवाहिनी असणाऱ्या मुळा आणि मुठा नद्यांच्या संवर्धनासाठी सरकारने ९०० कोटी रुपये दिले आहेत. या माध्यमातून या नद्यांचे पुनर्जीवन होणार आहे. पुणे शहराच्या विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध असून उत्तम असणाऱ्या पुण्याला सर्वोत्तम करणार असल्याची ग्वाही श्री. फडणवीस यांनी दिली.
केंद्रीय नगर विकास मंत्री व्यंकय्या नायडू आपल्या भाषणात म्हणाले, ‘भारताच्या परिवर्तनाला खऱ्या अर्थाने सुरवात झाली आहे. भ्रष्टाचार आणि काळे धन बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान विशेष प्रयत्न करत आहेत. देशातील प्रत्येक नागरिकाने पंतप्रधानांच्या या निर्णयामागे ठामपणे उभे राहिले पाहिजे. देशातील सामान्य जनता, गरीब तरुण, शेतकरी, स्त्रिया यांच्या विकासाला सरकारचे प्राधान्य आहे. पंतप्रधानांनी सुरु केलेल्या स्वच्छ भारत योजनेला जनआंदोलनाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या अभियानाचे व्याप्ती वाढून तन-मन व धनाचीही स्वच्छताही सुरु आहे. प्रत्येक योजनेत सामान्यांचा सहभाग वाढवण्यावर  सरकारचा भर आहे. पुणे मेट्रोच्या माध्यमातून पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक गतिमान होणार असून शहराच्या विकासाची ही सुरवात आहे.मुंबई नंतर पुणे हे राज्यातील सर्वात मोठे शहर आहे. या शहराच्या विकासासाठी केंद्र सरकार सर्वोतोपरी मदत करणार असल्याची श्री. नायडू यांनी सांगितले.
प्रास्ताविकात पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले, विद्येचे माहेरघर अशी ओळख असणाऱ्या पुण्याची ओळख आता विस्तारत आहे. औद्योगिक क्षेत्रातही पुणे अग्रक्रमावर आले आहे.पीएमआरडीएच्या माध्यमातून पुण्याचा सर्वांगीण विकास करण्यात येणार आहे. मेट्रोमुळे शहरातील सार्वजनिक वाहतुक व्यवस्था अधिक गतिमान होऊन त्याचा शहराच्या विकासावर सकारात्मक परिणाम होणार आहे. पंतप्रधानांच्या स्वच्छ भारत अभियानाला पुणे शहराने चांगला प्रतिसाद दिला असून या योजनेंतर्गत सर्वात जास्त शौचालय बांधण्याचा विक्रम झाला आहे. केंद्र सरकारच्या मदतीने विविध योजनांच्या माध्यमातून पुणे शहराचा चेहरा मोहरा बदलणार असल्याचे श्री. बापट यांनी सांगितले.
यावेळी खासदार सर्वश्री संजय काकडे, वंदना चव्हाण, अमर साबळे, आमदार सर्वश्री विजय काळे, भीमराव तपकीर, मेधाताई कुलकर्णी, माधुरी मिसाळ, योगेश टिळेकर, विजय काळे, लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, नीलमताई गोऱ्हे, राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त कुणाल कुमार आदी पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
000000





पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुणे विमानतळावर स्वागत


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुणे विमानतळावर स्वागत

पुणे, दि. २४ (वि.मा.का.): पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज सायंकाळी भारतीय हवाई दलाच्या विमानाने लोहगाव विमानतळावर आगमन झाले.
         यावेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान श्री. मोदी यांचे स्वागत केले. तसेच केंद्रीय नगरविकास व माहिती प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, आमदार जगदीश मुळीक, राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, लष्कराचे ले. जनरल पी. एम. हरतीज, एअर कमांडर ए. के. भारती, पोलीस महासंचालक सतीश माथूर, विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम, पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, जिल्हाधिकारी सौरभ राव यांनीही यावेळी श्री. मोदी यांचे  स्वागत केले.

0000000 

Tuesday, December 20, 2016

कॅशलेस व्यवहाराचे शासकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण

कॅशलेस व्यवहाराचे शासकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण

       पुणे, दि.20: सहसंचालक, लेखा व कोषागारे व कोषागार कार्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने लेखाकोषभवन येथील प्रशिक्षण हॉलमध्ये डिजिटल पेमेंटबाबत पुणे कोषागार कार्यालय अधिनस्त आहरण व संवितरण अधिकाऱ्यांसाठी व कर्मचाऱ्यांसाठी नुकतीच एक कार्यशाळा आयोजित करण्यात आली  होती. या कार्यशाळेमध्ये  सहसंचालक श्रीमती शुभांगी माने व जिल्हा कोषागार अधिकारी श्री.संजय राजमाने यांनी शासनाच्या कॅशलेस धोरणाचे  महत्व विषद केले. कॅशलेस व्यवहारात लोकसहभाग अत्यंत आवश्यक असल्याने सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांना प्रशिक्षित करुन त्याचा जास्तीत जास्त प्रचार व दैनंदिन कामकाजात वापर करण्याचे अहवाहन त्यांनी केले. कॅनरा बॅाकेचे शाखा प्रबंधक श्री . सतीश कुमार व बँकेचे प्रतिनिधी सुमित कुडकेलवार यांनी युनिफाई पेयमेंट विविध प्रकारची डेबीट कार्ड, क्रेडीट कार्ड व ई-वॉलेटबाबत बहुमोल मार्गदर्शन केले.
          कार्यक्रमाची सांगता करताना वरिष्ठ कोषागार अधिकारी संजय राजमाने यांनी  यापुढेही  अशा प्रकारच्या कार्यशाळा आयोजित करण्यात येतील असे सांगितले.

                                                   0000

अरबी समुद्रातील छत्रपतींच्या भव्य स्मारकाचे प्रधानमंत्र्यांच्या हस्ते २४ डिसेंबरला भूमिपूजन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन

अरबी समुद्रातील छत्रपतींच्या भव्य स्मारकाचे
प्रधानमंत्र्यांच्या हस्ते  २४ डिसेंबरला भूमिपूजन
सोहळ्यास उपस्थित राहण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन
 पुणे, दि.20 : मुंबईजवळच्या अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचे जलपूजन व भूमिपूजन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 24 डिसेंबरला होत आहे. या भूमिपूजन सोहळ्यासाठी राज्यातील जनतेने उपस्थित राहावे, असे आवाहन पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज पत्रकार परिषदेत केले.
राजभवनापासून जवळच असणाऱ्या समुद्रातील  बेटावर जगातील सर्वात उंच असे हे स्मारक असेल. हा कार्यक्रम अधिक संस्मरणीय ठरावा यासाठी राज्यातील सुमारे 70 हून अधिक प्रमुख नद्यांचे जल आणि गड किल्ल्यांवरची पवित्र माती या ठिकाणी आणली जाणार आहे.
 राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराजांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक मुंबई लगत अरबी समुद्रात उभारण्याचा निर्णय 2002 मध्ये घेतला, परंतु, त्याच्या उभारणीसाठी त्यानंतर फारशा हालचाली झाल्या नाहीत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ऑक्टोबर-2014 मध्ये राज्याची सुत्रे हाती घेतल्यानंतर तातडीने याबाबत कार्यवाही पूर्ण करून स्मारकाच्या कामास गती दिली.त्यानंतर सर्व परवानग्या तातडीने प्राप्त करण्यात आल्या. या स्मारकास राज्य व केंद्र शासनासह महापालिकेच्या विविध विभागाच्या परवानग्या आवश्यक होत्या. यामध्ये केंद्रीय पर्यावरण मंत्रालय, नौदल पश्चिम विभाग, तटरक्षक दल, सागरी किनारा अधिनियम,मुंबई पोलीस, मुंबई महानगरपालिका, बेस्ट, मुंबई पोर्ट ट्रस्ट, बी.एन.एच.एस.इंडिया,मत्स्यव्यवसाय विभाग,राष्ट्रीय सुरक्षा दल, दिल्ली, भारतीय विमानपत्तन प्राधिकरण अशा बारा विभागांची  ना हरकत प्रमाणपत्रे शासनास प्राप्त झाली आहेत.
आपल्या असामान्य कामगिरीने महाराष्ट्राची पताका जगभरात फडकवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्राच्या वतीने हे अनोखे वंदन असेल. महाराष्ट्राच्या तेजस्वी आणि गौरवशाली इतिहासाचे प्रतिबिंब या स्मारकाच्या माध्यमातून अनुभवता येणार आहे.  त्यामुळे प्रकल्पाचे अनोखे व विशिष्ट स्वरुप लक्षात घेऊन प्रकल्पाचा आराखडा, निविदा कागदपत्रे तयार करणे, प्रकल्पावर देखरेख करणे यासाठी दिनांक 11 एप्रिल 2016 रोजी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नेमणूक करून त्यानंतर प्रकल्प आराखडा मंजूर करण्यात आला आहे. 
या आंतरराष्ट्रीय प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यामध्ये 2300 कोटी रूपयांची  कामे प्रस्तावित आहेत. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा 192 मीटर उंचीचा पुतळा उभारण्याचे प्रारंभी नियोजन होते. आता या पुतळ्याची उंची 210 मीटर इतकी वाढविण्यासाठी पर्यावरण विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.  या स्मारकात  महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित कला दालन, प्रदर्शन  गॅलरी, महाराजांच्या चरित्रावर आधारित पुस्तकांचे सुसज्ज  वाचनालय, प्रेक्षक गॅलरी, उद्यान, हेलीपॅड, अति महत्त्वाच्या व्यक्तींसाठी व जनतेसाठी जेट्टी (धक्का), सुरक्षाविषयक व्यवस्थेचा समावेश आहे.
प्रकल्पासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धात्मक निविदा मागविण्यात आल्या असून 30 जानेवारीपर्यंत त्यांची स्वीकृती केली जाईल. त्यानंतर  19फेब्रुवारीपर्यंत कार्यादेश देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. काम सुरु झाल्यानंतर 36 महिन्यातच स्मारक पूर्ण करण्याचे सरकारचे नियोजन असून ते भावी पिढ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे. महाराजांची जीवनमूल्ये प्रदर्शित करणारे देशभक्तीपर माहिती केंद्रही या स्मारकात असेल. तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी पर्यटनस्थळ असणार आहे.
 तसेच 24 डिसेंबररोजी सायंकाळी 6 वाजता पुणे रेल्वे मेट्रोचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होत असल्याची माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली.
----०००-----





Monday, December 19, 2016

शहिद सौरभ फराटे यांच्या कुटुबियांचे मुख्यमंत्र्यांकडून सात्वन

शहिद सौरभ फराटे यांच्या कुटुबियांचे
मुख्यमंत्र्यांकडून सात्वन

            पुणे, दि. 19– जम्मू-श्रीनगर महामार्गावरील पाम्पोर शहराच्या काडलाबल भागात 17 डिसेंबर,2016 रोजी दुपारी लष्कराच्या वाहनांच्या ताफ्यावर दहशतवाद्यानी केलेल्या हल्ल्यात शहिद झालेले फुरसुंगी येथील भेकराई नगरातील गुरुदत्त कॉलनीतील रहिवासी जवान सौरभ नंदकिशोर फराटे यांच्या कुटुबियांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज त्यांच्या घरी जाऊन सांत्वन केले. यावेळी पालकमंत्री तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे त्यांच्या समवेत होते.
          मुख्यमंत्र्यांनी यावेळी फराटे कुटुबियांची आस्थेवाईकपणे चौकशी केली व शासन कुटुबियांच्या पाठीशी आहे असे सांगितले. मुख्यमंत्र्यांनी शहिद सौरभ फराटे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांना आदरांजली वाहिली. शहिद जवानाचे वडील नंदकुमार फराटे, आई मंगल नंदकुमार फराटे, पत्नी सोनाली सौरभ फराटे व भाऊ रोहित नंदकुमार फराटे यावेळी उपस्थित होते.
00000




  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेची राज्यस्तरीय बैठक पुणे जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्व...