Friday, December 28, 2018




जिल्हा प्राणी क्लेष प्रतिबंधक समितीची बैठक संपन्न

            पुणे,दि.28:- महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा-1976 ची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी शासनाने नियुक्त केलेल्या जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.शितलकुमार मुकणे, जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शिवाजी विधाते, समितीचे सदस्य उपस्थित होते.
            बैठकीत, शासनाचा प्राणी क्लेष प्रतिबंधक कायदा राबविण्याचा तसेच प्राण्यांच्या वाहतुकीत प्राण्यांना होणाऱ्या वेदना किंवा त्यांच्या बंदीस्त अवस्थेत त्यांना होणाऱ्या वेदना, कत्तलपूर्व अयोग्य पध्दतीने जनावरांना वाहनामध्ये भरणे व उतरविणे, वाहतुक करताना वाहनांमधून जनावरे खच्चून भरणे, कत्तलीकरता नेणाऱ्या जनावरांचे जाणीवपूर्वक हाल करणे, कत्तलगृहाजवळ कत्तलीपूर्वी जनावरांना उन्हातान्हात पाण्याशिवाय बांधून ठेवणे, अतिशय क्रुर पध्दतीने प्राण्यांना मारहाण करणे, जखमा देणे इत्यादी घटना घडू नये व घडल्यास त्यावर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करणे यावर चर्चा करण्यात आली. प्राणी क्लेष प्रतिबंधक कायद्याचे पालन सर्वांनी करावे, असे आवाहन यावेळी समिती सदस्यांनी केले. मांस व चर्मविषयक उद्योगांना प्राणी क्रुरता प्रतिबंधक कायद्याच्या तरतूदीबाबत सतर्क करुन जनजागृती करण्याची सूचना यावेळी समिती सदस्यांनी केली.
            बैठकीला विविध विभागांचे अधिकारी, समितीचे सदस्य उपस्थित होते.

००००

No comments:

Post a Comment

  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेची राज्यस्तरीय बैठक पुणे जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्व...