Sunday, April 30, 2017

जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबध्द - पालकमंत्री गिरीश बापट









पुणे, दि. 1 – आपदग्रस्त गावांचे पुनर्वसन करताना माळीणचा आदर्श डोळयासमोर ठेवण्यात येणार असल्याने ही बाब जिल्हा प्रशासनासाठी अभिमानास्पद आहे. पुणे, पिंपरी चिंचवड शहरासह जिल्ह्यातील प्रत्येक गावाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज येथे केले.
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 57 व्या वर्धापनदिनानिमित्त पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते पोलीस मुख्यालय, शिवाजीनगर येथे ध्वजारोहण झाले. त्यावेळी ते बोलत होते. पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर झालेल्या या कार्यक्रमास विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, जिल्हाधिकारी सौरभ राव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई, अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे उपस्थित होते.
पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले, पुणे आणि परिसराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली असून हे प्राधिकरण औद्योगिक गुंतवणुक, वाहतूक, नगर नियोजन आणि कौशल्य विकास अशा विविध क्षेत्रात प्रभावीपणे काम करीत असून स्मार्ट सिटी योजनेतील कामांना सुरुवात झाली आहे. शहराच्या विकास आराखडयाला मंजूरी मिळाल्यामुळे शहर व उपनगरामध्ये पुनर्विकासाला चालना मिळणार आहे. गेल्या वर्षी जिल्हयात सरासरीपेक्षा जास्त पर्जन्यमान झाल्यामुळे पिण्यासाठी व शेतीसाठी पुरेसा पाणी पुरवठा झाला असून पुणे शहर व ग्रामीण भागाला येणाऱ्या काळात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी नियोजन करण्यात आले आहे. स्वस्त धान्य दूकानांमध्ये प्रायोगिक तत्वावर पीओएस मशीनद्वारे धान्य वाटप सुरु करण्यात आले असून येणाऱ्या काळात सर्वच स्वस्त धान्य दूकानांमध्ये पीओएस मशीन बसविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सर्वांसाठी पाणी-टंचाईमुक्त महाराष्ट्र धोरणांतर्गत टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार योजनेच्या अंमलबजावणीमध्ये यावर्षीही जिल्हा अग्रेसर राहील, असा विश्वास पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केला.
तत्पुर्वी पालकमंत्री गिरीश बापट यांना मानवंदना देण्यात आली. पुणे शहर पोलीस, ग्रामीण पोलीस, राज्य राखीव पोलीस दल, नागरी संरक्षण दलाच्या पथकांनी शानदार संचलन करून पालकमंत्री बापट यांना मानवंदना दिली. यावेळी माळीण गावाच्या पुनर्वसनामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तत्कालीन निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, उपविभागीय अधिकारी दत्तात्रय कवितके, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे, तलाठी नितीन चौरे यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही गौरविण्यात आले.
यावेळी खासदार अमर साबळे, महापौर मुक्ता टिळक, राज्य माहिती आयुक्त रवींद्र जाधव,जमाबंदी आयुक्त एस.चोक्कलिंगम, कृषी आयुक्त विकास देशमुख, यशदाचे महासंचालक आनंद लिमये यांच्याबरोबरच स्वातंत्र्यसैनिक, विविध विभागाचे अधिकारी, पदाधिकारी, समाजाच्या विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.
दरम्यान, सकाळी सात वाजता जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या हस्ते शनिवार वाडा येथे ध्वजारोहण झाले. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे तसेच विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते.
000

  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेची राज्यस्तरीय बैठक पुणे जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्व...