Sunday, February 24, 2019

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा राज्यात शुभारंभ अल्पभूधारक शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळणार ... केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री प्रकाश जावडेकर


         पुणे,दि.24-: शेतकरी जगला की शेतमजूर जगेल, शेतमजूर जगला की बारा बलुतेदार जगतील, बारा  बलुतेदार जगले की ग्रामीण अर्थव्यवस्था उभी राहते. यासाठी अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या सर्वांगिण विकास आणि उन्नतीसाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली असून त्याद्वारे शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज येथे केले.
            लागवडीलायक धारण क्षेत्र दोन हेक्टरपर्यत असलेल्या अल्पभूधारक शेतकरी कुटुबियांना दोन हजार रुपये प्रती हप्ता याप्रमाणे तीन हप्त्यात सहा हजार रुपयांची मदत देणाऱ्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा शुभारंभ केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याहस्ते मध्यवर्ती सहकारी बँकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात झाला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, कृषी व फलोत्पादन सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर, कृषी आयुक्त्‍ सुहास दिवसे, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे उपस्थित होत्या.
            यावेळी श्री.जावडेकर म्हणाले, शेतजमीन मृदा आरोग्य पत्रिका, शेतकऱ्यांना निम कोटींगनेयुक्त युरियाचा पुरवठा, सहकारी बँकांच्या माध्यमातून शेतीसाठी मुबलक कर्ज पुरवठा, शेतमालाला किफायतशीर भाव, शेतीसाठी पूरेसा पाणी पुरवठा तसेच प्रधानमंत्री पीक विमा योजना, केंद्र व राज्य शासन शेतकऱ्यांसाठी राबवित असलेल्या विविध विकास योजनांमुळे शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ होणार असून तो कर्जबाजारी होणार नाही. त्यामुळे भविष्यात शेतकऱ्याला कर्जमाफीची गरजच पडणार नाही. स्वातंत्र्योत्तर काळातील शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठीची ही सर्वात मोठी योजना असल्याचेही त्यांनी सांगितले.
            महसूल मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, छोटया शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण करणारी ही योजना असून, महाराष्ट्रातील सुमारे एकोणसत्तर लाख अल्पभूधारक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात 70 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपये जमा होणार आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना तीन हप्त्यामध्ये एकूण 4 हजार 200 कोटी रुपयांचा लाभ मिळेल अशी माहिती त्यांनी दिली. योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तर, जिल्हास्तर, तालुकास्तर व ग्रामस्तरावर संनियंत्रण समित्या गठीत करण्यात आल्या आहेत.
            कृषी व फलोत्पादन सचिव एकनाथ डवले यांनी प्रास्ताविकात योजनेची माहिती दिली. तलाठी यांच्या मदतीने लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात येणार असून, ग्रामसेवक व कृषी सहायक याकामी सहकार्य करणार आहेत. योजना सुटसुटीत असून यासाठी, आधार क्रमांक व बँक खाते क्रमांक आवश्यक असल्याचे सांगितले. मानव संसाधन मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याहस्ते यावेळी प्रतिनिधीक स्वरुपात चौदा लाभार्थी शेतकऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला शेतकरी, कृषी क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
000






             
             
           
           




Saturday, February 23, 2019









कार्यशैलीला तंत्रज्ञानाची जोड द्यावी
                                                             -पालकमंत्री गिरीश बापट

 पुणे, दि.23- प्रशासकीय कामकाज अधिक  गतिमान व कार्यक्षम होण्यासाठी आपल्या कार्यशैलीला तंत्रज्ञानाची जोड देणे आवश्यक असल्याचे मत  अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक सरंक्षण, अन्न वऔषध प्रशासन, संसदीय कार्य मंत्री तथा पुणे जिल्हयाचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले.
 येथील जिल्हाधिकारी कार्यालयात गृहशाखा ऑनलाईन प्रणाली उद्घाटन, उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी यांचा गुणगौरव व जिल्हा नियोजन समिती नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत तलाठयांना लॅपटॉप वितरण समारंभ कार्यक्रम पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास जिल्हाधिकारी नवल किशोर राम, अपर जिल्हाधिकारी रमेश काळे, उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, निवासी उप जिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, ई फेरफार प्रकल्प समन्वयक रामदास जगताप, जिल्हा नियोजन अधिकारी प्रमोद केंभावी आदी उपस्थित होते.
  श्री. बापट पुढे म्हणाले की, प्रशासकीय कामामध्ये चांगले काम करणाऱ्या  अधिकारी, कर्मचारी यांच्या कामाचे कौतुक हे केलेच पाहिजे. आपण अनेक चांगली कामे केलेली आहेत. आपल्या कार्यालयाची प्रतिमा चांगली ठेवण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारी ओळखून काम केले पाहिजे. सर्वांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे. आधुनिकीकरणाचा फायदा करुन घेतला पाहिजे. कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची मानसिकता ओळखून त्यास सन्मानाची वागणूक देऊन काम करा. यावर कार्यालयाची प्रतिमा अवलंबून असते. आपणास काम करण्यास लागणाऱ्या साहित्याची पूर्तता केली जाईल. आपण अशीच चांगली सेवा द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या.
  जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले की,  शासनासाठी महसूल विभाग हा महत्त्वाचा असून  पुणे जिल्हा हा सातबारा संगणकीकरणाच्या कामात पुढे आहे. महसूल  विभागातील अधिकारी, कर्मचारी हे नेहमी आपले काम वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतात.  महसूल विभागात आपली भूमिका महत्त्वाची असून आपणावर कितीही ताणतणाव असला तरी  आपण आपली मानसिकता सकारात्मक ठेवून प्रत्येक नागरिकासोबत चांगले वागणे गरजेचे आहे. यापुढेही आपण अधिक चांगले काम करुन दाखवू, असेही ते शेवटी म्हणाले.
 यावेळी  पालकमंत्री  गिरीश बापट यांच्या हस्ते  एकूण 39 गुणवंत कर्मचारी यांचा प्रशस्तीपत्रक देवून सन्मान केला तर  एकूण 16 तलाठी कर्मचाऱ्यांना लॅपटॉपचे वितरण करण्यात आले.
 कार्यक्रमाचे प्रास्ताविक अपर जिल्हाधिकारी  रमेश काळे यांनी  तर  निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
0000


Friday, February 22, 2019





जिल्हाधिकारी राम यांच्याकडून मतदान केंद्राची पहाणी
       पुणे दि.22:-आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासनाची तयारी सुरु झाली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज पुणे शहरातील २१५ कसबा विधानसभा मतदारसंघातील श्रीमती सावित्रीबाई फुले इंग्रजी माध्यम शाळा, रफीक अहमद किडवाई ऊर्दू माध्यमिक विद्यालय  या मतदान केंद्रांना भेट देऊन तेथील प्राथमिक सुविधांची पाहणी केली. मतदान केंद्र, दिव्यागांसाठी सोयी आदींचा आढावा घेतला.
            यावेळी पोलीस आयुक्त डॉ.के.वेंकटेशम, उप विभागीय अधिकारी भाऊसाहेब गलांडे, झोनल अधिकारी अविनाश घोडके, मंडल अधिकारी प्रमोद साळी, तलाठी एस.एन.नांगरे, अजिंक्य वनशिव, सौरभ शिरसाठ, बाळासाहेब आखाडे, सतीश देशमुख आदि उपस्थित होते.
00000

Monday, February 11, 2019


लोकराज्यच्या फेब्रुवारी अंकाचे नोंदणी महानिरीक्षक

अनिल कवडे यांच्याहस्ते विमोचन



            पुणे दि. 11 :-  माहिती जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात येणाऱ्या  लोकराज्य मासिकाच्या फेब्रुवारी,2019 च्या अंकाचे विमोचन राज्याचे नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक अनिल कवडे यांच्याहस्ते येथील नवीन प्रशासकीय भवन येथे आज झाले. यावेळी माहिती उपसंचालक मोहन राठोड, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, नोंदणी विभागाचे राजेंद्र हिंगणे, सहायक संचालक श्रीमती वृषाली पाटील, माहिती सहायक जयंत कर्पे उपस्थित होते.

            नागरिकांच्या सोईसाठी नोंदणी मुद्रांक विभागातर्फे विविध योजना डिजीटल तंत्रज्ञानाद्वारे ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहेत. यामुळे दस्त नोंदणीची कामे सुलभ होणार असल्याने नागरिकांनी या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन नोंदणी महानिरीक्षक अनिल कवडे यांनी याप्रसंगी केले. नोंदणी विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या -सेवांविषयी नागरिकांना प्रोत्साहित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

            शासनाच्या विविध योजनांची माहिती तसेच स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी लोकराज्य उपयुक्त असल्यामुळे विद्यार्थी व अभ्यागतांनी वार्षिक वर्गणी भरुन अंक प्राप्त करण्याचे आवाहन माहिती उपसंचालक मोहन राठोड यांनी यावेळी केले. सुरक्षित कागदपत्रे-सुरक्षित समाज,गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार, स्वच्छता हीच सेवा, नवे तंत्र-गतिमान विकास, शेती विकासाचा डिजीटल अध्याय यासह अन्य विषयांवर या अंकामध्ये माहिती प्रसिध्द करण्यात आली आहे.

            शासनाचे मुखपत्र असलेले लोकराज्य हे मासिक शहरातील तसेच जिल्ह्यातील बुकस्टॉलवर उपलब्ध आहे. लोकराज्य मासिकाच्या वार्षिक वर्गणीसाठी जिल्हा माहिती कार्यालय,  तळ मजला, नवीन मध्यवर्ती इमारत, पुणे दूरध्वनी क्रमांक 020-26121307 येथे वार्षिक वर्गणी भरुन लोकराज्यचा अंक घरपोच पोस्टाद्वारे पाठविण्याची सुविधा उपलब्ध आहे.

00000

Tuesday, February 5, 2019


एकही मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही

याची दक्षता घ्यावी - डॉ.दिपक म्हैसेकर

विभागीय आयुक्तांनी साधला मतदारांशी संवाद



            पुणे,  दिनांक 5 : मतदारांचे पत्ता बदल तसेच नवीन मतदारांची नोंदणी याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करुन एकही मतदार  मतदानापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ.दिपक म्हैसेकर यांनी दिल्या.

            जुन्या जिल्हा परिषदेच्या इमारतीमध्ये असलेल्या हडपसर व पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या कार्यालयास आज विभागीय आयुक्तांनी भेट देवून लोकसभा निवडणूक 2019 च्या मतदार यादीबाबत आढावा घेवून सूचना केल्या.

            मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी असलेल्या फॉर्म नं.6 बाबत मतदारांना योग्य रितीने मार्गदर्शन करावे. मतदारांचा पत्ता बदलला असल्यास त्याबाबत त्याची नोंद घेण्याबरोबरच एकही मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही याची योग्य ती काळजी घ्यावी, अशा सूचना यावेळी विभागीय आयुक्तांनी केल्या.

            उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, तहसिलदार कल्पना ढवळे, नायब तहसिलदार श्रीमती रोहिणी घाडगे, प्रशांत कसबे बैठकीस उपस्थित होते. यावेळी डॉ. म्हैसेकर यांनी नागरिकांशी संवाद साधून मतदार यादी बाबत त्यांना मार्गदर्शन केले.

0000






  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेची राज्यस्तरीय बैठक पुणे जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्व...