Wednesday, January 2, 2019




लोकसंवाद उपक्रमाद्वारे मुख्यमंत्र्यांनी साधला लाभार्थ्यांशी संवाद

            पुणे,दि.2 :- शासनाच्या विविध योजना गरजूंपर्यंत पोहचल्यानंतर त्यातून होणारा लाभ, येणाऱ्या अडचणी आणि आवश्यक सुधारणा याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसंवाद उपक्रमाच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांशी थेट संवाद साधून घेतली.
            केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची राज्यात यशस्वीपणे अंमलबजावणी सुरु आहे. नागरी व ग्रामीण भागात प्रधानमंत्री आवास योजना, उन्नत शेती-समृद्ध शेतकरी योजना, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, मागेल त्याला शेततळे, गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार, स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, सूक्ष्म सिंचन आणि मृदा परीक्षण सारख्या योजना अधिक गतीने लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी राज्य शासनाचे प्रयत्न सुरु आहेत. गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध जिल्ह्यांमध्ये आणि मंत्रालयातही या योजनांचा आढावा घेतला आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयातील व्हीडीओ कॉन्फरन्स प्रणालीद्वारे लाभार्थ्यांशी थेट संवाद साधून योजनेच्या अंमलबजावणीची माहिती घेतली.
            मुख्यमंत्र्यांशी थेट संवाद साधताना, विविध जिल्हयातील लाभार्थ्यांनी प्रधानमंत्री आवास योजनेद्वारे घरकुलाचा लाभ मिळाला त्यामुळे घराचा भक्कम आधार मिळाला, कच्च्या व कौलारु घरांऐवजी स्लॅबचे पक्के घर मिळाले त्यामुळे घरातील सदस्यांचे आरोग्य सुधारले, मातीच्या घरात पावसाळयात पाणी गळणे, थंडीत गारठा आणि उन्हाळयात उन्हाचा त्रास होत असे मात्र पक्क्या घरकुलामुळे घराचे स्वप्न साकार झाले आणि हा सर्व त्रास कमी झाल्याची भावना यावेळी व्यक्त केली.
            घरकुलाच्या बांधकामात वाळूची अडचण येऊ नये यासाठी, लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळू उपलब्ध करुन देण्यात येईल आणि सर्वांना घरे मिळेपर्यत ही योजना राबविण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. या लोकसंवाद उपक्रमामध्ये राज्यातील विविध जिल्हयातील लाभार्थी सहभागी झाले होते. नागपूर, ठाणे, नाशिक व लातूर जिल्हयातील ग्रामीण भागातूनही लाभार्थ्यांनी थेट संपर्काद्वारे या उपक्रमामध्ये सहभाग घेतला.
००००


No comments:

Post a Comment

  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेची राज्यस्तरीय बैठक पुणे जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्व...