Friday, September 25, 2020

 




कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणा-या रुग्णालयांनी जादा दर आकारल्यास कारवाई

माझे कुटुंब,माझी जबाबदारी मोहिम प्रभावीपणे राबवा

                                                                                     - उपमुख्यमंत्री अजित पवार

            पुणे,दि. 25 : कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी रूग्णालयांनी आकारावयाच्या दरासंबंधी यापूर्वीच शासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे कुठल्याही रूग्णालयाने त्याहून जादा दर आकारू नये. असा प्रकार झाल्याचे आढळताच संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, तसेच औषधांचाही काळाबाजार करणा-यांवरही कारवाई करण्यात येईल असा इशारा उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिला. माझे कुटुंब,माझी जबाबदारी मोहिमे अंतर्गत कोरोनाचे निदान होवून वेळेत उपचार करणे सुलभ होणार असल्याने ही मोहित अत्यंत प्रभावीपणे राबवा, असे निर्देशही त्यांनी दिले.

          विधानभवन सभागृहात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे, पिंपरी चिंचवड महानगरासह जिल्हयातील कोरोना परिस्थितीचा आणि उपाययोजनांचा आढावा घेतला. बैठकीला राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील, सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम वगळून) मृद व जलसंधारण, पदुम, वने, सामान्य प्रशासन विभागाचे  राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, खासदार श्रीरंग बारणे, आ. माधुरी मिसाळ, आ. चेतन तुपे, आ. सुनिल शेळके, आ.सिद्धार्थ शिरोळे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश,  पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, शांतनू गोयल,  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, डॉ. सुभाष साळुंखे, ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे  तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

           उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' ही अत्यंत महत्वाकांक्षी मोहिम सुरू केली आहे. घरोघरी जावून या मोहिमे अंतर्गत प्रत्येक कुटुंबाची आरोग्याच्या दृष्टीने तपासणी होणार आहे, या मोहिमेमुळे कोरोनाचे पूर्वनिदान होण्यास मदत होणार आहे, यातून रुग्णाला वेळेपूर्वीच उपचार मिळतील व रुग्ण लवकर बरा होईल, त्यामुळे माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिम प्रभावीपणे राबवा, असे निर्देशही त्यांनी दिले.

         कोरोना आजारातून बरे झालेल्या रुग्णांसाठी इतर आवश्यक उपचाराबाबतही दक्षता घेण्याच्या सूचना करून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोनाबाधितांची वाढती संख्या विचारात घेत उपचारासाठीच्या सुविधांही सातत्याने वाढविण्यात येत आहेत. कोरोनाच्या संसर्गाचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखून मास्कचा वापर, सुरक्षित अंतर व स्वच्छता या त्रिसूत्रीचा अवलंब करावा.  कोरोनाला कुणीही सहजपणे घेऊ नये. या साथीवर मात करण्यासाठी आपली जबाबदारी लक्षात घेत माझे कुटुंब, माझी जबाबदारीमोहिम यशस्वी करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

                                                    

            महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी पुणे महानगरपालिकाही सातत्याने उपचार सुविधांमध्ये वाढ करते आहे. जम्बो रुग्णांलयामध्येही उपचार सुविधा वाढविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

            विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी कोरोना स्थिती, उपाययोजनांची माहिती दिली. पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पुणे महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना संसर्गाबाबतची स्थिती, उपाययोजनांची माहिती दिली.

                      जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आयुष प्रसाद तसेच उपस्थित प्रमुख अधिकाऱ्यांनी कोरोना नियंत्रणासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. यावेळी प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

0000

 





जलसंपदा विभागाच्या कामांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा

 

          पुणे दि.25: जिल्हयातील जलसंपदा विभागाच्या विविध कामांचा उपमुख्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज आढावा घेतला.


         पुण्यातील विधानभवन सभागृहात झालेल्या या बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी- चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डिकर, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, पाटबंधारे विभागाचे सेवानिवृत्त सचिव अविनाश सुर्वे, मुख्य अभियंता हनुमंत गुणाले, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता सुभाष भुजबळ, पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता संजीव चोपडे, तसेच पाटबंधारे व  महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

           उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, नीरा डावा कालव्यावरील वितरण प्रणालीचे विशेष दुरुस्ती प्रस्ताव तसेच शेटफळ तलाव धरण व कालव्याच्या कामाचे प्रस्ताव निधीसाठी राज्य शासनाकडे सादर करावेत. नीरा डावा मुख्य कालव्यातून होणारी पाणीगळती थांबविण्यासाठी या कालव्याच्या अस्तरीकरण व दुरुस्तीच्या कामाचा प्रस्ताव तातडीने सादर करा. नीरा नदीवरील कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्याच्या जीर्ण झालेल्या दगडी बांधकामांचे काँक्रेटीकरण करुन बांधकामे मजबूत करावीत, असे सांगून इंदापूर तालुक्यातील जुन्या शासकीय इमारती, कार्यालये व विश्रांतीगृहाच्या इमारतीच्या दुरुस्तीची कामेही हाती घ्यावीत, अशा सूचना करुन मुळशी धरण प्रकल्पातून नागरिकांना शेती, आणि पिण्यासाठी दोन टीएमसी वाढीव पाणी मिळण्यासाठी तसेच कोळवण खोऱ्यातील शेतीसाठी पाणी उपसा योजना राबविण्यासाठी सुर्वे समितीने लवकरात लवकर अहवाल सादर करावा, असेही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी यावेळी सांगितले.

          राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यातील नागरिकांना पुरेसे पाणी मिळवून देण्यासाठी अपूर्ण कामे लवकरात लवकर पूर्ण करावेत. भागाचे सेवानिवृत्त सचिव अविनाश सुर्वे, मुख्य अभियंता हनुमंत गुणाले, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता सुभाष भुजबळ, पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता संजीव चोपडे यांनी पाटबंधारे विभागातील कामांच्या प्रश्नांबाबत तसेच विविध प्रकल्पांबाबत माहिती दिली.

0000

 


चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे काम गतीने मार्गी लावा

                                  उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

 

          पुणे दि.25: नागरिकांच्या वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्याबरोबरच वेळेची बचत होण्याच्या दृष्टीने चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे काम गतीने मार्गी लावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले.

         

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पहाटे मेट्रोच्या कामाची पाहणी केल्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयात सकाळी आठ वाजल्यापासून पुणे जिल्हयातील विकासकामांचा आढावा घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या. यावेळी  विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी- चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डिकर, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक एस.डी.चिटणीस, सैन्य दल तसेच सबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

           उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, नागरिकांच्या सोयीसाठी चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण होणे आवश्यक आहे. यासाठी शासनाकडून आवश्यक तो निधी पुरविला जाईल, तथापि दोन्ही महानगरपालिका व महसूल विभागाने भूसंपादनाची कामे तातडीने पूर्ण करावीत. तसेच या परिसरातील सुशोभिकरणाच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या परवानग्या महानगरपालिका व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मिळवून द्याव्यात. चांदणी चौकाची सुधारणा करण्याच्या कामात  अडचण येऊ नये यासाठी सबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याच्या  सूचनाही यावेळी उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी दिल्या.

        नाशिक रोडवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी नाशिक  फाटा ते मोशी रस्ता रुंदीकरण काम लवकरात लवकर पूर्ण करावे, असे सांगून  यामार्गावरील  मेट्रोचा समावेश करण्यात येत असल्यामुळे त्या अनुषंगाने भूसंपादनासह अन्य कामे जलद गतीने पूर्ण करावीत,असे ही ते म्हणाले.

        विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी- चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डिकर, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक एस.डी.चिटणीस यांनी कामांच्या सद्यस्थितीची माहिती दिली.

0000

Thursday, September 24, 2020

 




उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहाटे सहा वाजता केली पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी

पुणे स्टेशन, व्हील पार्क डेपो, शिवाजीनगर येथील कामाची पाहणी

 

          पुणे दि.25:  उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज पहाटे सहा वाजता  पुणे स्टेशन येथे जावून प्रत्यक्ष कामाची पाहणी केली. मेट्रोचे काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी यंत्रणेला दिल्या.

         उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुणे स्टेशन, व्हील पार्क डेपो( वनाज), शिवाजीनगर कृषी महाविद्यालय येथे पाहणी करून मेट्रोच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी मेट्रोच्या सुरू असलेल्या कामाबाबत सविस्तर माहीती दिली.



        उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवाजीनगर येथे मॉडेल  ट्रेनने प्रवास केला.  शिवाजीनगर येथे बोगदा काम,  व्हील पार्क येथील कचरा डेपोचे अत्याधुनिक मेट्रो डेपोमध्ये रूपांतर करण्यात आले आहे, येथील कामाचीही उपमुख्यमंत्री पवार यांनी पाहणी केली. मेट्रोच्या रेणू गेरा यांनी या मेट्रो डेपो उभारणीबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी मेट्रोचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

0000

Sunday, September 20, 2020

 महाराष्‍ट्र गुप्‍तवार्ता प्रबोधिनीस सर्वतोपरी मदत - गृहमंत्री अनिल देशमुख

 

          पुणे, दिनांक 20- महाराष्‍ट्र गुप्‍तवार्ता प्रबोधिनी ही राज्‍यातील एकमेव प्रशिक्षण संस्‍था असून इथे आवश्‍यक त्‍या सोयी-सुविधा निर्माण करण्‍यासाठी राज्‍य शासन मदत करेल, अशी ग्‍वाही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. प्रबोधिनीला भेट दिल्‍यानंतर त्‍यांनी प्रशिक्षणार्थ्‍यांशी संवाद साधला. त्‍यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास राज्‍य गुप्‍तवार्ताचे आयुक्‍त आशुतोष डुंबरे, संचालक प्रदीप देशपांडे आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

            गृहमंत्री देशमुख म्‍हणाले, पहिल्‍यांदाच या प्रबोधिनीला भेट देण्‍याचा योग आला. कोणत्‍याही राज्‍यात अशी संस्‍था नाही, क्‍त महाराष्‍ट्रात आहे. नामवंत प्रशिक्षकांकडून येथील प्रशिक्षणार्थ्‍यांना गुप्‍तवार्ताचे अद्ययावत प्रशिक्षण दिले जाते. येथे राष्‍ट्रीय स्‍तरावरील प्रशिक्षण संस्‍थेसारख्‍या सोयीसुविधा निर्माण व्‍हाव्‍यात, यासाठी राज्‍य शासनाचे संपूर्ण सहकार्य राहील.

          


प्रत्‍येक राज्‍यात खालपासून वरपर्यंत गुप्‍तवार्ता यंत्रणा आवश्‍यक आहे. अस्थिरता निर्माण करु पाहणा-या शक्‍ती बॉम्‍बस्‍फोटासाठी ड्रोनसारख्‍या वेगवेगळया तंत्रज्ञानाचा वापर करत असतात. अशा गोष्‍टींवर वेळेपूर्वी मात करणे आवश्‍यक आहे, त्‍यासाठी गुप्‍तवार्ता यंत्रणा सक्षम असणे गरजेचे आहे. येथे प्रशिक्षण घेतलेले अधिकारी भविष्‍यात राज्‍याची आणि देशाची सेवा करतील, अशी आशा गृहमंत्री देशमुख यांनी व्‍यक्‍त केली.

            राज्‍य गुप्‍तवार्ताचे आयुक्‍त आशुतोष डुंबरे यांनी संस्‍थेच्‍या प्रशिक्षणाची माहिती दिली. संचालक प्रदीप देशपांडे यांनी येथे देण्‍यात येणा-या प्रशिक्षणाच्‍या आराखड्यात काळानुरुप बदल केले जात असून राष्‍ट्रीय स्‍तरावरील तज्ञ, प्रशिक्षक येऊन मार्गदर्शन करत असल्‍याचे सांगितले. सूत्रसंचालन  विजय पळसुले यांनी केले. यावेळी प्रशिक्षणार्थ्‍यांसह पोलीस अधिकारी उपस्थित होते.  

            गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्‍य राखीव पोलीस बलाच्‍या कार्यालयास भेट देवून अधिका-यांशी चर्चा केली. पोलीस उप महानिरीक्षक नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलीस महासंचालक अर्चना त्‍यागी, समादेशक निवा जैन यांच्‍यासह इतर अधिकारी उपस्थित होते. तत्‍पूर्वी गृहमंत्री देशमुख यांनी शहीद स्‍मारकास पुष्‍पचक्र वाहून आदरांजली अर्पण केली.

0000

 




Friday, September 18, 2020

 




'कमवा व शिका' योजनेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नियुक्ती आदेश प्रदान

 

            पुणे दि.18:- पुणे जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या 'कमवा व शिका' या नाविन्यपूर्ण योजनेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना उपमुख्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नियुक्ती आदेश देण्यात आले.

            विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात झालेल्या या कार्यक्रमास सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे,  जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, आमदार सुनिल शेळके, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजीत शिवतारे, समाज कल्याण विभागाच्या सभापती सारिका पानसरे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष माननीय रणजीत शिवतारे, बांधकाम सभापती प्रमोद काकडे, पशुसंवर्धन व कृषी सभापती रवींद्र वायकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उप मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीणकर, समाज कल्याण विभागाचे सचिव तथा जिल्हा समाजकल्याण अधिकारी प्रवीण कोरगंटीवार  तसेच लोकप्रतिनिधी व पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.

            गुणवंत आणि होतकरु विद्यार्थ्यांना 'कमवा व शिका' या नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत जिल्हा परिषदेमध्ये 3 वर्षांसाठी प्रशासकीय कामाचा अनुभव आणि रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत नियुक्त करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना मासिक वेतनही देण्यात येणार आहे.

अखिल भारतीय वारकरी मंडळ हवेली तालुका कमिटीच्या वतीने

मुख्यमंत्री सहाय्यता निधीस धनादेश प्रदान

 

            पुणे जिल्हयातील अखिल भारतीय वारकरी मंडळ, हवेली तालुका कमिटीच्या वतीने 1 लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोवीड 19 साठी सुपूर्द करण्यात आला यावेळी मंडळाचे तालुका अध्यक्ष संतोष महाराज काळोखे देहूकर व अन्य पदाधिकारी, वारकरी उपस्थित होते.

००००

Thursday, September 17, 2020

 



उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी

पुणे मेट्रोसाठी राज्य शासनाचे सर्वतोपरी सहकार्य

 

            पुणे दि.18:  पमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज पुणे मेट्रोच्या कामाचा आढावा घेतला. आज पहाटे सहा वाजता त्यांनी संत तुकाराम नगर स्टेशन येथे जावून प्रत्यक्ष कामाची पाहणी केली. मेट्रोच्या कामासाठी राज्य शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. मेट्रोच्या कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे त्यांनी सांगितले.

           

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुणे व पिंपरी-चिंचवड मेट्रोचा आढावा घेतला. यावेळी महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांच्यासह मेट्रोचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संत तुकाराम नगर ते पिंपरी (खराळवाडी) असा मेट्रोने त्यांनी प्रवास केला. पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास फुगेवाडी येथून पाहणी दौ-यांला प्रारंभ केला. यावेळी अजित पवार यांनी मेट्रो चालकाच्या केबिनमधून पाहणी केली व कामकाजाचा आढावा घेतला. ब्रिजेश दीक्षित यांनी सादरीकरणाव्दारे माहिती दिली. सिव्हील कोर्ट,नळस्टॉप,लकडी पूल व स्वारगेट  येथील कामाचीही त्यांनी पाहणी केली तसेच आधुनिक पदधतीने बोगदा खोदकाम करणा-या नवीन मशिनचेही मेट्रोकामासाठी लोकार्पण करण्यात आले. यावेळी मेट्रोचे गौतम बि-हाडे, श्रीमती सरला कुलकर्णी यांनी सुरू असलेल्या कामकाजाबाबत माहिती दिली. यावेळी मेट्रोचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

0000

  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेची राज्यस्तरीय बैठक पुणे जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्व...