Friday, December 28, 2018




जिल्हा प्राणी क्लेष प्रतिबंधक समितीची बैठक संपन्न

            पुणे,दि.28:- महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा-1976 ची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी शासनाने नियुक्त केलेल्या जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.शितलकुमार मुकणे, जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शिवाजी विधाते, समितीचे सदस्य उपस्थित होते.
            बैठकीत, शासनाचा प्राणी क्लेष प्रतिबंधक कायदा राबविण्याचा तसेच प्राण्यांच्या वाहतुकीत प्राण्यांना होणाऱ्या वेदना किंवा त्यांच्या बंदीस्त अवस्थेत त्यांना होणाऱ्या वेदना, कत्तलपूर्व अयोग्य पध्दतीने जनावरांना वाहनामध्ये भरणे व उतरविणे, वाहतुक करताना वाहनांमधून जनावरे खच्चून भरणे, कत्तलीकरता नेणाऱ्या जनावरांचे जाणीवपूर्वक हाल करणे, कत्तलगृहाजवळ कत्तलीपूर्वी जनावरांना उन्हातान्हात पाण्याशिवाय बांधून ठेवणे, अतिशय क्रुर पध्दतीने प्राण्यांना मारहाण करणे, जखमा देणे इत्यादी घटना घडू नये व घडल्यास त्यावर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करणे यावर चर्चा करण्यात आली. प्राणी क्लेष प्रतिबंधक कायद्याचे पालन सर्वांनी करावे, असे आवाहन यावेळी समिती सदस्यांनी केले. मांस व चर्मविषयक उद्योगांना प्राणी क्रुरता प्रतिबंधक कायद्याच्या तरतूदीबाबत सतर्क करुन जनजागृती करण्याची सूचना यावेळी समिती सदस्यांनी केली.
            बैठकीला विविध विभागांचे अधिकारी, समितीचे सदस्य उपस्थित होते.

००००





पेरणे येथील विजयस्तंभास अभिवादन कार्यक्रम
सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे
                                                        - सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले
            पुणे,दि.28:- जिल्हयातील पेरणे येथील विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी दरवर्षी 1 जानेवारी रोजी मोठया प्रमाणात जनसमुदाय येत असतो. विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना उच्च प्रतीच्या मुलभूत सेवा-सुविधा देण्याबरोबच सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, अशी सूचना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी  केली.
            पेरणे येथील विजयस्तंभास 1 जानेवारी,2019 रोजी अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या सेवा-सुविधांच्या नियोजनाचा व केलेल्या कामांचा आढावा, पालकमंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत घेतला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी यशदाचे महासंचालक आनंद लिमये, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, समाज कल्याण आयुक्त मिलींद शंभरकर, पोलीस आयुक्त डॉ.के.वेंकटेशन, जिल्हा पोलीस अधीक्षक संदिप पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, उपविभागीय अधिकारी ज्योती कदम, उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख,विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
            यावेळी बोलताना, पालकमंत्री गिरीश बापट यांनी विजयस्तंभास अभिवादन करण्याचा कार्यक्रम शांततेने पार पाडावा असे सांगितले. अभिवादन करण्यासाठी येणाऱ्यांसाठी शुध्द पिण्याचा पाण्याचा पुरवठा करणे, वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था, पार्किंग ते विजयस्तंभ ठिकाणापर्यत प्रवासासाठी बसेसची व्यवस्था, कार्यक्रमाच्या ठिकाणी स्वच्छता व प्रकाश व्यवस्था, स्टॉलची मांडणी, अग्नीशमन यंत्रणा, वाहतूक व्यवस्था, सुरक्षा बंदोबस्त याचा  आढावा घेऊन, विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचाशी संवाद साधला. जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या सुविधांबद्दल सामाजिक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी केलेल्या सूचनांची दखल सर्व संबधित यंत्रणांनी घ्यावी, असे निर्देश यावेळी त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.
            सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केलेल्या सूचनांची दखल घेण्यात येईल असे सांगितले. विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, अशी सूचना केली.
            बैठकीला विविध विभागांचे अधिकारी, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
००००

Monday, December 24, 2018

ग्राहक हिताला सर्वोच्च्‍ प्राधान्य दयावे -पालकमंत्री गिरीश बापट

                         
                                       ग्राहक हिताला सर्वोच्च्‍ प्राधान्य दयावे
                                               -पालकमंत्री गिरीश बापट

पुणे, दि.24:- ‘ग्राहक हा राजा आहे’ त्याची फसवणूक टाळली जावी व त्याचा मान- सन्मान हा राखला पाहिजे. असे प्रतिपादन अन्न व औषध प्रशासन, संसदीय कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज येथे केले.
       देशभरामध्ये दरवर्षी 24 डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने शिवाजीनगर एस.टी.बसस्थानकाच्या आवारामध्ये ग्राहक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख,‍ अतिरिक्त ‍जिल्हाधिकारी चिंतामणी जोशी, उपआयुक्त (पुरवठा) श्रीमती निलीमा धायगुडे, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनिल गाढे, तहसिलदार श्रीमती होळकर, सुनिल कोळी इ. मान्यवर उपस्थित होते.
        यावेळी श्री.बापट यांनी कायदयाच्या दबावाबरोबरच समाजाचा दबावही महत्वाचा असल्याचे सांगून ग्राहकांची फसवणूक होऊ नये, त्यांना योग्य प्रकारे सेवा मिळावी हा त्यांचा हक्कच आहे, असे सांगितले. उत्पादन आणि सेवांबाबत ग्राहकांमध्ये जनजागृती होणे महत्वाचे असून ग्राहकांनीही मालाचा किंमतींविषयी खात्री करावी, तसेच त्यांनी केलेल्या तक्रारींचा शेवटपर्यंत पाठपुरावा करावा. जेणेकरुन त्यांना योग्य सेवा व उत्पादने मिळतील. यावेळी श्री.बापट यांनी   जनजागृतीच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या सर्व विभागांचे  कौतुक केले.
        या कार्यक्रमाकरीता शासनाच्या राज्य आरोग्य प्रयोगशाळा,अन्न व औषध प्रशासन, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, प्रादेशिक परिवहन कार्यालय, अन्न्‍ व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग- वैध मापनशास्त्र यंत्रणा, कृषि विभाग, हिंदुस्थान पेट्रोलियम, पीएमपीएमएल इ. विभागांचे स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलला भेट देऊन पालकमंत्र्यांनी माहिती घेतली.
        कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना जिल्हा पुरवठा अधिकारी सुनिल गाढे यांनी शासनाच्या विविध विभागांमार्फत ग्राहक जागृतीविषयीची दरवर्षी केलेली कार्यवाही, ग्राहकांना असणारे अधिकार व योजनांची माहिती एकत्रितरित्या त्यांच्यापर्यंत पोहचविण्याकरीता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. यावेळी महसूल व इतर विभागातील अधिकारी/कर्मचारी आणि नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
                                0000 

Saturday, December 22, 2018

शिक्षण यंत्रणा अधिक पारदर्शक करण्याचे प्रयत्न - शिक्षणमंत्री विनोद तावडे महाराष्ट्र राज्य शिक्षणसंस्था महामंडळ अधिवेशनात संस्थाचालकांशी साधला संवाद





शिक्षण यंत्रणा अधिक पारदर्शक करण्याचे प्रयत्न
-         शिक्षणमंत्री विनोद तावडे
महाराष्ट्र राज्य शिक्षणसंस्था महामंडळ अधिवेशनात संस्थाचालकांशी साधला संवाद   
पुणे, दि. 22 – महाराष्ट्र शासन हे विद्यार्थ्यांच्या हितासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. त्याला वेळोवेळी संस्थाचालकांनी सहकार्य केले आहे. यापुढेही शिक्षण यंत्रणा अधिक पारदर्शक करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, त्यामध्ये सर्व संस्थाचालकांचा सकारात्मक सहभाग आवश्यक आहे, असे प्रतिपादन शालेय, उच्च, तंत्रशिक्षण व सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी आज केले.
महाराष्ट्र राज्य शिक्षणसंस्था महामंडळाच्या 24 व्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे उद्घाटन शिक्षणमंत्री तावडे यांच्या हस्ते आज आळंदी येथे झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय दळणवळण मंत्री तथा महाराष्ट्र राज्य शिक्षणसंस्था महामंडळाचे अध्यक्ष विजय नवल पाटील होते. यावेळी कार्यकारिणी सदस्य अजित वडगावकर, अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष गणपतराव बालवडकर, कार्याध्यक्ष सुरेश वडगावकर,  माजी आमदार ॲड. विजय गव्हाणे आदी मान्यवर उपस्थित होते.
शिक्षणमंत्री तावडे म्हणाले, कोणतीही संस्था चालवणे हे सोपे काम नसते. एखादी संस्था उभी केल्यानंतर ती  शासकीय नियमांप्रमाणे चालवणे आवश्यक असते. हे सर्व काम सोपे व्हावे यासाठी शासनाने ऑनलाईन कार्यपद्धती अवलंबली आहे. यामुळे ही संपूर्ण यंत्रणा पारदर्शक होण्यास मदत होणार आहे.
विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी आवश्यक प्रयत्न शासनाकडून करण्यात येत आहेत. शिक्षण म्हणून विचार करत असताना सर्वच विषयांचा एकत्रितपणे विचार करणे आवश्यक असते. शिक्षक, शिक्षणसंस्था व पदाधिकारी आणि शासन हा एकच परिवार आहे. आपण एकत्र आल्यास अधिकाधिक गुणी विद्यार्थी महाराष्ट्रात घडतील, असा विश्वास श्री. तावडे यांनी व्यक्त केला.
श्री. तावडे पुढे म्हणाले, आतापर्यंतच्या कार्यकाळात आपण केवळ उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार न करता अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानुसार त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये,  यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांचे समुपदेशन करून त्यांचा कोणत्या विषयात रस आहे, त्यांच्याकडे कोणते कौशल्य आहे, या बाबीचा अभ्यास करणे आता महत्त्वाचे बनले आहे. त्यानुसार जिल्हा परिषद शाळांमध्ये अॅक्टिव्हिटी बेस लर्निंग तसेच स्पोकन इंग्लिश या बाबींवर भर दिला आहे. शासनाच्या धोरणामुळे चांगल्या शिक्षणसंस्था मजबूत होणार आहेत. त्यामुळे संस्थाचालकांनी शासनाला सहकार्य करावे, असे आवाहन श्री. तावडे यांनी केले.
यानंतर शिक्षणमंत्री तावडे यांनी उपस्थितांमध्ये जाऊन प्रश्नोत्तरांच्या स्वरुपात संवाद साधला. तसेच त्यांचे शंकानिरसन केले. शिक्षणसंस्था महामंडळ अधिवेशन आळंदी येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयात दोन दिवस चालणार असून त्याचा समारोप रविवारी (दि. 23) होणार आहे. 
तत्पूर्वी, छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर यांचे प्रतिमापूजन आणि दीपप्रज्वजलनाने कार्यक्रमाची सुरवात झाली. गौरव महाराष्ट्राचा महाविजेता युवा गायक कौस्तुभ गायकवाड यांनी यावेळी ईशस्तवन केले. तसेच दिव्यांग विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले. यानंतर विजय गव्हाणे, गणपतराव बालवडकर, अजित वडगावकर व विजय नवल पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. आभार कार्यकारिणी सदस्य अशोक मुरकुटे यांनी मानले. कार्यक्रमास महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील शिक्षण संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक तसेच सामान्य नागरिक उपस्थित होते. 


**********

Thursday, December 20, 2018

विजयस्‍तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी प्रशासनाची जय्यत तयारी
                                - पालकमंत्री बापट
            पुणे, दिनांक 20- हवेली तालुक्यातील पेरणे फाटा येथील 1 जानेवारीचा  विजयस्‍तंभ अभिवादन कार्यक्रम सुरळीत पार पाडण्‍यासाठी प्रशासन सज्‍ज असल्‍याची माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली. जिल्‍हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी सामाजिक न्‍याय राज्‍यमंत्री दिलीप कांबळेआमदार बाबूराव पाचर्णे,  पोलीस आयुक्‍त डॉ. के. व्‍यंकटेशम, जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम, जिल्‍हा पोलीस अधीक्षक संदिप पाटील, जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे निवासी उप जिल्‍हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब गलांडे, ज्‍योती कदम आदी उपस्थित होते.
            पालकमंत्री गिरीश बापट म्‍हणाले, अभिवादन कार्यक्रम सुरळीत पार पाडण्‍यासाठी प्रशासनाच्‍यावतीने आवश्‍यक ती सर्व तयारी करण्‍यात येत आहे. स्‍थानिक नागरिक, प्रशासन यांच्‍यामध्‍ये सकारात्‍मक भूमिका आहे. सर्व संबंधितांच्‍या  गाठीभेटी घेण्‍यात आल्‍या आहेत. आरोग्‍यस्‍वच्‍छता, पिण्‍याचे पाणी, वैद्यकीय सेवा याबाबतचे नियोजन उत्‍तम पध्‍दतीने करण्‍यात आले आहे. जनतेची गैरसोय होणार नाही, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्‍वयाने काम करावे, अशा सूचना त्‍यांनी दिल्‍या. स्‍थानिक पातळीवर जिल्‍हा परिषद, पंचायत समिती सदस्‍यांशी समन्‍वय ठेवण्‍याचेही त्‍यांनी सूचित केले. विजयस्‍तंभ परिसराचा विकास आराखडा तयार करण्‍यात आला असून तो लवकरच मंजूर होईल, असेही ते म्‍हणाले. पोलीस प्रशासन आणि जिल्‍हा प्रशासनाने केलेल्‍या तयारीबाबत पालकमंत्री बापट यांनी समाधान व्‍यक्‍त केले.
            जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी प्रशासनाच्‍यावतीने करण्‍यात येत असलेल्‍या तयारीचे नियोजन सादर केले. उप विभागीय अधिका-यांना समन्‍वयक अधिकारी म्‍हणून नेमण्‍यात आले असून सर्व शासकीय विभागाकडून करावयाच्‍या पूर्व तयारी संदर्भात नियमितपणे आढावा घेण्‍यात येत आहे. गेल्‍या 2 महिन्‍यांपासून पेरणे फाटा, सणसवाडी, वढू, वाघोली, कोरेगाव-भीमा या भागांतील विविध संघटना, लोकप्रतिनिधी, नागरिकांशी संपर्क साधून बैठकांच्‍या माध्‍यमातून विश्‍वासनिर्मिती करण्‍यात आली आहे. स्‍वच्‍छता, पिण्‍याचे पाणी, फीरते शौचालये, एसटी बसेसची उपलब्धता, विजयस्‍तंभ परिसराचे सुशोभीकरण, रस्‍ते दुरुस्‍ती, वाहतूक,  खाद्यपदार्थांचे दुकाने, वाहनतळ, सीसीटीव्‍ही कॅमेरे, अग्नीशमन यंत्रणा आदी बाबत काटेकोर नियोजन करण्‍यात आल्‍याचेही त्‍यांनी सांगितले.
            जिल्‍हा पोलीस अधीक्षक संदिप पाटील यांनी पोलीस प्रशासनाच्‍या वतीने आवश्‍यक ती खबरदारी घेण्‍यात येत असून जिल्‍ह्यात आतापर्यंत 250 हून अधिक बैठका घेण्‍यात आल्‍या असल्‍याचे सांगितले. 5 हजार पोलीस, 1200 गृहरक्षक दलाचे जवान, 12 कंपन्‍या, 400 स्‍वयंसेवक यांची मदत होणार असल्‍याचे नमूद करुन सोशल मिडीयावरही प्रत्‍येक जिल्‍ह्यातील पोलीस यंत्रणेमार्फत विशेष लक्ष ठेवण्‍यात आले असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. धार्मिक स्‍थळे, पुतळे यांच्‍या करिता बंदोबस्‍त आणि परिसरात गस्‍त ठेवण्‍यात येत आहे. सर्वांच्‍या सहकार्याने अभिवादन कार्यक्रम शांततेत पार पडेल, असा विश्‍वास पोलीस अधीक्षक पाटील यांनी व्‍यक्‍त केला. जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांनीही जिल्‍हा परिषदेच्‍यावतीने आरोग्‍य, स्‍वच्छता, पिण्‍याचे पाणी याबाबत करण्‍यात येणा-या तयारीची माहिती दिली.  बैठकीस विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 

0000




Wednesday, December 19, 2018

विजयस्तंभ येथील अभिवादन कार्यक्रम शांततेत
पार पाडण्यासाठी ग्रामस्थांनी प्रशासनास सहकार्य करावे
                                                                                          - जिल्हाधिकारी नवल किशोर राम
            पुणेदिनांक 19 : संपूर्ण देशाला पुरोगामी विचारांची दिशा देण्याचे काम  पुणे ‍जिल्हयाने केले आहे. त्यामुळेच ग्रामस्थांनी एकमेकांशी सुसंवाद ठेऊन विजयस्तंभ येथील कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे व शांततेचा संदेश देशभरापर्यंत पोहोचवावा तसेच सोशल मिडीयावर समाजविघातक संदेश आल्यास त्याकडे दुर्लक्ष करावे. कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन  जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज येथे केले.
            पुणे जिल्हयातील भिमा कोरेगाव येथील विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील   दि. 1 जानेवारी रोजी नागरिक मोठया संख्येने उपस्थित राहण्याची शक्य ता असल्याने त्यांना पुरविण्यात येणा-या सोईसुविधांची पाहणी जिल्हाधिकारी नवल किशोर राम तसेच  पोलिस अधिक्षक  संदीप पाटील यांनी आज प्रत्यक्ष स्मारकाच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत अप्पर पोलिस अधिक्षक डॉ. संदीप पखाले, कार्यकारी अभियंता मिलींद बारभाई, उपअभियंता हेमंत चौघुले, तहसिलदार रणजितसिंह भोसले, गटविकास अधिकारी संदीप जठार, उपविभागीय पोलिस अधिक्षक गणेश मोरेगजानन टोम्पे उपस्थित होते. त्यानंतर भिमा कोरेगाव तसेच वढू बु. येथील ग्रामपंचायतीमार्फत आयोजित संवाद बैठकीत उपस्थित ग्रामस्थांच्या अडीअडचणींची माहिती घेऊन प्रशासनामार्फत त्या सोडविण्यासाठी निर्णय घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिका-यांनी यावेळी सांगितले. यावेळी ग्रामपंचायतीमार्फत यादिवशी नागरिकांकरीता पुरविण्यात येणा-या पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह व आदी सोईसुविधांची माहिती देण्यात आली. तर प्रशासनामार्फत ग्रामस्थांच्या प्रलंबित मागण्यांवर तात्काळ चौकशी करुन कार्यवाही करण्यात येईल, असे सांगून यादिवशी नागरिकांना पुरविण्यात येणा-या सोईसुविधांची माहिती यावेळी देण्यात आली. परिसरात असणा-या सीसीटीव्ही कॅमेरा सुस्थितीत असल्याची खात्री करुन आवश्यकतेनुसार अतिरिक्त कॅमेरे बसविण्यात यावेत अशा प्रकारच्या सुचनाहि  त्यांनी यावेळी केल्या.
            यावेळी पोलिस अधिक्षक  संदीप पाटील यांनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरीता पोलिस विभागाकडून मोठया प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्यात येणार असल्याची तसेच संपुर्ण परिसरावर ड्रोनव्दारे लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे सांगून याकाळात समाजामध्ये तेढ निर्माण करणा-या कोणत्याही घटकाची गय केली जाणार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच ग्रामस्थांनी व व्यापा-यांनी कोणतेही भय न बाळगता आपले दैनंदिन व्यवहार सुरु ठेवावेत. यावेळी येणा-या नागरिकांना सहकार्य करुन एक आदर्श निर्माण करावा, असे प्रतिपादन केले. या संवाद बैठकीस  भिमा कोरेगाव येथील सरपंच संगिता कांबळे, वढू बु. येथील सरपंच रेखा साहेबराव  शिवले तसेच ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
             







0000
मतदार यादी मधील त्रूटी दुर करा
                                                            -हनुमंत पाटील

            बारामती दि. 18 : - आगामी काळात होणा-या   ‍निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नविन मतदान केंद्र तसेच मतदार यादीतील सुधारणांबाबत प्रशासनामार्फत तयारीचा आढावा बैठक तहसिलदार हनुमंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
            यावेळी बैठकीमध्ये  नविन मतदान केंद्र झालेल्या केंद्राचे सात फोटो अपलोड करणे, मतदार यादीत पात्र वंचित उमेदवार यांची नोंद करणे, मयत मतदारांची वगळणी करणे, कायमस्वरुपी स्थलांतरीत मतदारांच्या नोंदी तपासून वगळणी करणे, दिव्यांग मतदारांच्या नोंदी करणे. मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांचा तपशील पडताळणे, बीएलओ/ बीएलए  या दोघांनी मिळून मतदार यादीतील त्रुटी तपासणे, राजकीय पक्षांनी बीएलए  ची नेमणूक करणे, प्रत्येक भागाकरीता बीलए ची नेमणूक करणे इ.विषयांवर चर्चा करण्यात आली.
             या बैठकीस नायब तहसिलदार आर.सी.पाटील, संजय पांढरपट्टे, यादव, तसेच महसूल व इतर विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.   

0 0 0 0 0

Tuesday, December 18, 2018

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे पुणे येथे स्वागत

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे पुणे येथे स्वागत
पुणे दि. १८ :  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे म्हाळुंगे-बालेवाडी हेलिपॅड येथे आगमन झाले. यावेळी राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले. शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रोच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्यासाठी त्यांचे पुणे येथे आगमन झाले.
यावेळी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय राज्यमंत्री हरदीपसिंग पुरी, खासदार अमर साबळे, आमदार मेधा कुलकर्णी, आमदार माधुरी मिसाळ, आमदार योगेश टिळेकर, आमदार जगदीश मुळीक, आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, लेफ्टनंट जनरल सचिंदरकुमार सैनी आदींनी गुलाब पुष्प देऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले.

***



  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेची राज्यस्तरीय बैठक पुणे जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्व...