Saturday, September 29, 2018

कालवा बाधितांना मदत करणार - पालकमंत्री बापट

कालवा बाधितांना मदत करणार - पालकमंत्री बापट
पुणे, दिनांक 29- पुणे महानगरपालिका हद्दीतील पर्वती भागातून वाहणारा मुठा उजवा कालवा फुटून नुकसान झालेल्‍या घरांच्‍या पंचनामे जिल्‍हा प्रशासनाकडून पूर्ण झाले असून त्‍यांना खास बाब म्‍हणून मदत देण्‍याबाबतचा 3 कोटी रुपयांचा प्रस्‍ताव तात्‍काळ पाठविण्‍याच्‍या सूचना जिल्‍ह्याचे पालकमंत्री श्री. गिरीश बापट यांनी आज दिल्‍या.
जिल्‍हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम, निवासी उपजिल्‍हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब गलांडे, तहसिलदार गीता दळवी, हेमंत निकम आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. बापट म्‍हणाले, कालवा फुटण्‍याची दुर्घटना ही नैसर्गिक आपत्‍ती म्‍हणून गृहीत धरण्‍याबाबत विनंती करण्‍यात यावी. शासनाच्‍या मदत व पुनर्वसन विभागाच्‍या निर्णयानुसार कालवाबाधितांना नुकसान भरपाई मिळेलच, पण हानीची तीव्रता पहाता खास बाब म्‍हणून 3 कोटी रुपयांच्‍या मदतीची विनंती करणारा प्रस्‍ताव तात्‍काळ पाठवावा. हा प्रस्‍ताव मंजूर होण्‍यासाठी पाठपुरावा करण्‍यात येईल. कालवाबाधित भागातील घरांचे  पंचनामे पूर्ण झालेल्‍या संपूर्ण कुटुंबाची यादी त्‍या भागातील स्‍वस्‍त धान्‍य दुकानदारांकडे देऊन संबंधित कुटुंबांना धान्‍य वाटप करण्‍यात यावे, यावेळी नियंत्रण व देखभालीसाठी जिल्‍हा प्रशासनाचा प्रतिनिधी असावा, असेही ते म्‍हणाले.
मुठा उजवा कालवा फुटून या भागातील घरांमध्‍ये पाणी जाऊन त्यांच्‍या घरातील चीजवस्‍तूंचे नुकसान झाले आहे. हानीची तीव्रता पहाता शासनाकडून भरीव मदतीची गरज असल्‍यामुळे 3 कोटी रुपयांचा प्रस्‍ताव पाठविण्‍यात यावा, असे  पालकमंत्री श्री. बापट यांनी सांगितले.
प्रारंभी जिल्‍हाधिकारी श्री. नवल किशोर राम यांनी घटनेची पार्श्‍वभूमी सांगितली. जिल्‍हा प्रशासनाकडून बाधितांच्‍या घरांच्‍या पंचनाम्‍याची कार्यवाही करण्‍यात आली असून  740 घरांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. त्‍यामध्‍ये सुमारे  90 घरे पूर्णत: बाधित आहेत. पूर्णत: बाधित व अंशत: बाधित घरांच्‍या मदतीचा तसेच खास बाब म्‍हणून 3 कोटी रुपयांच्‍या मदतीचा प्रस्‍ताव शासनाकडे सादर करण्‍यात येईल, असेही जिल्‍हाधिकारी  श्री. नवल किशोर राम यांनी सांगितले.  
0000


शौर्य दिन

सैनिकांच्या प्रत्येक समस्या सोडविणे हे कर्तव्य
                                                       -पालकमंत्री गिरीश बापट
पुणे दि. 29 - देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी सैनिक नेहमीच कर्तव्यदक्ष असतात. अशा सैनिकांच्या कुटूंबास व सैनिकांना कोणतीही अडचण येणार नाही. अडचण आल्यास ती सोडविणे हे पालकमंत्री म्हणून माझे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले. 
शौर्य दिनानिमत्त जिल्हाधिकारी कार्यलयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, कर्नल सदानंद साळुंखे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर मिलिंद तुंगार, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, आदि उपस्थित होते.
पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले, शौर्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात देशाची सेवा करणाऱ्या सैनिकांसमोर मनोगत व्यक्त करणे हे माझे भाग्य आहे. एस.टी.पास, पेन्शन, नौकरी इत्यादी सैनिकांच्या समस्या सोडविण्यासाठी  पालकमंत्री म्हणून कटीबद्ध आहे. शब्दांचे सामर्थ्य  हे कर्तृत्वावर अवलंबून असते. सैनिक हा शब्दच देशासाठी लढणाऱ्या जवानांच्या कर्तृत्वाची ओळख करुन देतो.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले, पुणे जिल्हयातील सैनिकांना व त्यांच्या कुटुंबीयांना कुठल्याही पध्दतीची अडचण येणार नाही. महाराष्ट्र राज्य शूर-विरांचे राज्य आहे. म्हणूनच या राज्यातील बहुसंख्य सैनिक देशसेवेसाठी सैन्यात आहेत. यावरुनच खरे देशप्रेम दिसून येते. जिल्हाधिकारी म्हणून प्रत्येक समस्या सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमात वीर माता व वीर पत्नींचा पालकमंत्री महोदयांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमासाठी सैनिक वसतीगृह, न्यू एंजल हायस्कूलचे  विद्यार्थी, विद्यार्थिनी, माजी सैनिक व त्यांचे कुटुंबिय उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.





Friday, September 7, 2018

लोकराज्य वाचक मेळावा


 लोकराज्य अंकाचे नियमित वाचन ही यशाची गुरुकिल्ली                  – प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे



  पुणे दि. ६- माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने लोकराज्य हे मासिक प्रकाशित करण्यात येते. तरुणांनी हे मासिक आवर्जून वाचावे. लोकराज्य मासिक करीयर घडवण्यासाठी गरजेचे असून ती यशाची गुरुकिल्ली असल्याचे प्रतिपादन वाघीरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी केले. 
वाचन संस्कृती वाढावी यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे सप्टेंबर महिन्यात विविध ठिकाणी लोकराज्य वाचक मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत सासवड येथील वाघीरे महाविद्यालयात लोकराज्य वाचक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्राचार्य नितीन घोरपडे बोलत होते. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, प्रा. डॉ. एस. एस. जगताप,डॉ. किरण रणदिवे, प्रा. पल्लवी लोळे आदी उपस्थित होते.
         डॉ. घोरपडे म्हणाले, आजच्या पिढीत समाज माध्यमांचा प्रभाव वाढत आहे. त्यामुळे वाचनाची सवय मात्र नष्ट होतांना दिसत आहे. लोकराज्य वाचक मेळाव्यातून वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यसाठी मदत होणार आहे. लोकराज्य या अंकातील प्रत्येक पान वाचनीय आहे. जसा हा अंक स्पर्धा परीक्षेसाठी महत्वाचा आहे तसाच तो आयुष्यात यशस्वी होण्यासाठी गरजेचा आहे. वाचन हा विद्यार्थ्याचा आत्मा आहे, त्यामुळे वाचनाकडे लक्ष देऊन लोकराज्य अंक नियमित घेण्याचे आवाहन देखील यावेळी डॉ. घोरपडे यांनी केले. 
            यावेळी जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांनी लोकराज्य मासिकाचे महत्व सांगीतले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना ते म्हणाले, लोकराज्य मासिक हे स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे आहे. वाचनाने विचारांची कक्षा रुंदावते. या मासिकातील प्रत्येक पान  आपणास विचारांनी समृद्ध करेल. देशाची भावी पिढी वाचनातून प्रगल्भ होण्यासाठी लोकराज्य वाचक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे देखील  श्री.सरग   म्हणाले. 
लोकराज्य वाचक मेळाव्याची संकल्पना तसेच उद्देश याबाबत ज्ञानेश भुकेले यांनी यावेळी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सुनिता कोलते, यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.संजय लांडगे यांनी मानले. कार्यक्रमाला विलास कसबे, नीलिमा आहेरकर, वैशाली रांगणेकर, विशाल कार्लेकर, संतोष मोरे,दिलीप गांगुर्डे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठया संख्यने उपस्थित होते.



          लोकराज्य अंकावरील परीक्षेत 
       ५०० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग
                                  

वाघिरे महाविद्यालयाच्या वतीने लोकराज्य वाचक मेळाव्याच्या निमित्ताने लोकराज्य अंकावर आधारित परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी या परीक्षेस भरघोस प्रतिसाद दिला. ५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षेत सहभाग घेतला होता. 

      
                                          

  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेची राज्यस्तरीय बैठक पुणे जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्व...