Wednesday, March 18, 2020





आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली
राष्ट्रीय विषाणू संस्थेला भेट
                               
            पुणे, दि, १८: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेला आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी भेट दिली.    यावेळी संस्थेतील शास्त्रज्ञांबरोबर बैठक घेऊन त्यांनी चर्चा केली. यावेळी संचालक प्रिया अब्राहम, विभाग प्रमुख वर्षा पोतदार, डॉ.बसू, डॉ.सहारा चेरीयन, विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, माजी आरोग्य महासंचालक डॉ.सुभाष साळुंके, आरोग्य संचालक डॉ.अर्चना पाटील,बी.जे.वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.अजय चंदनवाले, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, पुणे मनपा अपर आयुक्त रूबल अग्रवाल आदी उपस्थित होते.
००००


Tuesday, March 17, 2020


विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी घेतला
पिंपरी-चिंचवड मनपा प्रशासनाचा कोरोना प्रतिबंधाबाबतचा आढावा
कोरोना आपत्तीचा एकजुटीने सामना करूया
-  विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

पुणे दि.17: कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि पूर्वकाळजी व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासंदर्भात प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेकडून सुक्ष्म नियोजन केले जात असून नागरिकांनी घाबरुन जावू नये, मात्र, पूर्वकाळजी घ्यावी. प्रशासनाने वेळोवेळी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन सहकार्य करावे आणि या आपत्तीचा एकजुटीने सामना करूया,असे  आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले.
         कोरोनाबाबत पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाकडून सुरू असलेल्या उपाययोजनांचा विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी आज आढावा घेतला. यावेळी  पिंपरी चिंचवडचे आयुक्त. श्रावण हर्डीकर, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय देशमुख, जिल्हा शल्यचिकीत्सक अशोक नांदापूरकर आदी यावेळी उपस्थित होते.
                       विभागीय  आयुक्त डॉ. म्हैसेकर म्हणाले,  ज्या नागरिकांना होम क्वॉरंटाईन सांगितले आहे, त्यांनी स्वत:हूनच घरी राहून स्वत:बरोबरच इतरांचीही काळजी घ्यावी.  तसेच त्यांच्या डाव्या हातावर शिक्का मारावा, जेणेकरुन समाजात या व्यक्ती वावरताना आढळल्यास त्यांची  ओळख पटेल. बाधित प्रवाशी आढळल्यास त्यांच्या प्रवासाची माहिती, त्यांच्या संपर्कात आलेल्यांची माहिती विचारपूस करणा-या पथकाने तातडीने घ्यावी. तसेच परदेशातून प्रवास करुन आलेले व ज्यांना बाधा झाली, अशा प्रवाशाच्या संपर्कात आलेल्या निकटवर्तीयांची तपासणी केली जाईल. उद्यापासून विमानाने आलेल्या सर्व प्रवाशांना 24 तास देखरेखीखाली ठेवले जाणार असून त्यासाठी परिपूर्ण व्यवस्था काळजीपूर्वक करण्याच्या सूचनाही विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी दिल्या.
                शहरातील बसस्थानक, रेल्वेस्थानक तसेच सार्वजनिक ठिकाणे येथे गर्दी नियंत्रण करताना महानगरपालिकेच्या वतीने व्यापक प्रमाणावर जनजागृती करावी असे सांगून डॉ. म्हैसेकर म्हणाले,  स्थानिक पातळीवर महानगरपालिका प्रशासनाने नागरिकांमध्ये कोरोना आजाराविषयी असलेली भीती दूर करण्यासाठी जागृती करावी. कोरोना प्रतिबंधासाठी कार्यरत असलेल्या प्रत्येक अधिकारी, कर्मचारी, आरोग्य सेवेसाठी कार्यरत अधिकारी, कर्मचारी यांना आवश्यक असलेले प्रशिक्षण तातडीने देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.तसेच कोरोना प्रतिबंधाबाबत उपाययोजनासंदर्भात प्रत्येक अधिका-यांने समन्वय ठेवून काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले. तसेच कोरोना प्रतिबंधासाठी तयार करण्यात आलेल्या प्रत्येक पथकाचे कामकाज व जबाबदा-या याबाबतचाही सविस्तर माहिती घेतली.
           पिंपरी चिंचवडचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने सुरू असलेल्या उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली. यावेळी महानगरपालिकेच्या सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
0000






कोरोना: विविध पथके स्‍थापन जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम
            पुणे, दिनांक 17- जिल्‍ह्यातील कोरोना विषाणूच्‍या संसर्गावर मात करण्‍यासाठी जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरणाचे अध्‍यक्ष नवल किशोर राम यांनी  वरिष्‍ठ अधिका-यांचा समावेश असलेली  विविध पथके स्‍थापन केली असून त्‍यांच्‍यामार्फत आवश्‍यक ती कार्यवाही करण्‍यात येत आहे.
            जिल्‍हाधिकारी कार्यालयात जिल्‍हाधिकारी राम यांनी बैठक घेतली. यावेळी उपजिल्‍हाधिकारी विजयसिंह देशमुख, निवासी उपजिल्‍हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. भगवान पवार, जिल्‍हा शल्य चिकित्‍सक डॉ. अशोक नांदापूरकर यांच्‍यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
            जिल्‍हाधिकारी राम म्‍हणाले, आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर व देशांतर्गत कोरोना विषाणू बाधित व्‍यक्‍ती आढळल्‍या आहेत. पुणे जिल्‍ह्यातही काही व्‍यक्‍ती कोरोना विषाणूबाधित आहेत. पुणे शहर आणि जिल्‍ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी जलद प्रतिसाद दल (रॅपीड रिस्‍पॉन्‍स टीम) स्‍थापन करण्‍यात आले आहे. याशिवाय विविध विभागातील वरिष्‍ठ       अधिका-यांचा समावेश असलेली पथकेही स्‍थापन करण्‍यात आली आहेत. या सर्व पथकांनी आपापली जबाबदारी योग्य पध्‍दतीने पार पाडावी. परस्‍पर समन्‍वयातून या संकटावर मात करावयाची असून आपण यात यशस्‍वी होऊ, असा विश्‍वास त्‍यांनी व्‍यक्‍त केला.
            जिल्‍ह्यातील पुणे महापालिका,  पिंपरी-चिंचवड महापालिका, जिल्‍हा परिषद, कटक मंडळे यांच्‍या बरोबर समन्‍वय ठेवणे, टूर्स, ट्रॅव्‍हल्‍स कंपन्‍या, हॉटेल्‍स, विमानतळ प्राधीकरण, लॅबरोटरी (प्रयोगशाळा), सेवाभावी संस्‍था, शासकीय रुग्णालये, खाजगी रुग्णालये, शहर वाहतूक यांच्‍याशी संपर्क ठेवून माहिती अद्ययावत करणे, घरातच क्‍वारंन्टाइन (अलगीकरण)असलेल्‍या व्‍यक्‍तींशी संपर्क ठेवून त्‍याबाबतची माहिती अद्ययावत ठेवणे अशा विविध जबाबदा-यांची जिल्‍हाधिकारी राम यांनी माहिती दिली.  आरोग्‍य विभाग तसेच इतर सर्व विभाग समर्पित भावनेने काम करत असल्‍याबद्दल त्‍यांनी समाधान व्‍यक्‍त केले. शासनाकडून कोरोनावर मात करण्‍यासाठी आवश्‍यक ती साधनसामुग्री खरेदी करण्‍यासाठी निधी प्राप्त झाला आहे, त्याचा योग्य पध्‍दतीने विनीयोग व्‍हावा, याचीही काळजी घेण्‍याचे आवाहन त्‍यांनी केले.
            बैठकीस विविध कार्यालय प्रमुख उपस्थित होते. 


Monday, March 16, 2020







                                 पुण्यातील 27 नागरिकांची नमुना चाचणी निगेटीव्ह
कोरोना बाधित 16 व्यक्तींची  प्रकृती स्थिर
                                             -विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

                पुणे,दि.16-   राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे (एनआयव्ही) पाठविलेल्या  व्यक्तींच्या घशातील स्त्राव नमुन्यांपैकी 28 व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले असून त्यातील 27 व्यक्ती कोरोना बाधित नसल्याचे स्पष्ट झाले आहे. एक व्यक्ती कोरोना बाधित असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली. दरम्यान यापूर्वी आढळलेल्या 16 कोरोना बाधित व्यक्तींची  प्रकृती स्थिर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
             विभागीय आयुक्त कार्यालयात कोरोना संदर्भात प्रशासनाच्या वतीने सुरु असलेल्या कार्यवाहीबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय देशमुख, जिल्हा शल्यचिकीत्सक अशोक नांदापूरकर आदी उपस्थित होते.
           विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर म्हणाले,  सध्या 28 पैकी 27 जणांच्या नमुन्यांचे अहवाल निगेटीव्ह आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाण्याचे कारण नाही. मात्र, चीन, इटली, इराण, फ्रान्स, स्पेन, जर्मनी, दक्षिण कोरियाबरोबरच आता दुबई, सौदी अरेबिया आणि अमेरिकेतून आलेल्या नागरिकांना देखरेखीखाली ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
                    रुग्णांच्या उपचारासाठी येणारा खर्च हा राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून उपयोगात आणला जाणार असल्याची माहिती देऊन विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर म्हणाले, राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या माध्यमातून सर्व जिल्ह्यांना निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. हा निधी  विभागीय आयुक्तांकडे दिला जाईल. तिथून आवश्यकतेप्रमाणे वेगवेगळ्या जिल्ह्यांना या निधीचे वाटप केले जाईल. जो निधी उपलब्ध करून दिला जाईल, त्याद्वारे पुणे व उर्वरीत चार जिल्ह्यांना निधी दिला जाईल. याच प्रमाणे अन्य विभागीय आयुक्तांकडे देखील असाच निधी दिला जाईल. स्थानिक स्तरावरील निर्णय घेण्याचे संपूर्ण अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.
              डॉ. म्हैसेकर म्हणाले, मुख्यमंत्री महोदयांनी आज सकाळी राज्यातील सर्व जिल्हाधिका-यांची व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली. मुख्य सचिव, आरोग्य सचिव व अन्य अधिकारी या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगला उपस्थित होते.
    दुबई, सौदी अरेबिया व युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका या तीन देशांमधून जर कोणी परदेशी प्रवासी इथे आले तर त्यांच्याबाबतीत अन्य सात देशांप्रमाणेच प्रोटोकॉल फॉलो केला जाणार आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेची पथके घरांचा सर्वे करून माहिती गोळा करीत आहे. आतापर्यंत 15 हजार 803 घरांमध्ये व 52 हजार 714 लोकांचा सर्वे पूर्ण केलेला आहे. या पथकांना संशयित वाटलेल्या दोन जणांना आज नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचेही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.
           डॉ. म्हैसेकर म्हणाले,  काल रात्री विमानाने आलेल्या प्रवाशांपैकी सात प्रवाशांनी त्यांना प्राथमिक स्वरुपातील काही लक्षणे जाणवत असल्याचे सांगितले. या प्रवाशांनी स्वतः याबाबत माहिती दिल्याने त्यांना नायडू रुग्णालयात दाखल केले आहे. तेथील डॉक्टर त्यांना तपासून आवश्यक असेल तर त्यांचे नमुने घेतील आणि नमुन्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याआधारे पुढील कार्यवाही ठरेल. डॉक्टरांच्या मते त्यांना केवळ घरी विलगीकरण कक्षात राहणे अपेक्षित असेल, तर त्यांना तशा सूचना दिल्या जातील व ते त्यांच्या घरी जातील. एक प्रवासी दोन महिने जर्मनीत राहिलेला होता. त्याला नायडू रुग्णालयात दाखल करून  या ठिकाणी त्याचे नमुने घेण्यात आले आहेत.
           जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले, शहरासह जिल्ह्यात साथरोग नियंत्रण कायद्यांतर्गत आदेश आहेत. स्वतंत्र १४४ चे आदेश नाहीत. १४४ (१) च्या आदेशानुसार प्रशासनाचे आदेश न पाळणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्यासाठी आहे, याची अंमलबजावणी पोलीस करतील.पुण्यात सध्या कुठेही संचारबंदी किंवा जमावबंदी नाही. यापूर्वीच महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्र तसेच लगतच्या क्षेत्रातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यापुढे संपूर्ण पुणे जिल्हयातील सर्व शाळा बंद राहतील असे त्यांनी स्पष्ट केले.
 यात्रा, जत्रा, मोठे उत्सव याठिकाणी होणारी गर्दी टाळण्याचे आवाहन यापूर्वीच करण्यात आले असून कुठेही  गर्दी होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्याचे ते म्हणाले. आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे. एकमेकांसोबतचा संपर्क टाळावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राम यांनी केले आहे.
0000


Friday, March 13, 2020




''कोरोना'' प्रतिबंधासाठी सूक्ष्म नियोजन करा
विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांच्या सूचना
व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतला आढावा
                पुणे, दि. 13 : कोरोना प्रतिबंधासाठीच्या उपाययोजनांचे सूक्ष्म नियोजन करुन त्यानुसार कार्यवाही करा. पर्यटनस्थळे, तीर्थस्थळे येथे गर्दी होवू नये, म्हणून व्यापक जनजागृती करा. तसेच शहरांमध्ये विलगीकरण आणि क्वॉरंटाईनची सुविधा तात्काळ निर्माण करा, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज पुणे विभागातील पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर जिल्हा प्रशासनाला दिल्या.
                 'कोरोना' बाबत विभागीय आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे डॉ. दीपक म्हैसेकर यांनी संवाद साधला. यावेळी पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, महसूल उपायुक्त प्रताप जाधव, जयंत पिंपळकर, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय देशमुख आदी यावेळी उपस्थित होते.
           डॉ. म्हैसेकर म्हणाले, केंद्र शासनाच्या सूचनेनुसार चीन, इराण, इटली, द.कोरिया, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनी या 7 देशांमधून प्रवास करुन आलेल्या व्यक्तिंना क्वॉरंटाईन करावे. प्रत्येक शहरातील टुर ऑपरेटर्सकडून परदेश प्रवास केलेल्या आणि सध्या परदेशात असलेल्या प्रवाशांची यादी घेवून त्यानुसार योग्य त्या उपाययोजना कराव्या. परदेशातून परतणाऱ्या पर्यटकांनी स्वत:हून घरीच 15 दिवस स्वतंत्र रहावे. कुटुंबात अथवा समाजात मिसळू नये, असा संदेश सर्वत्र द्यावा.
                डॉ. म्हैसेकर म्हणाले, पर्यटनस्थळे, धार्मिक ठिकाणी गर्दी होवू नये, यासाठी व्यापक जनजागृती करा. शालेय व महाविद्यालयीन विध्यार्थ्यांना तसेच नागरिकांना स्वच्छतेच्या खबरदारीबाबत प्रशिक्षित करा. सार्वजनिक स्वच्छतागृह, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता ठेवण्याबाबत संबंधितांना सूचना देवून सूचनांचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा.
कोरोनाच्या संशयित रुग्णांची माहिती मिळाल्यावर त्यांच्या विलगीकरणावर भर द्या. बाधित रुग्ण आढळल्यास त्यांच्या प्रवासाची माहिती, त्यांच्या संपर्कात आलेल्यांची माहिती याबाबत विचारपूस करण्यासाठी पथके तयार करा. क्वॉरंटाईनची सुविधा ही रुग्णालयापासून दूर करा. विलगीकरणाची सुविधा मात्र रुग्णालयात असायला हवी, असे सांगून पुढील किमान 15 ते 20 दिवस शहरांमधील धार्मिक कार्यक्रम, यात्रा रद्द करण्याबाबत विविध संस्थांना विनंती करा, अशा सूचनाही  डॉ. म्हैसेकर यांनी यावेळी केल्या. 
                दरम्यान, विभागातील जिल्हाधिकारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, महानगरपालिका आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा शल्यचिकित्सक, निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी जिल्ह्यात सुरु असलेल्या उपाययोजनांबाबत तसेच क्वॉरंटाईन आणि विलगीकरणासाठी राखीव केलेल्या जागा, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव  होवू नये यासाठी वापरण्यात येणाऱ्या मास्क, सॅनिटायझर, हँन्ड वॉश तसेच औषधसाठयाची उपलब्धता आदी विषयांबाबत यावेळी माहिती दिली. यामध्ये साताऱ्यातून जिल्हाधिकारी शेखर सिंह, सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी, कोल्हापुरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई, मनपा आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, सोलापुरातून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, आयुक्त दीपक तावरे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ तसेच पुण्याच्या निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी सहभागी झाले.
0000000

Friday, March 6, 2020







आंतरराष्ट्रीय  विमानसेवेने  येणाऱ्या प्रवाशांची  कसून वैद्यकीय तपासणी करावी
                                                          -विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर
तपासणीत कोणतीही हयगय   चालणार नाही
            पुणे दि.६:लोहगाव विमानतळ येथे आंतरराष्ट्रीय  विमानसेवेने पुण्यात येणाऱ्या प्रवाशांची कसून वैद्यकीय तपासणी करावी.यामध्ये कोणतीही हयगय न करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिल्या.
            लोहगाव विमानतळ येथे आंतरराष्ट्रीय  विमानसेवेने पुण्यात येणाऱ्या प्रवाशांची वैद्यकीय तपासणी (स्क्रिनिंग) करण्यासाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला असून या कक्षाची पाहणी करून डॉ. म्हैसेकर यांनी उपस्थितांना सूचना दिल्या. 
             विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर पुढे म्हणाले, खास करून इराण,दक्षिण कोरिया ,इटली या देशातून येणाऱ्या प्रवाशांवर विशेष लक्ष द्यावे. संशयीत रुग्ण आढळल्यास विमानतळावर स्क्रिनिंग मध्ये पॉजीटीव्ह आढळूनही पुढील उपचारांना ,तपासण्यांना नकार देणाऱ्या प्रवाशांना सक्तीने नायडू हॉस्पिटल येथे दाखल केले जाईल.वेळप्रसंगी पोलिस कारवाईही करण्याबाबत त्यांनी सांगितले.संशयीत रुग्ण आढळल्यास नायडू रुग्णालयात दाखल करण्यायुक्तांनी दिल्या.विमानतळवर प्रशासनाच्या वतीने तैनात केलेल्या वैद्यकीय पथकाशी आयुक्तांनी चर्चा करून आढावा घेतला.विमान प्राधिकरणाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सातत्याने संपर्कात राहण्याबाबतही त्यांनी सांगितलेसाठी खास रुग्णवाहिका सज्ज ठेवून रुग्णाला बाहेर नेण्याकरिता दोन मीटर रुंदीचा पैसेज करण्याच्या सूचनाही आ.
            यावेळी आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ.एस. ए. देशमुख,डॉ.नांदापूरकर,विमानतळ व्यवस्थापक नेहल मेंढे,विमानतळ प्राधिकरणाचे संचालक कुलदीप सिंग, डॉ. प्राणिल कांबळे उपस्थित होते.
                                                         0 0 0 0

Thursday, March 5, 2020


                        जनसंपर्कासारखे चांगले दुसरे कोणतेही क्षेत्र नाही
                        - उपसंचालक (माहिती) मोहन राठोड
        पुणे दि.5- जनसंपर्कासारखे चांगले दुसरे कोणतेही क्षेत्र नाही. या क्षेत्रातील व्‍यक्‍तींना समाजाला न्‍याय देण्‍याची संधी असते, त्‍यामुळे त्‍यांनी सर्वसामान्‍य लोकांना न्‍याय देण्‍याचे काम करावे, असे आवाहन पुणे विभागाचे उपसंचालक (माहिती) मोहन राठोड यांनी केले.
            यशदा (यशवंतराव चव्‍हाण विकास प्रशासन प्रबोधिनी) येथे जनसंपर्क क्षेत्रातील अधिका-यांच्‍या प्रशिक्षण कार्यक्रमाच्‍या सांगता समारंभात ते बोलत होते. यावेळी सत्र संचालक डॉ. बबन जोगदंड, पुण्‍याचे जिल्‍हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, सोलापूरचे जिल्‍हा माहिती अधिकारी रवींद्र राऊत यांची उपस्थिती होती.
            श्री. राठोड म्‍हणाले,  जनसंपर्क क्षेत्राची ज्‍यांना आवड आहे त्‍यांनीच या क्षेत्रात आले पाहिजे, केवळ नोकरी मिळते म्‍हणून या क्षेत्रात आल्‍यास आपण योग्‍य तो न्‍याय देवू शकत नाही. जनसंपर्क क्षेत्राचे  विविध पैलू उलगडून सांगतांना ते म्‍हणाले, प्रसिध्‍दी ही कला आणि शास्‍त्र या दोहोंचा संगम आहे. ही कला दिसू न देण्‍यातच खरी कला आहे. आपण केवळ सेवक म्‍हणून न रहाता सहभागीदाराच्‍या भूमिकेत राहिले पाहिजे. यशस्‍वी जनसंपर्क अधिकारी होण्‍यासाठी आवश्‍यक गुणांचीही त्‍यांनी माहिती दिली. ज्ञान हीच शक्‍ती असल्‍याने जनसंपर्क अधिका-याकडे ज्ञानाचे भांडार असायला हवे, माहिती आणि संदर्भ याबाबत अद्ययावत माहिती असायला हवी. अभिलेख्‍यांचे दस्‍ताऐवजीकरण, वेगवेगळया क्षेत्रातील लोकांशी (ओपिनीयन मेकर्स) मैत्री, पत्रकारांशी संवाद साधण्‍याचे कौशल्‍य, वाचन-मनन-चिंतन आदी गुण अवगत करता आले पाहिजे.
            बदलत्‍या माध्‍यमांचा संदर्भ देत श्री. राठोड म्‍हणाले, माध्‍यमांचे स्‍वरुप प्रचंड वेगाने बदलत आहे. माणसांना जोडण्‍याचे काम माध्‍यमे करीत आहेत. जनसंपर्क अधिका-यांनीही सोशल मिडीयाचा कार्यक्षमपणे वापर केला पाहिजे. आपल्‍या कार्यातून सर्वसामान्‍य माणसापर्यंत पोहोचून त्‍यांना न्‍याय दिला पाहिजे, याबाबत त्‍यांनी काही अनुभव सांगितले.
            जिल्‍हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांनी यशदाच्‍या माध्‍यमातून चालविल्‍या जाणा-या उपक्रमांचा गौरव केला. जनसंपर्क क्षेत्र हे आव्‍हानात्‍मक तसेच अत्‍यंत महत्‍त्‍वाचे असून दररोज वेगवेगळा अनुभव येत असतो.  या क्षेत्रातील अधिका-यांना नवनवीन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण यशदामार्फत मिळावे, अशी अपेक्षा व्‍यक्‍त केली.
            सत्रसंचालक डॉ. बबन जोगदंड यांनी यशदाच्‍या कार्याची माहिती सांगून भविष्‍यातही वेगवेगळया नावीन्‍यपूर्ण प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करणार असल्‍याचे सांगितले.
            समारोपात मुंबई विद्यापीठाचे उप कुलसचिव विनोद माळाळे, उस्‍मानाबादचे जिल्‍हा माहिती अधिकारी मनोज सानप, राज्‍य निवडणूक आयोगाचे जनसंपर्क अधिकारी जगदीश मोरे, कोल इंडियाचे जनसंपर्क अधिकारी जेट्टी राम दिलीप, डॉ. शंकर मुगावे, पालघर जिल्‍हा परिषदेच्‍या जनसंपर्क अधिकारी  श्रध्‍दा पाटील, दत्‍तात्रय  कोकरे यांनी मनोगत व्‍यक्‍त केले.
00000





  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेची राज्यस्तरीय बैठक पुणे जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्व...