Thursday, February 27, 2020




बोलीभाषा हेच मराठी भाषेचे सौंदर्य
                                             -माहिती उपसंचालक मोहन राठोड
 
                पुणे, दि.२७: बोलीभाषा हे मराठी भाषेचे सौंदर्य असून त्यातूनच मराठी भाषा समृध्द झाली आहे. मराठीला अधिक समृध्द बनविण्यासाठी सर्वांनी दैनंदिन जीवनात मराठीचा जास्तीत जास्त वापर करण्याची गरज आहे, असे मत माहिती उपसंचालक मोहन राठोड यांनी व्यक्त केले.
                मराठी भाषा गौरव दिनानिमित्त जिल्हा माहिती कार्यालय व मॉडर्न महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने  आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, मॉडर्न महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. अमृता ओक, प्राणीशास्त्र विभागाचे डॉ. युगंधर शिंदे, मॉडर्न महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या प्रा.डॉ.वैजयंतीमाला जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी  एमए मराठी मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या व नेट परीक्षा उत्तीर्ण झालेल्या महेश कांबळे याचा तसेच रोटरी वॉटर ऑलिम्पियाडमधील प्रथम पारितोषिक विजेता स्वप्नील पवार व अन्य विद्यार्थ्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मराठी भाषेतून कीर्तनाचे निरुपण, कविता, आईसाठीचे पत्र वाचन असे विविध कलागुण सादर केले.
                श्री.राठोड म्हणाले, मराठी ही अडीच हजार वर्षांपुर्वीची भाषा आहे. या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. मराठी भाषेचा गोडवा अन्य भाषेत नाही. दैनंदिन व्यवहारात आवश्यक ठिकाणी इंग्रजी व हिंदी भाषेचा वापर करायला हवा, मात्र इंग्रजीचे ज्ञान घेताना मराठी भाषेकडे आपण दुर्लक्ष करता कामा नये.
                डॉ.अमृता ओक म्हणाल्या, व्यक्तीच्या विचारांचा प्रभाव भाषेवर तर भाषेचा प्रभाव आपल्या विचारांवर आणि संस्कृतीवर पडत असतो. आपली संस्कृती जपण्यासाठी आपल्या मातृभाषेतून संवाद व लेखनकलेवर प्रभुत्व असणे गरजेचे आहे.
डॉ. युगंधर शिंदे म्हणाले, प्रमाणभाषा ही व्यवहारासाठी उपयुक्त असून माणसांना माणसांशी जोडण्याचं काम बोलीभाषा करते, म्हणून बोलीभाषेचा देखील वापर करायला हवा. मराठी भाषा केवळ महाराष्ट्रात बोलली जात नाही, तर बाहेरील राज्यात देखील बोलली जाते. मराठी माध्यमाच्या शाळा अन्य राज्यात देखील सुरु आहेत, ही आपल्यासाठी अभिमानास्पद बाब आहे.
                राजेंद्र सरग म्हणाले, मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांना जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल.
                कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.वैजयंतीमाला जाधव यांनी केले. सूत्रसंचालन जान्हवी पुरंदरे व ऋतुजा चिंचपुरे या विद्यार्थिनींनी केले तर प्रा. विनोद पवार यांनी आभार मानले.
000000


Wednesday, February 26, 2020




औद्योगिक क्षेत्रांसाठी आवश्यक त्या सोयी-सुविधा गतीने उपलब्ध करुन द्याव्यात
_अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड

पुणे, दि. २६ : औद्योगिक क्षेत्रांसाठी आवश्यक त्या सोयी-सुविधा गतीने उपलब्ध करुन द्याव्यात, अशा सूचना अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांनी केल्या.
जिल्हा उद्योग मित्र समिती सभा साहेबराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, यावेळी ते बोलत होते. बैठकीला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी अविनाश हदगल व प्रादेशिक अधिकारी संजीव देशमुख, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक पी. डी. रेंदाळकर तसेच समितीचे शासकीय व अशासकीय सदस्य उपस्थित होते.
श्री. गायकवाड म्हणाले, औद्योगिक क्षेत्रासाठी आरोग्य, वीज, पाणी तसेच अंतर्गत रस्ते, फायर फायटिंग आदी सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करुन द्याव्यात. महिला कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अंतर्गत रस्त्यांवर बसेसची सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी. कामगारांच्या दवाखान्यात (ईएसआय) त्यांना मोफत आरोग्य सुविधा द्यावी, असेही श्री. गायकवाड यांनी सांगितले.
पिंपरी चिंचवड एमआयडीसी मध्ये बस थांब्याचे अंतर अधिक आहे. स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी सकाळी व सायंकाळी कंपनीची शिफ्ट सुटण्याच्या वेळी एमआयडीसी च्या अंतर्गत रस्त्यांवर पीएमपीएमएल च्या बसेस तात्काळ सुरु कराव्यात, अशा सूचना यावेळी अविनाश हदगल यांनी दिल्या.
एमआयडीसी परिसरातील वीज पुरवठा वारंवार खंडित करण्यात येवू नये, या परिसरातील रस्त्यांची व अंतर्गत रस्त्यांची कामे जलदगतीने करावीत, कामगारांना ईएसआयसी दवाखान्यात आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, बीएसएनएल व इंटरनेट सुविधा पुरवावी, पाणीपुरवठा करावा, फायर फायटिंग स्टेशन उभारावे, आदी मागण्या समिती सदस्यांनी मांडल्या.
***








आई-वडिलांची काळजी घेणे हे मुलांचे कर्तव्य
                             -न्यायाधीश नीरज धोटे

            पुणे,दि.२६: आई-वडिलांची काळजी घेणे आणि त्यांच्या आवश्यक गरजा पुरवणे, हे मुलांचे कर्तव्य आहे, असे सांगून ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या कायद्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी करायला हवी, असे मत पुणे जिल्हा सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश नीरज धोटे यांनी केले.
                पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण व महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक संघ(फेस्कॉम) यांच्या संयुक्त विद्यमाने आई, वडील व ज्येष्ठ नागरिक यांच्या चरितार्थ व कल्याणासाठी अधिनियम-२००७ विषयावरील कार्यशाळा न्यायाधीश नीरज धोटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, यावेळी ते बोलत होते.
                यावेळी श्री. धोटे म्हणाले,  आई-वडिलांच्या त्यागाचे स्मरण मुलांनी नेहमी ध्यानात ठेवायला हवे. आई-वडील व ज्येष्ठांच्या भावनांचा आदर राखून त्यांना सन्मानाची वागणूक द्यायला हवी. ज्येष्ठांच्या समस्या सोडवण्यासाठी संबंधित विभागांनी गतीने कार्यवाही करावी. ज्येष्ठ नागरिकांच्या चरितार्थ व कल्याणासाठी च्या अधिनियमाची जनजागृती होणे गरजेचे आहे. हा कायदा प्रभावीपणे राबवून ज्येष्ठांचे प्रश्न लवकरात लवकर सोडविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.
                अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड म्हणाले, ज्येष्ठ नागरिकांना अत्यंत कमी वेळेत न्याय मिळावा, यासाठी या कायद्याचे अधिकार हे महसूल विभागाकडे देण्यात आले आहेत. महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी दैनंदिन कामकाज करत असताना ज्येष्ठ नागरिकांना जलदगतीने न्याय मिळवून देवून आपली क्षमता सिद्ध करुन दाखवावी.
                न्यायाधीश एच आर वाघमारे म्हणाले, ज्येष्ठांना आदराची वागणूक देणे ही आपली संस्कृती असून सध्या त्याचा विसर पडत आहे. या परिस्थितीत ज्येष्ठांच्या कायद्यांची जनजागृती ही गरजेची बाब बनली आहे.
                पुण्याचे प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख म्हणाले, आपला पाया भक्कम करुन आपली उभारणी करण्याचे श्रेय आई-वडिलांचे असते. आपण जितक्या उच्च पदावर काम करत आहोत, तितका जास्त त्रास आई-वडिलांनी आपल्यासाठी सहन केला आहे, याची जाणीव सदैव ठेवायला हवी. एकत्र कुटुंब पध्दती आणि आई-वडिलांना सन्मानाची वागणूक देणे, ही आपली संस्कृती असून सध्या या संस्कृतीचा विसर पडत आहे, ही खेदाची बाब आहे.
                जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चे  सचिव चेतन भागवत यांनी आई, वडील व ज्येष्ठ नागरिक यांच्या चरितार्थ व कल्याणासाठी अधिनियमाची सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, या कायद्याचा आधार घेऊन ज्येष्ठांना जलदगतीने न्याय मिळवून द्यावा. तसेच ज्येष्ठांचे प्रश्न प्रशासन व ज्येष्ठ नागरिक यांनी समन्वयाने सोडवायला हवेत.
                पुणे बार असोसिएशन चे अध्यक्ष सतीश मुळीक म्हणाले, आई आणि वडील हे कुटुंबातील महत्वाचे घटक आहेत. आई- वडिलांच्या भावनांचा आदर राखून त्यांची काळजीपूर्वक देखभाल करायला हवी. सध्या बऱ्याच कुटुंबातील आई-वडिलांना स्वतःच्या  मुला- मुलींकडून व कुटुंबातील सदस्यांकडून मानसिक त्रास सहन करावा लागत आहे, हे खूपच खेदजनक आहे. ज्येष्ठांना आपुलकी दाखवून भावनिक आधार देणे गरजेचे आहे. पोलीसांनी ज्येष्ठांबरोबर मित्रत्वाची भूमिका बजावायला हवी.
                समाजकल्याण विभागाचे पुणे विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या योजनांची माहिती दिली.
                फेस्कॉम चे अध्यक्ष चंद्रकांत महामुनी यांनी धर्मादाय आयुक्त विभागाशी संबंधित ज्येष्ठांचे प्रश्न लवकर सोडवण्यासाठी प्रयत्न व्हावेत, असे सांगितले.
                यावेळी केकर जवळेकर यांनी विमा योजनेची माहिती दिली.
पोलीस विभाग, समाजकल्याण विभाग, वकील, सामाजिक कार्यकर्ते यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या कायद्यांची सविस्तर माहिती देण्यात आली. समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विजयकुमार गायकवाड यांनी आभार मानले.
000000
                      

Wednesday, February 12, 2020


राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे पुण्यात स्वागत       
      पुणे,दि.१२: राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे आज वायुसेनेच्या विमानाने लोहगाव विमानतळावर आगमन झाले. त्यांच्यासोबत पत्नी सविता कोविंद होत्या. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रपती महोदय यांचे स्वागत केले.
      यावेळी परिवहन तथा सांसदीय कार्य मंत्री ॲड. अनिल परब, महापौर मुरलीधर मोहोळ, मेजर जनरल नवनीत कुमार, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनीही राष्ट्रपती महोदय यांचे स्वागत केले.
      पुण्यातील एनआयबीएम संस्थेचा '५० वर्षपूर्ती निमित्त कार्यक्रम' तसेच लोणावळा येथील इंडियन नेव्हल स्टेशन शिवाजी यांच्या वतीने आयोजि




त कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे पुण्यात आगमन झाले आहे.
     0000000

Saturday, February 8, 2020

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या नवीन नियमावलीचा निर्णय लवकरच घेणार
उपमुख्यमंत्री अजित पवार
* पुण्यातील झोपडपट्टी धारकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार
* झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या कामाला गती देणार

        पुणे, दि.8- पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील झोपडपट्टीधारकांना सर्व सुविधांयुक्त हक्काची घरे मिळवून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या नवीन नियमावलीबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन  उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.
         झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या पुणे आणि पिंपरी चिंचवड क्षेत्राच्या नवीन मुख्य कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे, आमदार सिद्धार्थ शिरोळे, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकरझोपडपट्टी पुनर्वसन  प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर, सचिव सुरेश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी झोपडपट्टी धारकांच्या गृहनिर्माण संस्था नोंदणीचे प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आले.
       बांधकाम व्यावसायिकांनी सामाजिक बांधिलकी जोपासून झोपडपट्टी धारकांना कमी कालावधीत चांगल्या दर्जाची घरे बांधून द्यायला हवीत, असे सांगून उपमुख्यमंत्री श्री.पवार  म्हणाले, झोपडपट्टी धारकांना वर्षभरात अधिकाधिक घरे उपलब्ध करुन देण्यासाठी  प्रयत्न करण्यात येतील. ऐतिहासिक व सांस्कृतिक दृष्टया प्रसिध्द असणाऱ्या पुण्यातील नागरिकांच्या हिताचे निर्णय शासन गतीने घेणार आहे. मेट्रो, रिंगरोड, विमानतळ विस्तारीकरण अशा मोठ्या प्रकल्पांची कामे  निधी अभावी रखडू नयेत, यासाठी  वेळेत निधी उपलब्ध करुन दिला जाईल. प्राधिकरणाचे हे कार्यालय सुसज्ज झाले असून या जागेतून अधिकारी व कर्मचाऱ्यांनी झोपडपट्टी धारकांना चांगल्या सोयी सुविधा तात्काळ उपलब्ध करुन द्याव्यात. या कार्यालयाचे कामकाज  शासकीय जागेत सुरु होण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे सांगून  शासनाची सर्व कार्यालये शासकीय जागेतच सुरु होण्यासाठी अधिकाऱ्यांनी कार्यवाही करावी, असेही ते म्हणाले. 
       गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले, दीन-दुबळया, सोशितांचे घरांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी अनेक धोरणात्मक निर्णय राज्य शासन घेत आहे. गृहनिर्माण विभागातील प्रलंबित कामे गतीने मार्गी लावण्यात येत असून लवकरच स्वतंत्र बैठक घेवून पुणे एसआरएची प्रलंबित प्रकरणे गतीने मार्गी लावण्यात येतील. पुण्यासह राज्याचा नगर नियोजन आराखडा ठरविण्यात येणार आहे. झोपडपट्टी वासियांच्या हितासाठी अनेक योजना हाती घेतल्या असून प्राधिकरणाच्या योजनेंतर्गत गोर-गरिबांना 300 चौ.फूटाची घरे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महानगरपालिकेप्रमाणेच एसआरए अंतर्गत इमारतींची उंची 100 मीटर ठेवण्याबाबतची परवानगी एसआरएला देण्यात येईल. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सर्व सोयी सुविधांयुक्त मोठा 'टाऊनशीप' प्रकल्प पुण्यात उभारण्यात येईल, असे सांगून यासाठी अधिकाऱ्यांनी जागा उपलब्ध करुन द्यावी, असेही ते म्हणाले.
          निलम गोऱ्हे म्हणाल्या, झोपडपट्टी धारकांच्या हितासाठी विकासकांनी पुढे यावे, तसेच त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी स्वतंत्र बैठक घ्यावी.
  राजेंद्र निंबाळकर यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या कामकाजाची माहिती प्रास्ताविकातून दिली. झोपडपट्टी धारकांच्या पुनर्वसनाला व त्यांच्या विकासाला गती देण्याचे काम या कार्यालयाद्वारे होईल, असे ते म्हणाले.
     आभार उपजिल्हाधिकारी वैशाली इंदाणी-उंटवाल यांनी मानले. कार्यक्रमाला बांधकाम व्यावसायिक, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
०००००

  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेची राज्यस्तरीय बैठक पुणे जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्व...