Friday, August 24, 2018

' लोकराज्य शाळा ' करण्याचे आवाहन

जिल्ह्यातील मराठी शिक्षकांच्या कार्यशाळेत 
' लोकराज्य शाळा ' करण्याचे आवाहन
पुणे दि. 23- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने लोकराज्यहे शासनाचे मुखपत्र दरमहा प्रकाशित करण्यात येते. शाळेतील अधिकाधिक विद्यार्थी लोकराज्य मासिकाचे वर्गणीदार झाल्यास त्या शाळेला ' लोकराज्य शाळा'  म्हणून घोषित करण्यात येईल. लोकराज्य शाळा ही संकल्पना यशस्वीपणे राबविणाऱ्या शाळांच्या प्रतिनिधींचा मा.पालकमंत्री महोदयांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. त्यामुळे आपल्या अधिपत्याखालील शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना लोकराज्य अंकाचे वार्षिक वर्गणीदार होण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांनी केले. 

पुणे जिल्हा अध्यापक संघ, मराठी अध्यापक पुणे शहर संघ व नूतन मराठी विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे जिल्ह्यातील मराठी विषय शिकवणाऱ्या शिक्षकांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. नूतन मराठी प्रशाळेतील या कार्यशाळेस माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. गणपत मोरे, महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाचे शिक्षणाधिकारी दिपक माळी, महाराष्ट्र मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष वि. ना. लांडगे, प्रशाळेच्या मुख्याध्यापिका संजीवनी ओमासे, रंगनाथ सुंबे, संजय गवांडे, अशोक तटके,  हनुमंत कुबडे,  ज्ञानदेव दहिफळे आदी उपस्थित होते.
जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग म्हणाले, शासनाने घेतलेल्या निर्णयाचे प्रतिबिंब या अंकात पाहायला मिळते. तसेच लोकराज्य हे मासिक स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. दर्जेदार मजकूर, आकर्षक व सप्तरंगी अंक प्रकाशित होत असल्यामुळे या मासिकाचा खप चार लाखांवर आहे. अंकातील सर्वच मजकूर वाचनीय व वैशिष्टयपूर्ण असतो. त्याबरोबरच हा अंक विद्यार्थ्यांसाठी व शिक्षकांसाठी कसा उपयुक्त आहे याबाबत देखील त्यांनी  माहिती दिली. जिल्ह्यातील शिक्षकांनी 'लोकराज्य शाळा' या उपक्रमात सहभागी होण्यासाठी 020- 26121307 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन देखील यावेळी त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मॉडर्न हायस्कूलचे शिक्षक नवेश पाटील यांनी तर आभार प्रशाळेच्या उपमुख्याध्यापिका सरिता गोखले यांनी मानले.  कार्यशाळेसाठी जिल्ह्यातील शाळांच्या मराठी विषयांचे शिक्षक उपस्थित होते.


0000

Tuesday, August 14, 2018

‘युवा माहिती दूत’ उपक्रमाच्या माध्यमातून
शासकीय योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचतील
                                                           - पालकमंत्री गिरीश बापट

            पुणे, दि 15 : माहिती व जनसंपर्क विभागाचा ‘युवा माहिती दूत’ हा उपक्रम अत्यंत नावीन्यपूर्ण आणि उपयुक्त असून या माध्यमातून शासनाच्या कल्याणकारी योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचतील असा विश्वास पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज व्यक्त केला.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, उच्च शिक्षण विभाग आणि तंत्र शिक्षण विभाग व युनिसेफच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या ‘युवा माहिती दूत’ या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते येथील विधान भवनाच्या सभागृहात झाला. यावेळी ‘युवा माहिती दूत’च्या ॲपचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते, उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर,  कृषी आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह, सहकार आयुक्त डॉ. विजय झाडे, पीएमआरडीएचे किरण गित्ते, भूजल संरक्षण व विकास यंत्रणेचे संचालक शेखर गायकवाड, पुणे विभागाचे उपसंचालक (माहिती) मोहन राठोड, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग उपस्थित होते.
            पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले, राज्य शासनातर्फे विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. शासनाच्या विकास योजनांची माहिती गाव पातळीपर्यंत लाभार्थींना मिळावी या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा हा उपक्रम नावीन्यपूर्ण आहे. या उपक्रमात युवकांना सामावून घेतल्यामुळे ही योजना अधिक प्रभावीपणे राबविली जाईल. या उपक्रमात तरुणांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.
प्रास्ताविकात उपसंचालक मोहन राठोड म्हणाले, हा उपक्रम ऐच्छिक असून, समाजकार्याची आवड असलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थी युवा माहिती दूत म्हणून कार्य करणार आहेत. माहिती दूत त्यांच्या तालुक्यातील 50 कुटुंबांशी समक्ष संपर्क साधुन शासकीय योजनांची माहिती देणार आहेत. युवा माहिती दुतांची नोंदणी महासंचालनालयाने तयार केलेल्या ॲपवर ऑनलाईन होणार आहे. हे ॲप प्ले स्टोअरवर विनामुल्य उपलब्ध आहे. प्ले स्टोअर वरुन हे ॲप डाऊनलोड करुन विद्यार्थ्यांना युवा माहिती दूत म्हणून नोंदणी करता येणार आहे. या युवा माहिती दूतांना विकास योजनांवरील व्हीडीओ क्लिप, शासकीय योजनांची माहिती असणाऱ्या पुस्तिका, घडीपत्रिका महासंचालनालयामार्फत पुरविण्यात येणार आहेत, तरी युवकांनी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.  
यावेळी ‘युवा माहिती दूत’ या उपक्रमावरील ध्वनीचित्रफित दाखविण्यात आली. उपस्थितांचे स्वागत जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांनी केले. सूत्रसंचालन माहिती सहायक जयंत कर्पे यांनी केले. यावेळी माहिती सहायक संग्राम इंगळे यांच्यासह विभागीय माहिती कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
*****





  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेची राज्यस्तरीय बैठक पुणे जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्व...