Tuesday, December 31, 2019







विजयस्तंभास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले अभिवादन
पुणे दि 1 :- कोरेगाव-भीमा येथील विजयस्तंभास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज अभिवादन केले.
यावेळी आ. अशोक पवार, विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील आदी उपस्थित होते.
 अभिवादनानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देतांना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, सर्वप्रथम महाराष्ट्रातील जनतेला नवीन वर्षाच्या मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे, येथील शौर्यस्तंभास एक वेगळा इतिहास आहे. दरवर्षी या ठिकाणी अभिवादनासाठी मोठ्या संख्येने नागरिक येतात, मी राज्यातील जनतेच्यावतीने येथील शौर्यस्तंभास अभिवादन करतो. मध्यंतरी काही घटना घडल्या होत्या, मात्र सरकार त्यामध्ये चांगल्या प्रकारची काळजी घेत आहे. आज देखील पोलीस व प्रशासनाकडून बंदोबस्त अतिशय व्यवस्थित ठेवण्यात आला आहे. राज्यभरातून नागरिक  या ठिकाणी अभिवादनासाठी येत असतात, शूर-वीरांची आठवण ठेवण्यासाठी त्यांना वंदन करण्यासाठी सर्वांनी विजयस्तंभास अभिवादन करण्याठी यावे. कोणत्याही प्रकारे अफवा पसरवण्याचा जर कोणी प्रयत्न केला, तर त्याच्यावर विश्वास ठेवू नये. कारण, जातीय सलोखा कायम राखत, आनंदाने राहण्याची आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे. ही परंपरा आपण जतन केली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.
*****

Saturday, December 28, 2019


'वढू' गावच्या विकासासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील
ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांचे आवाहन
     पुणे,दि. २८: 'वढू' गावची ख्याती सर्वदूर असून या गावच्या सर्वांगिण विकासासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे सांगून ग्रामस्थांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले. 
  पेरणे जयस्तंभ येथील पूर्वतयारी पाहणी नंतर  जिल्हाधिकारी श्री. राम
यांच्या अध्यक्षतेखाली वढू येथे ग्रामसभा झाली, यावेळी उपस्थित ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व ग्रामस्थांना उद्देशून ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, गावच्या सरपंच रेखा शिवले, उपसरपंच रमेश शिवले तसेच पदाधिकारी व  अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांनी यावेळी वढू येथील ग्रामस्थांशी संवाद साधला व समस्या जाणून घेतल्या.
   जिल्हाधिकारी श्री. राम म्हणाले, ग्रामस्थांनी केलेल्या सहकार्यामुळेच मागील वर्षी जयस्तंभ अभिवादन दिनाचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला असून यावर्षी देखील ग्रामस्थांनी आपसात समन्वय राखून प्रशासनाला सहकार्य करावे.  तसेच ग्रामस्थांनी  मागणी केलेल्या विविध विकास कामासाठी प्रशासन सहकार्य करेल, असेही त्यांनी सांगितले.
 पोलीस अधिक्षक संदीप पाटील म्हणाले, या गावाचे नाव अभिमानाने उंचवावे यासाठी ग्रामस्थांनी जिल्हा व पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे. कायदा व सुव्यवस्था तसेच हा अभिवादन सोहळा सुरळीतपणे पार पडण्याकरीता पोलीस विभाग सज्ज असल्याचे यावेळी त्यांनी  सांगितले. याबैठकीला ग्रामपंचायतींचे पदाधिकारी व  ग्रामस्थ उपस्थित होते. 
0 0 0 0 0



पेरणे जयस्तंभ अभिवादन कार्यक्रम सुरळीत पार पाडून जिल्ह्याच्या लौकीकात भर घालूया

                                      -जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांचे आवाहन

            पुणे, दि.२८: हवेली तालुक्यातील पेरणे फाटा (कोरेगाव भिमा) येथे १ जानेवारी रोजी होणारा जयस्तंभ अभिवादन कार्यक्रम सुरळीत व शांततेत पार पाडून जिल्हयाच्या लौकीकात भर घालुया, असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले. 

            पेरणे जयस्तंभ अभिवादनासाठी येणाऱ्या नागरिकांना प्रशासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या सोयी- सुविधांची पाहणी जिल्हाधिकारी श्री राम यांनी केली, यावेळी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. त्यांच्या सोबत विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.सुहास वारके, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर उपस्थित होते.
नागरिकांसाठी विविध सुविधा

             जिल्हाधिकारी श्री. राम म्हणाले, जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमास मोठया प्रमाणात नागरिक उपस्थित राहतात. हा कार्यक्रम सुरळीतपणे पार पाडण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. मागील वर्षीच्या नियोजनामध्ये आढळलेल्या त्रुटी दूर करुन नागरिकांना आवश्यक त्या सुविधा देऊन कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रशासनाने नियोजन केले असून त्यानुसार  गतीने  कामे होत आहेत.  जयस्तंभ येथे भेट देणाऱ्या नागरिकांची व गावकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी सर्व विभाग योग्य त्या उपाययोजना करत असून यासाठी प्रत्येक विभागाचे वरिष्ठ अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. जयस्तंभ परिसरात पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी चार हायमास्ट दिवे लावण्यात आले आहेत. तसेच पेरणे फाटा ते पेरणे गाव या रस्त्यावर कायम स्वरुपी पथदिवे बसविण्यात येत आहेत. मुख्य रस्ता आणि वाहनतळ येथे तात्पुरत्या स्वरुपात प्रकाश व्यवस्था व ध्वनीक्षेपण व्यवस्था करण्यात येत आहे. १०० टँकरव्दारे पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. ५०० फिरते स्वच्छतागृह असणार आहेत. १२ ओपीडी सेंटर्स, २० रुग्णवाहिका व पुरेसा औषधसाठा नागरिकांसाठी तयार ठेवण्यात येत आहे. बांधकाम विभागाच्या वतीने या ठिकाणचे सुशोभीकरण, रस्ते दुरुस्ती, बांधकाम दुरुस्ती, सी.सी.टी.व्ही कॅमेरे बसवण्यात येत आहेत. १५ ठिकाणी प्रशस्त पार्किंगची व्यवस्था करण्यात येत आहे. याशिवाय अग्नीशमन यंत्रणा, वाहतूक विभाग, महानगरपालिका, जिल्हा परिषद, राज्य उत्पादन शुल्क विभाग, अन्न, औषध व प्रशासन विभागाबरोबरच संबंधित विभाग याठिकाणी योग्य ती भूमिका बजावण्यासाठी कार्यरत आहेत. 

नागरिकांसाठी २६० बसेसची व्यवस्था
            जयस्तंभ अभिवादन दिन कार्यक्रमासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी दि.३१ डिसेंबर २०१९ व १ जानेवारी २०२० रोजी एकूण २६० बसेसची व्यवस्था करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.
पेरणे येथील अभिवादन दिन कार्यक्रमासाठी येणाऱ्या नागरिकांना वाहनस्थळापासून ते कार्यक्रम स्थळापर्यंत नेण्यासाठी दि. ३१ डिसेंबर २०१९ व १ जानेवारी २०२० रोजी एकूण २६० बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. नियोजित वाहनतळापासुन जयस्तंभापर्यंत येणाऱ्या ग्रामस्थांची व नागरिकांची विनाशुल्क वाहतुक  या बसेस करतील. त्यापैकी ६० बस दि.३१ डिसेंबर २०१९ रोजी व २०० बस दि. १ जानेवारी २०२० रोजी उपब्ध असतील, यात ३० मिनीबसचा देखील समावेश असेल.
  अभिवादन कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील विविध पक्ष, संस्था, संघटनांचे पदाधिकारी प्रशासनाला सहकार्य करणार असून याठिकाणी भेट देणाऱ्या नागरिकांनीही प्रशासनाला  सहकार्य करावे, असे जिल्हाधिकारी श्री. राम म्हणाले.

नागरिकांच्या संरक्षणासाठी पोलीस प्रशासन दक्ष

   पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके म्हणाले, नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी पोलीस प्रशासन कटीबध्द असून सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी अतिरिक्त पोलीस यंत्रणा कार्यरत राहिल. तसेच ४०० पोलीस अधिकाऱ्यांसह सुमारे १० हजार पोलीस कर्मचारी, होमगार्ड  व स्वयंसेवक का

र्यरत असतील.
  'ट्रॅफिक जॅम' ची समस्या उद्भवू नये, यासाठी वाहतूक वळविण्यात येणार आहे.  सोशल मीडिया द्वारे अफवा पसरविणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यात येत असून नागरिकांनी सहकार्य करावे, असेही डॉ.वारके म्हणाले.

  पोलीस अधीक्षक संदिप पाटील म्हणाले, पेरणे जयस्तंभ अभिवादन दिन हा शौर्याचा अभिमान बाळगण्याचा दिवस असून या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक नागरिकाने एकमेकांच्या भावनांचा आदर राखून शांतता राखावी व प्रशासनास सहकार्य करावे. बाहेरून येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांसाठी प्रशस्त पार्किंगची सोय करण्यात येत आहे.  हा कार्यक्रम शांततेने पार पाडून पुणे जिल्हा हा सर्वांना सामावून घेणारा जिल्हा असल्याचे दाखवून देवूया, असे आवाहन श्री. पाटील यांनी यावेळी केले. जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठया प्रमाणात नागरिक उपस्थित राहतात, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कोणत्याही प्रकारची अफवा पसरु नये, यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी, असेही ते म्हणाले. बैठकीला विविध विभागांचे अधिकारी व  ग्रामस्थ उपस्थित होते.
000000


Saturday, December 7, 2019






                                                 

सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ                     
          पुणे दि. 7 :  राजभवन येथे राज्य  सैनिक कल्याण विभागाच्या वतीने  आयोजित सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्रधानमंत्री मोदी यांनी शहीद जवान कुणाल गोसावी यांच्या वीरपत्नी उमा मुलगी उमंग यांच्याशी संवाद साधला.
          यावेळी लेफ्टनंट कर्नल  आर. आर. जाधव,  शहीद जवान कुणाल गोसावी यांच्या वीरपत्नी श्रीमती उमा कुणाल गोसावी, मुलगी उमंग कुणाल गोसावी,  नाईक नंदकुमार चावरे,  सुभेदार संजय कुमार मोहिते,  एनसीसी अधिकारी बाळासाहेब शिंदे,  एनसीसी  विद्यार्थी  अमंग रुपेली,  संकेत कदम, विजयश्री सुरदे,  प्रीती जगदाळे आदी उपस्थित होते.
000000
                                               


Friday, December 6, 2019






प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे पुण्यात स्वागत

            पुणे,दि.६: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आज वायुसेनेच्या विमानाने लोहगाव विमानतळावर आगमन झाले. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रधानमंत्री महोदय यांचे स्वागत केले. 

      यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार संजय काकडे, आमदार सर्वश्री भिमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, सुनील कांबळे तसेच मुख्य सचिव अजोय मेहता, पोलीस महासंचालक सुबोध कुमार जायसवाल, गुप्त वार्ता विभागाचे संचालक अरविंद कुमार, एअर कमोडोर राहूल भसीन, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, लेफ्टनंट जनरल दीपेंद्रसिंग आहुजा, जिल्हाधिकारी नवल किशोर राम तसेच योगेश गोगावले, जयंत येरवडेकर, गणेश बिडकर आदी उपस्थित होते.

        देशातील पोलीस महासंचालक यांच्या राष्ट्रीय पातळीवरील परिषदेला उपस्थित राहण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे पुण्यात आगमन झाले आहे.
0000000


Thursday, December 5, 2019




पेरणे विजयस्तंभ अभिवादनासाठी येणाऱ्या
नागरिकांना सोयी-सुविधा पुरवाव्यात
                                -जिल्हाधिकारी नवल किशोर राम
        पुणे दि.5:- हवेली तालुक्यातील पेरणे फाटा येथे विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमास 1 जानेवारी रोजी मोठया प्रमाणात नागरिक उपस्थित राहतात. या ठिकाणी  येणाऱ्या नागरिकांना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी आवश्यक त्या सोयी-सुविधा पुरवाव्यात, अशी सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केली.
                जिल्हाधिकारी कार्यालयात मौजे पेरणे (भिमा कोरेगांव) येथील विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाची पूर्वतयारी आढावा बैठक जिल्हाधिकारी श्री.राम यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक संदीप पाटील, निवासी उप जिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे उपस्थित होत्या.
                श्री.राम म्हणाले, हा कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी तसेच विजयस्तंभ येथे भेट देणाऱ्या नागरिकांची व गावकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी सर्व संबंधितांनी योग्य त्या उपाययोजना कराव्यात. टँकरव्दारे पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करुन द्यावे, फिरते स्वच्छतागृह, ये-जा करण्याकरीता एस.टी. महामंडळ व पी.एम.पी.एम.एल ने पुरेश्या बसेस उपलब्ध करुन द्याव्यात, आरोग्य विभागाने रुग्णवाहिका व पुरेसा औषध साठा तयार ठेवावा. बांधकाम विभागाने या ठिकाणचे सुशोभीकरण, रस्ते दुरुस्ती, बांधकाम दुरुस्ती, सी.सी.टी.व्ही कॅमेरे, प्रशस्त वाहन पार्किंग व्यवस्था करावी. विद्युत विभागाने पुरेसा विद्युतपुरवठा करावा. अन्न व औषध विभागाने खाद्य पदार्थांच्या दुकानामध्ये भेसळयुक्त पदार्थांची विक्री होणार नाही याची दक्षता घ्यावी. अग्नीशमनवाहिका तसेच आवश्यक त्या सुविधा वेळेत पुरवण्यासाठी सर्वांनी एकमेकांशी समन्वय ठेवून कार्यवाही करावी. 
                पोलीस अधीक्षक संदीप पाटील म्हणाले, विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठया प्रमाणात नागरिक उपस्थित राहतात, या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी दक्ष राहून कामे करावीत. या दिवशी कोणत्याही प्रकारची अफवा पसरु नये, यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी.
                या बैठकीस महसूल, गृह विभागाबरोबरच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी, वढू, पेरणे येथील सरपंच तसेच नागरिक उपस्थित होते.
००००


  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेची राज्यस्तरीय बैठक पुणे जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्व...