Wednesday, November 23, 2016

नोटाबंदीमुळे सर्व सामान्यांना होणारा त्रास कमी करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे - विजयालक्ष्मी बिद्री-प्रसन्ना

नोटाबंदीमुळे सर्व सामान्यांना होणारा
त्रास कमी करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे
-    विजयालक्ष्मी बिद्री-प्रसन्ना
पुणे दि. २३: केंद्र सरकारचा जून्या ५०० आणि १००० च्या नोटा चलनातून बंद करण्याचा उद्देश चांगला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करताना सामान्य लोकांचा त्रास कमी करण्यासाठी सर्व विभागांनी संयुक्तपणे काळजी घेण्याचे आवाहन मनुष्य बळ विकास मंत्रालयाच्या विभागीय संचालक विजयालक्ष्मी बिंद्री यांनी आज केले
            चलनबंदीचा आढावा घेण्यासाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात श्रीमती बिंद्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, जिल्हा पुरवठा अधिकारी दिनेश भालेदार, जिल्हा अन्न धान्य वितरण अधिकारी शिवाजी पवार, जिल्हा उपनिबंधक अनंद कटके यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
            श्रीमती बिंद्री म्हणाल्या, चलनातून ५०० आणि १००० च्या जून्या नोटा बंद करण्याचा परिणाम काही प्रमाणात आर्थिक व्यवहारावर पडला आहे. ही परिस्थिती हाताळताना सर्व सामान्य नागरिकांना त्रास होवू नये यासाठी शासनाने विविध उपाययोजना केल्या आहेत. नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने राबविलेली टोल फ्री क्रमांकाची संकल्पना चांगली आहे. या परिस्थितीत सामान्य नागरिकांना कमीत कमी त्रास व्हावा यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याची आवश्यकता आहे खाजगी रुग्णालयांनी उपचारापोटी धनादेश स्विकारावेत, याची अंमलबजावणी काटेकोरपणे होत आहे का याची पाहणी करण्यासाठी पथकांची नियुक्ती करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. तसेच बॅकांनीही आरटीजीस, एनईफटीसाठी ग्राहकांच्या स्वतंत्र रांगांची व्यवस्था करावी. त्यामुळे आर्थिक व्यवहार अधिक गतीने होण्यास मदत होईल. तसेच लोकांना ई-बँकींगच्या माध्यमातून अधिकाधिक व्यवहार करण्यास प्रवृत्त करावे व ग्राहकांना अधिक चांगल्या सेवा उपलब्ध करुन देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी बँकेच्या प्रतिनिधींना केल्या.
            या बैठकीला राष्ट्रीयकृत बँकांचे प्रतिनिधी, सहकारी, अर्बन बँकांचे प्रतिनिधी, बाजार समितीचे समितीचे प्रतिनिधी, पेट्रोल पंप प्रतिनिधी, ट्रान्सपोर्ट कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या सर्व प्रतिनिधींनी चलनबंदी मुळे निर्माण झालेल्या समस्या व त्या सोडविण्यासाठीच्या सूचना या बैठकीत मांडल्या.

०००००००
ॲट्रोसिटी कायद्याविषयीच्या जागृतीसाठी प्रयत्न व्हावेत
-    सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले
पुणे दि. २३: अनुसूचित जाती अनुसूचीत जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याबाबात आजही समाजाच्या सर्व स्तरात अपूरी माहिती आहे. त्यामुळे समाजच्या तळागाळापर्यंत या कायद्याविषयीच्या जागृतीसाठी प्रयत्न व्हावेत असे प्रतिपादन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी आज केले.
            सामाजिक न्याय विभागाच्यावतीने यशदा येथे आयोजित अनुसूचित जाती अनुसूचीत जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्या संदर्भात अधिकाऱ्यांच्या राज्यस्तरीय एक दिवसीय कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी श्री. बडोले बोलत होते. यावेळी अनुसूचीत जाती जमातीचे माजी अध्यक्ष तथा सदस्य सी. एल. थूल, समाजिक न्याय विभागाचे सचिव डॉ. सुरेंद्रकुमार बागडे, विशेष पोलीस महासंचालक कैसर खलीद, ॲङ असीम सरोदे उपस्थित होते.
श्री. बडोले म्हणाले, अनुसूचीत जाती अनुसूचीत जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्या विषयी ग्रामीण भागात माहितीचा अभाव आहे. राज्यातील वाड्या खेड्यापर्यंत या कायद्याची योग्य माहिती सर्व लोकांना होणे आवश्यक आहे. त्याच बरोबर या कायद्यांतर्गत होणारी प्रकरणे हाताळणाऱ्या सामाजिक न्याय विभाग पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनाही या कायद्याची सखोल माहिती असणे आवश्यक आहे. ही कार्यशाळा त्यासाठी उपयुक्त असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले
                                                            ०००००००००       
सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेखाली
सामाजिक न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक संपन्न
पुणे दि. २३: राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक आज संपन्न झाली. या बैठकीला विभागाचे सचिव    डॉ. सुरेंद्रकुमार बागडे, विभागाचे आयुक्त पियुषसिंह, अतिरिक्त आयुक्त सदानंद पाटील उपस्थित होते.
यशदा येथील सभागृहात श्री. बडोले यांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक न्याय विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली. या बैठकीत शिष्यवृत्ती, मागासवर्गीय गृहनिर्माण सोसायटी, मागासवर्गीय वसतिगृह, समाजिक न्याय भवन तसेच विविध योजनांवरील निधींच्या खर्चाचा आढावा घेण्यात आला. सामाजिक न्याय विभागाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांवरील निधी तातडीने खर्च करण्याच्या सूचना श्री. बडोले यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच यावेळी राज्यात नव्याने स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय जातपडताळी समितीच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला.

०००००००

सामाजिक न्यायमंत्री बडोले यांच्या अध्यक्षतेखाली
अपंगाच्या योजनाची आढावा बैठक संपन्न
        पुणे, दि. 23 : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेखाली अपंग कल्याण   विभागाच्या योजनांबाबत आढावा बैठक अपंग आयुक्तालयात संपन्न्‍ झाली. याप्रसंगी अपंग कल्याण आयुक्त नितीन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
            सदरील बैठकीत अपंग कल्याण आयुक्तालयात चालू असलेल्या कामाचे सादीकरण करण्यात आले. तसेच अपंगत्व येवूच नये यासाठी काय करता येईल, अपंगत्वाचे प्रमाणपत्रे देणेसाठी शिबीर घेणे सन 2016-17 साठी योजनानिहाय मंजूर प्राप्त तरतूद  झालेला खर्च आदिबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला.
            याबाबत 23 डिसेंबर 2015 रोजी झालेल्या बैठकीतील इतिवृत्तावर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच शाळा गुणवत्ता सुधार समिती गठीत करण्याचे निर्देश देण्यात आले होते.  त्याप्रमाणे झालेली कार्यवाही, अंध, अपंग, मतिमंद शाळांचे प्रलंबित प्रस्ताव, अनुदान याबाबतही आढावा घेण्यात आला. यावर्षी कोणताही निधी परत जावू नये याची काळजी घ्यावी अशा सुचना श्री. बडोले यांनी दिल्या.
            तसेच दिनांक 21 जुलै 2016 रोजी मुंबई येथे झालेल्या बैठकीनुसार झालेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने विशेष शाळेतील विशेष शिक्षकांचा विशेष दर्जा लक्षात घेवून माध्यमिक वेतनश्रेणी, कंत्राटी पदांना नियमित वेतन मिळणेबाबत चर्चा झाली.
            प्रारंभी अपंग कल्याण आयुक्तालय आवक – जावक संगणकीय प्रणालीचे उदघाटन सामाजिक न्यायमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले.
            अपंग कल्याण आयुक्तालयाची वेबसाईट तयार करावी. किती शाळा आहेत, शासकीय किती आहेत, अनुदानित किती आहेत, विद्यार्थी संख्या आदि माहिती याव्दारे उपलब्ध  झाली पाहिजे अशा सुचना श्री. बडोले यांनी दिल्या.
अपंगाच्या समस्येबाबत बैठक :  याप्रसंगी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील अपंगाच्या समस्येबाबतची आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी आ. मेधा कुलकर्णी, अपंग कल्याण आयुक्त नितीन पाटील, अपंग संस्थेचे संस्थापक आदि उपस्थित होते.
            अपंगाच्या  योजनाबाबत जनजागृती करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांच्या सहभागाव्दारे यशदाच्या मार्फत वर्षभराचे प्रशिक्षणाचे नियोजन करण्याच्या सुचना श्री. बडोले यांनी दिल्या.
            याप्रसंगी उपस्थितीत संस्थाचालकांनी मुकबधीर, कर्णबधीर, मतिमंद यांच्याबाबतच्या विविध समस्या अडचणी मागण्या मांडल्या. याबाबत नियमानुसार आवश्यक कार्यवाही करण्यात येईल असे श्री. बडोले यांनी सांगितले.

                                                            00000



Tuesday, November 22, 2016

पुणे स्थानिक प्राधिकार मतदार संघाच्या निवडणुकीत अनिल भोसले विजयी

पुणे स्थानिक प्राधिकार मतदार संघाच्या  
निवडणुकीत अनिल भोसले विजयी
पुणे दि. 22 : पुणे विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकार मतदार संघाच्या निवडणुकीची मतमोजणी प्रक्रीया आज दि. 22 नोव्हेंबर 2016 रोजी शिवाजीनगर येथील शासकीय गोडाऊनमध्ये शांततेत पार पडली. या निवडणुकीत सर्वाधिक मते मिळविणारे अनिल शिवाजीराव भोसले यांना निवडणुक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी विजयी घोषीत केले.  
या निवडणुकीत एकूण झालेल्या 658 मतांपैकी 650 मते वैध तर 8 मते अवैध ठरली. या निवडणुकीत अनिल शिवाजीराव भोसले यांना 440 मते, अशोक येनपूरे यांना 133 मते, संजय चंदूकाका जगताप यांना 71 मते, यशराज पारखी  व विलास विठोबा लांडे यांना प्रत्येकी 3 मते मिळाली. 
शिवाजीनगर गोडाऊनमध्ये सकाळी 8 वाजता मतमोजणी प्रक्रीयेला सुरुवात झाली. 6 टेबलवर मतमोजणी प्रक्रीया पार पडली. यावेळी या मतदार संघाचे निवडणुक निरीक्षक शिवाजीराव दौंड, उपजिल्हा निवडणुक अधिकारी समीक्षा चंद्राकार, सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी राजेंद्र मुठे उपस्थित होते.

0000000

Monday, November 21, 2016

नगरपालिका निवडणूक निर्भय वातरणात पार पडल्या पाहिजेत ---जिल्हाधिकारी सौरभ राव

नगरपालिका निवडणूक निर्भय
वातरणात पार पडल्या पाहिजेत
                                                   ---जिल्हाधिकारी सौरभ राव

पुणे, दि. 21 : जिल्हयातील नगरपालिका निवडणूका नि :पक्षपाती,  निर्भय वातारणात पार पडल्या पाहिजेत. लोकसभा विधानसभा निवडणूकीप्रमाणेच सुक्ष्मनियोजन करावे. निवडणूकीत कोठेही गैरप्रकार होवू नये यासाठी विशेष लक्ष देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिल्या.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात नगरपरिषद निवडणूकीत आचारसंहितेची अंमलबजावणीसाठी आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी पोलीस अधिक्षक जय जाधव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाधिकारी सौरभ राव म्हणाले की, या निवडणूकीबाबत राज्य निवडणूक आयोगाकडून नियमितपणे आढावा घेतला जात आहे. निवडणूकीत कायदा व सुव्यवस्था राहिली पाहिजे. निवडणूकीत कोठेही गैरप्रकार होवू नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपायोजना करुन वेळीच करण्यात याबाबतचा अहवाल नियमितपणे पाठविण्यात यावा. गुन्हेगारावर वचक राहिला पाहिजे. मतदारावर प्रभाव टाकण्यासाठी देण्यात येणाऱ्या वस्तू, मद्य इत्यादी वाटपावर अंकुश ठेवावा. हातभट्टी विरुध्द कार्यवाही करावी. तसेच या कालावधीत नगरपालिका भागातील दुकानाची मागील वर्षाची विक्री व यावर्षीची विक्री याची पडताळणी करुन अहवाल देण्यात यावा. याद्वारे प्रभावीपणे नियोजन करुन निवडणूकीत प्रशासनाचा प्रभाव दिसून आला पाहिजे यासाठी पुढाकार घेण्याच्या सूचना संबधितअधिकाऱ्यांना दिल्या.
निवडणूक कालावधीत भरारी पथक,दक्षता पथक, ‍स्थिर पथक नगरपरिषद स्तरावर प्रभावीपणे कार्यरत असले पाहिजे. संबधित पथकांच्या प्रमुखांची स्वतंत्र बैठक घेवून काम करावे. का य करु नये याबाबत मार्गदर्शन केले जावे. अशा सूचना दिल्या. त्याचप्रमाणे राजकीय पक्ष, उमेदवार यांच्या रोख रक्कमाचा मोठा व्यवहार तसेच बँकेमार्फत होणाऱ्या मोठया संशयास्पद आर्थिक व्यवहारावर लक्ष ठेवण्याच्या सूचना संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
निवडणूकीत पेड न्यूज,सोशल मिडिया व इंटरनेट इत्यादी विशेष लक्ष द्यावे. अतिशय प्रभावी कमी खर्चाच्या या माध्यमाद्वारे चुकीचे काही होवू नये. यामधीलअद्यावत तंत्रज्ञान अवगत असलेल्या तज्ञांचा यासाठी सहभाग घ्यावा तसेच या निवडणूकीतही स्वयंसेवी संस्था, महाविद्यालयीन विद्यार्थी,युवक आदिंचा सहभाग घेवून मतदारामध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी केले.
याबैठकीत राज्य उत्पादन शुल्क,आयकर विक्रीकर तसेच संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
000000




रुग्णालयांनी धनादेश स्वीकारण्यास नकार दिल्यास आरोग्य सनियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा -जिल्हाधिकारी सौरभ राव यांचे आवाहन

रुग्णालयांनी धनादेश स्वीकारण्यास नकार दिल्यास
आरोग्य सनियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा
 -जिल्हाधिकारी  सौरभ राव यांचे आवाहन
पुणे, दि. 21 : जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयांनी रुग्णांकडून उपचाराच्या रकमेपोटी धनादेश स्वीकारावेत तसेच  शुल्का अभावी कोणाचाही आपत्कालीन औषधोपचार टाळू नये अशा सूचना देत या बाबत रुग्णांना अथवा त्यांच्या नातेवाईकांना सहकार्य मिळत नसल्यास त्यांनी तात्काळ 108 क्रमांकाच्या हेल्पलाईनवर अथवा आरोग्य सनियंत्रण समितीशी संपर्क  साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी केले आहे.
खासगी रुग्णालयांकडून जून्या 500 व 1000 रुपयांच्या नोटा स्विकारण्यास नकार देण्यात येत असल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त होत आहेत. याबाबत राज्य शासनाच्या आरोग्य संचालनालयाने सर्व खाजगी रुग्णालयांना रुग्णांकडून धनादेश स्विकारण्याचे आदेश दिलेले आहेत. या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी आरोग्य विभागाला सनियंत्रणाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. रुग्णांना खाजगी रुग्णालयांकडून सहकार्य मिळत नसल्यास त्यांनी 108 या हेल्पलाईनवर अथवा जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या 020-27286458 व जिल्हा आरोग्य अधिकारी पुणे यांच्या 020-26051418, 26129965 या क्रमांकावर संपर्क साधावा.
 तसेच या निर्णयाची माहिती देणारा फलक प्रत्येक रुग्णालयांनी त्यांच्या दर्शनी भागात लावण्याच्या सूचनाही देण्यात आलेल्या आहेत. औषधोपचाराबाबत काही तक्रारी प्राप्त झाल्यास आरोग्य विभागाच्या संबंधित अधिकाऱ्याने संबंधित रुग्णालयाकडे संपर्क साधून रुग्णाचे नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक प्राप्त करुन घ्यावेत व रुग्णालयात कोणत्याही परिस्थितीत शुल्काअभावी आपत्कालीन औषधोपचार टळू देवू नयेत. रुग्णांनी अथवा त्यांच्या नातेवाईकांनी संबंधित रुग्णालयातील जबाबदार व्यक्तीचा दूरध्वनी अथवा मोबाईल नंबर घ्यावा, जेणेकरुन त्यांना धनादेश स्विकारण्यास मदत होईल. तसेच एखाद्या रुग्णाने उपचार घेतलेल्या रुग्णालयास दिलेला 10 हजार रुपये पर्यंतचा धनादेश न वटल्यास या धनादेशाची प्रतिपूर्ती मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून करण्यात येणार आहे.  

*******

Wednesday, November 16, 2016

विधानपरिषद निवडणूकीसाठी आचारसंहितेचे पालन करुन निवडणूकीचे पावित्र्य राखावे - - जिल्हाधिकारी सौरभ राव

 विधानपरिषद निवडणूकीसाठी आचारसंहितेचे
पालन करुन निवडणूकीचे पावित्र्य राखावे
-         - जिल्हाधिकारी सौरभ राव
पुणे. दि.16:- विधानपरिषद (स्थानिक प्राधिकारी संघ) निवडणूक निर्भय मुक्त वातारवणात पार पाडली पाहिजे. निवडणूक आयोगाच्या  आदर्श आचारसंहितेचे पालन करुन अधिक पारदर्शकता आणून निवडणूकीची पवित्रता राखली गेली पाहिजे. यासाठी संबधितानी सतर्क रहावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांनी केले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात विधानपरिषद निवडणूकीबाबतच्या बैठकीत मार्गदर्शन करतांना बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी जिल्हाधिकारी सौरभ राव म्हणाले की, संबधित उमेदवार व त्यांच्या पक्षातर्फे केले जाणारे रोख रक्कमाचा मोठा आर्थिक व्यवहारावर निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार आयकर,विक्रीकर आदि संबधित विभागांनी विशेष लक्ष ठेवावे. निवडणूकीत गैरव्यवहार होवू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करुन अधिक पारदर्शकपणे काम करुन निवडणूक यंत्रणेची प्रतिमा चांगली राहिली पाहिजे याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना दिल्या.
निवडणूकीच्या दरम्यान नियमबाहय होर्डिग्ज,बॅनरद्वारे राजकीय स्वरुपाच्या जाहिराती लावल्या जाणार नाहीत याकडे लक्ष द्यावे. बँकामार्फत होणाऱ्या मोठया संशयास्पद आर्थिक व्यवहाराबाबत सतर्क रहावे. पैशाचा दुरपयोग निवडणूकीत होवू नये. विविध बँकेमार्फत नोटाची माहिती रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार करावी. तसेच त्याचा अहवालही नियमित कळविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.
निवडणूक कालावधीत सोने व्यापारी यांच्याकडूनही गैरव्यवहार होवू नये अशा सूचना सराफ असोशिएनच्या पदाधिकारी यांना दिल्या. तसेच निवडणूक प्रक्रिया शांततेत सुरळीत पार पाडण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. त्याचप्रमाणे निवडणूक कालावधीसाठी नियुक्त केलेले भरारी पथके, दक्षता पथके यांनी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
बैठकीस उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती समिक्षा चंद्राकार, उपजिल्हाधिकारी श्रीमती मोनिका सिंह, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्री. दिवाकर देशमुख, जिल्हा उपनिबंधक बी.टी.लावंड (शहर) देवेंद्र कटके (ग्रामीण) आयकर विक्रीकर – राज्य उत्पादन शुल्क पुणे व पिंपरी चिंचवड मनपाचे अधिकारी,ज्वेलर्स असोशिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
0000



Sunday, November 13, 2016

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला भेट

पुणे, दि. 13 (वि.मा.का.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी राज्यपाल सी.विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मानव संशोधन व विकासमंत्री प्रकाश जावडेकर,  पालकमंत्री गिरीश बापट, खासदार शरद पवार, सिरमचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. सायरस पुनावाला, कार्यकारी संचालक आदर पुनावाला आदी उपस्थित होते.
आदर पुनावाला स्वच्छ शहर पुढाकार अंतर्गत विविध सक्शन मशीनची यावेळी  पंतप्रधान श्री मोदी यांनी पाहणी केली.
००००





स्टार्टअप उद्योगांनी कृषी क्षेत्रातही काम करावे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन: आंतरराष्ट्रीय साखर परिषदेचे उद्घाटन

स्टार्टअप उद्योगांनी कृषी क्षेत्रातही काम करावे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन: आंतरराष्ट्रीय साखर परिषदेचे उद्घाटन

पुणे, दि. १३ (विमाका): कृषी क्षेत्रात अधिक नाविन्यपूर्ण संशोधन होण्याची आवश्यकता असून स्टार्टअप उद्योगानीही कृषी क्षेत्रात काम करायला हवे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे केले.
पुणे जिल्ह्यातील मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे शुगरकेन व्हॅल्यू चेन-व्हिजन २०२५ या आंतरराष्ट्रीय साखर परिषदेचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर, सहकार मंत्री सुभाष देशमुख, संस्थेचे उपाध्यक्ष शिवाजीराव गिरधर पाटील, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष दिलीपराव वळसे-पाटील आदी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘जागतिक स्तरावरील विचार केला असता कृषी क्षेत्रात संशोधन आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला गेला आहे. त्या तुलनेत आपल्या देशात संशोधन आणि तंत्रज्ञानाचा तितकासा वापर होत नाही. हा वापर वाढण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट सारख्या संस्थांनी पुढाकार घ्यायला हवा. स्टार्टअप उद्योगांनी कृषी क्षेत्रात संशोधन, विकास, तंत्रज्ञान विस्तार, बीज संशोधन आदी क्षेत्रात काम करण्याची आवश्यकता आहे. यामुळे देशातील अनेक तरुणांना रोजगार मिळेल आणि शेतीच्या विकासाला हातभार लागेल.’
शेतीसमोर दुष्काळ, पावसाची अनियमितता, घटत जाणारी जमीन धारणा आदी आव्हाने आहेत. या आव्हानावर मात करून आपणास उत्पादकता वाढवायची आहे, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, ‘ऊसाच्या पिकात आंतरपीक घेण्याकडे शेतकरी वळला आहे. आता ऊसाच्या पिकासाठी सूक्ष्म सिंचन करण्याची आवश्यकता आहे. यामुळे उत्पादकता वाढते आणि साखरेचे उत्पादन चांगले होत असल्याचा अनुभव आहे.’
डाळीच्या उत्पादनावर भर देण्याची आवश्यकता असल्याचे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘ऊसाच्या उत्पादनाबरोबरच इथेनॉल उत्पादनावर साखर कारखान्यांनी भर द्यायला हवा. गेल्या दोन वर्षात इथेनॉलचे उत्पादन आणि विक्रीत वाढ झाली आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था इथेनॉलवर चालू शकते. यामुळे खनिज तेलाच्या आयातीसाठी लागणारे परकीय चलनाची बचत होऊ शकते.’
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने बांबूच्या संशोधनाकडे लक्ष द्यावे अशी सूचना पंतप्रधान मोदी यांनी केली. ते म्हणाले, ‘ऊस आणि बांबू यांच्यात साम्य आहे. बांबूला जागतिक स्तरावर चांगली मागणी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना एक चांगला पर्याय उपलब्ध होऊ शकतो.’
केंद्र सरकारने पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांबाबत घेतलेल्या निर्णयाला जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘देशाची अर्थव्यवस्था सुदृढ करण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेतील काळा पैसा दूर करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. तीस डिसेंबरपर्यंत जनतेने वेळ द्यावा. सर्व व्यवस्था सुरळीत होईल.’
साखरेबरोबरच उपउत्पादनावरही
कारखान्यांनी लक्ष द्यावे: मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘जागतिकीकरणानंतर राज्यातील साखर कारखानदार उद्योगाला राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करावी लागत आहे. त्यामुळे आता या उद्योगाला केवळ साखर उत्पादन करून चालणार नाही. सहवीज निर्मिती, इथेनॉल उत्पादन यासारख्या उपउत्पादनांवर साखर कारखानदारीने लक्ष केंद्रित करायला हवे.’
ऊस पीक येत्या तीन वर्षात सूक्ष्म सिंचनावर वळवण्याचा राज्य शासनाचा निर्धार आहे. त्यासाठी शासन, शेतकरी आणि उद्योग यांची मदत घेतली जाईल. ऊसाची उत्पादकता वाढवण्याबरोबरच पाण्याचा किफायतशीर वापर करण्यासाठी लक्ष केंद्रित करावे लागणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
राज्यातील बहुतांश कारखान्यांनी उसासाठीची एफआरपीची रक्कम आदा केली आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्याला एफआरपीची रक्कम मिळावी यासाठी राज्य शासन नेहमीच आग्रही आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
माजी केंद्रीय कृषी मंत्री तथा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, ‘साखर उद्योगासमोर अनेक आव्हाने आहेत. या आव्हानांचा विचार आणि त्यावर उपाययोजना करण्यासाठी या परिषदेचे संयोजन करण्यात आले आहे. ऊसाची उत्पादकता वाढवणे, कारखानदारीत आधुनिक तंत्रज्ञान आणणे, तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करणे या बाबींचा या परिषदेत विचार होणार आहे.
यावेळी राज्यातील सहकार, साखर कारखानदारी, कृषी, उद्योग अशा विविध क्षेत्रातील लोक उपस्थित होते. सूत्रसंचालन मानसी सोनटक्के यांनी केले.
क्षणचित्रे
·        कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी स्थापन केलेल्या या संस्थेबाबतची माहिती देणारा लघुपट दाखविण्यात आला. या लघुपटात संस्थेच्या विकासाबरोबरच विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली.
·        पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करून त्यांचा यथोचित गौरव केला आहे. वसंतदादांनी आपले सार्वजनिक जीवन कृषी व सहकार क्षेत्रात घालवून भरीव योगदान दिले. परिणामी शेतीमध्ये परिवर्तन झाल्याचे दिसून येत आहे. ते दूरदृष्टीचे नेते होते, या शब्दात त्यांच्या कार्याचा गौरव केला.
·        वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आगमन होताच क्षेत्रीय ऊसाची पाहणी केली. नवीन वाण आणि नव्या तंत्रज्ञानाची माहिती घेतली. शरद पवार यांनी सार्वजनिक जीवनात काम करण्याला आता ५० वर्षे पूर्ण होत आहे. त्यांनी राजकारणात शेती आणि शेतकरी केंद्रबिंदू मानून काम केले, असा गौरवपूर्ण उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. त्याचबरोबर राज्याचे तरुण व अभ्यासू मुख्यमंत्री यांच्या राजकीय जीवनालाही  २५ वर्षे पूर्ण झाल्याचे सांगून देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले.
·        सौर उर्जेच्या क्षेत्रात महाराष्ट्र शासन चांगले काम करीत असल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे कौतुक केले. सहकार क्षेत्राने सौर उर्जेच्या क्षेत्रात योगदान द्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
·        नरेंद्र मोदी हे उर्जावान पंतप्रधान आहेत. ते काल जपानच्या दौऱ्याहून भारतात आले. आज सकाळी गोवा, दुपारी बेळगाव आणि आता महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांच्यासारखा काम करणारा पंतप्रधान देशाला लाभला आहे, असे गौरवउद्गार शरद पवार यांनी व्यक्त केले.
·        मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्रंदिवस काम करणारे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला.
·        साखर उद्योग शेतकऱ्यांसाठी वरदान असला तरी गेल्या दोन वर्षात पाउस कमी पडल्यामुळे संकटाला तोंड द्यावे लागले. अशाप्रसंगी केंद्र सरकारने महाराष्ट्राला भरीव मदत केली. त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.
·        व्हिएसआय संस्थेने यापुढेही कृषी संशोधन क्षेत्रात काम करावे, शासन आपल्याबरोबर आहे, असे मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केले.
·        तीन दिवस चालणाऱ्या आंतरराष्ट्रीय साखर परिषदेसाठी महाराष्ट्राबरोबरच देशातील अन्य राज्य आणि परदेशातील कृषी शास्त्रज्ञ सहभागी झाले.
****





  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेची राज्यस्तरीय बैठक पुणे जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्व...