Friday, January 31, 2020







साहित्य आणि कलेमध्ये समाजाला घडविण्याची ताकद
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी
'डेक्कन लिटरेचर फेस्टीव्हल'चे उद्घाटन
            पुणे,दि.31: साहित्य आणि कला हे समाजाचे प्रतिबिंब दाखविणारा आरसा असून समाजाला घडविण्याची ताकद यामध्ये असते, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केले.
             येथील बालगंधर्व रंगमंदिर मध्ये 'डेक्कन लिटरेचर फाऊंडेशन' तर्फे पुण्यात आयोजित तीन दिवसीय 'डेक्कन लिटरेचर फेस्टीव्हल' चे उद्घाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंह, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, साखर आयुक्त सौरभ राव, दिग्दर्शक विशाल भारद्वाज, उप जिल्हाधिकारी मोनिका सिंग, मनोज ठाकूर, रवींद्र तोमर आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी मोनिका सिंग यांच्या गझलांच्या संग्रहाचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते झाले.
            राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, पुणे ही सांस्कृतिक राजधानी असून हे कलेचं केंद्र आहे. साहित्य प्रेमींच्या शहरात होणारा हा महोत्सव महत्वपूर्ण आहे. समाजाचे प्रतिबिंब दाखविणारा साहित्य हा आरसा  असतो. समाजाला दिशा दाखवून समाज घडविण्याची ताकद कलेत असते. साहित्य, चित्र, मालिका व चित्रपटांचा प्रभाव समाजावर पडत असतो. समाज युगानुयुगे टिकवण्यासाठी साहित्यिक, कलाकार योगदान देऊ शकतात समाजाला एकत्र आणण्यासाठी योगदान देणाऱ्या  साहित्याची निर्मिती होणे गरजेचे आहे. या तीन दिवसीय  महोत्सवाच्या विचारमंथनातून नवी दिशा द्यावी, अशी अपेक्षा श्री. कोश्यारी यांनी यावेळी व्यक्त केली.
            विशाल भारद्वाज म्हणाले, साहित्य, संस्कृती, कला यांचा चांगला मिलाफ या फेस्टिव्हलमध्ये होत आहे. या निमित्ताने होणारे विचारमंथन समाजाला नवा विचार देईल.
            सत्यपाल सिंह म्हणाले, नव्या पिढीसमोर चांगले साहित्य येणे आवश्यक आहे. जीवन समृध्द करण्यासाठी, समाजाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी साहित्याची गरज आहे. सर्वांना जोडण्याचे काम साहित्याने करावे.
            मोनिका सिंग यांनी प्रास्ताविक केले. राजीव श्रीवास्तव यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला साहित्यप्रेमी, विविध क्षेत्रातील मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते. साहित्य,कविता, नाट्य, चर्चा अशा बहुरंगी कार्यक्रमांचे आयोजन या फेस्टीव्हल मध्ये करण्यात आले आहे.

0000000








आंतरराष्ट्रीय साखर परिषद व प्रदर्शनाला प्रारंभ
साखर उद्योगाच्या सक्षमीकरणासाठी संशोधन कार्याच्या विस्ताराची गरज
                                        - माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार

          पुणे दि. 31: ग्रामीण भागात उसशेतीमुळे चांगले सामाजिक व आर्थिक बदल होत आहेत. मात्र, ऊस संशोधन संस्थांमध्ये केलेली गुंतवणूक अत्यल्प आहे. यामुळे मागणी असूनही साखर उद्योगाला भविष्यात साखरेसह सहवीज, इथेनॉलचा पुरवठा करता येणार नाही. साखर उद्योगाच्या सक्षमीकरणासाठी संशोधन कार्याच्या विस्ताराची गरज असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले.
             मांजरी, पुणे येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट संस्थेच्या वतीने 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2020 या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या साखर उद्योगासंदर्भात व्दितीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते उदघाटन् झाले. यावेळी आंतरराष्ट्रीय साखर परिषदेचे कार्यकारी संचालक डॉ. जोस ऑरिव्ह, पंजाबचे सहकारमंत्री सुखजिंदरसिंग रंधावा, व्हीएसआयचे उपाध्यक्ष व मंत्री दिलीप वळसे पाटील, जलसंपदामंत्री जयंत पाटील, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, व्हीएसआयचे पदाधिकारी विजयसिंह मोहिते पाटील, हर्षवर्धन पाटील, साखर आयुक्त सौरभ राव, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे महासंचालक शिवाजीराव देशमुख आदी मान्यवर होते.
             श्री. पवार म्हणाले, व्हीएसआय ही शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी उभी केलेली संस्था आहे. जगातील साखर क्षेत्रातील तज्ज्ञाचे मार्गदर्शन घेवून साखर उद्योगाला पुढे नेण्यासाठी संस्थेचे प्रयत्न सुरू आहेत. याच प्रयत्नातून आंतरराष्ट्रीय पातळीवरील ही परिषद होत आहे. साखर उद्योगाच्या प्रयत्नामुळे देशातील पाच कोटी शेतकरी आता 50 लाख हेक्टरवर ऊस लागवड करीत समृध्दीकडे जात आहेत. 2025 पर्यंत देशाची साखर मागणी 300 ते 330 लाख टनापर्यंत गेलेली असेल. आपल्याला  ऊस उत्पादकता व साखर उतारा वाढवून ही समस्या सोडवावी लागेल, असा सल्ला श्री.पवार यांनी दिला.
          दुष्काळ, क्षारता, कीड आणि रोग या संकटाचा मुकाबला करणारे नवीन ऊस वाण शोधण्यासाठी जैवतंत्रज्ञान, नॅनो तंत्रज्ञान तसेच जनुक तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक असल्याचे सांगून श्री पवार म्हणाले,  शेतकऱ्यांना लागवडीच्या पातळीवर तांत्रिक मार्गदर्शन देणे गरजेचे असून त्यासाठी उत्पादक ते कारखानदार हा दुवा मजबूत करावा लागणार आहे. उत्पादक शेतकरी, कारखानदार आणि ग्राहक यांच्यात दुवा तयार करण्यासाठी डिजिटल तंत्राचा वापर करण्याची गरज आहे. त्यासाठी संशोधन संस्थांचे बळकटीकरण अत्यावशक ठरणार असल्याचेही श्री पवार यांनी स्पष्ट केले.
            आंतरराष्ट्रीय साखर परिषदेचे कार्यकारी संचालक डॉ. जोस ऑरिव्ह म्हणाले, जागतिक साखर बाजारात भारत आघाडीवर असून उत्पादन वाढवून भारताने जागतिक साखर उद्योगाचे नेतृत्व स्वतःकडे आणले आहे. प्रक्रियकडे वळणे आणि उत्पादकता वाढविणे हे एकमेव पर्याय तुमच्या समोर आहेत. भारत जागतिक बाजारपेठेत पहिल्या क्रमांकाचा देश राहणार आहे, भारताने इथेनॉल धोरण आणले. यामुळे साखर साठे कमी होण्यास मदत झाली आहे. तसेच या धोरणामुळे मळीपासून तसेच ऊस रसापासून इथेनॉल निर्मिती वाढीला मदत होईल, असे मत डॉ. जोस यांनी व्यक्त केले.
     पंजाबचे सहकारमंत्री रंधावा म्हणाले, महाराष्ट्र सहकार आणि साखर या दोन्ही क्षेत्राकरीता आमच्यासाठी आदर्श आहे. साखर उद्योगाने आपल्या भवितव्याचा विचार करताना शेतकऱ्याला कायम केंद्रबिंदू ठेवावे. महाराष्ट्राने शेती क्षेत्रात नेत्रदिपक प्रगती केली आहे.
या परिषदेला  देशविदेशातील साखर उद्योगातील देश विदेशातील उद्योजक, नामवंत शास्त्रज्ञ, तंत्रज्ञानातील राज्यातील ऊस कारखान्यांचे पदाधिकारी, सभासद, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
                                                              ००००


महिला सक्षमीकरणाच्‍या योजनांना व्‍यापक प्रसिध्‍दी द्यावी
                                                         - निवासी उप जिल्‍हाधिकारी डॉ. कटारे

          पुणे, दिनांक 30- समाजातील मुलींचे जन्‍मप्रमाण मुलांच्‍या तुलनेत कमी असल्‍याने बेटी बचाओ, बेटी पढाओ योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी, महिला सक्षमीकरणाच्‍या योजनांना व्‍यापक प्रसिध्‍दी द्यावी, अशा सूचना निवासी उप जिल्‍हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी दिल्‍या.
          जिल्‍हाधिकारी कार्यालयात बेटी बचाओ, बेटी पढाओ योजनेंतर्गत जिल्‍हा स्‍तरीय कृती समितीची बैठक झाली. यावेळी उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी दत्‍तात्रय मुंडे, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी भगवान पवार, बाल विकास प्रकल्‍प अधिकारी हिवराळे, जिल्‍हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, जिल्‍हा विधी सल्‍लागार मेधा सोनतळे,  मीरा टेकवडे यांच्‍या सह इतर अधिकारी उपस्थित होते.
          निवासी उप जिल्‍हाधिकारी डॉ. कटारे म्‍हणाल्‍या, बेटी बचाओ, बेटी पढाओ  ही मोहीम काळाची गरज झाली आहे. समाजामध्‍ये मुला-मुलींना समान दर्जा असावयास हवा, तथापि, काही कारणांमुळे नकळतपणे असा भेदभाव होतो.  मुलींच्‍या शिक्षणाचे प्रमाण वाढावे, त्‍यांच्‍यात जागृती व्‍हावी यासाठीही प्रभावीपणे काम व्‍हायला हवे, अशी अपेक्षा त्‍यांनी व्‍यक्‍त केली.
          मार्चमध्‍ये जागतिक महिला दिनानिमित्‍त कार्यक्रम घेवून त्‍यामध्‍ये गुणवंत तसेच प्रेरणादायी काम करणा-या मुलींचा सत्‍कार करण्‍यात यावा, अशी सूचना त्‍यांनी केली. बैठकीत मुलींच्‍या सर्वांगीण विकासाबाबत तसेच मुलांमध्‍येही सामाजिक जबाबदारी निर्माण होण्‍यासाठी विविध उपक्रम राबविण्‍या बाबत व्‍यापक चर्चा झाली. 
0000





जिल्हा प्रशासनातर्फे हुतात्म्यांना आदरांजली
            पुणे,दि.30- देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्मांच्या स्मरणार्थ जिल्हा प्रशासनातर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयात दोन मिनिटे मौन (स्तब्धता) पाळून आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, उपजिल्हाधिकारी निता शिंदे, सुरेखा माने, अपर चिटणीस राम चोभे, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग व जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
००००




  जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी निधी मिळवून देवू
पर्यटन मंत्री दित्य ठाकरे यांचे प्रतिपादन
            पुणे दि.29:- पुणे जिल्हयातील हेरिटेज वास्तू पर्यंटनस्थळांच सौंदर्य वाढवून याठिकाणी  पर्यटन विकासाच्या संधी उपलब्ध होण्यासाठी निधी मिळवून देण्यात येईल, असे प्रतिपादन पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले.
            येथील आयसीसी ट्रेड टॉवर येथे विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत पर्यटन मंत्री श्री. ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली  त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महानगरपालिका आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हार्डिकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पर्यटन संचालनालयाच्या उपसंचालक सुप्रिया करमरकर आदि अधिकारी उपस्थित होते.
            श्री.ठाकरे म्हणाले, पुणे जिल्हयात शिवनेरी, सिंहगड, शनिवारवाडा अशा अनेक ऐतिहासिक वास्तू व महत्वाची पर्यटन स्थळे आहेत. याठिकाणी  विविध उपक्रम राबवून त्यांचे जागतिक पातळीवर महत्व वाढविण्यासाठी  प्रयत्न करणे आवश्यक आहे. जिल्हयातील पर्यटन स्थळे व या ठिकाणी आवश्यक सोयी सुविधांसाठी लागणाऱ्या निधीचा सविस्तर प्रस्ताव संबंधित विभागांनी लवकरात लवकर शासनाकडे सादर  करावा, जेणेकरुन निधीची तरतुद करणे सोयीचे होईल.
            पर्यावरणाच्या संवर्धनासाठी हवा, पाणी आदी घटकांचे प्रदुषण रोखणे आवश्यक आहे, असे सांगुन श्री. ठाकरे म्हणाले, पुण्यात लोकसहभागातून अनेक उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आले असून 'प्लॅस्टिक पिशवी मुक्त महाराष्ट्र संकल्प अभियान' यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा. सिंगल युज प्लॅस्टिक वापरास पूर्ण बंदी असल्यामुळे प्लॅस्टिकचा कचरा कमी होण्यास मदत होईल, तथापी पाण्याच्या बाटल्या, प्लॅस्टिक पाऊच याबरोबरच ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण व व्यवस्थापनावर भर द्या, अशा सूचना त्यांनी केल्या.
            पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने घनकचरा व्यवस्थापन व मलनिस्सारण प्रकल्प राबवावेत. पाणी प्रदुषण रोखण्यासाठी येथील मुळा, मुठा, पवना, इंद्रायणी या नद्यांच्या स्वच्छतेवर भर देवून जायका प्रकल्प प्रभावीपणे राबवावा, तसेच  पर्यटन व पर्यावरण विषयक विकास कामांना गती द्यावी.
            जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले, जिल्हयातील दुर्लक्षित पर्यटन स्थळांच्या विकासासाठी तसेच मोठया ग्रामपंचायतींच्या घनकचरा व्यवस्थापनासाठी निधी मिळणे आवश्यक आहे. तसेच जिल्हयात प्लॅस्टिक पिशवी मुक्त अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी प्रशासनाच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न केले जातील,असा विश्वास व्यक्त केला.
            यावेळी  पर्यटन मंत्री श्री. ठाकरे यांनी विविध विभागांच्या कामाचा आढावा घेतला.
००००
             


पर्यावरण आणि पर्यटन खाते अधिक सक्षम बनविणार
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

            पुणे दि.29: पर्यावरण आणि पर्यटन हे विभाग लोकांशी निगडित असून लोकसहभागावर भर देऊन ही खाती अधिक सक्षम व महत्वपूर्ण बनविणार, असे प्रतिपादन पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज केले.

            'पुणे कार्बन न्यूट्रल स्मार्ट सस्टेनेबल टावूनशिप 2030' या विषयावर आयसीसी ट्रेड टॉवर येथे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली परिषद घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ तथा पीआयसी चे अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. विजय केळकर, पीएमआरडीए चे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रमकुमार, प्रा. अमिताव मलिक यांच्यासह पर्यावरण विभागातील तज्ज्ञ मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते 'मेकिंग पुणे कार्बन न्यूट्रल बाय 2030' या धोरणपत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले.

            पर्यावरण मंत्री श्री. ठाकरे म्हणाले, प्रदूषणाचे प्रमाण वाढत असून पर्यावरण रक्षण ही काळाची गरज आहे. पुण्यात राबवण्यात येणारा 'कार्बन न्यूट्रल स्मार्ट सस्टेनेबल टाउनशिप' उपक्रम राज्य पातळीवर राबवणे गरजेचे आहे. नगर नियोजन करताना व्यापक आराखड्यावर भर देणे आवश्यक असून यात सक्षम सार्वजनिक व खाजगी वाहतूक व्यवस्था, ट्रॅफिक व्यवस्थापन व पार्किंग व्यवस्था यांचा सविस्तर विचार होणे आवश्यक आहे. याबरोबरच इलेक्ट्रीक वाहनांच्या वापरावर भर द्यायला हवा. या वाहनांसाठी नवीकरणीय ऊर्जेचा वापर होण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.
घनकचरा व्यवस्थापन आवश्यक असून ओला व सुका कचरा वर्गीकरणावर भर द्यावा लागेल. यात जनजागृती आवश्यक असून प्रत्येकाने  पुढाकार घ्यायला हवा. पर्यावरण संरक्षणासाठी शहरी भागात स्थानिक प्रजातींची वृक्ष लागवड करणे आवश्यक आहे.  नदी काठ, समुद्र किनारे अशा सार्वजनिक ठिकाणी लहान मुले स्वच्छता अभियान राबविताना दिसतात. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेची वेळ लहानांवर येऊ नये,  यासाठी मोठ्यांनी  दक्षता घ्यायला हवी. मुंबईमध्ये घनकचरा व्यवस्थापनासाठी हॉटेल, गृहनिर्माण संस्था, दुकाने, कंपन्या या ठिकाणी जनजागृतीवर भर देण्यात आल्यामुळे  घनकचरा व्यवस्थापन व वर्गीकरण यात अल्पावधीतच सकारात्मक परिणाम दिसून आले. पुण्यातही असा प्रयोग राबवल्यास निश्चितच चांगले बदल घडतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. शहरीकरण होताना हवा, पाणी या निसर्गातील घटकांचे प्रदूषण करून त्यांना हानी पोहचवता कामा नये. भविष्यात ऑक्सिजन पुरवणारी ठिकाणे निर्माण करण्याची गरज पडू नये यासाठी पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे, असे ते म्हणाले.

            विक्रमकुमार म्हणाले, पीएमआरडीए च्या वतीने पुण्यातील डोंगरउताराची जमीन, शेतजमीनीच्या संरक्षणावर भर देण्यात येत आहे. त्याचबरोबर चाकण, हिंजवडी व वाघोली हा भाग मेट्रोने जोडण्यात येणार असून त्यामुळे ट्रॅफिक ची समस्या कमी होईल, असे ते म्हणाले.
यावेळी शास्त्रज्ञ व तज्ज्ञ मान्यवर यांनी सादरीकरणातून माहिती दिली.
                                                                        000000         

Thursday, January 9, 2020








उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली पोलीस वसाहतीची पाहणी
            पुणे, दि. 10 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज शिवाजीनगर येथील नव्याने बांधकाम सुरू असलेल्या व जुन्या पोलीस वसाहतीची पाहणी केली. पोलीस कर्मचारी यांच्या कुटुंबियांशी संवाद साधत पोलीस कुटुंबियाला भेडसावणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी लवकरात लवकर वसाहतीचे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
           यावेळी पोलीस आयुक्त डॉ . के. वेंकटेशम, पोलिस सहआयुक्त डॉ रवींद्र शिसवे, अपर पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उपआयुक्त संभाजी कदम, पोलीस उपआयुक्त स्वप्ना गोरे, पोलीस उपआयुक्त पंकज देशमुख आदी उपस्थित होते.
             श्री. पवार यांनी इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट, इमारतीची पुनर्बांधणी यासंदर्भातील चर्चेसोबतच सद्यास्थितीत पोलीस वसाहतीचे सुरू असलेल्या कामाची पाहणी करून समाधान व्यक्त केले. पोलीस वसाहत परिसरासोबतच पोलीस पाल्य वसतीगृहाचीही पाहणी केली. पोलीस वसाहतीचे अत्यंत उत्कृष्ट काम करून राज्यात आदर्श निर्माण करूया, असा विश्वास श्री. पवार यांनी व्यक्त केला.
0000

  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेची राज्यस्तरीय बैठक पुणे जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्व...