Sunday, July 8, 2018

चित्रप्रदर्शन आणि कलापथक शासनाचे स्तुत्य उपक्रम

चित्रप्रदर्शन आणि कलापथक
शासनाचे स्तुत्य उपक्रम

पुणे दि. 8 : चित्रप्रदर्शनातून चित्र पाहता येते, नकळत चित्रांशी बोलता येते, चित्ररुपी वाक्य बोलके वाटतात. शासनाच्या विविध योजना चित्ररुपाने खूप छान पध्दतीने मांडल्या आहेत. याठिकाणी लावलेले छायाचित्र प्रदर्शन खरोखरच स्तुत्य आहे, अशा बोलक्या प्रतिक्रिया या ठिकाणी आलेल्या वारकऱ्यांनी व्यक्त केल्या.
पुणे शहरात संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे आगमन झाले आहेत. त्यासोबत लाखो वारकरी पुण्यनगरीत आलेले आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे दर्शन एका रांगेत वारकरी मनोभावे घेत आहेत. भवानी पेठेतील सावित्रीबाई फुले प्रशालेत लावलेले चित्रप्रदर्शन सगळयांचे आकर्षण ठरत आहे.


माहिती व जनसंपर्क महासंचालनायच्या वतीने आषाढी वारीचे औचित्य साधून 'संवादवारी' हा नावीन्यपूर्ण उपक्रम सुरु केला आहे. लाखो भाविक या वारीत सहभागी होतात. संपूर्ण राज्यातून वारकरी पंढरपूरात विठ्ठलाच्या दर्शनसाठी येतात.
माहिती व जनसंपर्क या विभागाला शासनाचे कान, नाक, डोळे म्हटले जाते, जनतेच्या प्रतिक्रिया शासनापर्यंत पोहचविण्याचे काम या विभागामार्फत केले जाते. शासकीय संदेशाचे प्रसारण आणि कल्याणकारी योजनांबाबत जनजागृती हे ब्रीद घेऊन 'संवादवारी' सहभागी झाली आहे.


'संवादवारी' संबंधी आपली प्रतिक्रिया व्यक्त करतांना ज्ञानेश्वर महाराजांच्या रथापुढील दिंडी क्रमांक एकचे प्रमुख श्री. राणोजी वासकर महाराज म्हणाले, विसाव्यासाठी दरवर्षी आम्ही या ठिकाणी थांबतो. या शाळेच्या प्रवेशद्वारावर लावलेले चित्ररथही सर्वांना आकर्षून घेत आहे, खरोखरच हा चांगला उपक्रम आहे. या उपक्रमास माझ्या शुभेच्छा.

*****


संत विचारांचा ठेवा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

संत विचारांचा ठेवा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे दि. : महाराष्ट्राच्या समाजमनावर आजही संत विचारांचा मोठा पगडा आहे. संत परंपरेच्या विचारानेच कायम सामान्य माणसाला प्रेरीत केले. संत विचार हे काळसापेक्ष असून हा विचारांचा ठेवा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रत्येक काळात संत चरित्रांचे लेखन होण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.
श्री गंधर्व वेद प्रकाशनच्या संतदर्शन चरित्र ग्रंथाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर संमितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, चैतन्य महाराज देगलूरकर, संत तुकाराम महाराज सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बिदुरा नवले, संत परंपरेचे अभ्यासक तथा ग्रंथाचे संपादक डॉ. सदानंद मोरे, आळंदी
संस्थानचे विश्वस्त अभय टिळक, प्रकाशक दीपक खाडिलकरप्रकाश खाडिलकर उपस्थित होते.
            यावेळी श्रीदेवेंद्र फडणवीस म्हणालेमहाराष्ट्राला संत विचारांची मोठी परंपरा आहेया संत विचाराने सामान्य माणसाला कायमच प्रेरणा दिलीमहाराष्ट्रातील संक्रमण काळात हेच संत विचार समाजाच्या पाठिशी उभा राहिलासंत ज्ञानेश्वरांनी अखिल विश्वाच्या कल्याणाची परंपरा सुरू केली तर संत तुकारामांनी अध्यात्म आणि संसार यांची सुयोग्य सांगड घालून दिली.
संत विचार हे काळसापेक्ष आहेत. प्रत्येक काळात त्यांच्या विचारांना महत्व आहे. मात्र हे संत विचार पुढच्या पिढी पर्यंत पोहोचण्यासाठी काळानुसार संत चरित्रांचे लेखन होण्याची आवश्यकता आहे. संत दर्शन या संतांच्या चरित्र लेखनाने संतांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. हे संत विचार सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येणार असल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले.  
श्री गहिनीनाथ महाराज औसेकर म्हणाले, प्रत्येक संतांच्या मागे मोठा इतिहास आहे. हा संतांचा  इतिहास आजच्या पिढीसमोर येण्याची आवश्यकता आहे. संतांच्या विचारावरच चांगला समाज घडू शकतो, त्यामुळे संतांच्या विचारांना सामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता आहे.
चैतन्य महाराज देगलूरकर म्हणाले, नामदेवराय यांनी आपल्या अभंगातून सर्व संतांचे चरित्र पहिल्यांदा मांडले. महाराष्ट्र ही संतभूमी आहे. सकल समाजाच्या उत्थानासाठी संतांचा जन्म झाला. बदणाऱ्या सामाजिक मनोविकासामुळे संत चरित्रांची वारंवार नव्याने मांडणी आवश्यक आहे. संतांचे विचार पुढे सुरू राहण्यासाठी संत चरित्रांची आवश्यकता आहे. तत्वज्ञान आणि आचरण यांचा सुयोग्य समन्वय संतांच्या जीवनात असल्याने त्यांची चरित्र कायमच उपयुक्त असतात. जीवनाला दिशा देण्यासाठी संत चरित्रांची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.    
 डॉ. सदानंद मोरे म्हणाले, महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची समृध्द परंपरा आहे. संतांनी महाराष्ट्राची साहित्य संस्कृती टिकवली. महाराष्ट्राचा सामाजिक पोत सांभाळण्याचे काम संतांनी केले. संतांचे विचार लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी या संत चरित्राची निर्मिती करण्यात आली. वारकरी संप्रदायाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आस्था आहे. ती त्यांच्या कृतीतून वारंवार स्पष्ट होत असल्याचे त्यांनी सांगितले.  
कार्यक्रमाच्या सुरूवातीला संत चरित्र ग्रंथांच्या सर्व लेखकांचा परिचय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्तीश: करून घेतला व त्यांच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक दीपक खाडिलकर यांनी केलेसूत्रसंचलन दीपक खाडिलकर यांनी केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
*****


Thursday, July 5, 2018

श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यास प्रारंभ

पुणे, दि. 5 : श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थानाचा शुभारंभ पालकमंत्री तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री श्री.गिरीश बापट यांनी सपत्निक महापुजा करुन, आज श्री क्षेत्र देहू येथे केला. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, खासदार अमर साबळे, .संजय भेगडे, श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब ऊर्फ पंढरीनाथ मोरे, पालखी सोहळा प्रमुख सर्वश्री सुनिल मोरे, विठ्ठल मोरे, अशोक मोरे, अभिजीत बाळकृष्ण मोरे, जालिंदर मोरे, बबनराव पाचपुते,उपविभागीय अधिकारी ज्योती कदम उपस्थित होते.
            मंगलमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात श्री क्षेत्र देहू येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थान येथील मंदिरात माऊलींच्या पादुकांची पालकमंत्री गिरीश बापट यांच्याहस्ते विधीवत पाद्यपूजा करण्यात आली. शिस्तबध्द पध्दतीने वारकऱ्यांनी केलेल्या टाळ-मृदुंगाच्या गजराने यावेळी सभोवतालचा परिसर दुमदुमला होता. पालखी प्रस्थानापूर्वी करावी लागणारी नैमेत्तिक कामांची तयारी मंदिर प्रशासनाच्यावतीने पूर्ण करण्यात आली होती.
            पालखी सोहळयात सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी विविध सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. आरोग्य सेवा, पिण्याचे पाणी, इंधन इत्यादी व्यवस्था पालखी सोहळा व्यवस्थापनातर्फे करण्यात आल्या आहेत. पालखीमध्ये महाराष्ट्रासह इतर राज्यातील दिंडयाही सहभागी झाल्या आहेत. या दिंडयाच्या माध्यमातून निर्मल वारी-स्वच्छ वारी तसेच सामाजिक जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती पालखी व्यवस्थापनाने दिली.
            पालखी प्रस्थानानंतर, श्री क्षेत्र देहू येथील इनामदार वाडयात पालखीचा मुक्काम राहणार असून त्यानंतर पुढील प्रवासासाठी पालखी मार्गस्थ होणार असल्याची माहिती यावेळी विश्वस्तांनी दिली. या सोहळयास वारकरी, नागरीक, स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी, महाविद्यालयीन युवक-युवती, स्वयंसेवक मोठया प्रमाणावर सहभागी झाले होते.
                                          पान २
                                                                                       भक्त निवासाचे उदघाटन



            श्री क्षेत्र देहू येथे पालखी सोहळयासाठी, वारकरी मोठया संख्येने सहभागी होत असतात. वारकऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या भक्त निवासाचे उदघाटन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले. या भक्त निवास अठरा कक्षांमध्ये भाविकांची राहण्याची सोय करण्यात आली आहे. भक्त निवासात भोजन कक्ष, सभा मंडप, वाहनांसाठी पार्कींग इत्यादी सोयी करण्यात आल्या आहेत.
000

आषाढी वारीत अन्न सुरक्षा व स्वछता अभियान
राबविणार-पालकमंत्री गिरीश बापट

            पुणे ता. 5  :-  आषाढी वारीत अन्न  सुरक्षा व स्वछता अभियान राबवणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी आज येथे केले. श्री क्षेत्र देहू येथे पालखी अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या, श्री क्षेत्र देहू व आळंदी येथून पंढरपूरकडे जाणाऱ्या वारीच्या मार्गावरील अन्न विक्रेते व अन्न छत्र चालवणाऱ्यांच्या प्रबोधनासाठी '' परिवर्तन अन्न सुरक्षा व स्वच्छता अभियान'' सुरु करण्यात आले आहे. या्अभियानाद्वारे दोन चित्ररथांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. या चित्ररथाचा शुभारंभ पालकमंत्री यांच्याहस्ते  करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.
            देहू, आळंदी येथून निघणाऱ्या पालख्यांमध्ये महाराष्ट्रासह विविध प्रांतातून मोठया प्रमाणावर भाविक सहभागी होत असतात. या पालखीसोहळा कालावधीत पालखी मार्गावर हॉटेल,रेस्टॉरंट, फिरते विक्रेते हे अन्न पदार्थांची विक्री करत असतात. तसेच या कालावधीत सेवा भावी संस्था, सेवाभावी व्यक्ती, भाविकांना अन्न पदार्थ मोफत देत असतात. या अभियानाच्या माध्यमातून अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने अन्नछत्राच्या तपासण्या करून वारकरी व भाविकांना सुरक्षित  व स्वच्छ अन्न उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्याचबरोबर अन्न व्यावसायिकांची सुरक्षा व स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.  देहू ते पंढरपूर व आळंदी ते पंढरपूर या दोन्ही मार्गावर अन्न प्रशासन, कोकाकोला इं. लि. आणि नेस्ले इं. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने हे अभियान राबविण्यात येणार आहे. पालखी मार्गावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांना सुरक्षित अन्न पदार्थ तयार करण्याबाबत तसेच अन्न सुरक्षेबाबत तज्ञ प्रशिक्षक व अन्न सुरक्षा अधिकारी प्रशिक्षण देणार आहेत. या अन्न व्यावसायिकांना  हातमोजे, टोपी,अॅप्रन,आदींचा समावेश असलेले हायजिन किटचे मोफत वितरण करण्यात येणार आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली.
000





Sunday, July 1, 2018

13 कोटी वृक्ष लागवड उपक्रम

13 कोटी वृक्ष लागवड उपक्रमातून निसर्गाच्या संवर्धनाबरोबरच
मानवी मुल्यांचे संर्वधन होईल
- पालकमंत्री गिरीश बापट
पुणे दि. 1- समृद्ध निसर्ग समाजाला ऊर्जा देतो, त्यामुळे 13 कोटी वृक्ष लागवड या सारख्या उपक्रमातून निसर्गाच्या संवर्धना बरोबरच मानवी मुल्यांचे संवर्धन देखील होणार आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले.
भांबुर्डा वन उद्यान येथील 13 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर, अपर जिल्हाधिकारी रमेश काळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक जीतसिंग, उपवनसंरक्षक श्रीलक्ष्मी ए, आमदार विजय काळे, नगरसेवक आदित्य माळवे, मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर, वनसंरक्षक सर्व श्री. कुलकर्णी, वानखेडे, सत्यजित गूजर आदी उपस्थित होते.
           पालकमंत्री बापट म्हणाले, आजच्या परिस्थितीत होणारी निसर्गाची हानी थांबवण्यासाठी वृक्षारोपण करणे गरजेचे आहे. मनुष्य स्वभावाप्रमाणे आपण नेहमीच प्रत्येक कामाच्या मोबदल्याची अपेक्षा करत असतो. वृक्षारोपण केल्याने मात्र आपल्याला लगेच मोबदला मिळणार नसला तरी ती भविष्यासाठीची तरतूद आणि आपण पुढील पिढीसाठी निर्माण केलेली संपत्ती आहे याची जाणीव ठेवावी. एखादी चांगली कृती करण्यासाठी समाजाची साथ असणे आवश्यक आहे. आज या कार्यक्रमात आपण वृक्षारोपणाची आणि वृक्षसंवर्धनाची शपथ घेऊ पण त्याची अंमलबजावणी होणे महत्त्वाचे आहे. वृक्षारोपणांसोबतच त्या वृक्षाचे दायित्व घेऊन वृक्ष वाढवणे आणि संवर्धन होण्यासाठी ही प्रयत्न करायला हवेत. वृक्षारोपण ही फक्त वन विभागाची जबाबदारी नसून ती सगळ्यांची जबाबदारी आणि कर्तव्य आहे. वृक्षारोपन केल्यानंतर ते जगवण्यासाठी पाणी असणे देखील गरजेचे आहे, त्यामुळे पाण्याची बचत करण्यावर देखील आपण लक्षकेंद्रीत केले पाहिजे. आरोग्य सेवांच्या प्रगतीमुळे आज सरासरी आयुष्यमान वाढले आहे. पण आरोग्य चांगले राहण्यासाठी पर्यावरण जपणे देखील महत्त्वाचे आहे. नैसर्गिक संपत्तीची योग्य ती काळची न घेता आपण निसर्गाचा ऱ्हास करतो आणि निर्सगाशीच भांडण करतो असे न करता निसर्ग आपला मार्गदर्शक असतो याची जाणीव प्रत्येकाने ठेवावी, असे देखील श्री. बापट यांनी यावेळी सांगितले.

            विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर म्हणाले, पावसाच्या वेळेत झालेला बदल हा आपल्याला कित्येक वर्ष जाणवतो आहे. याचे मुख्य कारण म्हणजे निसर्गाची होणारी हानी आहे. पुणे विभागाला दिलेल्या एकूण 55 लाख उद्दिष्टा पेक्षा अधिक वृक्षारोपण होईल आणि जीओ टॅपिंगच्या माध्यमातून त्या वृक्षांचे संवर्धन देखील होईल. नदी काठावर देखील मोठ्या प्रमाणात या वर्षी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. सर्वच शासकीय कार्यालयामध्ये होणारा कागदाचा वापर टाळावा, कारण हा कागद झाडांपासून तयार होतो. त्यामुळे कागदाचा नाहक वापर केल्याने आपण अप्रत्यक्षरित्य निसर्गाचा ऱ्हास करत असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.
मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे म्हणाले, अनेकवेळा शाळेत निसर्गावर निबंध लिहिले जातात, त्यात निसर्गाचा ऱ्हास झाल्याचे तोटे देखील लिहिलेले असतात. पण या निबंधाचा रोजच्या जगण्यात उपयोग होणे आवश्यक आहे. दिल्लीमध्ये निर्माण झालेली परिस्थिती, इतर ठिकाणी निर्माण होऊ नये यासाठी वृक्ष लागवड करणे गरजेचे आहे. वृक्षलागवडी बाबत फक्त प्रबोधन न करता कृती होणे गरजेचे आहे. जिल्हा परिषदेच्या अंतर्गत वृक्षारोपण मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहे. लागवड केलेल्या वृक्षाचे संवर्धन करण्यासाठी त्या वृक्षाचे संगोपन करण्याची जबाबदारी एका कुटुंबावर देऊन त्यांना त्याचे मानधन देखील देण्यात येणार आहे. वृक्षारोपणास भावनांची जोड देणे गरजचे आहे. एखाद्या आनंदी किंवा दुखाच्या प्रसंगाची आठवण म्हणून लावलेल्या रोपाची काळजी घेतली जाते, असे देखील ते यावेळी म्हणाले.
वृक्षारोपणाठी हुजूर पागा विद्यालय, रामचंद्र राठी विद्यालय, विशेष मुलांचे नवक्षितीज विद्यालय, तसेच एन.सी.सी चे विद्यार्थी उपस्थित होते. पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला. प्लॅस्टीक पिशवीचा वापर टाळण्यासाठी पुणे महापालिकेचे नगरसेवक आदित्य माळवे हे कापडी पिशवीचे वितरण करणार आहेत. या पिशवीचे प्रातिनिधीक वाटप श्री. बापट यांच्या हस्ते झाले.
विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, तसेच महिलांनी व महाविद्यालयीन युवक युवतींनी वृक्षारोपन केले. तसेच मान्यवर व उपस्थितांनी वृक्षारोपणाची शपथ देखील घेतली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर यांनी केले तसेच सुत्रसंचालन विभागीय वन अधिकारी रमाकांत बोराडे यांनी केले.       



13 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाचा  मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ

पालकमंत्री गिरीश बापट, विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर, अपर जिल्हाधिकारी रमेश काळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक जीतसिंग, उपवनसंरक्षक श्रीलक्ष्मी ए, आमदार विजय काळे, नगरसेवक आदित्य माळवे, मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर, वनसंरक्षक सर्व श्री. कुलकर्णी, वानखेडे, सत्यजित गूजर आदी उपस्थित मान्यवरांनी यावेळी  वृक्षारोपण करून 1 जुलै ते 31 जुलै या कालावधीत होणाऱ्या 13 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाचा शुभारंभ केला . 

00000

  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेची राज्यस्तरीय बैठक पुणे जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्व...