Tuesday, January 8, 2019

प्रधानमंत्री मुद्रा योजनेमुळे स्‍वयंपूर्ण – मनीषा कानगुडे
            प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा लाभ घेऊन स्‍वत:च्‍या पायावर उभ्‍या झालेल्‍या मनीषा विलास कानगुडे यांची कहानी सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. मनीषा यांनी फुरसुंगी ढमाळवाडी येथे एंजेल बुटीक्‍स ॲण्ड लेडीज शॉपी हे दुकान सुरु करुन प्रगतीच्‍या मार्गावर वाटचाल सुरु केली आहे.
            आपल्‍या प्रवासाविषयी मनीषा कानगुडे सांगतात, मी 2016 मध्‍ये पेपरमध्‍ये प्रधानमंत्री मुद्रा योजनेची जाहिरात वाचली. त्‍यानंतर मी घराजवळच्‍याच बँक ऑफ महाराष्‍ट्रच्‍या फुरसुंगीच्‍या शाखेत चौकशीसाठी गेले. तेथे बँक मॅनेजर लखपती हे होते. त्‍यांनी योजनेची सविस्‍तर माहिती सांगितली.  मी टेलरिंगचे काम करत होते. भरतकाम, वीणकाम मला येत होते. साड्यांवर, ब्‍लाऊजवर भरतकाम, वीणकाम करुन छोटेखानी व्‍यवसाय चालू होता. पण मला भांडवल मिळाले तर माझा व्‍यवसाय वाढू शकत होता. प्रधानमंत्री मुद्रा योजनेमुळे माझ्या आशा पल्‍लवीत झाल्‍या. लखपती साहेबांनी सांगितल्‍यानुसार मी कर्जप्रकरण तयार केले. कर्जाची प्रक्रिया चालू असतांनाच त्‍यांची बदली झाली. मला थोडं टेन्‍शन आले. लखपती साहेबांच्‍या जागेवर सोमनाथ ससाणे साहेब आले, त्‍यांनी कर्जप्रकरण मंजूर केले. सप्‍टेंबर 2016 मध्‍ये पहिल्‍यांदा दीड लाखाचे कर्जमंजूर झाले. माझ्याजवळचे भांडवल आणि कर्ज दोन्‍ही एकत्र करुन मी घराजवळच (लिटील फ्लॉवर स्‍कूल जवळ) एंजेल बुटीक्‍स अॅण्‍ड लेडीज शॉपी हे दुकान सुरु केले.
मनीषा कानगुडे या मूळच्‍या करमाळा तालुक्‍यातील सरबडोह (जि. सोलापूर) येथील आहेत. त्‍यांचे शिक्षण सातवीपर्यंतच झाले. पण लहानपणापासून शिवणकाम, वीणकामाची आवड होती. काही दिवस मुंबईला राहिल्‍यानंतर गेल्‍या 18-19 वर्षांपासून पुण्‍यात राहत आहेत. प्रारंभी घरगुती शिवणकाम तसेच तोरण, लोकरीच्‍या वस्‍तू विक्री  करुन त्‍या उदरनिर्वाह करत होत्‍या.  या छोटेखानी व्‍यवसायातून त्‍यांना दरमहा 5 हजार इतका नफा मिळायचा. कर्ज मिळाल्‍यानंतर त्‍यांनी व्‍यवसाय वाढवला. दुकानात फॉल, अस्‍तर, धागा, लेस, लटकन, कॅन्‍व्‍हॉस, मॅचींग ब्‍लाऊजपीस, डिझाईन ब्‍लाऊज पीस, होजिअरी, ओढणी, स्‍टोल, स्‍कार्फ अशा वस्‍तू विक्रीसाठी ठेवल्‍या. त्‍यामुळे पहिल्‍या सहा महिन्‍यात त्‍यांची उलाढाल 5लाखापर्यंत वाढली. गेल्‍या वर्षी ती 15 लाखापर्यंत वाढल्‍याचे सांगतात.
            प्रधानमंत्री मुद्रा योजनेमुळे व्‍यवसाय वाढीला भांडवल मिळालेच पण आत्‍मविश्‍वास वाढून आर्थिक प्रगतीही झाली. स्‍वयंपूर्ण होण्‍याची मनीषा कानगुडे यांची मनीषा पूर्ण झाली. 
0000





Monday, January 7, 2019




विकास कामे वेळेत पूर्ण करण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांचे निर्देश

            पुणे,दि.7 :- जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत विविध विकास कामांना मंजूरी देण्यात येते. ही विकास कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज येथे अधिकाऱ्यांना दिले.
            जिल्हा वार्षिक योजना 2019-20 च्या प्रारुप आराखडयाची छाननी करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या कार्यकारी समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली आज आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत चालू आर्थिक वर्षासाठी मंजूर करण्यात आलेल्या विकास कामांचा आढावा घेताना ते बोलत होते. बैठकीला आमदार राहूल कुल, सदस्य शरद बुट्टे पाटील, ज्ञानेश्वर चवरे, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, सहायक जिल्हाधिकारी तथा आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी आयुष प्रसाद, उपजिल्हाधिकारी उत्तम चव्हाण,  जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नृसिंह मित्रगोत्री, जिल्हा नियोजन अधिकारी प्रमोद केंभावी उपस्थित होते.
            पालकमंत्री गिरीश बापट यांनी 2018-19 या वर्षात जिल्हा नियोजन समितीने मंजूर केलेल्या विविध विकास कामांची सद्यस्थिती आणि त्यावर झालेल्या खर्चाचा आढावा घेतला. बैठकीत 2019-20 साठी प्रशासकीय विभागांनी योजनांच्या अंमलबजावणीबाबत केलेल्या सूचना, नवीन अंतर्भूत करण्यात आलेल्या योजना, केंद्र व राज्य पुरस्कृत योजनांसाठी प्राप्त झालेल्या निधीतून झालेला खर्च व अखर्चित निधी, नवीन बाबींवरील प्रस्ताव मंजूरीसाठी शासनाकडे पाठविण्याबाबत चर्चा करण्यात आली. समिती सदस्य तसेच लोकप्रतिनिधींनी विकास कामांच्या अंमलबजावणीमध्ये केलेल्या सूचनांची दखल घेण्याची सूचना पालकमंत्री गिरीश बापट यांनी बैठकीत केली.
            जिल्हा नियोजन अधिकारी यांनी प्रास्ताविकात 2019-20 साठी तयार करण्यात आलेल्या प्रारुप आराखडयाची माहिती दिली. बैठकीला विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
००००



Sunday, January 6, 2019






क्रीडा मंत्र्यांनी केली मैदानांची प्रत्यक्ष पहाणी
खेलो इंडीयाच्या आयोजनात कोणतीही त्रुटी राहू नये
                                                                     -विनोद तावडे
            पुणे दि. 06: खेलो इंडीया स्पर्धेच्या आयोजनाचा मान महाराष्ट्राला मिळाला आहे. त्यामुळे ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे, या स्पर्धेच्या आयोजनात कोणतीही त्रुटी राहू नये, याची प्रत्येकाने खबरदारी घेण्याच्या सूचना शिक्षण व क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी आज दिल्या.
            महाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या सभागृहात खेलो इंडीया स्पर्धेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट व शिक्षण क्रीडा मंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. त्यावेळी श्री तावडे बोलत होते.
              या बैठकीला विभागीय आयुक्त तथा यशदाचे महासंचालक आनंद लिमये, क्रीडा आयुक्त सुनील केंद्रेकर, स्पोर्ट अथॉरिटी ऑफ इंडीयाचे उपमहासंचालक संदीप प्रधान, संयोजन समितीचे अध्यक्ष तथा उपसचिव (क्रीडा) राजेंद्र पवार, मुख्यमंत्री कार्यालयाच्या समन्वयक राणी व्दिवेदी, संयोजन समितीचे सचिव तथा सहसंचालक (क्रीडा) एन. एम. सोपल उपस्थित होते.
              श्री. विनोद तावडे म्हणाले, देशातील ग्रामीण आणि शहरी भागातील शालेय वयोगटांच्या खेळाडूंना चालना मिळावी, तसेच येणाऱ्या ऑलंपीक स्पर्धेत भारताच्यावतीने खेळण्यासाठी चांगले खेळाडू तयार व्हावेत, यासाठी खेलो इंडीया या स्पर्धेचे देशपातळीवर आयोजन करण्यात येते. यावर्षी या स्पर्धेच्या आयोजनाचा मान महाराष्ट्राला मिळाला आहे. ही स्पर्धा यशस्वी करून इतर राज्यांसमोर महाराष्ट्राने आदर्श निर्माण करावा. या स्पर्धेत सहभागी होणारे खेळाडू हे शालेय वयोगटातील असल्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेची वाढीव जबाबदारी आपल्यावर आहे. संयोजन समितीने अधिक काळजीपूर्वक नियोजन करण्याची आवश्यकता आहे.
            या स्पर्धेच्या आयोजनात आरोग्य विभागाची भूमिका ही अत्यंत महत्त्वपूर्ण असून क्रीडा प्रकारांच्या अनुषंगाने आवश्यक वैद्यकीय सुविधा पुरविण्यात याव्यात. तसेच या स्पर्धेच्या निमित्ताने देशातील खेळाडू व त्यांचे प्रशिक्षक महाराष्ट्रात येत आहेत, त्यांच्यासमोर आपल्या राज्याची चांगली प्रतिमा निर्माण व्हावी, यासाठी प्रयत्न करावेत.  
            यावेळी क्रीडा आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी स्पर्धेच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या नियोजनाचे माहिती दिली. या बैठकीला केंद्र व राज्य शासनातील विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
             बैठकीनंतर पालकमंत्री गिरीश बापट आणि क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी मैदानांची आणि खेळाडूंना देण्यात येणाऱ्या सुविधांची प्रत्यक्ष पहाणी केली. यावेळी त्यांनी काही सूचना संयोजन समितीला केल्या.
                                                                        0000   

Thursday, January 3, 2019



फुले दांपत्यास भारतरत्न मिळावा यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध
                                                    -सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले
            पुणे,दि.३- ज्यांच्या आदर्शाने महाराष्ट्रात  समाज क्रांती घडली व नवसमाज समाज उभा राहिला त्यातून बलशाली राष्ट्र उभारणीसाठी शिक्षणाचा पाया रोवला , महिला शिक्षणाचे व सक्षमीकरणाचे दार ज्यांच्या मुळे आज खुले झाले आहे असे क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रयत्नातून केंद्र शासनास तसा प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचे मत राज्याचे सामाजिक न्यायमंत्री  राजकुमार बडोले  यांनी व्यक्त केले.
            दिनांक 3 जानेवारी 2019 सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने पुण्यात सामाजीक न्याय विभागाच्या वतीने  विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यानिमित्ताने श्री. बडोले आज पुण्यात आले असता त्यांनी सपत्नीक फुले वाड्यात भेट दिली. यावेळी त्यांनी ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. फुले वाड्यात एका सामाजिक संस्था मार्फत आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते मार्गदर्शन करत होते त्यावेळी त्यांनी आपले मत व्यक्त केले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक समाज समाजोपयोगी उपक्रम राज्यभर राबविले जात आहे समाजसुधारकांनी जो आदर्श घालून दिला आहे  त्याच पावलावर पाऊल ठेवून राज्य प्रगती करीत आहेत त्यातून नवनवीन योजना राबविल्या जात असल्याचेही  श्री. बडोले यांनी यावेळी बोलताना सांगितले
            श्री. राजकुमार बडोले यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी शारदा बडोले देखील उपस्थित होत्या त्याच प्रमाणे समाज कल्याण आयुक्त मिलिंद शंभरकर, बार्टीचे महासंचालक कैलास कणसे, प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण अविनाश देवसटवार, सहायक आयुक्त समाज कल्याण पुणे विजयकुमार गायकवाड, यांच्यासह आदी मान्यवर मोठ्या संख्येने या वेळी उपस्थित होते.
0000


Wednesday, January 2, 2019



क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना प्रशासनातर्फे अभिवादन

            पुणे,दि.३- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती जिल्हा प्रशासनातर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. प्रारंभी अपर जिल्हाधिकारी  रमेश काळे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. उप विभागीय अधिकारी भाऊसाहेब गलांडे, हेमंत निकम, संजय आसवले, तहसिलदार हेमंत निकम, हनुमंत पाटील, विकास भालेराव यांनीही अभिवादन केले. यावेळी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
००००




लोकसंवाद उपक्रमाद्वारे मुख्यमंत्र्यांनी साधला लाभार्थ्यांशी संवाद

            पुणे,दि.2 :- शासनाच्या विविध योजना गरजूंपर्यंत पोहचल्यानंतर त्यातून होणारा लाभ, येणाऱ्या अडचणी आणि आवश्यक सुधारणा याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसंवाद उपक्रमाच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांशी थेट संवाद साधून घेतली.
            केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची राज्यात यशस्वीपणे अंमलबजावणी सुरु आहे. नागरी व ग्रामीण भागात प्रधानमंत्री आवास योजना, उन्नत शेती-समृद्ध शेतकरी योजना, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, मागेल त्याला शेततळे, गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार, स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, सूक्ष्म सिंचन आणि मृदा परीक्षण सारख्या योजना अधिक गतीने लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी राज्य शासनाचे प्रयत्न सुरु आहेत. गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध जिल्ह्यांमध्ये आणि मंत्रालयातही या योजनांचा आढावा घेतला आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयातील व्हीडीओ कॉन्फरन्स प्रणालीद्वारे लाभार्थ्यांशी थेट संवाद साधून योजनेच्या अंमलबजावणीची माहिती घेतली.
            मुख्यमंत्र्यांशी थेट संवाद साधताना, विविध जिल्हयातील लाभार्थ्यांनी प्रधानमंत्री आवास योजनेद्वारे घरकुलाचा लाभ मिळाला त्यामुळे घराचा भक्कम आधार मिळाला, कच्च्या व कौलारु घरांऐवजी स्लॅबचे पक्के घर मिळाले त्यामुळे घरातील सदस्यांचे आरोग्य सुधारले, मातीच्या घरात पावसाळयात पाणी गळणे, थंडीत गारठा आणि उन्हाळयात उन्हाचा त्रास होत असे मात्र पक्क्या घरकुलामुळे घराचे स्वप्न साकार झाले आणि हा सर्व त्रास कमी झाल्याची भावना यावेळी व्यक्त केली.
            घरकुलाच्या बांधकामात वाळूची अडचण येऊ नये यासाठी, लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळू उपलब्ध करुन देण्यात येईल आणि सर्वांना घरे मिळेपर्यत ही योजना राबविण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. या लोकसंवाद उपक्रमामध्ये राज्यातील विविध जिल्हयातील लाभार्थी सहभागी झाले होते. नागपूर, ठाणे, नाशिक व लातूर जिल्हयातील ग्रामीण भागातूनही लाभार्थ्यांनी थेट संपर्काद्वारे या उपक्रमामध्ये सहभाग घेतला.
००००


Tuesday, January 1, 2019

पेरणे फाटा येथील जयस्‍तंभ अभिवादन कार्यक्रम शांततेत
            पुणे, दि. 1- पेरणे फाटा येथील जयस्‍तंभ अभिवादन कार्यक्रम प्रशासनाच्या जय्यत तयारीमुळे शांततेत संपन्न झाला. जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी गेली दोन महिने अभिवादन कार्यक्रमपूर्व तयारीच्या आढावा बैठका घेतल्या. जयस्‍तंभास अभिवादन करण्‍यासाठी राज्‍यभरातून असंख्‍य नागरिक मोठया संख्येने आले होते. परिसरात कायदा व सुव्‍यवस्‍‍थेच्‍या दृष्‍टीने चोख बंदोबस्‍त ठेवण्‍यात आला होता. तसचे परिसरात पुस्‍तके, खादयपदार्थांचे स्टॉल्‍सही उभारण्‍यात आले होते. सामाजिक संस्‍थांच्‍या वतीने मोफत आरोग्‍य तपासणी शिबिर तसेच रक्‍तदान शिबिर आयोजन करण्‍यात आले होते. नागरिकांसाठी प्रशासनाच्‍या वतीने पाणी, स्‍वच्‍छतागृहे तसेच पार्किंगपासून कार्यक्रमाच्‍या स्‍‍थळापर्यंत ने-आण करण्‍याकरीता पी.एम.पी.एम.एलच्‍या बसेस इ. सोयीसुविधा पुरविण्यात आल्‍या होत्‍या.
0000
 



  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेची राज्यस्तरीय बैठक पुणे जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्व...