विजयस्तंभ येथील अभिवादन कार्यक्रम शांततेत
पार पाडण्यासाठी ग्रामस्थांनी प्रशासनास
सहकार्य करावे
- जिल्हाधिकारी नवल किशोर राम
पुणे, दिनांक
19 : संपूर्ण देशाला पुरोगामी विचारांची दिशा देण्याचे
काम पुणे जिल्हयाने केले आहे. त्यामुळेच
ग्रामस्थांनी एकमेकांशी सुसंवाद ठेऊन विजयस्तंभ येथील कार्यक्रम शांततेत पार
पाडण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे व शांततेचा संदेश देशभरापर्यंत पोहोचवावा
तसेच सोशल मिडीयावर समाजविघातक संदेश आल्यास त्याकडे दुर्लक्ष करावे. कोणत्याही
प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज येथे
केले.
पुणे जिल्हयातील भिमा
कोरेगाव येथील विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील दि. 1 जानेवारी रोजी
नागरिक मोठया संख्येने उपस्थित राहण्याची शक्य ता असल्याने त्यांना पुरविण्यात
येणा-या सोईसुविधांची पाहणी जिल्हाधिकारी नवल किशोर राम तसेच पोलिस अधिक्षक
संदीप पाटील यांनी आज प्रत्यक्ष स्मारकाच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली.
यावेळी त्यांच्यासमवेत अप्पर पोलिस अधिक्षक डॉ. संदीप पखाले, कार्यकारी अभियंता मिलींद बारभाई, उपअभियंता हेमंत
चौघुले, तहसिलदार रणजितसिंह भोसले, गटविकास
अधिकारी संदीप जठार, उपविभागीय पोलिस अधिक्षक गणेश मोरे, गजानन टोम्पे उपस्थित होते.
त्यानंतर भिमा कोरेगाव तसेच वढू बु. येथील ग्रामपंचायतीमार्फत आयोजित संवाद बैठकीत
उपस्थित ग्रामस्थांच्या अडीअडचणींची माहिती घेऊन प्रशासनामार्फत त्या
सोडविण्यासाठी निर्णय घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिका-यांनी यावेळी सांगितले.
यावेळी ग्रामपंचायतीमार्फत यादिवशी नागरिकांकरीता पुरविण्यात येणा-या पिण्याचे
पाणी, स्वच्छतागृह व आदी सोईसुविधांची माहिती देण्यात आली.
तर प्रशासनामार्फत ग्रामस्थांच्या प्रलंबित मागण्यांवर तात्काळ चौकशी करुन
कार्यवाही करण्यात येईल, असे सांगून यादिवशी नागरिकांना
पुरविण्यात येणा-या सोईसुविधांची माहिती यावेळी देण्यात आली. परिसरात असणा-या
सीसीटीव्ही कॅमेरा सुस्थितीत असल्याची खात्री करुन आवश्यकतेनुसार अतिरिक्त कॅमेरे
बसविण्यात यावेत अशा प्रकारच्या सुचनाहि
त्यांनी यावेळी केल्या.
यावेळी पोलिस
अधिक्षक संदीप पाटील यांनी कोणताही अनुचित
प्रकार घडू नये याकरीता पोलिस विभागाकडून मोठया प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात
ठेवण्यात येणार असल्याची तसेच संपुर्ण परिसरावर ड्रोनव्दारे लक्ष ठेवण्यात येणार
असल्याचे सांगून याकाळात समाजामध्ये तेढ निर्माण करणा-या कोणत्याही घटकाची गय केली
जाणार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच ग्रामस्थांनी व व्यापा-यांनी
कोणतेही भय न बाळगता आपले दैनंदिन व्यवहार सुरु ठेवावेत. यावेळी येणा-या
नागरिकांना सहकार्य करुन एक आदर्श निर्माण करावा, असे
प्रतिपादन केले. या संवाद बैठकीस भिमा
कोरेगाव येथील सरपंच संगिता कांबळे, वढू बु. येथील सरपंच
रेखा साहेबराव शिवले तसेच ग्रामस्थ मोठया
संख्येने उपस्थित होते.
0000




No comments:
Post a Comment