Friday, December 14, 2018

विजयस्‍तंभ येथे होणारा अभिवादन कार्यक्रम शांततेत पार पडणार
                                           - जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम

            पुणे, दिनांक 14- तरुण वर्गापर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पोहचवून त्‍यांच्‍यामध्‍ये सकारात्‍मक सक्षमता निर्माण करण्‍याची गरज आहे, असे प्रतिपादन करीत येत्‍या 1 जानेवारी रोजी विजयस्‍तंभ येथे होणारा अभिवादन कार्यक्रम शांततेत संपन्‍न होईल, असा विश्‍वास जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी व्‍यक्‍त केला. जिल्‍हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्‍हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, उपमहापौर डॉ. सिध्‍दार्थ धेंडे, निवासी उपजिल्‍हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब गलांडे, ज्‍योती कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप पखाले आदी उपस्थित होते.
            जिल्‍हाधिकारी राम म्‍हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अन्‍यायग्रस्‍त समाजाला न्‍याय मिळवून देण्‍यासाठी जीवनभर कार्य केले. त्‍यांनी कधीही हिंसेचा मार्ग अवलंबला नाही. देशाला सर्वोत्‍तम राज्‍य घटना देऊन सर्वसामान्‍य जनतेला न्‍याय मिळवून दिला. त्‍यांच्‍या विचार आणि वाणीमध्‍ये खूप मोठी ताकत होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्‍या विचारांवर विश्‍वास आणि श्रध्‍दा असणारे विजयस्‍तंभ येथे अभिवादन करण्‍यासाठी येत असतात. येथील 1 जानेवारीचा कार्यक्रम अत्‍यंत शांततेत पार पाडण्‍याचे नियोजन करण्‍यात आले आहे. जिल्‍हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि जनता यांच्‍या एकत्रित समन्‍वयातून हा कार्यक्रम यशस्‍वी होईल, असा विश्‍वास त्‍यांनी व्‍यक्‍त केला.
            अभिवानद कार्यक्रमासाठी मोठ्या संख्‍येने नागरिक येतील त्‍यामुळे कायदा व सुव्‍यवस्‍था राखणे आणि येणा-या नागरिकांना पार्कींग, पिण्‍याचे पाणी, शौचालयांची व्‍यवस्‍था आदी बाबी उपलब्‍ध होतील याची काळजी घेतली जाईल, असे जिल्‍हाधिकारी राम म्‍हणाले. अन्‍न-पदार्थांच्‍या स्‍टॉलवर भेसळयुक्‍त पदार्थ नसतील, याबाबत दक्षता घेण्‍याची सूचनाही त्‍यांनी केली. रस्‍ते दुरुस्‍ती, सीसीटीव्‍ही कॅमेरे, ड्रोन कॅमेरे, बॅरीकेड्स, वीजपुरवठा आदींबाबतही त्‍यांनी मार्गदर्शन केले.  25 हून अधिक रुग्‍णवाहिकांची सोय करण्‍यात येणार असून पिण्‍याचे पाणी, पार्कींग, रुग्‍णवाहिका याबाबतची माहिती उपलब्ध करुन दिली जाईल, असेही ते म्‍हणाले.
            जिल्‍हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी पोलीस प्रशासनाने केलेल्‍या नियोजनाची माहिती दिली.  सोशल मिडीयावर बारकाईने लक्ष ठेवण्‍यात आले असून प्रतिबंधात्‍मक कार्यवाही चालू आहे. देशविघातक, समाजविघातक शक्‍ती कार्यरत असतात, जाती-जातींमध्‍ये भांडणे लागावीत हाच त्‍यांचा हेतू असतो, अशा शक्‍तींपासून आपण सावध रहायला हवे. प्रशासन त्‍यांच्‍यावर योग्‍य ती कारवाई करत आहे. प्रत्‍येक नागरिक हा पोलीस असतो असे नमूद करुन नागरिकांनी त्‍यांना काही नकारात्‍मक बाबी आढळून आल्‍यास प्रशासनाच्‍या निदर्शनास आणाव्‍यात, असे आवाहन श्री. पाटील यांनी केले.
            उपमहापौर डॉ. धेंडे यांनीही अभिवानद कार्यक्रम यशस्‍वी होण्‍यासाठी उपयुक्‍त सूचना केल्‍या.
            प्रारंभी विविध संस्‍था, संघटना आणि व्‍यक्‍तींनी प्रशासनाकडून असलेल्या अपेक्षा व्‍यक्‍त केल्या. यावेळी  विविध संघटना, पक्षांचे प्रतिनिधी आणि नागरिक उपस्थित होते. 
0000

No comments:

Post a Comment

  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेची राज्यस्तरीय बैठक पुणे जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्व...