Sunday, July 31, 2016

डॉ. बाबासाहेबांना अभिप्रेत असणारा समताधिष्ठीत समाज घडविण्यासाठी प्रयत्नशील - सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले

डॉ. बाबासाहेबांना अभिप्रेत असणारा
समताधिष्ठीत समाज घडविण्यासाठी प्रयत्नशील
-    सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले

पुणे, दि.३१ : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणारा समताधिष्ठीत समाज घडविण्यासाठी राज्याचा सामाजिक न्याय विभाग कायमच प्रयत्‍नशील राहील असे प्रतिपादन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी आज केले.
            मोशी ता. हवेली येथील 250 विद्यार्थीनी क्षमतेचे मुलींचे शासकीय वसतिगृह इमारतीचे उद्घाटन सामाजिक न्यायमंत्री श्री. बडोले यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील, आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, पुणे कॅन्टोनमेंट बोर्डाचे उपाध्यक्ष दिलीप गिरणकर, सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त एल.व्ही. महाजन, सहाय्यक उपायुक्त एस.आर.दाणी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एन.व्ही. तेलंग उपस्थित होते.
            श्री. बडोले म्हणाले, डॉ. बाबासाहेबांच्या १२५ व्या जयंती निमित्त राज्यात नवीन ५० शासकीय वसतिगृह उभारण्यात आली आहेत. या वसतिगृहाच्या माध्यमातून समाजातील तळागाळातील मागासवर्गीय विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येण्यास मदत होत आहे. डॉ. आंबेडकरांनी दिलेल्या घटनेचे पाईक होवूनच राज्याचा सामाजिक न्याय विभाग वाटचाल करत आहे. राज्यातील मागसवर्गीय मुले स्पर्धा परिक्षेव्दारे प्रशासकीय सेवेत येण्यासाठी तसेच त्यांना उच्च शिक्षण मिळवून देण्यासाठी सामाजिक न्याय विभाग विविध योजना राबवत असल्याचे त्यांनी सांगितले.
            राज्यमंत्री श्री. कांबळे म्हणाले, डॉ. बाबासाहेबांच्या १२५ व्या जयंती निमित्त राज्यातील १२५ मागासवर्गीय मुलांना परदेशी शिक्षणासाठी पाठविण्यात आले आहे. या मुलांचा सर्व खर्च राज्यशासन करत आहे. बाबासाहेबांच्या स्वप्नातील महाराष्ट्र उभा करण्यावर शासनाचा भर असल्याचे त्यांनी सांगितले.
            कार्यक्रमाचे प्रास्ताविक एल. व्हृी. महाजन यांनी केले. तर आभार सहाय्यक आयुक्त एस. आर. दाणी यांनी मानले.
००००






No comments:

Post a Comment

  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेची राज्यस्तरीय बैठक पुणे जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्व...