Saturday, September 29, 2018

कालवा बाधितांना मदत करणार - पालकमंत्री बापट

कालवा बाधितांना मदत करणार - पालकमंत्री बापट
पुणे, दिनांक 29- पुणे महानगरपालिका हद्दीतील पर्वती भागातून वाहणारा मुठा उजवा कालवा फुटून नुकसान झालेल्‍या घरांच्‍या पंचनामे जिल्‍हा प्रशासनाकडून पूर्ण झाले असून त्‍यांना खास बाब म्‍हणून मदत देण्‍याबाबतचा 3 कोटी रुपयांचा प्रस्‍ताव तात्‍काळ पाठविण्‍याच्‍या सूचना जिल्‍ह्याचे पालकमंत्री श्री. गिरीश बापट यांनी आज दिल्‍या.
जिल्‍हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम, निवासी उपजिल्‍हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब गलांडे, तहसिलदार गीता दळवी, हेमंत निकम आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. बापट म्‍हणाले, कालवा फुटण्‍याची दुर्घटना ही नैसर्गिक आपत्‍ती म्‍हणून गृहीत धरण्‍याबाबत विनंती करण्‍यात यावी. शासनाच्‍या मदत व पुनर्वसन विभागाच्‍या निर्णयानुसार कालवाबाधितांना नुकसान भरपाई मिळेलच, पण हानीची तीव्रता पहाता खास बाब म्‍हणून 3 कोटी रुपयांच्‍या मदतीची विनंती करणारा प्रस्‍ताव तात्‍काळ पाठवावा. हा प्रस्‍ताव मंजूर होण्‍यासाठी पाठपुरावा करण्‍यात येईल. कालवाबाधित भागातील घरांचे  पंचनामे पूर्ण झालेल्‍या संपूर्ण कुटुंबाची यादी त्‍या भागातील स्‍वस्‍त धान्‍य दुकानदारांकडे देऊन संबंधित कुटुंबांना धान्‍य वाटप करण्‍यात यावे, यावेळी नियंत्रण व देखभालीसाठी जिल्‍हा प्रशासनाचा प्रतिनिधी असावा, असेही ते म्‍हणाले.
मुठा उजवा कालवा फुटून या भागातील घरांमध्‍ये पाणी जाऊन त्यांच्‍या घरातील चीजवस्‍तूंचे नुकसान झाले आहे. हानीची तीव्रता पहाता शासनाकडून भरीव मदतीची गरज असल्‍यामुळे 3 कोटी रुपयांचा प्रस्‍ताव पाठविण्‍यात यावा, असे  पालकमंत्री श्री. बापट यांनी सांगितले.
प्रारंभी जिल्‍हाधिकारी श्री. नवल किशोर राम यांनी घटनेची पार्श्‍वभूमी सांगितली. जिल्‍हा प्रशासनाकडून बाधितांच्‍या घरांच्‍या पंचनाम्‍याची कार्यवाही करण्‍यात आली असून  740 घरांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. त्‍यामध्‍ये सुमारे  90 घरे पूर्णत: बाधित आहेत. पूर्णत: बाधित व अंशत: बाधित घरांच्‍या मदतीचा तसेच खास बाब म्‍हणून 3 कोटी रुपयांच्‍या मदतीचा प्रस्‍ताव शासनाकडे सादर करण्‍यात येईल, असेही जिल्‍हाधिकारी  श्री. नवल किशोर राम यांनी सांगितले.  
0000


शौर्य दिन

सैनिकांच्या प्रत्येक समस्या सोडविणे हे कर्तव्य
                                                       -पालकमंत्री गिरीश बापट
पुणे दि. 29 - देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी सैनिक नेहमीच कर्तव्यदक्ष असतात. अशा सैनिकांच्या कुटूंबास व सैनिकांना कोणतीही अडचण येणार नाही. अडचण आल्यास ती सोडविणे हे पालकमंत्री म्हणून माझे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले. 
शौर्य दिनानिमत्त जिल्हाधिकारी कार्यलयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, कर्नल सदानंद साळुंखे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर मिलिंद तुंगार, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, आदि उपस्थित होते.
पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले, शौर्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात देशाची सेवा करणाऱ्या सैनिकांसमोर मनोगत व्यक्त करणे हे माझे भाग्य आहे. एस.टी.पास, पेन्शन, नौकरी इत्यादी सैनिकांच्या समस्या सोडविण्यासाठी  पालकमंत्री म्हणून कटीबद्ध आहे. शब्दांचे सामर्थ्य  हे कर्तृत्वावर अवलंबून असते. सैनिक हा शब्दच देशासाठी लढणाऱ्या जवानांच्या कर्तृत्वाची ओळख करुन देतो.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले, पुणे जिल्हयातील सैनिकांना व त्यांच्या कुटुंबीयांना कुठल्याही पध्दतीची अडचण येणार नाही. महाराष्ट्र राज्य शूर-विरांचे राज्य आहे. म्हणूनच या राज्यातील बहुसंख्य सैनिक देशसेवेसाठी सैन्यात आहेत. यावरुनच खरे देशप्रेम दिसून येते. जिल्हाधिकारी म्हणून प्रत्येक समस्या सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमात वीर माता व वीर पत्नींचा पालकमंत्री महोदयांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमासाठी सैनिक वसतीगृह, न्यू एंजल हायस्कूलचे  विद्यार्थी, विद्यार्थिनी, माजी सैनिक व त्यांचे कुटुंबिय उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.





Friday, September 7, 2018

लोकराज्य वाचक मेळावा


 लोकराज्य अंकाचे नियमित वाचन ही यशाची गुरुकिल्ली                  – प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे



  पुणे दि. ६- माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने लोकराज्य हे मासिक प्रकाशित करण्यात येते. तरुणांनी हे मासिक आवर्जून वाचावे. लोकराज्य मासिक करीयर घडवण्यासाठी गरजेचे असून ती यशाची गुरुकिल्ली असल्याचे प्रतिपादन वाघीरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी केले. 
वाचन संस्कृती वाढावी यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे सप्टेंबर महिन्यात विविध ठिकाणी लोकराज्य वाचक मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत सासवड येथील वाघीरे महाविद्यालयात लोकराज्य वाचक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्राचार्य नितीन घोरपडे बोलत होते. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, प्रा. डॉ. एस. एस. जगताप,डॉ. किरण रणदिवे, प्रा. पल्लवी लोळे आदी उपस्थित होते.
         डॉ. घोरपडे म्हणाले, आजच्या पिढीत समाज माध्यमांचा प्रभाव वाढत आहे. त्यामुळे वाचनाची सवय मात्र नष्ट होतांना दिसत आहे. लोकराज्य वाचक मेळाव्यातून वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यसाठी मदत होणार आहे. लोकराज्य या अंकातील प्रत्येक पान वाचनीय आहे. जसा हा अंक स्पर्धा परीक्षेसाठी महत्वाचा आहे तसाच तो आयुष्यात यशस्वी होण्यासाठी गरजेचा आहे. वाचन हा विद्यार्थ्याचा आत्मा आहे, त्यामुळे वाचनाकडे लक्ष देऊन लोकराज्य अंक नियमित घेण्याचे आवाहन देखील यावेळी डॉ. घोरपडे यांनी केले. 
            यावेळी जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांनी लोकराज्य मासिकाचे महत्व सांगीतले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना ते म्हणाले, लोकराज्य मासिक हे स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे आहे. वाचनाने विचारांची कक्षा रुंदावते. या मासिकातील प्रत्येक पान  आपणास विचारांनी समृद्ध करेल. देशाची भावी पिढी वाचनातून प्रगल्भ होण्यासाठी लोकराज्य वाचक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे देखील  श्री.सरग   म्हणाले. 
लोकराज्य वाचक मेळाव्याची संकल्पना तसेच उद्देश याबाबत ज्ञानेश भुकेले यांनी यावेळी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सुनिता कोलते, यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.संजय लांडगे यांनी मानले. कार्यक्रमाला विलास कसबे, नीलिमा आहेरकर, वैशाली रांगणेकर, विशाल कार्लेकर, संतोष मोरे,दिलीप गांगुर्डे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठया संख्यने उपस्थित होते.



          लोकराज्य अंकावरील परीक्षेत 
       ५०० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग
                                  

वाघिरे महाविद्यालयाच्या वतीने लोकराज्य वाचक मेळाव्याच्या निमित्ताने लोकराज्य अंकावर आधारित परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी या परीक्षेस भरघोस प्रतिसाद दिला. ५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षेत सहभाग घेतला होता. 

      
                                          

Friday, August 24, 2018

' लोकराज्य शाळा ' करण्याचे आवाहन

जिल्ह्यातील मराठी शिक्षकांच्या कार्यशाळेत 
' लोकराज्य शाळा ' करण्याचे आवाहन
पुणे दि. 23- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने ‘लोकराज्य’ हे शासनाचे मुखपत्र दरमहा प्रकाशित करण्यात येते. शाळेतील अधिकाधिक विद्यार्थी लोकराज्य मासिकाचे वर्गणीदार झाल्यास त्या शाळेला ' लोकराज्य शाळा'  म्हणून घोषित करण्यात येईल. ‘लोकराज्य शाळा’ ही संकल्पना यशस्वीपणे राबविणाऱ्या शाळांच्या प्रतिनिधींचा मा.पालकमंत्री महोदयांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. त्यामुळे आपल्या अधिपत्याखालील शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना लोकराज्य अंकाचे वार्षिक वर्गणीदार होण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांनी केले. 

पुणे जिल्हा अध्यापक संघ, मराठी अध्यापक पुणे शहर संघ व नूतन मराठी विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे जिल्ह्यातील मराठी विषय शिकवणाऱ्या शिक्षकांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. नूतन मराठी प्रशाळेतील या कार्यशाळेस माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. गणपत मोरे, महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाचे शिक्षणाधिकारी दिपक माळी, महाराष्ट्र मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष वि. ना. लांडगे, प्रशाळेच्या मुख्याध्यापिका संजीवनी ओमासे, रंगनाथ सुंबे, संजय गवांडे, अशोक तटके,  हनुमंत कुबडे,  ज्ञानदेव दहिफळे आदी उपस्थित होते.
जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग म्हणाले, शासनाने घेतलेल्या निर्णयाचे प्रतिबिंब या अंकात पाहायला मिळते. तसेच लोकराज्य हे मासिक स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. दर्जेदार मजकूर, आकर्षक व सप्तरंगी अंक प्रकाशित होत असल्यामुळे या मासिकाचा खप चार लाखांवर आहे. अंकातील सर्वच मजकूर वाचनीय व वैशिष्टयपूर्ण असतो. त्याबरोबरच हा अंक विद्यार्थ्यांसाठी व शिक्षकांसाठी कसा उपयुक्त आहे याबाबत देखील त्यांनी  माहिती दिली. जिल्ह्यातील शिक्षकांनी 'लोकराज्य शाळा' या उपक्रमात सहभागी होण्यासाठी 020- 26121307 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन देखील यावेळी त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मॉडर्न हायस्कूलचे शिक्षक नवेश पाटील यांनी तर आभार प्रशाळेच्या उपमुख्याध्यापिका सरिता गोखले यांनी मानले.  कार्यशाळेसाठी जिल्ह्यातील शाळांच्या मराठी विषयांचे शिक्षक उपस्थित होते.


0000

Tuesday, August 14, 2018

‘युवा माहिती दूत’ उपक्रमाच्या माध्यमातून
शासकीय योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचतील
                                                           - पालकमंत्री गिरीश बापट

            पुणे, दि 15 : माहिती व जनसंपर्क विभागाचा ‘युवा माहिती दूत’ हा उपक्रम अत्यंत नावीन्यपूर्ण आणि उपयुक्त असून या माध्यमातून शासनाच्या कल्याणकारी योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचतील असा विश्वास पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज व्यक्त केला.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, उच्च शिक्षण विभाग आणि तंत्र शिक्षण विभाग व युनिसेफच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या ‘युवा माहिती दूत’ या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते येथील विधान भवनाच्या सभागृहात झाला. यावेळी ‘युवा माहिती दूत’च्या ॲपचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते, उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर,  कृषी आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह, सहकार आयुक्त डॉ. विजय झाडे, पीएमआरडीएचे किरण गित्ते, भूजल संरक्षण व विकास यंत्रणेचे संचालक शेखर गायकवाड, पुणे विभागाचे उपसंचालक (माहिती) मोहन राठोड, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग उपस्थित होते.
            पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले, राज्य शासनातर्फे विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. शासनाच्या विकास योजनांची माहिती गाव पातळीपर्यंत लाभार्थींना मिळावी या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा हा उपक्रम नावीन्यपूर्ण आहे. या उपक्रमात युवकांना सामावून घेतल्यामुळे ही योजना अधिक प्रभावीपणे राबविली जाईल. या उपक्रमात तरुणांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.
प्रास्ताविकात उपसंचालक मोहन राठोड म्हणाले, हा उपक्रम ऐच्छिक असून, समाजकार्याची आवड असलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थी युवा माहिती दूत म्हणून कार्य करणार आहेत. माहिती दूत त्यांच्या तालुक्यातील 50 कुटुंबांशी समक्ष संपर्क साधुन शासकीय योजनांची माहिती देणार आहेत. युवा माहिती दुतांची नोंदणी महासंचालनालयाने तयार केलेल्या ॲपवर ऑनलाईन होणार आहे. हे ॲप प्ले स्टोअरवर विनामुल्य उपलब्ध आहे. प्ले स्टोअर वरुन हे ॲप डाऊनलोड करुन विद्यार्थ्यांना युवा माहिती दूत म्हणून नोंदणी करता येणार आहे. या युवा माहिती दूतांना विकास योजनांवरील व्हीडीओ क्लिप, शासकीय योजनांची माहिती असणाऱ्या पुस्तिका, घडीपत्रिका महासंचालनालयामार्फत पुरविण्यात येणार आहेत, तरी युवकांनी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.  
यावेळी ‘युवा माहिती दूत’ या उपक्रमावरील ध्वनीचित्रफित दाखविण्यात आली. उपस्थितांचे स्वागत जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांनी केले. सूत्रसंचालन माहिती सहायक जयंत कर्पे यांनी केले. यावेळी माहिती सहायक संग्राम इंगळे यांच्यासह विभागीय माहिती कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
*****





Sunday, July 8, 2018

चित्रप्रदर्शन आणि कलापथक शासनाचे स्तुत्य उपक्रम

चित्रप्रदर्शन आणि कलापथक
शासनाचे स्तुत्य उपक्रम

पुणे दि. 8 : चित्रप्रदर्शनातून चित्र पाहता येते, नकळत चित्रांशी बोलता येते, चित्ररुपी वाक्य बोलके वाटतात. शासनाच्या विविध योजना चित्ररुपाने खूप छान पध्दतीने मांडल्या आहेत. याठिकाणी लावलेले छायाचित्र प्रदर्शन खरोखरच स्तुत्य आहे, अशा बोलक्या प्रतिक्रिया या ठिकाणी आलेल्या वारकऱ्यांनी व्यक्त केल्या.
पुणे शहरात संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे आगमन झाले आहेत. त्यासोबत लाखो वारकरी पुण्यनगरीत आलेले आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे दर्शन एका रांगेत वारकरी मनोभावे घेत आहेत. भवानी पेठेतील सावित्रीबाई फुले प्रशालेत लावलेले चित्रप्रदर्शन सगळयांचे आकर्षण ठरत आहे.


माहिती व जनसंपर्क महासंचालनायच्या वतीने आषाढी वारीचे औचित्य साधून 'संवादवारी' हा नावीन्यपूर्ण उपक्रम सुरु केला आहे. लाखो भाविक या वारीत सहभागी होतात. संपूर्ण राज्यातून वारकरी पंढरपूरात विठ्ठलाच्या दर्शनसाठी येतात.
माहिती व जनसंपर्क या विभागाला शासनाचे कान, नाक, डोळे म्हटले जाते, जनतेच्या प्रतिक्रिया शासनापर्यंत पोहचविण्याचे काम या विभागामार्फत केले जाते. शासकीय संदेशाचे प्रसारण आणि कल्याणकारी योजनांबाबत जनजागृती हे ब्रीद घेऊन 'संवादवारी' सहभागी झाली आहे.


'संवादवारी' संबंधी आपली प्रतिक्रिया व्यक्त करतांना ज्ञानेश्वर महाराजांच्या रथापुढील दिंडी क्रमांक एकचे प्रमुख श्री. राणोजी वासकर महाराज म्हणाले, विसाव्यासाठी दरवर्षी आम्ही या ठिकाणी थांबतो. या शाळेच्या प्रवेशद्वारावर लावलेले चित्ररथही सर्वांना आकर्षून घेत आहे, खरोखरच हा चांगला उपक्रम आहे. या उपक्रमास माझ्या शुभेच्छा.

*****


संत विचारांचा ठेवा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

संत विचारांचा ठेवा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे दि. ८: महाराष्ट्राच्या समाजमनावर आजही संत विचारांचा मोठा पगडा आहे. संत परंपरेच्या विचारानेच कायम सामान्य माणसाला प्रेरीत केले. संत विचार हे काळसापेक्ष असून हा विचारांचा ठेवा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रत्येक काळात संत चरित्रांचे लेखन होण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.
श्री गंधर्व वेद प्रकाशनच्या “संतदर्शन चरित्र ग्रंथा”चे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर संमितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, चैतन्य महाराज देगलूरकर, संत तुकाराम महाराज सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बिदुरा नवले, संत परंपरेचे अभ्यासक तथा ग्रंथाचे संपादक डॉ. सदानंद मोरे, आळंदी
संस्थानचे विश्वस्त अभय टिळक, प्रकाशक दीपक खाडिलकर, प्रकाश खाडिलकर उपस्थित होते.
            यावेळी श्री. देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राला संत विचारांची मोठी परंपरा आहे. या संत विचाराने सामान्य माणसाला कायमच प्रेरणा दिली. महाराष्ट्रातील संक्रमण काळात हेच संत विचार समाजाच्या पाठिशी उभा राहिला. संत ज्ञानेश्वरांनी अखिल विश्वाच्या कल्याणाची परंपरा सुरू केली तर संत तुकारामांनी अध्यात्म आणि संसार यांची सुयोग्य सांगड घालून दिली.
संत विचार हे काळसापेक्ष आहेत. प्रत्येक काळात त्यांच्या विचारांना महत्व आहे. मात्र हे संत विचार पुढच्या पिढी पर्यंत पोहोचण्यासाठी काळानुसार संत चरित्रांचे लेखन होण्याची आवश्यकता आहे. संत दर्शन या संतांच्या चरित्र लेखनाने संतांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. हे संत विचार सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येणार असल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले.  
श्री गहिनीनाथ महाराज औसेकर म्हणाले, प्रत्येक संतांच्या मागे मोठा इतिहास आहे. हा संतांचा  इतिहास आजच्या पिढीसमोर येण्याची आवश्यकता आहे. संतांच्या विचारावरच चांगला समाज घडू शकतो, त्यामुळे संतांच्या विचारांना सामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता आहे.
चैतन्य महाराज देगलूरकर म्हणाले, नामदेवराय यांनी आपल्या अभंगातून सर्व संतांचे चरित्र पहिल्यांदा मांडले. महाराष्ट्र ही संतभूमी आहे. सकल समाजाच्या उत्थानासाठी संतांचा जन्म झाला. बदणाऱ्या सामाजिक मनोविकासामुळे संत चरित्रांची वारंवार नव्याने मांडणी आवश्यक आहे. संतांचे विचार पुढे सुरू राहण्यासाठी संत चरित्रांची आवश्यकता आहे. तत्वज्ञान आणि आचरण यांचा सुयोग्य समन्वय संतांच्या जीवनात असल्याने त्यांची चरित्र कायमच उपयुक्त असतात. जीवनाला दिशा देण्यासाठी संत चरित्रांची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.    
 डॉ. सदानंद मोरे म्हणाले, महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची समृध्द परंपरा आहे. संतांनी महाराष्ट्राची साहित्य संस्कृती टिकवली. महाराष्ट्राचा सामाजिक पोत सांभाळण्याचे काम संतांनी केले. संतांचे विचार लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी या संत चरित्राची निर्मिती करण्यात आली. वारकरी संप्रदायाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आस्था आहे. ती त्यांच्या कृतीतून वारंवार स्पष्ट होत असल्याचे त्यांनी सांगितले.  
कार्यक्रमाच्या सुरूवातीला संत चरित्र ग्रंथांच्या सर्व लेखकांचा परिचय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्तीश: करून घेतला व त्यांच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक दीपक खाडिलकर यांनी केले.  सूत्रसंचलन दीपक खाडिलकर यांनी केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
*****


  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेची राज्यस्तरीय बैठक पुणे जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्व...