Tuesday, December 11, 2018


पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातील स्टेनो विकास देसाईंचे
वॉटर पोलो क्रीडा प्रकारात महाराष्ट्र संघाला सुवर्णपदक मिळवून देण्यात योगदान

            पुणे, दि.11- अखिल भारतीय नागरी सेवा जलतरण स्पर्धा 2018-19 या स्पर्धेत विभागीय आयुक्त कार्यालयातील विकास देसाई यांनी महाराष्ट्र संघाबरोबर वॉटर पोलो क्रीडा प्रकारात अंतिम सामन्यामध्ये केंद्रीय सचिवालय, नवी दिल्ली संघाचा 10/5 गुणांच्या फरकाने धुव्वा उडवून महाराष्ट्र संघाला विजेतेपद मिळवून दिले.
            गांधीनगर,गुजरात येथे दि.27 नोव्हेंबर, ते 29 नोव्हेंबर,2018 मध्ये झालेल्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेंतर्गत अखिल भारतीय जलतरण स्पर्धेत महाराष्ट्र संघाचा सहभाग होता. महाराष्ट्राच्या संघामध्ये विकास देसाई यांची निवड झाली होती. त्यामध्ये या संघाने विजय प्राप्त केला. विकास देसाई यांनी वॉटर पोलो क्रीडा प्रकारा शिवाय 50 मी. ब्रेस्टस्ट्रोक प्रकारात रौप्यपदक व 4 बाय 100 मिडले प्रकारात कास्यपदक मिळविले. त्यांनी महसूल विभागाच्या होणा-या विभागीय क्रीडा स्पर्धेत तसेच  राज्यस्तरीय महसूल क्रीडा स्पर्धेत जलतरण प्रकारात अनेकवेळा सुवर्ण पदके मिळविली आहेत. त्यांच्या या कामाची दखल घेवून त्यांना अनेक वेळा गौरविण्यात आले आहे.
            त्यांनी आत्तापर्यंत मालवण येथील राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धा (3 कि.मी.), संकरॉक टू गेट वे ऑफ इंडिया येथील (5.कि.मी.) स्पर्धेत तसेच गोवा येथील बंबोलीम बिचवर झालेल्या 5 कि.मी.सागरी जलतरण स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी  करुन विभागीय आयुक्त कार्यालयाचा नावलौकिक केला आहे.   
त्यांच्या या यशाबद्दल विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त पुनर्वसन श्री. दीपक नलवडे, उपसचिव तथा प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी श्री. भ.सं.वानखेडे, तहसिलदार श्री.विवेक साळुंके,  तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी उपजिल्हाधिकारी, डॉ जयश्री कटारे, श्री. विकास भालेराव, तहसिलदार, महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष श्री.दिपक चव्हाण,  पुणे जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्री. विनायक राऊत व स्वाती मुरदाळे यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.
0000


Monday, December 10, 2018

खेलो इंडियाच्या यशस्वीतेसाठी उद्योजकांनी प्रशासनास सहकार्य करावे
                                              -जिल्हाधिकारी नवल किशोर राम

        पुणे दि. ९: विविध खेळांमध्ये कौशल्य असलेल्या प्रतिभावंत खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्यावतीने खेलो इंडियास्पर्धेचे आयोजन करण्यात येते. 7 ते 20 जानेवारी, 2019 या कालावधीत महाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात खेलो इंडियास्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या आयोजनात उद्योजकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले.
            खेलो इंडिया स्पर्धेच्या आयोजनाच्यानिमित्त चाकण परिसरातील उद्योजकांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम बोलत होते. यावेळी पुणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, क्रीडा विभागाचे सहसंचालक नरेंद्र सोपल, चाकण औद्योगिक वसाहत संघटनेचे सनी साकला, क्रीडा सहायक संचालक सुहास पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान, तहसिलदार विकास भालेराव आदी उपस्थित हेाते.
            या स्पर्धेमुळे उत्कृष्ट खेळाडू तयार होतील व ते आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नांव उज्वल करणार असल्याने, उद्योजकांनी या  स्पर्धेच्या ठिकाणी  देण्यात येणाऱ्या आवश्यक त्या सोयीसुविधा पुरविण्यासाठी स्पर्धा आयोजनात प्रशासनास सहकार्य करावे. यावेळी महानगरपालिका आयुक्त सौरभ राव  यांनीही उद्योजकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. बैठकीला उपस्थित विविध उद्योगांच्या प्रतिनिधींनी स्पर्धेला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. बैठकीला चाकण परिसरातील उद्योजक उपस्थित होते.
0000





जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती बैठक संपन्न
योजनांची अंमलबजावणी परिणामकाररित्या करावी
                                               ... केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर

        पुणे,दि.10:- केंद्र शासनाने सुरु केलेल्या विविध योजनांचा आढावा घेऊन योजनांच्या अंमलबजावणीमध्ये येणाऱ्या अडचणींवर चर्चा करुन मार्ग काढणे हा दिशा समितीचा उद्देश आहे. यासाठी सर्व संबधित विभागांनी ताळमेळ ठेवून, योजनांची अंमलबजावणी परिणामकारित्या करावी, असे प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज येथे व्यक्त केले.
            जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वासराव देवकाते, खा. शिवाजीराव आढळराव पाटील, खा.अनिल शिरोळे, .बाबुराव पाचर्णे,.माधुरी मिसाळ, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रभाकर गावडे उपस्थित होते.
            यावेळी श्री. प्रकाश जावडेकर म्हणाले, दिशा समितीमधील लोकप्रतिनिधींच्या सहभागामुळे योजना राबविणाऱ्या विभागांमध्ये उत्तरदायित्व निर्माण होऊन पारदर्शकता वाढण्यास मदत होईल. योजनांची अंमलबजावणी करताना संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिंधींना विश्वासात घेऊन त्यांचे सहकार्य घ्यावे. विविध योजनांची अंमलबजावणी झाल्यानंतर, लाभार्थ्यांचे मेळावे आयोजित करावे. लाभार्थ्यांच्या अनुभवावर आधारीत यशोगाथा व चित्रफीत समाज माध्यमातून प्रसारित करावी. यासाठी सर्व विभागांनी समन्वय ठेवून काम करावे.
            उद्योजकांसाठी बँकांतर्फे राबविण्यात येणारी मुद्रा योजनेसह प्रधानमंत्री जनधन योजना, वित्तीय समायोजना, प्रधानमंत्री उज्ज्व्ला योजना, पोस्ट ऑफीस बँक योजना, रेल्वे विकासाच्या योजना, टेलीकॉम विभागातर्फे ग्राम पंचायतींना इंटरनेट वापरासाठी पुरविण्यात येणाऱ्या  ब्रॉड बँड आणि फायबर कनेक्टीव्हीटी योजनांच्या प्रगतीचा आढावा घेऊन, मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधला. खा.शिवाजीराव आढळराव पाटील, खा.अनिल शिरोळे यांनी चर्चेमध्ये सहभाग घेतला.
            बैठकीला पोस्ट, रेल्वे, बँक, टेलीकॉम, महसूल, महानगरपालिका, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग व अन्य विभागांचे अधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
0000



Saturday, December 8, 2018

विजय रणस्‍तंभ येथील  कार्यक्रम शांततेत पार पाडण्‍यासाठी
सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवून कामे करावीत
                                        - जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम
            पुणे, दिनांक 8- विजय रणस्‍तंभ येथे 1 जानेवारी  रोजी अभिवादन करण्‍यासाठी असंख्‍य नागरिक येत असतात. पेरणे येथील कार्यक्रम शांततेत पार पाडण्‍यासाठी प्रशासनाच्या सर्व संबंधित यंत्रणांनी एकमेकांशी समन्वय ठेवून कामे करावीत, अशा सूचना जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम आणि पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी केल्या. पेरणे येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. त्‍यावेळी ते बोलत होते.  1 जानेवारी रोजी होणा-या अभिवादन कार्यक्रमाचे नियोजनासाठी प्रशासनाच्‍यावतीने बैठकीचे आयोजन करण्‍यात आले होते. यावेळी उपविभागीय अधिकारी ज्‍योती  कदम, अतिरिक्‍त पोलीस अधीक्षक संदीप पखाले, संदीप जाधव, आदी उपस्थित होते.
            जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम म्‍हणाले,  1 जानेवारी रोजी होणारा कार्यक्रम शांततेत संपन्‍न होण्यासाठी. गेल्‍या वर्षी झालेल्‍या घटनेची पुनरावृत्‍ती होणार नाही, यासाठी सर्व यंत्रणांनी दक्ष रहावे. या कार्यक्रमाच्‍या यशस्‍वीतेसाठीसर्वांनी योग्य नियोजन करुन आपआपल्या जबाबदाऱ्या व्यवस्थीत रित्या पार पाडाव्यात. या ठिकाणी संबंधीत अधिकाऱ्यांनी पार्किंगची व्यवस्था, अखंडीत वीज, शुध्द पिण्याचे पाणी, खाद्यपदार्थ विक्रेत्यांसाठी योग्य जागा उपलब्ध करुन द्यावी. आरोग्य विभाग, अग्निशमन दल, पोलीस विभाग यांनीही आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. असेही ते म्‍हणाले.
            पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे आढळून आल्यास  ते पोलीस विभागाच्या निर्दशनास आणून द्यावे. प्रशासकीय यंत्रणेतील सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी आपले ओळखपत्र जवळ ठेवावीत. सोशल मिडीयावरुन नेहमी चुकीचा संदेश प्रसारित होत राहातात त्यांच्याविरुध्‍द पोलीस प्रशासनाचे लक्ष असून त्‍यांच्‍यावर कडक कारवाई केली जाईल. 1 जानेवारी रोजी होणारा कार्यक्रम शांततेत संपन्‍नहोण्यासाठी आपण सर्व जण सज्ज आहोत हे आपण आपल्या नियोजनातून दाखवून द्यावे, असेही ते म्हणाले.
               यावेळी  सर्व संबंधीत अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
000000



Friday, December 7, 2018


ध्‍वजदिन निधीसाठी आपले योगदान द्या- विजयसिंह देशमुख

            पुणे,दिनांक 7- सैनिक सीमेवर खडा पहारा देत असतात, म्‍हणून आपण सुरक्षित असतो, या सैनिकांच्‍या ऋणातून उतराई होण्‍यासाठी सशस्‍त्र सेना ध्‍वजदिन निधीसाठी आपले योगदान द्यायला हवे, असे आवाहन करत आपण सर्व सैनिकांविषयी कटीबध्‍द असायला हवे, असे प्रतिपादन सैनिक कल्‍याण विभागाचे प्रभारी संचालक विजयसिंह देशमुख यांनी केले. जिल्‍हाधिकारी कार्यालयात सशस्‍त्र सेना ध्‍वजदिन निधी संकलन शुभारंभात ते बोलत होते. यावेळी सैनिक कल्‍याण विभागाचे उपसचिव सुरेख खाडे, जिल्‍हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, कर्नल शिंदे, कर्नल गोरे, कर्नल नाईकवडे, जिल्‍हा सैनिक कल्‍याण अधिकारी मिलींद देवदत्‍त तुंगार आदी उपस्थित होते.

            देशमुख म्‍हणाले, सीमेवर डोळ्यात तेल घालून खडा पहारा देणारा  सैनिक सेवानिवृत्‍ती नंतर नागरी जीवन जगत असतो, अशावेळी त्‍याला विविध प्रश्‍नांबाबत अडचणी येऊ शकतात, त्‍या निवारण करण्‍यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्‍न करायला हवेत. सैनिकांविषयी असलेले ऋण व्‍यक्‍त करण्‍याचा हा एक छोटासा प्रयत्‍न असतो. सैनिकांच्‍या मुलांमध्‍ये असलेल्‍या कौशल्‍यांचा विकास होण्‍यासाठी क्षमता बांधणी उपक्रम हाती घेण्‍याची गरजही त्‍यांनी प्रतिपादन केली. माजी सैनिकांचे प्रश्‍न सोडविण्‍यासाठी मासिक बैठक घेण्‍यात येणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

            सैनिक कल्‍याण विभागाचे उपसचिव सुरेख खाडे यांनी महाराष्‍ट्र माजी सैनिक महामंडळाच्‍यावतीने (मेस्‍को) राबविण्‍यात येणा-या विविध योजनांची माहिती दिली. प्रत्‍येक सैनिक हा शेतकरी असतो. सेवानिवृत्‍तीनंतर अनेक जण शेतीव्‍यवसाय करत असतात. त्‍यांच्‍या शेतमालाला योग्‍य बाजारपेठ मिळावी, यासाठी मेस्‍कोच्‍या वतीने प्रयत्‍न करण्‍यात येतील, असे ते म्‍हणाले.

            जिल्‍हा सैनिक कल्‍याण अधिकारी मिलींद देवदत्‍त तुंगार यांनी जिल्‍हा सैनिक कल्‍याण कार्यालयाच्‍यावतीने माजी सैनिकांच्‍या कल्‍याणासाठी विविध उपक्रम राबवत असल्‍याचे सांगितले. शासनाच्‍या विविध विभागांनी ध्‍वजदिननिधीसाठी सढळ हस्‍ते मदत करावी, असे आवाहनही त्‍यांनी केले.  या कार्यक्रमात गतवर्षी ध्‍वजदिननिधी संकलनासाठी उत्‍कृष्‍ट संकलन केलेल्‍या विविध संस्‍था,कार्यालयांच्‍या प्रमुखांना उत्‍तेजनार्थ पारितोषिके देऊन गौरविण्‍यात आले. या शिवाय माजी सैनिक, विधवा पत्‍नी यांच्‍या पाल्‍यांना गौरव पुरस्‍कार प्रीत्‍यर्थ धनादेश वितरित करण्‍यात आले. कार्यक्रमाचा शुभारंभ दीपप्रज्‍वलनाने झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृष्‍णा वाघमारे यांनी केले. यावेळी माजी सैनिक, पाल्‍य, विद्यार्थी  मोठ्या संख्‍येने  उपस्थित होते.

00000









Thursday, December 6, 2018

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पालकमंत्री गिरीश बापट यांची आदरांजली

पुणे    , दि. 6 : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज गुरुवार, 6 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या त्यांच्या पुतळ्यास अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा पालकमंत्री गिरीश बापट यांनी पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी, नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.
00000




Wednesday, December 5, 2018

जिल्ह्याबाहेर चारावाहतुकीस प्रतिबंध-जिल्हाधिकारी

जिल्ह्याबाहेर चारावाहतुकीस प्रतिबंध-जिल्हाधिकारी
          पुणे दि. 5 : पुणे जिल्ह्यामध्ये माहे सप्टेंबर,2018 अखेर सरासरीच्या तुलनेत पाऊस कमी पडलेला असल्याने, तसेच यापुढील कालावधीमध्ये पावसाची अशाश्वती निर्माण झाल्याने जिल्ह्यामध्ये पाणी टंचाई व जनावरांना चारा टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे चाऱ्याची पळवापळवी होऊन त्यातून मोठ्या प्रमाणात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्यामध्ये शिल्लक असलेला चारा इतर जिल्ह्यात जाऊ नये व त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 नुसार प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करुन जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, नवल किशोर राम यांनी  पुणे जिल्ह्यातून जिल्ह्याबाहेर चारा वाहतूक करु नये यासाठी आदेश निर्गमित केले आहे. सदरचा आदेश, निर्गमित झाल्यापासून दोन महिन्याच्या कालावधी करीता अंमलात राहील, असे कळविले आहे.

00000

  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेची राज्यस्तरीय बैठक पुणे जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्व...