Monday, November 21, 2016

रुग्णालयांनी धनादेश स्वीकारण्यास नकार दिल्यास आरोग्य सनियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा -जिल्हाधिकारी सौरभ राव यांचे आवाहन

रुग्णालयांनी धनादेश स्वीकारण्यास नकार दिल्यास
आरोग्य सनियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा
 -जिल्हाधिकारी  सौरभ राव यांचे आवाहन
पुणे, दि. 21 : जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयांनी रुग्णांकडून उपचाराच्या रकमेपोटी धनादेश स्वीकारावेत तसेच  शुल्का अभावी कोणाचाही आपत्कालीन औषधोपचार टाळू नये अशा सूचना देत या बाबत रुग्णांना अथवा त्यांच्या नातेवाईकांना सहकार्य मिळत नसल्यास त्यांनी तात्काळ 108 क्रमांकाच्या हेल्पलाईनवर अथवा आरोग्य सनियंत्रण समितीशी संपर्क  साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी केले आहे.
खासगी रुग्णालयांकडून जून्या 500 व 1000 रुपयांच्या नोटा स्विकारण्यास नकार देण्यात येत असल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त होत आहेत. याबाबत राज्य शासनाच्या आरोग्य संचालनालयाने सर्व खाजगी रुग्णालयांना रुग्णांकडून धनादेश स्विकारण्याचे आदेश दिलेले आहेत. या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी आरोग्य विभागाला सनियंत्रणाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. रुग्णांना खाजगी रुग्णालयांकडून सहकार्य मिळत नसल्यास त्यांनी 108 या हेल्पलाईनवर अथवा जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या 020-27286458 व जिल्हा आरोग्य अधिकारी पुणे यांच्या 020-26051418, 26129965 या क्रमांकावर संपर्क साधावा.
 तसेच या निर्णयाची माहिती देणारा फलक प्रत्येक रुग्णालयांनी त्यांच्या दर्शनी भागात लावण्याच्या सूचनाही देण्यात आलेल्या आहेत. औषधोपचाराबाबत काही तक्रारी प्राप्त झाल्यास आरोग्य विभागाच्या संबंधित अधिकाऱ्याने संबंधित रुग्णालयाकडे संपर्क साधून रुग्णाचे नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक प्राप्त करुन घ्यावेत व रुग्णालयात कोणत्याही परिस्थितीत शुल्काअभावी आपत्कालीन औषधोपचार टळू देवू नयेत. रुग्णांनी अथवा त्यांच्या नातेवाईकांनी संबंधित रुग्णालयातील जबाबदार व्यक्तीचा दूरध्वनी अथवा मोबाईल नंबर घ्यावा, जेणेकरुन त्यांना धनादेश स्विकारण्यास मदत होईल. तसेच एखाद्या रुग्णाने उपचार घेतलेल्या रुग्णालयास दिलेला 10 हजार रुपये पर्यंतचा धनादेश न वटल्यास या धनादेशाची प्रतिपूर्ती मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून करण्यात येणार आहे.  

*******

Wednesday, November 16, 2016

विधानपरिषद निवडणूकीसाठी आचारसंहितेचे पालन करुन निवडणूकीचे पावित्र्य राखावे - - जिल्हाधिकारी सौरभ राव

 विधानपरिषद निवडणूकीसाठी आचारसंहितेचे
पालन करुन निवडणूकीचे पावित्र्य राखावे
-         - जिल्हाधिकारी सौरभ राव
पुणे. दि.16:- विधानपरिषद (स्थानिक प्राधिकारी संघ) निवडणूक निर्भय मुक्त वातारवणात पार पाडली पाहिजे. निवडणूक आयोगाच्या  आदर्श आचारसंहितेचे पालन करुन अधिक पारदर्शकता आणून निवडणूकीची पवित्रता राखली गेली पाहिजे. यासाठी संबधितानी सतर्क रहावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांनी केले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात विधानपरिषद निवडणूकीबाबतच्या बैठकीत मार्गदर्शन करतांना बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी जिल्हाधिकारी सौरभ राव म्हणाले की, संबधित उमेदवार व त्यांच्या पक्षातर्फे केले जाणारे रोख रक्कमाचा मोठा आर्थिक व्यवहारावर निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार आयकर,विक्रीकर आदि संबधित विभागांनी विशेष लक्ष ठेवावे. निवडणूकीत गैरव्यवहार होवू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करुन अधिक पारदर्शकपणे काम करुन निवडणूक यंत्रणेची प्रतिमा चांगली राहिली पाहिजे याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना दिल्या.
निवडणूकीच्या दरम्यान नियमबाहय होर्डिग्ज,बॅनरद्वारे राजकीय स्वरुपाच्या जाहिराती लावल्या जाणार नाहीत याकडे लक्ष द्यावे. बँकामार्फत होणाऱ्या मोठया संशयास्पद आर्थिक व्यवहाराबाबत सतर्क रहावे. पैशाचा दुरपयोग निवडणूकीत होवू नये. विविध बँकेमार्फत नोटाची माहिती रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार करावी. तसेच त्याचा अहवालही नियमित कळविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.
निवडणूक कालावधीत सोने व्यापारी यांच्याकडूनही गैरव्यवहार होवू नये अशा सूचना सराफ असोशिएनच्या पदाधिकारी यांना दिल्या. तसेच निवडणूक प्रक्रिया शांततेत सुरळीत पार पाडण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. त्याचप्रमाणे निवडणूक कालावधीसाठी नियुक्त केलेले भरारी पथके, दक्षता पथके यांनी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
बैठकीस उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती समिक्षा चंद्राकार, उपजिल्हाधिकारी श्रीमती मोनिका सिंह, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्री. दिवाकर देशमुख, जिल्हा उपनिबंधक बी.टी.लावंड (शहर) देवेंद्र कटके (ग्रामीण) आयकर विक्रीकर – राज्य उत्पादन शुल्क पुणे व पिंपरी चिंचवड मनपाचे अधिकारी,ज्वेलर्स असोशिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
0000



Sunday, November 13, 2016

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला भेट

पुणे, दि. 13 (वि.मा.का.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी राज्यपाल सी.विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मानव संशोधन व विकासमंत्री प्रकाश जावडेकर,  पालकमंत्री गिरीश बापट, खासदार शरद पवार, सिरमचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. सायरस पुनावाला, कार्यकारी संचालक आदर पुनावाला आदी उपस्थित होते.
आदर पुनावाला स्वच्छ शहर पुढाकार अंतर्गत विविध सक्शन मशीनची यावेळी  पंतप्रधान श्री मोदी यांनी पाहणी केली.
००००





स्टार्टअप उद्योगांनी कृषी क्षेत्रातही काम करावे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन: आंतरराष्ट्रीय साखर परिषदेचे उद्घाटन

स्टार्टअप उद्योगांनी कृषी क्षेत्रातही काम करावे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन: आंतरराष्ट्रीय साखर परिषदेचे उद्घाटन

पुणे, दि. १३ (विमाका): कृषी क्षेत्रात अधिक नाविन्यपूर्ण संशोधन होण्याची आवश्यकता असून स्टार्टअप उद्योगानीही कृषी क्षेत्रात काम करायला हवे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे केले.
पुणे जिल्ह्यातील मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे शुगरकेन व्हॅल्यू चेन-व्हिजन २०२५ या आंतरराष्ट्रीय साखर परिषदेचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर, सहकार मंत्री सुभाष देशमुख, संस्थेचे उपाध्यक्ष शिवाजीराव गिरधर पाटील, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष दिलीपराव वळसे-पाटील आदी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘जागतिक स्तरावरील विचार केला असता कृषी क्षेत्रात संशोधन आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला गेला आहे. त्या तुलनेत आपल्या देशात संशोधन आणि तंत्रज्ञानाचा तितकासा वापर होत नाही. हा वापर वाढण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट सारख्या संस्थांनी पुढाकार घ्यायला हवा. स्टार्टअप उद्योगांनी कृषी क्षेत्रात संशोधन, विकास, तंत्रज्ञान विस्तार, बीज संशोधन आदी क्षेत्रात काम करण्याची आवश्यकता आहे. यामुळे देशातील अनेक तरुणांना रोजगार मिळेल आणि शेतीच्या विकासाला हातभार लागेल.’
शेतीसमोर दुष्काळ, पावसाची अनियमितता, घटत जाणारी जमीन धारणा आदी आव्हाने आहेत. या आव्हानावर मात करून आपणास उत्पादकता वाढवायची आहे, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, ‘ऊसाच्या पिकात आंतरपीक घेण्याकडे शेतकरी वळला आहे. आता ऊसाच्या पिकासाठी सूक्ष्म सिंचन करण्याची आवश्यकता आहे. यामुळे उत्पादकता वाढते आणि साखरेचे उत्पादन चांगले होत असल्याचा अनुभव आहे.’
डाळीच्या उत्पादनावर भर देण्याची आवश्यकता असल्याचे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘ऊसाच्या उत्पादनाबरोबरच इथेनॉल उत्पादनावर साखर कारखान्यांनी भर द्यायला हवा. गेल्या दोन वर्षात इथेनॉलचे उत्पादन आणि विक्रीत वाढ झाली आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था इथेनॉलवर चालू शकते. यामुळे खनिज तेलाच्या आयातीसाठी लागणारे परकीय चलनाची बचत होऊ शकते.’
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने बांबूच्या संशोधनाकडे लक्ष द्यावे अशी सूचना पंतप्रधान मोदी यांनी केली. ते म्हणाले, ‘ऊस आणि बांबू यांच्यात साम्य आहे. बांबूला जागतिक स्तरावर चांगली मागणी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना एक चांगला पर्याय उपलब्ध होऊ शकतो.’
केंद्र सरकारने पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांबाबत घेतलेल्या निर्णयाला जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘देशाची अर्थव्यवस्था सुदृढ करण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेतील काळा पैसा दूर करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. तीस डिसेंबरपर्यंत जनतेने वेळ द्यावा. सर्व व्यवस्था सुरळीत होईल.’
साखरेबरोबरच उपउत्पादनावरही
कारखान्यांनी लक्ष द्यावे: मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘जागतिकीकरणानंतर राज्यातील साखर कारखानदार उद्योगाला राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करावी लागत आहे. त्यामुळे आता या उद्योगाला केवळ साखर उत्पादन करून चालणार नाही. सहवीज निर्मिती, इथेनॉल उत्पादन यासारख्या उपउत्पादनांवर साखर कारखानदारीने लक्ष केंद्रित करायला हवे.’
ऊस पीक येत्या तीन वर्षात सूक्ष्म सिंचनावर वळवण्याचा राज्य शासनाचा निर्धार आहे. त्यासाठी शासन, शेतकरी आणि उद्योग यांची मदत घेतली जाईल. ऊसाची उत्पादकता वाढवण्याबरोबरच पाण्याचा किफायतशीर वापर करण्यासाठी लक्ष केंद्रित करावे लागणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
राज्यातील बहुतांश कारखान्यांनी उसासाठीची एफआरपीची रक्कम आदा केली आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्याला एफआरपीची रक्कम मिळावी यासाठी राज्य शासन नेहमीच आग्रही आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
माजी केंद्रीय कृषी मंत्री तथा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, ‘साखर उद्योगासमोर अनेक आव्हाने आहेत. या आव्हानांचा विचार आणि त्यावर उपाययोजना करण्यासाठी या परिषदेचे संयोजन करण्यात आले आहे. ऊसाची उत्पादकता वाढवणे, कारखानदारीत आधुनिक तंत्रज्ञान आणणे, तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करणे या बाबींचा या परिषदेत विचार होणार आहे.
यावेळी राज्यातील सहकार, साखर कारखानदारी, कृषी, उद्योग अशा विविध क्षेत्रातील लोक उपस्थित होते. सूत्रसंचालन मानसी सोनटक्के यांनी केले.
क्षणचित्रे
·        कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी स्थापन केलेल्या या संस्थेबाबतची माहिती देणारा लघुपट दाखविण्यात आला. या लघुपटात संस्थेच्या विकासाबरोबरच विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली.
·        पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करून त्यांचा यथोचित गौरव केला आहे. वसंतदादांनी आपले सार्वजनिक जीवन कृषी व सहकार क्षेत्रात घालवून भरीव योगदान दिले. परिणामी शेतीमध्ये परिवर्तन झाल्याचे दिसून येत आहे. ते दूरदृष्टीचे नेते होते, या शब्दात त्यांच्या कार्याचा गौरव केला.
·        वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आगमन होताच क्षेत्रीय ऊसाची पाहणी केली. नवीन वाण आणि नव्या तंत्रज्ञानाची माहिती घेतली. शरद पवार यांनी सार्वजनिक जीवनात काम करण्याला आता ५० वर्षे पूर्ण होत आहे. त्यांनी राजकारणात शेती आणि शेतकरी केंद्रबिंदू मानून काम केले, असा गौरवपूर्ण उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. त्याचबरोबर राज्याचे तरुण व अभ्यासू मुख्यमंत्री यांच्या राजकीय जीवनालाही  २५ वर्षे पूर्ण झाल्याचे सांगून देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले.
·        सौर उर्जेच्या क्षेत्रात महाराष्ट्र शासन चांगले काम करीत असल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे कौतुक केले. सहकार क्षेत्राने सौर उर्जेच्या क्षेत्रात योगदान द्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
·        नरेंद्र मोदी हे उर्जावान पंतप्रधान आहेत. ते काल जपानच्या दौऱ्याहून भारतात आले. आज सकाळी गोवा, दुपारी बेळगाव आणि आता महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांच्यासारखा काम करणारा पंतप्रधान देशाला लाभला आहे, असे गौरवउद्गार शरद पवार यांनी व्यक्त केले.
·        मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्रंदिवस काम करणारे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला.
·        साखर उद्योग शेतकऱ्यांसाठी वरदान असला तरी गेल्या दोन वर्षात पाउस कमी पडल्यामुळे संकटाला तोंड द्यावे लागले. अशाप्रसंगी केंद्र सरकारने महाराष्ट्राला भरीव मदत केली. त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.
·        व्हिएसआय संस्थेने यापुढेही कृषी संशोधन क्षेत्रात काम करावे, शासन आपल्याबरोबर आहे, असे मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केले.
·        तीन दिवस चालणाऱ्या आंतरराष्ट्रीय साखर परिषदेसाठी महाराष्ट्राबरोबरच देशातील अन्य राज्य आणि परदेशातील कृषी शास्त्रज्ञ सहभागी झाले.
****





ऊस प्रात्यक्षिक क्षेत्राची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून पाहणी

ऊस प्रात्यक्षिक क्षेत्राची
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून पाहणी
पुणे दि. 13 : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथील ऊस पीक प्रात्यक्षिक क्षेत्राची पाहणी करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऊस लागवडीच्या नवीन तंत्रज्ञानाची तपशीलवार माहिती घेवून चर्चा केली. त्यांच्यासोबत राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संस्थेचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार उपस्थित होते.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संस्थेच्यावतीने आयोजित शुगरकेन व्हॅल्यू चेन-व्हिजन 2025 शुगर या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात करण्यात आले होते. या परिषदेच्या उदघाटनानिमित्त पंतप्रधान श्री. मोदी यांचे आज या परिसरात आगमन झाले. त्या प्रसंगी त्यांनी या परिसरातील नवीन तंत्रज्ञानावर आधारित विविध प्रात्यक्षिक ऊस क्षेत्राची पाहणी केली.
ऊसाच्या लागवडीतील नवीन तंत्रज्ञानाविषयी, नवीन बियाण्यांविषयी, खतांविषयी पंतप्रधान श्री मोदी यांनी माहीती घेत अत्यंत बारकाईने सर्व प्लॉटची पाहणी केली. ऊस पीकाच्या नवीन तंत्रज्ञानाविषयी श्री. मोदी यांनी संस्थेच्या संशोधकांकडून माहिती घेतली. यावेळी त्याच्या सोबत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, पालकमंत्री गिरीश बापट, संस्थेचे महासंचालक शिवाजीराव देशमुख उपस्थित होते.
या परिषदेच्या निमित्त या परिसरात लावण्यात आलेल्या ऊस प्रात्यक्षिक क्षेत्रामुळे हा सर्व परिसर हिरवागार दिसत होता.

****


शुगरकेन व्हॅल्यू चेन-व्हिजन परिषदे निमित्त प्रदर्शनाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

शुगरकेन व्हॅल्यू चेन-व्हिजन परिषदे निमित्त
प्रदर्शनाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे, दि. १३ (विमाका): वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे आंतरराष्ट्रीय ‘शुगर व्हॅल्यू चेन-व्हिजन २०२५’ शुगर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेच्या निमित्ताने आयोजित प्रदर्शनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. या प्रदर्शनास उत्पादन वाढीसाठी विविध विषयांशी संबंधित प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली. त्याची पाहणी करून संबंधितांशी चर्चा करून माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाणून घेतली.
याप्रसंगी राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संस्थेचे अध्यक्ष खासदार शरदराव पवार, केंद्रीय मानव संशोधन व विकासमंत्री प्रकाश जावडेकर, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रदर्शनामध्ये साखर उद्योगाशी निगडीत १८२ स्टॉल्स  लावण्यात आले आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलिया, चीन, कॅनडा, बेल्जियम या चार देशासह देशातील उत्तर प्रदेश, कर्नाटक, आंध्रप्रदेश, गुजरात, तामिळनाडू, दिल्ली आदी राज्यातील साखर उद्योगांशी निगडीत संस्थांचे स्टॉल लावण्यात आले आहेत. तसेच राज्यातील महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग, राज्यातील चार कृषी विद्यापीठे तसेच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट व अन्य संबंधित संस्थांचे ऊस उत्पादन व वाढीशी निगडीत स्टॉल्स या प्रदर्शनात लावण्यात आले आहेत.

****



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुण्यात स्वागत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुण्यात स्वागत

पुणे, दि. 13 (वि.मा.का.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे येथे आयोजित "शुगरकेन व्हॅल्यू चेन-व्हिजन 2025 शुगर"  आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनकार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी भारतीय हवाई दलाच्या विमानाने लोहगाव विमानतळावर सायंकाळी 4.35 वाजता आगमन झाले.
राज्यपाल सी.विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी पुष्पगुच्छ देवून पंतप्रधान श्री. मोदी यांचे स्वागत केले. तसेच पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार सर्वश्री रावसाहेब दानवे, अनिल शिरोळे, अमर साबळे,आमदार सर्वश्री संजय भेगडे, लक्ष्मण जगताप, पुण्याचे महापौर प्रशांत जगताप, लष्कराचे मेजर जनरल मनोज ओका, एअर कमांडर ए.के. भारती,  विभागीय आयुक्त एस.चोक्कलिंगम,पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, जिल्हाधिकारी सौरभ राव यांनीही यावेळी श्री. मोदी यांचे स्वागत केले.
००००

-- 

  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेची राज्यस्तरीय बैठक पुणे जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्व...