नोटाबंदीमुळे सर्व सामान्यांना होणारा
त्रास कमी करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे
-
विजयालक्ष्मी बिद्री-प्रसन्ना
पुणे दि. २३:
केंद्र
सरकारचा जून्या ५०० आणि १००० च्या नोटा चलनातून बंद करण्याचा उद्देश चांगला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करताना सामान्य
लोकांचा त्रास कमी करण्यासाठी सर्व विभागांनी संयुक्तपणे काळजी घेण्याचे आवाहन
मनुष्य बळ विकास मंत्रालयाच्या विभागीय संचालक विजयालक्ष्मी बिंद्री यांनी आज केले.
चलनबंदीचा आढावा
घेण्यासाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात श्रीमती बिंद्री यांच्या
अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी निवासी
उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, जिल्हा पुरवठा
अधिकारी दिनेश भालेदार, जिल्हा अन्न
धान्य वितरण अधिकारी शिवाजी पवार,
जिल्हा
उपनिबंधक अनंद कटके यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
श्रीमती बिंद्री
म्हणाल्या, चलनातून ५०० आणि १०००
च्या जून्या नोटा बंद करण्याचा परिणाम काही प्रमाणात आर्थिक व्यवहारावर पडला आहे. ही परिस्थिती हाताळताना सर्व सामान्य
नागरिकांना त्रास होवू नये यासाठी शासनाने विविध उपाययोजना केल्या आहेत. नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जिल्हा
प्रशासनाने राबविलेली टोल फ्री क्रमांकाची संकल्पना चांगली आहे. या परिस्थितीत सामान्य नागरिकांना कमीत कमी
त्रास व्हावा यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याची आवश्यकता आहे खाजगी
रुग्णालयांनी उपचारापोटी धनादेश स्विकारावेत,
याची
अंमलबजावणी काटेकोरपणे होत आहे का याची पाहणी करण्यासाठी पथकांची नियुक्ती
करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.
तसेच
बॅकांनीही आरटीजीस, एनईफटीसाठी ग्राहकांच्या स्वतंत्र रांगांची
व्यवस्था करावी. त्यामुळे आर्थिक
व्यवहार अधिक गतीने होण्यास मदत होईल.
तसेच
लोकांना ई-बँकींगच्या माध्यमातून
अधिकाधिक व्यवहार करण्यास प्रवृत्त करावे व ग्राहकांना अधिक चांगल्या सेवा उपलब्ध
करुन देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी बँकेच्या
प्रतिनिधींना केल्या.
या बैठकीला
राष्ट्रीयकृत बँकांचे प्रतिनिधी, सहकारी, अर्बन बँकांचे प्रतिनिधी, बाजार समितीचे समितीचे प्रतिनिधी, पेट्रोल पंप प्रतिनिधी, ट्रान्सपोर्ट कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित
होते. या सर्व प्रतिनिधींनी
चलनबंदी मुळे निर्माण झालेल्या समस्या व
त्या सोडविण्यासाठीच्या सूचना या बैठकीत मांडल्या.
०००००००
No comments:
Post a Comment