Monday, September 12, 2016

स्वराज्याचे सुराज्यात रुपांतर करण्यासाठी शासनाला सर्वांनी सहकार्य करा - तहसिलदार हनुमंत पाटील

 स्वराज्याचे सुराज्यात रुपांतर करण्यासाठी
शासनाला सर्वांनी सहकार्य करा   
-         तहसिलदार हनुमंत पाटील
         बारामती (उ.मा.का) दि.12: शासनाच्या विविध कल्याणकारी योजना समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी गणेशोत्सव काळात संवादपर्व उपक्रम राबविण्यात आला आहे. स्वराज्याचे सुराज्यात रुपांतर करण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी शासनाला सहकार्य करण्याचे  आवाहन तहसिलदार हनुमंत पाटील यांनी केले.  
खिल तांदुळवाडी वेस तरुण मंडळाच्यावतीने येथील कवीवर्य मोरोपंत नाट्यगृहात आयोजित श्रीमंत आबा गणपती महोत्सव- 2016 मध्ये जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने आयोजित संवादपर्व या कार्यक्रमात श्री. पाटील बोलत होते. यावेळी चित्रपट महामंडळाचे संचालक राहूल जगताप, शशीकांत सिकची,  मंडळाचे अध्यक्ष नितेशभाऊ सावंत, लोकमतचे ब्युरो चिफ महेंद्र कांबळे, डॉ. दिलीप लोंढे, डॉ. महेंद्र झांबरे, किशोर मेहता, जयसिंगतात्या पवार, मंडळाचे उपाध्यक्ष रमेश पंजाबी, श्रीकांत जाधव, शेखर गायकवाड, राजेश मेहता, करण वाघोलीकर, महावितरणचे जनसंपर्क अधिकारी ज्ञानेश्वर आर्दड, उप माहिती कार्यालयाचे संग्राम इंगळे उपस्थित होते.
हनुमंत पाटील म्हणाले, यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सवाचे हे  125 वे वर्ष आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रणेते लोकमान्य टिळक यांच्या स्वराज्य हा माझा जन्म सिध्द हक्क आहे, तो मी मिळवणारच या सिंहगर्जनेचे हे शताब्दी वर्ष आहे. त्यामुळे शासनच्यावतीने यावर्षीचा गणेशोत्सव लोकमान्य महोत्सव म्हणून साजरा केला जात आहे. जनतेचे संघटन व्हावे व जनजागृती व्हावी यासाठी लोकमान्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. याच विचारांवर शासनाच्यावतीने यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी स्वदेशी, साक्षरता, बेटी बचाव-बेटी पढाओ, व्यसनमुक्ती आणि जलसंधारण या पंचसूत्रीवर आधारीत गणेशोत्सव सजावट स्पर्धेचे आयोजन केले आहे. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. उत्सवाबरोबरच समाजप्रबोधनाचे काम या निमित्ताने झाले आहे. शासनाच्या विविध विभागाच्या माध्यमातून लोककल्याणकारी योजना राबविल्या जातात. या योजनांचा तळागाळातील लोकांना लाभ होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
ज्ञानेश्वर आर्दड म्हणाले, महावितरणच्या माध्यमातून सामान्यांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. महावितरणच्या माध्यमातून मोबाईल ॲप विज ग्राहकांसाठी विकसीत करण्यात आले आहे. या ॲपच्या माध्यमातून वीज ग्राहक घरबसल्या वीज बीलचा भरणा करु शकतात. तसेच आपल्या तक्रारी टोल फ्री नंबरच्या माध्यमातून महावितरणकडे नोंदवू शकतात. तरी या बहुउपयोगी ॲपचा लाभ घ्यावा.   
या संवादपर्व कार्यक्रमाला मोठ्या संख्येने गणेशभक्त उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल सावळे-पाटील यांनी केले. तर अभार संग्राम इंगळे यांनी मानले.
**********




No comments:

Post a Comment

  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेची राज्यस्तरीय बैठक पुणे जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्व...