Saturday, September 10, 2016

सौर ऊर्जा क्षेत्राला उज्ज्वल भवितव्य
-         पालकमंत्री गिरीश बापट
-          
            पुणे, दि. 10 : पारंपारिक ऊर्जा स्त्रोतांना मर्यादा आहेत, त्या तुलनेत अपारंपारिक ऊर्जा  स्त्रोत अमर्याद उपलब्ध आहेत. त्यामुळे सौर ऊर्जा क्षेत्राला उज्ज्वल भवितव्य असून या क्षेत्रात आणखी संशोधन होण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज केले.
          बालेवाडी, पुणे येथील मिटकॉन मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटच्या ४० किलोवॅट रुफ टॉप सोलर पॉवर प्रोजेक्टचे उद्घाटन पालकमंत्री श्री. बापट यांच्या हस्ते झाले. यावेळी श्री. बापट बोलत होते. यावेळी मिटकॉनचे मॅनेजिंग ट्रस्टी डॉ. प्रदीप बावडेकर, सिनिअर व्हाईस प्रेसिडेंट सुनिल नातू, दीपक झाडे उपस्थित होते.
          श्री. बापट म्हणाले, पारंपारिक ऊर्जा स्त्रोत हे मर्यादीत असून त्यामाध्यमातून प्रदुषणाच्या अनेक समस्या निर्माण होत आहेत. त्यातुलनेने अपारंपारिक ऊर्जा स्त्रोत हे अधिक स्वच्छ आणि प्रदुषण विरहीत आहेत. यापुढील काळात अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांवरच अधिक भिस्त ठेवावी लागणार आहे. त्यामुळे सौर ऊर्जा प्रकल्पांना चांगले भविष्य आहे. सौर ऊर्जेची व्याप्ती मोठी असून  या क्षेत्रात भविष्यात क्रांती घडणार आहे. अपारंपारिक ऊर्जा क्षेत्राला प्रोत्साहन देण्याची शासनाची भूमीका असून पुढील काळात शासकीय इमारीवर रुफ टॉप सौर प्रकल्प बसविण्याबाबत गांभीर्याने विचार केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
          प्रास्ताविक डॉ. प्रदीप बावडेकर यांनी केले. दीपक झाडे यांनी मिटकॉनच्या सौर ऊर्जा प्रकल्पाची माहिती दिली. तर आभार सुनिल नातू यांनी मानले.

                                                          00000

No comments:

Post a Comment

  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेची राज्यस्तरीय बैठक पुणे जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्व...