पुणे शहराला दररोज पाणी पुरवठा
-
पालकमंत्री गिरीश बापट
पुणे, दि. 6 :
पुणे जिल्ह्यासह धरण परिसरात चांगला पाऊस सुरु आहे. धरणातील पाणीसाठ्यातही
समाधानकारक वाढ होत आहे. त्यामुळे पुणे शहराला दररोज १२०० एमएलडी दाबाने पाणी
पुरवठा करण्याचा निर्णय आज पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत
घेण्यात आला.
येथील विधान भवनाच्या सभागृहात
पालकमंत्री श्री. बापट यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय पाणी आरक्षण परिषद आणि
खडकवासला कालवे समितीची बैठक झाली. यावेळी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे,
पुण्याचे महापौर प्रशांत जगताप, उपमहापौर मुकारी अलगुडे, खासदार वंदना चव्हाण,
आमदार अजित पवार, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त कुणालकुमार, जिल्हाधिकारी सौरभ राव,
जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता अतुल कपोले उपस्थित होते.
श्री. बापट म्हणाले, गेल्या दोन
वर्षात राज्यभरात पावसाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे पुणे शहराला वर्षभर सुरळीत
पाणीपुरवठा होण्यासाठी एकदिवसाआड ८५० एमएलडीने दाबाने पाणी पुरवठा करण्याचा निर्णय
घेण्यात आला होता. यावर्षी पावसाची चांगली स्थिती असून जिल्ह्यातील सर्व धरणे
पूर्ण क्षमतेने भरत आली आहेत. त्यामुळे यापुढे पुणे शहराला दररोज १२०० एमएलडी
दाबाने पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. पुढील काळात पावसाचे प्रमाण असेच चांगले
राहिले तर पुण्याला दररोज दोन वेळा पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात येईल.
मात्र हे करत असताना पुणे महानगरपालिकेने पाण्याची गळती कमी करुन पाण्याची तूट
भरुन काढण्याबरोबरच सांडपाण्यावर योग्य प्रक्रीया करुन ते पाणी शेतीसाठी उपलब्ध
करुन देण्याकडे लक्ष देण्याच्या सूचना श्री. बापट यांनी यावेळी केली.
या बैठकीला आमदार मेधा कुलकर्णी,
आमदार सर्वश्री लक्ष्मण जगताप, अनिल भोसले, विजय काळे, बाबुराव पाचर्णे, जयदेव
गायकवाड, सुरेश गोरे, बाळा भेगडे, ॲङ शरद रणपीसे यांच्यासह जलसंपदा विभागाचे वरिष्ठ
अधिकारी उपस्थित होते.
0000
No comments:
Post a Comment