महसूल सप्ताहानिमित्त
महिलांना विविध दाखल्यांचे वाटप
पुणे, दि. 05 – सर्वसामान्य नागरिक, शेतकरी व शेतमजूर यांचा त्यांच्या दैनंदिन कामकाज
व विविध प्रश्नांच्या संदर्भात महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय कार्यालयाशी नेहमी संबध
येतो. सर्वसामान्य जनतेचे व शेतकऱ्यांचे दैनंदिन प्रश्न त्वरित निकाली काढण्यासाठी
यापूर्वी शासनातर्फे विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. महसूल प्रशासन अधीक लोकाभिमूख,
कार्यक्षम, गतीमान व पारदर्शक होण्यासाठी महसूल विभागातर्फे 1 ते 7 ऑगस्ट,2016 दरम्यान
महसूल सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. या सप्ताहात महिलांच्या सक्षमीकरणासाठी विशेष
मोहिम राबविण्यात येत आहे. शासनाच्या कृषि, सहकार, महिला व बालकल्याण या विभागांमार्फत
शेतकऱ्यांसाठी, विशेषत्वाने महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती या सप्ताहात
देण्यात येणार आहे. त्याचबरोबर महिला खातेदारांच्या महसूल विभागाशी संबंधित असणाऱ्या
अडी-अडचणी समजून घेण्यात येऊन त्याचे तात्काळ निराकरण करण्यात येणार आहे.
या मोहिमेंतर्गत
महसूल विभागातर्फे गांवपातळीवर महिला खातेदारांचे मेळावे आयोजित करण्यात येत आहेत.
याचाच एक भाग म्हणून निरावागज (ता.बारामती) येथे महिलांना सातबारा, आठ-अ व इतर दाखल्यांचे नुकतेच वाटप करण्यात आले. दाखल्यांचे वाटप सरपंच अशोक देवकाते यांच्या हस्ते
करण्यात आले. यासोबतच गांवपातळीवर दाखल्यांचे
वाचन करणे, मयत खातेदारांचा शोध घेऊन त्यांची यादी तयार करणे, शिधापत्रिका, निवडणूक
ओळखपत्रे, उत्पन्नाचे दाखले, महिलांना आधार कार्डाचे वाटप करणे आदि उपक्रम हाती घेण्यात
आले आहेत. ग्राम विकास अधिकारी सुनिल काळे, तलाठी बी.एम.खाडे यांनी या कामात पुढाकार
घेतला आहे.
000
No comments:
Post a Comment