Monday, June 3, 2019

नियोजन व वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या हस्‍ते भांबुर्डा वन उद्यानाचे लोकार्पण

            पुणे, दिनांक 3- भांबुर्डा वन उद्यानाचे लोकार्पण राज्‍याचे वित्‍त आणि  नियोजन व वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या हस्ते झाले.  यावेळी पुण्‍याच्‍या महापौर मुक्‍ता टिळक, आमदार विजय काळे, सिम्‍बॉयसिसचे डॉ. शां.ब. मुजूमदार, नगरसेवक आदित्‍य माळवे, मुख्‍य वन संरक्षक विवेक खांडेकर, उपवन संरक्षक ए. श्रीलक्ष्‍मी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
            नियोजन मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी वनांची आवश्‍यकता प्रतिपादन करुन वृक्षलागवडीचे महत्‍त्‍व विशद केले.  मानव हा बुध्‍दीमान प्राणी असला तरी त्‍याने निसर्गाचा -हास करुन स्‍वत:च्‍या पायावर कु-हाड मारुन घेतली आहे. नदीला माता मानणा-या मानवाने  नद्यांचेही  शोषण केले आहे. पर्यावरणाच्‍या संरक्षणाची चावी वृक्षांमध्‍ये असल्‍याने राज्‍यात वृक्षलागवडीची चळवळ सुरु करण्‍यात आली असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.
 राज्यातील पर्यावरणप्रेमी जनता, स्‍वयंसेवी संस्‍था,  शासकीय विभाग या सर्वांच्‍या सहकार्याने वृक्षलागवड मोहीम यशस्‍वी होईल, असा विश्‍वास त्यांनी व्‍यक्‍त केला.
            आमदार विजय काळे यांनी भांबुर्डा वनउद्यानाचे वैशिष्‍ट्य सांगितले. ते म्‍हणाले,  भांबुर्डा टेकडीच्‍या पायथ्‍याशी 14 एकरात साकारले असून निसर्गाचे विविध पैलू उलगडणारे माहिती केंद्र म्‍हणून भांबुर्डा वन उद्यान विकसित करण्‍यात आले आहे. आयुष वन, दुर्मिळवनस्‍पती, गणेशवन, सुगंधीवन, नवग्रह, पंचवटी, औषधी वन,बांबूवन, स्‍मृतिवन आदींचा समावेश आहे. जैव विविधतेतील माहितीचा खजिना उलगडणारे निसर्ग परिचय केंद्र म्‍हणून ओळख निर्माण होईल. पर्यावरणाच्‍या गोष्‍टी समजून घेण्‍यासाठी, त्‍याचे सादरीकरण करण्‍यासाठी ओपन थिएटर केले असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.
            मुख्‍य वनसंरक्षक विवेक खांडेकर यांनी प्रास्‍ताविक केले.  सुधीर मुनगंटीवार हे हरित क्रांतीचे नवे नायक असून त्‍यांनी  ग्‍लोबल वार्मिंग आणि वाढत्‍या प्रदूषणाची समस्‍या ओळखून वृक्षलागवडीची मोहीम होती घेतली असल्‍याचे सांगितले. यावेळी महापौर मुक्‍ता टिळक, नगरसेवक आदित्‍य माळवे आदींची समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमात वृक्षलागवडीमध्‍ये योगदान देणा-या स्‍वयंसेवी संस्‍था, अधिका-यांचा गौरव करण्‍यात आला. 
0000





Saturday, June 1, 2019

माजी राष्‍ट्रपती प्रतिभा देविसिंह पाटील यांना मेक्सिको सरकारचा पुरस्‍कार सन्‍मानपूर्वक प्रदान

            पुणे, दिनांक 1- मेक्सिको सरकारच्‍यावतीने देण्‍यात आलेला पुरस्‍कार हा देशाचा गौरव असल्‍याचे प्रतिपादन देशाच्‍या माजी राष्‍ट्रपती प्रतिभा देविसिंह पाटील यांनी केले. पाटील यांना मेक्सिको सरकारचा प्रतिष्‍ठेचा ‘ऑर्डन मेक्सिकाना डी अॅग्‍यूइला’ हा राष्‍ट्रीय पुरस्‍कार त्‍या देशाच्‍या भारतातील राजदूत श्रीमती मेल्‍बा प्रिया यांच्‍या हस्‍ते सन्‍मानपूर्वक प्रदान करण्‍यात आला.

            सेनापती बापट रस्‍त्‍यावरील मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्‍ट्रीजच्‍या पाचव्‍या मजल्‍यावरील सभागृहात हा कार्यक्रम झाला.यावेळी ज्‍येष्‍ठ शास्‍त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. शां.ब. मुजूमदार, डॉ. देविसिंह शेखावत, ज्‍योती राठोड, मोहन जोशी, उल्‍हास पवार, शरद रणपिसे,डॉ. शिवाजीराव कदम, चंद्रकांत शिवरकर, डॉ. के. एम. संचेती, उपजिल्‍हाधिकारी अमृत नाटेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

            श्रीमती पाटील म्‍हणाल्‍या, राष्‍ट्रपतीपदी असतांना मेक्सिको आणि भारत देशामध्‍ये विविध क्षेत्रातील परस्‍पर सामंजस्‍य करार करण्‍यात आले. दोन्‍ही देशांमध्‍ये मैत्रीपूर्ण संबंध वाढवण्‍यावर भर देण्‍यात आला.  हे सर्व करत असतांना मी देशाचे प्रतिनिधीत्‍व केले. त्‍यामुळे हा पुरस्‍कार म्‍हणजे माझ्या देशाचा गौरव आहे. दोन्‍ही देशांच्‍या मैत्रीचा गौरव आहे. देशाच्‍या राष्‍ट्रपतीपदी असतांना सन 2007मध्‍ये मेक्सिकोचे राष्‍ट्राध्‍यक्ष फेलिपी डी जेझस कॉल्‍डेरॉन हिनोजोसा यांनी भारताला भेट दिली होती. त्‍यानंतर मी 2008 मध्‍ये मेक्सिकोला भेट दिली होती. या काळात दोन्‍ही देशांदरम्‍यान असलेले संबंध अधिक बळकट झाले होते, अशी आठवण श्रीमती पाटील यांनी यावेळी सांगितली.

            श्रीमती प्रतिभाताई  त्यांच्या प्रत्येक परदेश दौऱ्याच्या वेळी देशातील उच्चत्तम व्यापारी फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अॅण्‍ड इंडस्‍ट्रीज (फीक्‍की), अॅसोचॅम, कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्‍ट्री (सीआयआय)  यांचे व्यापारी प्रतिनिधी मंडळ बरोबर नेत असत,  ते त्यांच्याच खर्चाने यायचे व त्यामुळे भारताचे दुसऱ्या देशांशी व्यापारी संबंध वाढले व ते फायद्याचे ठरले असे या उच्चतम व्यापारी संघटनांनी पुस्तिका प्रकाशित करून सांगितले.







            मेक्सिकोच्‍या भारतातील राजदूत श्रीमती मेल्‍बा प्रिया यांनी या राष्‍ट्रीय पुरस्‍कारामागची भावना व्‍यक्‍त केली. त्‍या म्‍हणाल्‍या, मेक्सिको देशाशी मानवतावादी परस्‍पर संबंध दृढ करणा-या परदेशी नागरिकाला हा सन्मान प्रदान करण्‍यात येतो. असा पुरस्‍कार मिळवणा-या श्रीमती पाटील या पहिल्‍या भारतीय महिला असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. यापूर्वी डॉ. नेल्‍सन मंडेला, राणी एलिझाबेथ (द्वितीय), डॉ. सर्वपल्‍ली राधाकृष्‍णन, बिल गेट्स या मान्‍यवरांना या पुरस्‍काराने गौरवण्‍यात आले असल्‍याचाही त्‍यांनी उल्‍लेख केला.

            कार्यक्रमात माजी राष्‍ट्रपती प्रतिभा देविसिंह पाटील यांच्‍या कारकिर्दीवर प्रकाश टाकणारी तसेच त्यांच्‍या मेक्सिको भेटीवरील व्हिडीओ चित्रफीत दाखवण्‍यात आली. श्रीमती मेल्‍बा प्रिया यांचे स्‍वागत ज्‍योती राठोड यांनी तर डॉ. देविसिंह शेखावत यांचे स्‍वागत डॉ. जसवंत पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपूर्वा शहा यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. शैलेश गुजर यांनी केले. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्‍यवर उपस्थित होते..

Friday, May 31, 2019

जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्ताने  जिल्हा रुग्णालयात सोहळा
            पुणे, दिनांक 31 –  जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्ताने येथील  जिल्हा रुग्णालयात  जिल्हास्तरीय उद्घाटन सोहळा पार पडला. कार्यक्रमास उद्घाटक म्हणून आमदार लक्ष्मण जगताप उपस्थितहोते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. त्‍यानंतर  पुण्यश्लोक अहिल्यादेवी  होळकर यांच्या जयंती निमित्त प्रतिमेस वंदन करण्‍यात आले.
            जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. अशोक नांदापूरकर यांनी  प्रास्‍ताविक केले. तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने आरोग्यास होणाऱ्या दुष्परिणामांची त्‍यांनी  माहिती दिली.  मौखिक आरोग्य चांगले ठेवूनस्वस्थ जीवन कसे जगता येईल,  याबाबत त्‍यांनी मार्गदर्शन केले.  जिल्हयात एकूण १४ समुपदेशन केंद्र सुरु असून या  समुपदेशन केंद्राकरीता तयार करण्यात आलेल्या  समुदेशन पुस्तकाचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
            जिल्हा रुग्णालयातील वाहक श्री लोहार यांनी तंबाखू सोडली असल्याने त्यांचे सुद्धा स्वागत शाल व श्रीफळ देऊन करण्यात आले. लोहार यांनी कश्याप्रकारे तंबाखू सोडली व याकरीता दृढ निश्चय कसा आवश्यक आहे, हे मनोगतात सांगितले.  त्यानंतरआमदार जगताप यांनी आपले मनोगत व्यक्त करत सर्वांनी तंबाखू सोडावी,  ते कठीण नाही.  मी सुद्धा सोडली, असे म्हणत सर्वांना तंबाखू सोडण्याकरीता आवाहन केले. सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी  तंबाखू सोडणे गरजेचे आहे. धूम्रपानामुळे  सर्वांनाच  त्रास होतो,  त्यामुळे असे करणाऱ्यास दंड करावा व तंबाखू सेवन करणाऱ्या व्यक्तीस त्याची जाणीव व्हावी याकरीता त्यांना समुपदेशन करावे, असे त्यांनी सांगितले. आमदार जगताप यांनी उपस्थितांना  तंबाखू मुक्तीची शपथ दिली. कार्यक्रमानंतर शाहीर बाळासाहेब मालुसकर यांनी एकपात्री नाटक सादर केले. 
0000


Thursday, May 30, 2019

                  पालखी सोहळयामध्ये वारक-यांना सोई-सुविधा
                         प्राधान्याने देण्यात याव्यात
                                             - जिल्हाधिकारी नवल किशोर राम
 पुणे, दि.  30 :- आषाढी वारीच्या निमित्ताने पुणे जिल्हयामध्ये पालखी सोहळयाच्या कालावधीमध्ये वारक-यांना सर्व सोई-सुविधा प्राधान्याने देण्यात याव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज केल्या. पालखी सोहळा – 2019 च्या पार्श्वभूमीवर पूर्व तयारीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहामध्ये  आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस अपर जिल्हाधिकारी रमेश काळे, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, निवासी उप जिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख,जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे, अमर माने,कार्यकारी अभियंता.ग्रामीण पाणी पुरवठा विभाग एस.एम.कदम.प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत, बारामतीचे उप विभागीय अधिकारी हेमंत निकम, दौंड-पुरंदरचे उप विभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड  , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अजित कारंजकर, जिल्हा रुग्णालय,पुणेचे जिल्हा चिकीत्सक डॉ. अशोक नांदापूरकर,तहसिलदार हवेली,बारामती,इंदापूर, पुरंदर तसेच श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदीचे प्रमुख विश्वस्त तसेच श्री संत तुकाराम महाराज संस्थान, श्रीक्षेत्र देहू चे पालखी सोहळा प्रमुख              तसेच दोन्ही संस्थानचे प्रमुख विश्वस्त, शासकीय अधिकारी उपस्थ‍ित होते.
                       या बैठकीमध्ये दिनांक 25 जून 2019 रोजी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे तर दिनांक 24 जून 2019 रोजी श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. या काळात पुणे जिल्हयातील पालख्यांचा मुक्कामाच्या ठिकाणी तसेच पालखी मार्गावर  मांसाहारी हॉटेल, मच्छी मार्केट, कत्तलखाने व दारुची दुकाने बंद ठेवावीत, या सोहळयामध्ये सामील असणा-या वाहनांची तपासणी करणे व त्यांना फिटनेस प्रमाणपत्र देणे, वाहतुकीचे नियोजन, सुरळीत विद्युत व्यवस्था, सपाटीकरण, निर्माल्य  व्यवस्था इ. बाबींवर चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर वारक-यांना मुक्कामाच्या ठिकाणी वैद्यकीय सुविधा, शासकीय दरामध्ये रॉकेल, धान्य, अखंडीत वीज पुरवठा करण्याबाबत संबंधित यंत्रणांना आदेश देण्यात आले.
                      यावेळी अपर जिल्हाधिकारी रमेश काळे यांनी पुरवठा विभागाकडून देण्यात येणा-या सुविधा तसेच अग्नीशमन यंत्रणा इ.बाबतचा आढावा घेतला. पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी या कालावधीमध्ये पोलीस बंदोबस्त, वाहतुक नियोजन इ.बाबत संस्थानप्रमुखांशी चर्चा केली.
                      यावेळी  दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर वारीच्या काळात पाणीपुरवठयाचे नियोजन करण्यासाठी, पालखीतळांवरील खड्डे मुरुम भराई करुन व्यवस्थ‍ित करणे, आवश्यक त्याठिकाणी रोलींग करणे, पालखीतळांकडे जाणा-या रस्तयांवर दुकानदारांकडून होणा-या अतिक्रमणाबाबत तसेच पालखीमध्ये सामील वाहनांच्या पार्किंगबाबत चर्चा करण्यात आली तसेच याबाबत संबंधित यंत्रणांना आवश्यक त्या सूचना करण्यात आल्या.
            यावेळी संस्थानच्या प्रमुख पदाधिका-यांनी केलेल्या सूचनांवर चर्चा करण्यात आली.      
०००००

स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांना जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन

            पुणे, दि. 28 : जिल्हा प्रशासनातर्फे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात झालेल्या या कार्यक्रमात निवासी उपजिल्‍हाधिकारी यांनी स्‍वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी सर्वसाधारण शाखेचे तहसिलदार प्रशांत आवटे, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0000

Tuesday, May 28, 2019

31 मे पासून तंबाखू नकार सप्‍ताह – अपर जिल्‍हाधिकारी रमेश काळे



31 मे पासून तंबाखू नकार सप्‍ताह – अपर जिल्‍हाधिकारी रमेश काळे
पुणे, दिनांक 28- तंबाखूमुक्‍तीबाबत शहरी भागातील नागरिकांप्रमाणेच ग्रामीण भागातही जनजागृती करण्‍यात यावी, असे आवाहन अपर जिल्‍हाधिकारी रमेश काळे यांनी केले. राष्‍ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्‍या जिल्‍हा स्‍तरीय समन्‍वय समितीच्‍या बैठकीत ते बोलत होते. यावेळी अतिरिक्‍त जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ. अशोक कांबळे, अतिरिक्‍त जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. अभय तिडके यांच्‍यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
31 मे पासून तंबाखू नकार सप्‍ताह सुरु करण्‍यात येत आहे. या निमित्‍ताने शासकीय कार्यालयातील कर्मचारी-अधिका-यांची मौखिक आरोग्‍य तपासणी करण्‍यात येणार आहे. कार्यालय प्रमुखांनी या कामी पुढाकार घेवून सहकार्य करण्‍याचे आवाहन श्री. काळे यांनी केले. पुणे महापालिका आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेनेही तंबाखू नकार सप्‍ताहामध्‍ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन जनजागृती करावी, शहरातील जाहिरात फलकांवर, शासकीय कार्यालयांमध्‍ये तंबाखूचे दुष्‍परिणाम दर्शवणारे फलक लावण्‍यात यावेत, निवासी सोसायट्या तंबाखूमुकत घोषित करण्‍याबाबत पुढाकार घ्‍यावा,असेही आवाहन त्‍यांनी केले.
कार्यक्रमाचे समन्‍वय डॉ. राहूल मणियार यांनी राष्‍ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाची माहिती सांगितली. गेल्‍या वर्षी या कार्यक्रमांतर्गत एकूण 88 प्रशिक्षण घेण्‍यात आले त्‍यामध्‍ये 7299 प्रशिक्षणार्थींना तंबाखूच्‍या दुष्‍परिणामांबाबत माहिती देण्‍यात आली. या कालावधीत 1504 लोकांवर कार्यवाही करण्‍यात येऊन 3 लाख 44 हजार 165 रुपये एवढी रक्‍कम दंड स्‍वरुपात जमा करण्‍यात आली. या शिवाय अन्‍न व औषध प्रशासनाच्‍यावतीने जिल्‍ह्यात 1 कोटी 24 लाख 96 हजार 148 रुपये किंमतीचा गुटखा तर ग्रामीण पोलीस विभागाच्‍यावतीने 30 लाख 85 हजार 410 रुपये किंमतीचा गुटखा जप्‍त करण्‍यात आल्‍याचे त्‍यांनी सांगितले.
बैठकीस दिलीप करंजखेले, जीवन माने, अनिता वाघचौरे, बीके भाग्‍यश्री, बीके दशरथभाई, बीके पार्थभाई, मुकूंद अयाचित, दीपक माळी, ज्‍योती ढमाळ, मदन व्‍हावळ, जयश्री डोंगरे, अपर्णा शेंडकर, सचिन पाटील आदींची उपस्थिती होती.
                                                                  0000

Saturday, March 16, 2019

निवडणूक निर्णय अधिका-यांना इव्‍हीएम-व्‍हीव्‍हीपॅट हाताळणीचे प्रशिक्षण




      पुणे, दिनांक 16- जिल्‍ह्यातील निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांना आज इव्‍हीएम-व्‍हीव्‍हीपॅट हाताळणीचे प्रशिक्षण समन्‍वय अधिकारी डॉ. ज्‍योत्‍स्‍ना पडियार यांनी आज दिले. जिल्‍हाधिकारी कार्यालयात झालेल्‍या या प्रशिक्षणास मावळच्‍या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी, शिरुरचे रमेश काळे यांच्‍यासह इतर अधिकारी उपस्थित होते. डॉ. पडियार यांनी इलेक्‍ट्रॉनिक व्‍होटींग मशीन, कंट्रोल युनिट, व्‍हीव्‍हीपॅट यांच्‍या जोडणीचे प्रात्‍यक्षिक करुन घेतले तसेच शंकांचे निरसन केले.

00000



  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेची राज्यस्तरीय बैठक पुणे जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्व...