Monday, June 18, 2018

बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याला उत्स्फुर्त प्रतिसाद 
रोजगार मेळावा सोहळा नसून शासनाची बांधिलकी
-उद्योगमंत्री सुभाष देसाई
पुणे दि. 16 : राज्यातील तरुणाईच्या हाताला रोजगार मिळवून देण्याचे काम उद्योग विभागाने हाती घेतले आहे. त्यासाठी बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याची अभिनव संकल्पना राज्य सरकारने सुरू केली आहे. रोजगार मेळावा हा फक्त ‘सोहळा’ नसून  शासनाची ती ‘बांधिलकी’ असल्याचे सांगत या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून नोकरी मागणारा आणि देणारा यांच्यात सांगड घालण्याचे काम शासन करत असल्याचे प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज केले.
राज्य शासनाचा उद्योग विभाग आणि सी.आय.आय.च्यावतीने उरळी देवाची जि. पुणे येथे आयोजित पहिल्या बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी उद्योग मंत्री सुभाष देसाई बोलत होते. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, शिवसेनेचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, खादी ग्रामोद्योग महामंडळाचे विशाल चोरडीया, उद्योग विभागाचे विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, सी. आय. आय.चे महाव्यवस्थापक आशिष केशरवानी उपस्थित होते.
उद्योग मंत्री सुभाष देसाई म्हणाले, राज्यातील उद्योगवाढी बरोबरच तरुणांच्या हाताला काम मिळवून देण्याचे काम उद्योग विभागाचे आहे. राज्यात उद्योगांची संख्या वाढली की त्यांना काम करणाऱ्या कुशल कामगारांचीही गरज असते, असे कुशल कामगार या मेळाव्याच्या माध्यमातून उद्योजकांना मिळणार आहेत. बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्यासाठी पहिल्याच आठवड्यात 8 हजार 800 उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी केली होती. तर दोन ते तीन हजार नव्या उमेदवारांनी आज प्रत्यक्ष नोंदणी केली आहे. हा पहिलाच मेळावा अत्यंत यशस्वी झाला आहे. याच प्रकारचे मेळावे राज्यभर घेण्यात येणार आहेत. यासाठी एका स्वतंत्र कक्षाची स्थापना करून या मेळाव्याच्या माध्यमातून नोंदणी केलेल्या उमेदवारांना नोकरी मिळेपर्यंत त्याचा पाठपुरवा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले, तरुणांच्या हाती ताकद आहे, बुद्धी आहे, परंतु रोजगार नसल्याने प्रश्न निर्माण होत आहेत. अशा परिस्थितीत या रोजगार मेळाव्याला मोठे महत्व आहे. राज्यातील आतापर्यंतचा हा सर्वात मोठा मेळावा आहे. एका युवकाला रोजगार मिळाला की त्याचे संपुर्ण कुटुंब उभे राहते. त्यामुळे या मेळाव्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अनेक कुटुंबे उभी राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यमंत्री विजय शिवतारे म्हणाले, विकासाच्या कामात प्रशिक्षीत मनुष्यबळाची खूप आवश्यकता असते. या मेळाव्याच्या माध्यमातून अनेक बेरोजगार युवकांना काम मिळणार आहे. रोजगाराबरोबरच स्वयंरोजगाराला या माध्यमातून चालना मिळणार आहे. गुंजवणी धरणाच्या माध्यमातून पुरंदर तालुक्याच्या विकासाला मोठी चालना मिळाली आहे. पुरंदर विमानतळामुळे पुरंदर हा सर्वात वेगाने विकसित होत असलेला तालुकाअसल्याचे त्यांनी सांगितले.

श्री आदित्य ठाकरे म्हणाले, बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळावा ही राज्य शासनाची अत्यंत उपयुक्त संकल्पना आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून राज्यातील तरुणाईच्या हाताला त्याच्या योग्यतेचे काम मिळणार आहे. राज्यातील बेरोजगारीचे प्रमाण कमी होण्यासाठी या मेळाव्याचा मोठा उपयोग होणार आहे. कोणत्याही परिस्थितीत तरुणांनी जिद्द आणि चिकाटी सोडू नये असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
        कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. हर्षदीप कांबळे यांनी केले. तर आभार विश्वनाथ राजाळे यांनी मानले. मेळाव्याला हजारो तरुण-तरुणींसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


मेळाव्याची ठळक वैशिष्ट्ये
§  या मेळाव्यासाठी एकूण १० हजार ६८० उमेदवारांची ऑनलाईन आणि ऑफलाईन नोंदणी.
§  मेळाव्यामध्ये ४ हजार ३०० उमेदवारांची उपस्थिती.
§  मेळाव्यात १ हजार ८९० उमेदवारांना नियुक्ती पत्र.
§  नोंदणी झालेल्या उमेदवारांना नोकरी मिळवून देण्याच्या पाठपुराव्यासाठी उद्योग विभाग स्वतंत्र कक्ष उभारणार.
§  देशातील नामवंत ६० हून अधिक कंपन्यांची मेळाव्यात हजेरी.   
§  स्वयंरोजगार मार्गदर्शनासाठी स्वतंत्र दालन.
§  स्वयंरोजगार मार्गदर्शनासाठी विशेष चर्चासत्राचे आयोजन.
§  योग्य नियोजनामुळे मेळाव्यासाठी उपस्थित उमेदवार आणि पालक यांच्यात समाधान.
§  पालक आणि उमेदवारांच्यात मोठा उत्साह.
*****

मेळाव्यात सहभागी झालेल्या उमेदवारांच्या प्रतिक्रीया

मेळाव्याला आल्याचे सार्थक झाले...
मी माजी सैनिक आहे. सैन्य दलातून निवृत्त झाल्यावर कुटुंबाची काळजी घेत, घराच्या जवळ दुसरी नोकरी मिळविण्यासाठी प्रयत्नशील होतो. बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याची माहिती मिळाली, त्यानुसार मी नोकरीसाठी मेळाव्यात नाव नोंदविले. सैन्य दलातील माझ्या कामाचा अनुभव पाहून मला तात्काळ या ठिकाणी नोकरी मिळाली. मला लगेचच जॉईनिंग लेटर ही मिळाले. या मेळाव्याला आल्याचे सार्थक झाले, मी शासनाचा मनापासून आभारी आहे.
-          आबासाहेब चौधरी
रा. फुरसुंगी, पुणे.

मला माझ्या पात्रतेची नोकरी मिळाली!
कराड तालुक्यातील छोट्या खेड्यातील मी मुलगा आहे. मी सीएनजी ऑपरेटर आहे. मी कामाच्या शोधात होतो. नोकरीसाठी मी अनेक ठिकाणी जावून आलो परंतू मला माझ्या पात्रतेची नोकरी मिळत नव्हती. बाळासाहेब ठाकरे मेळाव्यात मी आलो आणि मला माझ्या पात्रतेची नोकरी मिळाली. या ठिकाणी मला थेट जॉईनिंग लेटरच मिळाले, त्यामुळे मी खूप खूश असून शासनाचा आभारी आहे.
-          राहूल आनंदराव खबाले
रा. विंग, ता. कराड, जि. सातारा.   

नोकरी मिळाल्याचा मोठा आनंद!
बाळासाहेब ठाकरे मेळाव्याची माहिती मला मिळाल्यानंतर या ठिकाणी मी नोकरीसाठी नावाची नोंदणी केली. एकाच ठिकाणी एवढ्या कंपन्या आल्यामुळे नोकरी नक्की मिळेल अशी आशा होती. मात्र लगेच आजच हातात कॉल लेटर मिळेल असे वाटले नव्हते. मात्र या रोजगार मेळाव्यामुळे हे शक्य झाले. नोकरी मिळाल्याचा मला मोठा आनंद असून शासनाचा मी खूप-खूप आभारी आहे.
-          प्रसाद सुनिल मेमाणे
रा. पारगाव, ता. पुरंदर, जि. पुणे. 

लगेच नोकरी मिळेल असे वाटलेच नव्हते...
दौंड तालुक्यातले लोणारवाडी हे माझ गाव आहे. मात्र मी पुरंदर तालुक्यातल्या माझ्या काकांच्या गावात शिक्षण पूर्ण केले. बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्या विषयी माहिती मला मिळाल्यावर मी सहजच नोकरीसाठी माझ्या नावाची नोंदणी केली. एवढी मुल इथ दिसल्यावर मला नोकरी मिळेल का? अशी शंका होती, मात्र अगदी सहजच मला नोकरी मिळाली, कॉल लेटर हातात घेतल्यावर सुध्दा एवढ्या सहज नोकरी मिळाली आहे, असं वाटतच नाही. मी शासनाचा आभारी आहे.
-          अक्षय गाढवे
रा. लोणारवाडी, ता. दौंड, जि. पुणे. 
*****
खुपच चांगले उमेदवार आम्हाला मिळाले
बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्यात आमची आयएसटीसी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सहभागी झाली होती. या निमित्ताने अनेक होतकरू, हुशार उमेदवार आम्हाला मिळाले आहेत. आमच्याकडे आलेल्या अर्जातील मुलांच्या पात्रतेनुसार आम्ही त्यांना नोकरी देणार आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने कुशल उमेदवार आम्हाला मिळणार आहेत, या रोजगार मेळाव्याचा उमेदवारांबरोरच कंपन्यांनाही चांगला फायदा झाला आहे.
-          मनिषा मोहिते
                                                                        आयएसटीसी प्रा. लि. कंपनी. प्रतिनीधी  
रा. खराडी, पुणे. 

*****

Friday, June 8, 2018


जिल्हयातील उरळी देवाची येथे 16 जून रोजी रोजगार मेळावा
पुणे दि.8 : जिल्हयातील बेरोजगार युवक युवतींसाठी आता रोजगाराच्या एकत्रीत पणे ‘बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याच्या’ माध्यमातून संधी उपलब्ध होणार आहेत.  पुणे जिल्हयातील उरळी देवाची येथे शनिवार दि. 16 जून रोजी हा मेळावा होणार आहे. दहावी उत्तीर्ण ते पदवीधर मुला-मुलींना या मेळाव्यातून माहिती तंत्रज्ञान, औषध उत्पादन, हॉटेल  व इतर व्यवसाय क्षेत्रातील रोजगाराची संधी मिळणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाच्यावतीने बाळासाहेब ठाकरे रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे कौशल्य विकास विभाग, रोजगार व स्वयंरोजगार विभाग, उद्योग संचालनालय, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्यावतीने युवक / युवतींना रोजगार संधी उपलब्ध व्हाव्यात म्हणून राज्यभर मेळावे घेतले जाणार आहेत.  त्याचा प्रारंभ पुणे जिल्ह्यातील हडपसर परिसरातील उरळी देवाची येथून 16 जून रोजी सकाळी 10.00 ते 02.00 या कालावधीत होणार आहे. 
            या मेळाव्यात पुणे परिसर व जिल्ह्यातील प्रमुख उद्योग, कारखाने तसेच माहिती तंत्रज्ञान, औषध उत्पादक, हॉटेल उद्योग आदी क्षेत्रातील80 हून अधिक नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत.  संबंधित कंपन्या आपल्या प्रतिनिधीमार्फत इच्छुक उमेदवारांची आवड निवड लक्षात घेऊन प्रत्यक्षात नोकरीची संधी उपलब्ध करुन देणार आहेत. या मेळाव्यात कौशल्य विकास व स्वयंरोजगार या विषयावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. मेळाव्यात शासनाच्या विविध विभागांची रोजगार-स्वयंरोजगार संबंधीची दालने मार्गदर्शनासाठी उपलब्ध असतील.  या ठिकाणी इच्छुकांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेऊन रोजगाराची संधी उपलब्ध करुन दिली जाणार आहे. तसेच मेळाव्यानंतरही त्यासंबंधीचा पाठपुरावा केला जाणार आहे.
            सीआयआय या उद्योग संघटनेचा या उपक्रमात प्रमुख सहभाग आहे. राज्याच्या विविध भागात अशा प्रकारे मेळावे आयोजित केले जाणार असून त्याद्वारे तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन दिली जाणार आहे.
इच्छुक उमेदवारांनी  www.balasahebthackrayrojgarmeleva.com  या संकेतस्थळावर 4 ते 10 जून दरम्यान नोंदणी करावी, असे आवाहन उद्योग विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
00000

  अन्नसुरक्षा अधिनियमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी
                                                                   - पालकमंत्री गिरीश बापट
पुणे दि. 8- अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या योजनांची तसेच  राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी अशी सुचना पालकमंत्री गिरीश बापट यांनी केली.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमाच्या अंमलबजावणीबाबत व्हीव्हीआयपी सर्कीट हाऊस येथे श्री. बापट यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली, त्यावेळी  ते बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार सर्वश्री जयदेव गायकवाड, माधुरी मिसाळ, संग्राम थोपटे, राहूल कुल, जगदीश मुळीक, महेश लांडगे, मेधा कुलकर्णी, भिमराव तापकीर, योगेश टिळेकर, उपायुक्त दीपक नलावडे, जिल्हा ‌पुरवठा अधिकारी दिनेश भालेदार, जिल्हा अन्नधान्य वितरण अधिकारी रघुनाथ पोटे, आदी उपस्थित होते.
श्री. बापट म्हणाले, एइपीडीएस प्रणालीद्वारे पुणे जिल्ह्यात धान्य वितरण सुरू आहे. या प्रणालीवरील व्यवहार वाढविण्याचा प्रयत्न करावेत.अन्नधान्य वितरण विभागाची परिमंडल कार्यालये संबंधीत भागातच स्थापन करण्यासाठीची जलद कार्यवाही करावी. अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी समन्वय ठेवून आधार सिडींग  वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. काही ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडर हे व्यावसायिक कारणासाठी वापरल्याचे आढळून येते. याची तपासणी करून दोषींवर कारवाई करावी. जिल्ह्यात उज्जवला गॅस योजनेंतर्गत 72 हजार 500 कनेक्शन देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील अधिकाधिक गरजू व्यक्तींना या योजनेचा लाभ द्यावा, असे सांगून श्री. बापट म्हणाले, अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांना मिळवून देण्यासाठी लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत. तसेच लोकप्रतिनिधींनी जागरूकतेने काम करावे. अन्नधान्य वितरण व्यवस्थेत गैरव्यवहार करणाऱ्या दुकानदारांविरूद्ध तक्रार दाखल करावी, जेणेकरुन  दोषींवर कारवाई करता येईल,  अशा सूचना देखील श्री. बापट यांनी  यावेळी दिल्या.  
यावेळी लोकप्रतिनिधींनी त्यांच्या भागामधील अन्नधान्य वितरण व्यवस्थेबाबत तसेच समस्येबाबत चर्चा केली आणि विविध सूचना मांडल्या.

00000

Saturday, October 7, 2017

'पर्यावरण -2017 ' परिषदेचे उत्‍साहात उद्घाटन पर्यावरण संवर्धनासाठी सामूहिक प्रयत्‍न आवश्‍यक- मुख्‍यमंत्री फडणवीस­­­­­­­­­­­­­­­­­­­­­­­­­­­­­­­­­­­­­­­­­­­­­­­­










'पर्यावरण -2017 '  परिषदेचे उत्‍साहात  उद्घाटन  
पर्यावरण संवर्धनासाठी सामूहिक प्रयत्‍न आवश्‍यक- मुख्‍यमंत्री फडणवीस­­­­­­­­­­­­­­­­­­­­­­­­­­­­­­­­­­­­­­­­­­­­­­­­
 पुणे दि, 7 - पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज असून विधीमंडळ, न्‍यायमंडळ, कार्यकारी मंडळ आणि जनता या सर्वांनी त्‍यासाठी सामूहिक सकारात्‍मक प्रयत्‍न करावेत, असे आवाहन मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
आर्म फोर्स मेडीकल कॉलेजच्‍या धन्‍वंतरी ऑडिटोरियम मध्‍ये 'पर्यावरण -2017 ' या विषयावरील प्रादेशिक परिषद आयोजित करण्‍यात आली होती. या परिषदेच्‍या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सर्वोच्‍च न्‍यायालयाचे न्‍यायमूर्ती मदन लोकूर, मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या मुख्‍य न्‍यायमूर्ती डॉ. मंजुला चेल्‍लूर,  राष्‍ट्रीय हरित लवादाचे अध्‍यक्ष न्‍यायमूर्ती स्‍वतंत्रकुमार, पर्यावरण व वन मंत्रालयाचे सचिव अजय नारायण झा, न्‍यायमूर्ती यू.डी. साळवी, बी.एस. सजवान, रंजन चॅटर्जी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्‍यमंत्री श्री. फडणवीस म्‍हणाले, पर्यावरण विषयक कायद्यांची कार्यक्षमपणेअंमलबजावणी होणे आवश्‍यक आहे. कायद्याची अंमलबजावणी करतांना अडचणी लक्षात येतात. त्‍यामुळे पर्यावरण संरक्षणाबाबत सर्वोच्‍च न्‍यायालय, उच्‍च न्‍यायालय, राष्‍ट्रीय हरित लवाद यांनी दिलेले निर्णय महत्‍त्‍वाचे ठरतात. न्‍यायमूर्ती श्री. लोकूर यांनी स्‍वराज अभियान प्रकरणात दिलेला निकाल राज्‍यामध्‍ये पूरनियंत्रण आणि जल संवर्धन विषयक निर्णय घेतांना महत्वाचा ठरल्याचे त्‍यांनी सांगितले.
वन्‍यजीवन आणि वनजमीनीचे संरक्षण करणे किती महत्‍त्वाचे आहे, हे त्‍या भागातील जनतेला समजावून सांगितले तर हे काम अधिक सोपे होते. आफ्रिका खंडातील केनिया सारख्‍या देशांमध्‍ये या प्रकारे वनसंवर्धन झाल्याचे सांगून मुख्‍यमंत्री  फडणवीस म्‍हणाले, वन परिसरात राहणा-या जनतेचा वनसंवर्धन हा जीवनाचा एक भाग व्‍हायला हवा. वनसंवर्धनामुळे आपले जीवन सुसह्य होते, हे त्यांना पटवून द्यायला हवे. आपल्‍या राज्‍यात वन्यजीवांविषयी जागृती झालेली दिसून येत आहे.
शाश्‍वत प्रगतीसाठी  विकास आणि   पर्यावरण संवर्धन हे हातात हात घालून जाऊ शकतात, यावर विश्‍वास व्‍यक्‍त करुन मुख्‍यमंत्री  फडणवीस म्‍हणाले, भावी पिढीसाठी चांगले जग निर्माण करायचे असेल तर न्‍यायालयांनी योग्‍य मार्गदर्शन करावे.  किनारपट्टीजवळील मॅग्रूव्‍हबाबत बोलतांना श्री.  फडणवीस म्‍हणाले, या भागातील कोस्‍टल मँग्रूव्‍ह आणि इन्‍लॅण्‍ड मँग्रूव्‍ह यातील फरक लक्षात घेतला पाहिजे. प्रगती साध्‍य करण्‍यासाठी हे करणे काळाची गरज आहे.  मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. समुद्रामध्‍ये अनट्रीटेड वॉटर(प्रक्रिया न केलेले पाणी) मोठ्या प्रमाणावर सोडले जाते. येत्‍या 4-5 वर्षात समुद्रात प्रक्रिया न केलेल्या पाण्‍याचा एकही थेंबही जाऊ दिला जाणार नाही, अशी ग्‍वाही  मुख्‍यमंत्री फडणवीस यांनी दिली.
सर्वोच्‍च न्‍यायालयाचे न्‍यायमूर्ती मदन लोकूर यांनी पुणे हे पर्यावरण जागृतीचे केंद्र असल्‍याचे सांगून विकासाबरोबरच पर्यावरण संरक्षण महत्वाचे असल्याचे सांगितले. पर्यावरण संवर्धनात राज्‍यांची, स्‍वयंसेवी संस्‍थाचीही भूमिका महत्‍त्‍वाची आहे. नागरिकांनीही मी कर देतो म्‍हणून कुठेही कचरा टाकून पर्यावरणाची हानी करणे चुकीचे आहे. प्रत्‍येकाने पर्यावरण संवर्धनासाठी पुढे आले पाहिजे, असे आवाहन त्‍यांनी केले.
 मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या मुख्‍य न्‍यायमूर्ती डॉ. मंजुला चेल्‍लूर यांनी बालपणीचा काळ आठवून निसर्गरम्‍य वातावरणात झालेला बदल सर्वांच्‍या लक्षात आणून दिला. आर्थिक प्रगती साधत असतांना निसर्गाचा घात करणे अपेक्षित नाही. प्रदूषण वाढीमुळे रोगप्रतिकारक शक्‍ती कमी झाली. त्‍यामुळे बालकांना वेगवेगळ्या रोगप्रतिबंधक लसी टोचाव्‍या लागतात. औद्योगिक, तांत्रिक, वैज्ञानिक प्रगती हवी पण निसर्गाचा समतोल साधून हे साध्‍य करावे लागेल, असे त्‍या म्‍हणाल्‍या.
 राष्‍ट्रीय हरित लवादाचे अध्‍यक्ष न्‍यायमूर्ती स्‍वतंत्रकुमार यांनी लवकरच मुंबईमध्‍ये पर्यावरणविषयक परिषद घेण्‍यात येणार असल्याचे सांगून देशाच्‍या पर्यावरण संरक्षणासाठी आजचे विद्यार्थी महत्‍त्‍वपूर्ण भूमिका बजावू शकतात, असे सांगितले. या परिषदेच्‍या माध्‍यमातून पर्यावरण संवर्धनाबाबत जनतेमध्‍ये जागृती होईल, अशी आशा त्यांनी व्‍यक्‍त केली.
पर्यावरण व वन मंत्रालयाचे सचिव अजय नारायण झा यांनी प्रास्‍ताविक केले.  न्‍यायमूर्ती यू.डी. साळवी यांनी स्‍वागतपर भाषण केले. 
या परिषदेमध्‍ये महाराष्‍ट्रासह गोवा आणि गुजरात राज्यातील पर्यावरण क्षेत्राशी संबंधित राष्‍ट्रीय हरित लवादाचे सदस्‍य, न्‍यायमूर्ती, न्‍यायाधीश, वकील, विद्यार्थी सहभागी झाले होते.

00000

Sunday, September 10, 2017

सहकारातील चांगल्या संस्थाच्या मागे सरकार ठामपणे उभे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सहकारातील चांगल्या संस्थाच्या मागे सरकार ठामपणे उभे
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे दि. १० : राज्यातील ११ हजार विविध कार्यकारी संस्थांना पुनर्जीवित करुन सहकार समाजाच्या तळापर्यंत नेण्यासाठी सरकारचे काम सुरू आहे. सहकार क्षेत्रातील अपप्रवृत्तींवर अंकुश लावण्यासाठी सरकारने कडक पावले उचलली असली तरी सहकारातील चांगल्या संस्थांच्यामागे सरकार ठामपणे उभे असल्याची ग्वाही देत येत्या ऑक्टोबरपासून शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करून शेतकऱ्यांची दिवाळी गोड करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली.











            येथील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शताब्दी वर्ष सांगता कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात श्री. देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार उपस्थित होते. यावेळी सहकार मंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री गिरीष बापट, कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे, खासदार सुप्रिया सुळे, खासदार वंदना चव्हाण, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते, सहकार विभागाचे अप्पर मुख्य सचिव एस. एस. संधू, बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, नाबार्डचे मुख्य महाव्यवस्थापक राजेंद्र कुलकर्णी, कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रतापसिंह, सहकार आयुक्त डॉ. विजय झाडे, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, बँकेच्या उपाध्यक्षा अर्चना घारे, बँकचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय भोसले उपस्थित होते.
            देवेंद्र फडणवीस म्हणाले, आर्थिक संकटात अडकलेला शेतकरी आत्महत्येकडे वळतो अशा अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना उभारी देण्याचे काम सहकारी संस्था करत असतात. राज्यातील ४४ लाख शेतकरी संस्थात्मक कर्ज घेण्यास अपात्र होते. अशा शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देऊन त्यांना संस्थात्मक कर्जास पात्र करण्यासाठी राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना आखली आहे. या कर्जमाफी योजनेत थकीत कर्जदाराबरोबरच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही लाभ होणार आहे. मात्र, ही कर्जमाफी करताना चुकीच्या आणि अपात्र लोकांना कर्जमाफी मिळू नये यासाठी ऑनलाईन अर्जांची प्रक्रिया करण्यात आली आहे. राज्यभरातून ऑनलाईन कर्जमाफी प्रक्रीयेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक ही ऑनलाईन कर्जमाफीचे अर्ज स्वीकारण्यात आघाडीवर आहे. येत्या ऑक्टोबर महिन्यात पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा करून त्यांची दिवाळी गोड करण्याचे काम सरकार करणार आहे.
            कर्जमाफी हा शेतकऱ्यांच्या उत्थानाचा उपाय नाही. त्यासाठी शेतीमधील गुंतवणूक वाढविण्याची गरज आहे. शेतीमधील गुंतवणूक वाढवून शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला चांगला दर देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्यादृष्टीने सरकार पावले उचलत आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात सावकारांच्या पाशातून मुक्ती मिळविण्यासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची स्थापना झाली. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्यात आर्थिक स्थैर्य आणि समृद्धी आणण्यात पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचा मोठा वाटा आहे. माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक करत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे लेस कॅशसह कॅश लेसचे स्वप्न साकारण्यासाठी हे उपयुक्त आहे.
केंद्रीय मंत्री अरुण जेटली म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळात जागतिक स्तरावर सुरु असणाऱ्या पहिल्या महायुद्धाच्या कालावधीत पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची स्थापना झाली. अशा कठीण काळात सुरु झालेल्या बँकेचे काम योग्य नियोजनामुळे चांगल्या प्रकारे सुरु आहे. या यशस्वीतेमागे संस्थेचा सचोटीचा व्यवहार कारणीभूत आहे. शेतकऱ्यांना कमी व्याजदराने पैसे देण्याचे काम या बँकेने केले आहे.
देशातील ग्रामीण भागांना रस्त्यांनी जोडण्याचे काम केंद्र व राज्य सरकारने हाती घेतले आहे. त्याचबरोबर प्रत्येक घरात वीज पोहोचविण्याच्या कामालाही प्राधान्य देण्यात आले आहे. देशातील ५५ टक्के जनता ही कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. सिंचन व्यवस्था हीच कृषी क्षेत्रासमोरील प्रमुख समस्या आहे. या सिंचन क्षेत्रावर केंद्र व राज्य सरकार अधिक खर्च करत असून सिंचन क्षेत्र वाढविण्यावर भर देण्यात आला आहे.
पद्मभूषण शरद पवारांचे काम हे राजकारण्याच्या पलीकडचे असून त्यांनी कायमच देशहिताला प्राधान्य दिले आहे. शेती आणि शेतकऱ्यांसाठी त्यांचे योगदान मोठे असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे काम चांगल्या प्रकारे सुरु असल्याचे श्री. जेटली यांनी सांगितले.
            श्री. शरद पवार म्हणाले, लोकमान्य टिळकांचे अनुयायी न. चि. केळकर यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची स्थापना केली. धनंजयराव गाडगीळांसारख्या मोठ्या व्यक्तींचे नेतृत्त्व या बँकेला लाभले. त्यामुळे या बँकेची वाटचाल योग्य प्रकारे सुरु आहे. या बँकेने सहा हजार कोटी रुपयांचा कर्ज पुरवठा जिल्ह्यातील सर्वसामान्यांपर्यंत  केला आहे. या बँकेमुळे जिल्ह्याची अर्थव्यवस्था बदलली. दुष्काळासह इतर संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी सहकारी बँकाच उभ्या राहतात. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी सरकारने सहकारी बँकेच्या पाठीशी उभे राहावे.
            सुभाष देशमुख म्हणाले, सहकाराच्या माध्यमातून महाराष्ट्र समृद्ध व्हावा हेच शासनाचे धोरण आहे. त्यासाठी शासन विविध स्तरावर प्रयत्न करत आहे.राज्यातील अडचणीत असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकांना सुस्थितीत असलेल्या इतर बँकांनी हात देण्याचे गरज आहे. राज्यातील सहकार टिकविण्यासाठी शासन सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
            यावेळी बँकेच्या शताब्दी स्मरणिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. ‘को-ऑपरेशन बियोंड बँकिंग’ या पुस्तकाचे प्रकाशन केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच पद्मविभूषण सन्मान मिळाल्याबद्दल शरद पवार यांचे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाच्यावतीने श्री. जेटली यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या एटीएम मोबाईल व्हॅनचे उद्घाटन आणि ‘गाथा पीडीसीसी बँकेची’ या ध्वनीचित्रफितीचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच मान्यवरांच्या हस्ते पोस्ट कार्यालयाच्यावतीने काढण्यात आलेल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विशेष पाकिटाचे प्रकाशन करण्यात आले.
            यावेळी माजी उपमुख्यमंत्री आमदार अजित पवार, रमेश थोरात यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संजय भोसले यांनी केले. तर आभार अर्चना घारे यांनी मानले.

******

'आरोग्‍याचा चातुर्मास' ही अभिनव संकल्पना - मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस महिलांसाठी मोफत आरोग्‍य तपासणी शिबीराची मुख्‍यमंत्री फडणवीस यांच्‍याकडून पहाणी

'आरोग्‍याचा चातुर्मास' ही अभिनव संकल्पना - मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस
महिलांसाठी मोफत आरोग्‍य तपासणी शिबीराची मुख्‍यमंत्री फडणवीस यांच्‍याकडून पहाणी

पुणे, दिनांक 10- 'आरोग्‍याचा चातुर्मास' ही अभिनव संकल्पना असून ‍या माध्‍यमातून प्रत्‍येक व्‍यक्‍तीपर्यंत आरोग्‍य सुविधा मोफत पोहोचवण्‍यात आली आहे. आमदार विजय काळे यांनी राबविलेला हा उपक्रम कौतुकास्‍पद असून असे उपक्रम राज्‍यभरात राबविण्‍यात यावेत, असे आवाहन  मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
            बोपोडी येथील डॉ. राजेंद्रप्रसाद विद्यामंदिर येथे  महिलांसाठी आयोजित करण्‍यात आलेल्‍या  मोफत आरोग्‍य तपासणी शिबीरास मुख्‍यमंत्री श्री. फडणवीस यांनी  भेट देऊन पहाणी केली.  त्‍यानंतर मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी सामाजिक न्‍याय राज्‍य मंत्री दिलीप कांबळे, आमदार विजय काळे, नगरसेवक प्रकाश ढोरे, विजय शेवाळे, सुरेश कांबळे, आदित्‍य माळवे, कमलेश चासकर, अभय सावंत, कार्तिकी हिवरकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
            मुख्‍यमंत्री श्री. फडणवीस म्‍हणाले, नागरिकांना आरोग्‍यविषयक सुविधा देण्‍यासाठी शासन प्राधान्‍य देत असून  शासनाच्‍या आरोग्‍यविषयक विविध योजनांमधून कर्करोग, ह्दयरोग यासारख्‍या दुर्धर आजारांवर मोफत शस्‍त्रक्रिया करण्‍यात आल्‍या आहेत.  आतापर्यंत सुमारे 20 हजार रुग्‍णांवर अशा प्रकारच्‍या शस्‍त्रक्रिया करण्‍यात आल्‍या आहेत. 'आरोग्‍याचा चातुर्मास' ही नवीन संकल्‍पना असून या संकल्‍पनेमध्‍ये केवळ आरोग्‍य तपासणीच होत नाही तर आवश्‍यकता भासल्‍यास शस्‍त्रक्रिया केली जाणार आहे. शासनाच्‍या विविध आरोग्‍यविषयक योजना तसेच मुख्‍यमंत्री सहायता निधीतून या उपक्रमासाठी  आवश्‍यक ती मदत करण्‍याची ग्‍वाही त्‍यांनी दिली.
            आमदार विजय काळे यांनी आरोग्‍य शिबीराच्‍या आयोजनामागचा हेतू विशद केला. ते म्‍हणाले, आजच्‍या शिबीरात आतापर्यंत 900 महिलांची आरोग्‍य तपासणी करण्‍यात आली असून  सायंकाळपर्यंत 2 हजार महिलांची तपासणी होईल. शहरात अन्‍य ठिकाणीही  अशाच प्रकारची आरोग्‍य तपासणी शिबीरे आयोजित करण्‍यात येणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.
            कार्यक्रमास महिलांसह इतर नागरिक, पदाधिकारी मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.
ooooo









  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेची राज्यस्तरीय बैठक पुणे जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्व...