Monday, August 14, 2017

कृषी आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या हस्ते मध्यवर्ती इमारत प्रांगणात ध्वजवंदन



पुणे, दि.15- भारतीय स्वातंत्र्याच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त कृषी आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या हस्ते आज मध्यवर्ती इमारतीच्या प्रांगणात ध्वजवंदन झाले. या शानदार समारंभास राज्य शासनाच्या विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कृषी आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी  उपस्थित अधिकारी  आणि  कर्मचाऱ्यांना  शुभेच्छा दिल्या.
00000000




पालकमंत्री गिरीश बापट यांच्याहस्ते पुण्यात मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न


पुणे, दि. १५भारतीय स्वातंत्र्याच्या 70 व्या वर्धापना दिनानिमित्त पालकमंत्री तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्याहस्ते आज विधान भवनाच्या प्रांगणात उत्साहपूर्ण वातावरणात ध्वजवंदन झाले. विधान भवन परिसरात सकाळी नऊ वाजून पाच मिनिटांनी ध्वजवंदनाचा शानदार समारंभ पार पडला.
पालकमंत्री गिरीश बापट यांचे सकाळी नऊ वाजता विधानभवन येथे आगमन झाले. विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांतर पालकमंत्र्यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजवंदनानंतर पालकमंत्री गिरीश बापट यांनी उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, प्रशासकीय अधिकारी आणि नागरिकांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिकांसह महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, खासदार अमर साबळे, आमदार भिमराव तापकीर, आमदार माधुरी मिसाळ, आमदार शरद रणपिसे, आमदार जयदेव गायकवाड, पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, जिल्हाधिकारी सौरभ राव,अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, पदाधिकारी, नागरिक, पत्रकार मोठया संख्येने उपस्थित होते.
00000000












स्वातंत्र्य दिनानिमित्त शनिवारवाड्यावर जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या हस्ते ध्वजारोहण


पुणे, दि.15- स्वातंत्र्य   दिनाच्या  70 व्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारवाड्यावर सकाळी 7.30 वाजता जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.
याप्रसंगी अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, उपजिल्हाधिकारी सर्वश्री, शंकरराव जाधव, मोनिका सिंग, दिनेश भालेदार, ज्योती कदम, महसूल आणि इतर विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारीतसेच नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
                                                                         000000






Saturday, August 12, 2017

पिंपरी चिंचवडला लवकरच पोलिस आयुक्तालय होईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस -विकास प्रकल्पांचे उदघाटन

पिंपरी चिंचवडला लवकरच
पोलिस आयुक्तालय होईल
        मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस -विकास प्रकल्पांचे उदघाटन
पुणे,दि.१२-पिंपरी चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या पाहता पोलिस आयुक्त कार्यालय कार्यान्वित करण्याची प्रक्रिया सुरू असून लवकरच ते मार्गी लागेल ,असे आश्वासन मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या तीन  विकास प्रकल्पांचे उदघाटन आणि दोन प्रकल्पांचे भूमिपूजन झाले.  त्यावेळी ते बोलत होते.  

यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री गिरीश बापट,  महापौर नितीन काळजे, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, खासदार अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, आमदार बाळा भेगडे,  गौतम चाबूकस्वार,  उपमहापौर शैलजा मोरे,  पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला,  आयुक्त श्रावण बर्डिच आदी उपस्थित होते. भोसरी येथील अंकुशराव लांडगे सभागृहात हा कार्यक्रम झाला.

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराचा विस्तार अतिशय गतीने होत आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड साठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयास तत्वतः मान्यता देण्यात आली आहे.  लवकरच त्याबाबतच्या आवश्यक त्या प्रक्रिया पूर्ण केल्यावर पिंपरी चिंचवड साठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय जाहिर केले जाईल,  असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,  राज्याच्या कानाकोपर्यातून रोजगारासाठी पिंपरी चिंचवड येथे नागरिक आले आहेत. येथील उद्योगाने सर्वांना संधी दिली आहे.  आता राज्य शासन या शहराला विकासाची संधी देणार आहे.  या संधीचा पिंपरी चिंचवडच्या नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन करतो.

पुण्यापेक्षा जास्त गतीने विकास करण्याचे पिंपरी चिंचवडमध्ये क्षमता आहे.  मात्र महापालिकेने स्वच्छता, कचरा विल्हेवाट आणि सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यावर भर द्यायला हवा, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले पिंपरी चिंचवडच्या विकासासाठी आवश्यक असणार्या सर्व विकास प्रकल्पांसाठी राज्य शासन प्राधान्याने मदत करेल. त्यासाठी आवश्यक असणारा निधी पुरवला जाईल.

पालकमंत्री गिरीश बापट यांनी पिंपरी चिंचवडच्या विकासासाठी राज्य शासन सर्व मदत करण्यासाठी तत्पर आहेच गरज भासल्यास जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी दिला जाईल, असे सांगितले.

महापौर नितीन काळजे यांनी प्रास्ताविक केले. आभार स्थायी समिति सभापती सीमा सावळे यांनी केले.  सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले. 

यावेळी पुणे पोलीस आयुक्त कार्यालय मार्फत विकसित करण्यात आलेल्या सिटी सेफ मोबाइल अप्लिकेशनचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
-----













विश्व शांती विद्यापीठातून मूल्याधारीत शिक्षण घेतलेली नवी पिढीच जग बदलेल -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विश्व शांती विद्यापीठातून
मूल्याधारीत शिक्षण घेतलेली नवी पिढीच जग बदलेल
-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे दि. १२: अज्ञानाच्या अंध:कारामुळे जगात अशांतता आहे, हा अज्ञानाचा अंध:कार दूर करण्यासाठी मूल्याधारित शिक्षण आवश्यक आहे. विश्व शांती विद्यापीठाच्या माध्यमातून मूल्याधारित शिक्षण प्राप्त केलेली नवी पिढीच जग बदलेल, असा विश्वास मुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला.
डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कोथरुड येथील एमआयटी कॉलेजच्या प्रांगणात झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी एमआयटीचे प्रमुख डॉ. विश्वनाथ कराड, स्विडनचे ऊर्जा क्षेत्रातील उद्योजक मायकल नोबेल, पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, नालंदा ‍विद्यापीठाचे कुलगुरू पद्मभूषण विजय भाटकर, युजीसीचे माजी चेअरमन डॉ. अरुण निगवेकर, न्यूट्रॉन इलेक्ट्रॉन सिस्टिमचे चेअरमन नानीक रुपानी, अध्यात्मिक गुरु जे.पी. ऊर्फ दादा वासवानी, प्रसिध्द तबलावादक पंडीत सुरेश तळवळकर उपस्थित होते.
श्री. देवेंद्र फडणवीस म्हणाले, शिक्षण हे मूल्यांवर आधारित असावे. मूल्यरहित शिक्षण ही फक्त माहिती असते ते ज्ञान नसते. जीवन जगताना कोणत्याही विषयाचे केवळ तांत्रिक ज्ञान पुरेसे नसते तर त्याला मूल्य शिक्षणाची जोड आवश्यक आहे. विश्व शांती विद्यापीठाचे स्वप्न बघून ते पूर्ण करणाऱ्या कराड कुटुंबाचा आम्हाला अभिमान आहे. या विद्यापीठाच्या माध्यमातून मूल्याधारित शिक्षण दिले जाईल. शासनाच्यावतीने अशा शिक्षणाला प्रोत्साहन दिले जाईल.
अज्ञानाच्या अंध:कारामुळे जगात अशांतता आहे. मूल्याधारित शिक्षणच हा अंध:कार दूर करेल. यामाध्यमातून जगात बंधूत्वाची भावना निर्माण होईल. यामुळे जग अधिक सुंदर होईल, ते सर्वांना जगण्यास लायक होईल. विश्वशांती विद्यापीठाची निर्मिती हा सर्वांसाठी ऐतिहासिक क्षण आहे. यापुढेही एमआयटी हे नवीन प्रयोग करण्यात आघाडीवर राहील असा विश्वास श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला.
डॉ. रघुनाथ माशेलकर म्हणाले, जीवन जगण्यासाठी विज्ञान आणि अध्यात्म यांचा संगम आवश्यक आहे. मूल्याधारित शिक्षण देणाऱ्या या विद्यापीठाच्या माध्यमातून सक्षम विद्यार्थी घडतील.
डॉ. विजय भटकर म्हणाले, या विश्व शांती विद्यापीठाची निर्मिती हा सर्वांच्यासाठी अत्यंत महत्वाचा क्षण आहे. अशा प्रकारच्या विश्वशांती विद्यापीठाची निर्मिती व्हावी असे माझे स्वप्न होते. डॉ. कराड यांनी ते पूर्ण केले. या विद्यापीठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे जीवन उंचावेल.
डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले, विज्ञान आणि अध्यात्माची जोडच जगाला शांततेचा रस्ता दाखवेल. स्वामी विवेकानंदाच्या विचारावर ही संस्था सुरु आहे. हा देशासाठी ऐतिहासिक क्षण आहे. या विद्यापीठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मूल्याधारित शिक्षण मिळेल.
यावेळी दादा वासवानी, मायकेल नोबेल, डॉ. जय गोरे यांची भाषणे झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विश्व शांती विद्यापीठाचे उद्घान करण्यात आले. तसेच विद्यापीठाच्या माहिती पत्रकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दादा वासवानी यांच्यावरील माहिती पट यावेळी दाखवण्यात आला. तसेच उपस्थित विद्यार्थ्यांना विश्व शांती विद्यापीठाची शपथ श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहूल कराड यांनी केले. तर आभार मंगेश कराड यांनी मानले. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच एमआयटी विद्यापीठाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*****






राज्‍यातील न्‍यायालयांमध्‍ये आवश्‍यक त्‍या चांगल्‍या सुविधा पुरविणार- मुख्‍यमंत्री
पुण्‍याच्‍या कौटुंबिक न्यायालयाच्‍या नूतन इमारतीचे उद्घाटन

पुणे दि 12 :  राज्‍यातील न्‍यायालयांच्‍या इमारतींमध्‍ये आवश्‍यक त्‍या सुविधा पुरविण्‍यासाठी सर्वतोपरी मदत करु, अशी ग्‍वाही  मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
येथील कौटुंबिक न्यायालयाच्‍या  नूतन इमारतीच्‍या  उद्घाटन  कार्यक्रमात ते बोलत होते.  मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती डॉ.श्रीमती मंजुळा चेल्लूर यांच्या हस्‍ते या नूतन इमारतीचे उद्घाटन झाले.  कौटुंबिक न्यायालयाच्या प्रमुख न्यायाधीश श्रीमती एस.एस.सावंत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्या. श्रीमती रेवती मोहिते -डेरे, न्‍यायमूर्ती  भूषण गवई, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश प्रसाद पालसिंगनकर, पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र दौंडकर, द पुणे फैमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनचे अध्यक्ष गणेश कवडे, महापौर मुक्‍ता टिळक, विभागीय आयुक्‍त चंद्रकांत दळवी, जिल्‍हाधिकारी सौरभ राव आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्‍यमंत्री श्री. फडणवीस म्‍हणाले, देशातील आदर्श कौटुंबिक न्‍यायालय पुणे येथे झाले आहे. कामाच्‍या ठिकाणी चांगले वातावरण असेल तर कार्यक्षमतेवर चांगला परिणाम होतो. त्‍यासाठी न्‍यायालयांमध्‍ये चांगल्‍या सुविधा आवश्‍यक आहेत. राज्‍यातील सर्व न्‍यायालयांमध्‍ये आवश्‍यक त्‍या चांगल्‍या सुविधा देण्‍यासाठी प्रयत्‍न करु.
समाजातील एकत्र कुटुंब पध्‍दतीचे प्रमाण कमी होत असल्याबद्दल चिंता व्‍यक्‍त करुन मुख्‍यमंत्री म्‍हणाले, पूर्वी एकत्र कुटुंब पध्‍दती होती, घरांतील ज्‍येष्‍ठ सदस्‍यांच्‍या मध्‍यस्‍थीमुळे पती-पत्‍नीतील वाद संपुष्‍टात यायचे. बदलत्‍या जीवनशैलीमुळे कौटुंबिक वादाचे प्रमाण वाढत आहेत. या न्‍यायालयात येणा-या व्‍यक्‍ती  निराश, कौटुंबिक कलहामुळे जीवनावरील विश्‍वास उडालेल्‍या असतात. येथील वातावरणामुळे त्‍यांना संवादासाठी वेळ मिळेल आणि घटस्‍फोटासाठी आलेल्‍या व्‍यक्ती परत आनंदात एकत्र जातील, असा विश्‍वास त्‍यांनी व्‍यक्‍त केला.
पान :२
पान : २
 मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती डॉ.श्रीमती मंजुळा चेल्लूर यांनी जीवनात सुबत्‍ता असलेल्‍या व्‍यक्‍ती कौटुंबिक कलहामुळे त्रस्‍त असल्‍याची उदाहरणे देऊन कौटुंबिक न्‍यायालयांमध्‍ये येणा-या व्‍यक्‍तींच्‍या जीवनात आनंद, आशा निर्माण करण्‍याची मोठी जबाबदारी या क्षेत्रात काम करणा-यांवर असल्‍याचे सांगितले. कौटुंबिक न्‍यायालय हे एक वेगळे आणि विशेष न्‍यायालय आहे. इथे येणा-या व्‍यक्‍तींबाबत सर्वांनी सहानुभूतीचा, आपुलकीचा दृष्टिकोन ठेवावयास हवा, असे आवाहन करुन त्‍या म्‍हणाल्‍या, आत्‍मविश्‍वास गमावलेल्‍या, नैराश्‍याने ग्रस्‍त असलेल्‍या व्‍यक्‍तींच्‍या जीवनात शांतता निर्माण करण्‍याचे, त्‍यांचे जीवन घडविण्‍याचे महत्‍त्वपूर्ण काम आपल्‍याला करावयाचे आहे.
मुंबई उच्च न्यायालयाचे  न्‍यायमूर्ती  भूषण गवई यांनीही कौटुंबिक न्‍यायालयाच्‍या स्‍थापनेचा उद्देश सांगून विभक्‍त झालेले आणि घटस्‍फोटासाठी वेगवेगळ्या मार्गांनी या न्‍यायालयात आलेली जोडपी आपल्‍या मुलांचा हात हातात घेऊन येथून बाहेर जातील, असा आशावाद व्‍यक्‍त केला.
मुंबई उच्च न्यायालयाच्या न्या. श्रीमती रेवती मोहिते -डेरे म्‍हणाल्‍या, पुणे येथे  प्रथम कौटुंबिक न्‍यायालय 27 जानेवारी 1989 मध्‍ये स्‍थापन करण्‍यात आले होते. तेव्हापासून हे न्‍यायालय भारती विद्यापीठाच्‍या 7 व्‍या व नवव्‍या मजल्‍यावर कार्यरत होते. ती जागा अपुरी पडत असल्याने सध्‍या अस्तित्‍वात असलेल्‍या जिल्‍हा व सत्र न्‍यायालयाच्‍या इमारती शेजारील गोदामाच्‍या जागेत नूतन वास्‍तू उभारण्‍यात आली आहे. या वास्‍तूचे भूमिपूजन मुंबई उच्‍च न्‍यायालयाचे तत्‍कालीन  मुख्‍य न्‍यायमूर्ती श्री. स्‍वतंत्रकुमार यांच्‍या हस्‍ते 13 सप्‍टेंबर 2009 मध्‍ये झाले होते. शिवाजीनगर येथे उभारलेल्या कौटुंबिक न्यायालयाच्या नूतन इमारतीमध्ये विविध सुविधा देण्यात आल्‍या असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.  ज्यामध्ये लहान मुलांना भेटण्यासाठी मुलांचे संकुल, पक्षकार, कर्मचारी व वकील यांच्या मुलांसाठी पाळणाघराची व्यवस्था, प्रतीक्षालय, दूरदर्शन संच, सुसज्ज ग्रंथालय, मानसोपचारतज्ञ, बाल मानसोपचारतज्ञ यांच्यासाठी स्वतंत्र कक्ष अशा सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. न्यायालयीन कक्षाची रचना देखील विशिष्ट पध्दतीने करण्यात आली आहे. ज्यामध्ये शारीरिकक दृष्टया विकलांग, पक्षकारांसाठी रॅम्पची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या नूतन इमारतीमध्ये न्यायाधीश, वकील व कर्मचाऱ्यांसाठी सुसज्ज असे भूमिगत वाहनतळ बांधण्यात आलेले आहे. नूतन इमारतीमुळे वकील, पक्षकार व कर्मचारी यांची सोय होणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.
पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र दौंडकर, द पुणे फैमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनचे अध्यक्ष गणेश कवडे यांनीही यावेळी आपले मनोगत व्‍यकत केले. कार्यक्रमास न्‍यायाधीश, कर्मचारी, वकील मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.
0000








Tuesday, August 1, 2017

पूना कॉलेजमध्ये यापुढे आठवड्यातून एकदिवस “ऊर्दू लोकराज्य”चा विशेष तास - प्राचार्य डॉ. आफताब अन्वर शेख

पूना कॉलेजमध्ये यापुढे आठवड्यातून
एकदिवस “ऊर्दू लोकराज्य”चा विशेष तास- प्राचार्य डॉ. आफताब अन्वर शेख
पुणे दि.1: शासनाच्यावतीने प्रसिध्द करण्यात येणारे “लोकराज्य” मासिक हे विद्यार्थ्यांच्या करिअरला दिशा देण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. लोकराज्यच्या वाचनामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्वात मोठा बदल होणार आहे, त्यामुळे यापुढे पूना कॉलेजमध्ये प्रत्येक आठवड्यातून एक दिवस “लोकराज्य”चा विशेष तास घेणार असल्याचे प्रतिपादन पूना कॉलेजचे प्राचार्य डॉ. आफताब अन्वर शेख यांनी केले.
माहिती व जनसंपर्क विभागाच्या विभागीय माहिती कार्यालय, पुणे, जिल्हा माहिती कार्यालय, पुणे आणि वाय ॲण्ड एम अंजूमन खैरुल इस्लाम संस्थेच्या पुना कॉलेज ऑफ आर्टस्, सायन्स ॲण्ड कॉमर्स महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने “ऊर्दू लोकराज्य वाचक मेळाव्या”चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. शेख बोलत होते. यावेळी उपसंचालक (माहिती) मोहन राठोड, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य मोईनुद्दीन खान, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य इब्राहिम खन, पर्यवेक्षक मेहराजवुल हक उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. शेख म्हणाले, लोकराज्य मासिकाच्या माध्यमातून अत्यंत उपयुक्त माहिती देण्यात येते. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे मासिक अत्यंत उपयुक्त आहे. या मासिकाच्या नियमित वाचनाने शासनाच्या विविध निर्णयांची, योजनांची माहिती मिळण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या सामान्य ज्ञानात भर पडते. ऊर्दू लोकराज्य हे ऊर्दू भाषिकांसाठी उपयुक्त आहे. मातृभाषेत मिळणारी माहिती अधिक चटकन समजते त्यामुळे ऊर्दू लोकराज्य हे महत्वाचे आहे. विद्यार्थ्यांनी या लोकराज्यचा लाभ घेवून ते तळागाळापर्यंत पोहोचवावे असे आवाहन त्यांनी केले.
श्री. मोहन राठोड म्हणाले, ऊर्दू भाषेत गोडवा आहे. या भाषेच्या अभ्यासामुळे वक्तृत्व बहरते. त्यामुळे ऊर्दू भाषेचे महत्व वेगळे आहे. सर्व भाषांचे जतन-संवर्धन होणे आवश्यक आहे त्यामुळे ऊर्दू भाषेला चालना देण्याची शासनाची भूमिका आहे. त्यासाठी शासन विविध उपाययोजना अवलंबत असते. ऊर्दू लोकराज्यच्या माध्यमातून शासनाच्या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे.
मोईनुद्दीन खान म्हणाले, ऊर्दू भाषेला चालना देण्याचे काम महाराष्ट्र शासन करत आहे. ऊर्दूच्या संवर्धनासाठी विविध उपाययोजना शासन राबवत असते, ही ऊर्दू भाषेसाठी अत्यंत महत्वाची बाब आहे. ऊर्दू लोकराज्य हे अत्यंत उपयुक्त असून या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या करिअरला गती मिळेल. या ऊर्दू लोकराज्य वाचक चळवळीला गती देण्यासाठी पूना कॉलेज सक्रीय मदत करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहिती सहाय्यक जयंत करपे यांनी केले. अभार राजेंद्र सरग यांनी मानले. या कार्यक्रमाला माहिती अधिकारी वृषाली पाटील, माहिती सहाय्यक संग्राम इंगळे, विलास कसबे, विशाल कार्लेकर, रोहीत साबळे, संजय गायकवाड, सुर्यकांत कासार, ए. एम. खान, रावजी बांबळे, पूना महाविद्यालयाचे प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






“ऊर्दू लोकराज्य”चे 1 हजार वर्गणीदार करणार
पूना कॉलेजमध्ये गेल्या काही वर्षापासून स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्र चालविण्यात येते. या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातील विद्यार्थ्यांसाठी ऊर्दू लोकराज्य अत्यंत उपयुक्त आहे. त्यामुळे ऊर्दू लोकराज्यचा विद्यार्थ्यांना फायदा होण्यासाठी येत्या आठ दिवसात कॉलेजमध्ये लोकराज्य वर्गणीदारांची विशेष मोहीम राबवून 1 हजार ऊर्दू लोकराज्य वर्गणीदार करण्यात येणार असल्याची माहिती प्राचार्य आफताब अन्वर शेख यांनी यावेळी बोलताना दिली.
*****

  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेची राज्यस्तरीय बैठक पुणे जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्व...