Saturday, December 28, 2019


पेरणे जयस्तंभ अभिवादन कार्यक्रम सुरळीत पार पाडून जिल्ह्याच्या लौकीकात भर घालूया

                                      -जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांचे आवाहन

            पुणे, दि.२८: हवेली तालुक्यातील पेरणे फाटा (कोरेगाव भिमा) येथे १ जानेवारी रोजी होणारा जयस्तंभ अभिवादन कार्यक्रम सुरळीत व शांततेत पार पाडून जिल्हयाच्या लौकीकात भर घालुया, असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले. 

            पेरणे जयस्तंभ अभिवादनासाठी येणाऱ्या नागरिकांना प्रशासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या सोयी- सुविधांची पाहणी जिल्हाधिकारी श्री राम यांनी केली, यावेळी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. त्यांच्या सोबत विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.सुहास वारके, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर उपस्थित होते.
नागरिकांसाठी विविध सुविधा

             जिल्हाधिकारी श्री. राम म्हणाले, जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमास मोठया प्रमाणात नागरिक उपस्थित राहतात. हा कार्यक्रम सुरळीतपणे पार पाडण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. मागील वर्षीच्या नियोजनामध्ये आढळलेल्या त्रुटी दूर करुन नागरिकांना आवश्यक त्या सुविधा देऊन कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रशासनाने नियोजन केले असून त्यानुसार  गतीने  कामे होत आहेत.  जयस्तंभ येथे भेट देणाऱ्या नागरिकांची व गावकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी सर्व विभाग योग्य त्या उपाययोजना करत असून यासाठी प्रत्येक विभागाचे वरिष्ठ अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. जयस्तंभ परिसरात पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी चार हायमास्ट दिवे लावण्यात आले आहेत. तसेच पेरणे फाटा ते पेरणे गाव या रस्त्यावर कायम स्वरुपी पथदिवे बसविण्यात येत आहेत. मुख्य रस्ता आणि वाहनतळ येथे तात्पुरत्या स्वरुपात प्रकाश व्यवस्था व ध्वनीक्षेपण व्यवस्था करण्यात येत आहे. १०० टँकरव्दारे पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. ५०० फिरते स्वच्छतागृह असणार आहेत. १२ ओपीडी सेंटर्स, २० रुग्णवाहिका व पुरेसा औषधसाठा नागरिकांसाठी तयार ठेवण्यात येत आहे. बांधकाम विभागाच्या वतीने या ठिकाणचे सुशोभीकरण, रस्ते दुरुस्ती, बांधकाम दुरुस्ती, सी.सी.टी.व्ही कॅमेरे बसवण्यात येत आहेत. १५ ठिकाणी प्रशस्त पार्किंगची व्यवस्था करण्यात येत आहे. याशिवाय अग्नीशमन यंत्रणा, वाहतूक विभाग, महानगरपालिका, जिल्हा परिषद, राज्य उत्पादन शुल्क विभाग, अन्न, औषध व प्रशासन विभागाबरोबरच संबंधित विभाग याठिकाणी योग्य ती भूमिका बजावण्यासाठी कार्यरत आहेत. 

नागरिकांसाठी २६० बसेसची व्यवस्था
            जयस्तंभ अभिवादन दिन कार्यक्रमासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी दि.३१ डिसेंबर २०१९ व १ जानेवारी २०२० रोजी एकूण २६० बसेसची व्यवस्था करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.
पेरणे येथील अभिवादन दिन कार्यक्रमासाठी येणाऱ्या नागरिकांना वाहनस्थळापासून ते कार्यक्रम स्थळापर्यंत नेण्यासाठी दि. ३१ डिसेंबर २०१९ व १ जानेवारी २०२० रोजी एकूण २६० बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. नियोजित वाहनतळापासुन जयस्तंभापर्यंत येणाऱ्या ग्रामस्थांची व नागरिकांची विनाशुल्क वाहतुक  या बसेस करतील. त्यापैकी ६० बस दि.३१ डिसेंबर २०१९ रोजी व २०० बस दि. १ जानेवारी २०२० रोजी उपब्ध असतील, यात ३० मिनीबसचा देखील समावेश असेल.
  अभिवादन कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील विविध पक्ष, संस्था, संघटनांचे पदाधिकारी प्रशासनाला सहकार्य करणार असून याठिकाणी भेट देणाऱ्या नागरिकांनीही प्रशासनाला  सहकार्य करावे, असे जिल्हाधिकारी श्री. राम म्हणाले.

नागरिकांच्या संरक्षणासाठी पोलीस प्रशासन दक्ष

   पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके म्हणाले, नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी पोलीस प्रशासन कटीबध्द असून सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी अतिरिक्त पोलीस यंत्रणा कार्यरत राहिल. तसेच ४०० पोलीस अधिकाऱ्यांसह सुमारे १० हजार पोलीस कर्मचारी, होमगार्ड  व स्वयंसेवक का

र्यरत असतील.
  'ट्रॅफिक जॅम' ची समस्या उद्भवू नये, यासाठी वाहतूक वळविण्यात येणार आहे.  सोशल मीडिया द्वारे अफवा पसरविणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यात येत असून नागरिकांनी सहकार्य करावे, असेही डॉ.वारके म्हणाले.

  पोलीस अधीक्षक संदिप पाटील म्हणाले, पेरणे जयस्तंभ अभिवादन दिन हा शौर्याचा अभिमान बाळगण्याचा दिवस असून या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक नागरिकाने एकमेकांच्या भावनांचा आदर राखून शांतता राखावी व प्रशासनास सहकार्य करावे. बाहेरून येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांसाठी प्रशस्त पार्किंगची सोय करण्यात येत आहे.  हा कार्यक्रम शांततेने पार पाडून पुणे जिल्हा हा सर्वांना सामावून घेणारा जिल्हा असल्याचे दाखवून देवूया, असे आवाहन श्री. पाटील यांनी यावेळी केले. जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठया प्रमाणात नागरिक उपस्थित राहतात, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कोणत्याही प्रकारची अफवा पसरु नये, यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी, असेही ते म्हणाले. बैठकीला विविध विभागांचे अधिकारी व  ग्रामस्थ उपस्थित होते.
000000


No comments:

Post a Comment

  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेची राज्यस्तरीय बैठक पुणे जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्व...