Friday, January 25, 2019

26 जानेवारी ते 10 फेब्रुवारी दरम्यान साजरा होणार लोकशाही पंधरवडा



                पुणे दि. 25 :- राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांनी दिलेल्या सूचनांनुसार 26 जानेवारी 2019 ते 10 फेब्रुवारी 2019 या कालावधीत लोकशाही भक्कम होण्याच्या व नागरीकांना निवडणूकीच्याबाबत विविध स्वरुपातील माहिती  उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने "लोकशाही पंधरवडा" साजरा करण्यात येणार आहे. या पंधरा दिवसाच्या कालावधीत वेगवेगळ्या स्तरांवर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत.
                26 जानेवारी 2019 रोजी झेडावंदनाच्या वेळी ठिकठिकाणी होणाऱ्या लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकाऱ्याच्या भाषणांमध्ये लोकशाही, निवडणूक व सुशासन या विषयावर माहिती देण्यात येणार आहे. तसेच महानगरपालिका, नगरपरिषद ग्रामपंचायतींमध्ये "लोकशाही निवडणूक व सुशासन" या विषयाचे होर्डिग्ज, बॅनर्स लावण्यात येणार आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र व बस स्टँड, रेल्वे स्टेशन, बाजारपेठा इ. ठिकाणी पोस्टर्स, कापडी फलक लावण्यात येणार आहेत. स्थानिक टि.व्ही, केबल व रेडिओ चॅनलवर 30 सेकंदाची "लोकशाही निवडणूक व सुशासन" या विषयावर जिंगल्स प्रसारीत करण्यात येणार आहे. मतदार यादी जागृती अभियानाची व्यापक प्रसिध्दी करण्याण्यासोबतच अक्षम नोंदणीकृत राजकीय पक्षांची नोंदणी रद्द केली, NOTA ला सर्वाधिक मते पडल्यास अशा जागी फेरनिवडणूक घेणेबाबत सुधारणा करण्यात आली, याबाबत माहिती देण्यात येणार आहे.
                18 व 19 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांची निश्चिती करून त्यांचे नाव मतदार यादीत अंतर्भुत करण्यासंदर्भात महाविद्यालयात कक्ष उभारण्यात येणार आहेत. मतदार यादीत महिला मतदारांची टक्केवारी कमी आहे अशा मतदान केद्रांचा शोध घेऊन त्याठिकाणी महिला मतदारांचे नाव नोंदणीकरीता विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये (प्रामुख्याने शहरी भागातील) इतर भाषिक मतदारांना निवडणूकीचे महत्व पटवून देण्यासाठी व निवडणूकीतील त्यांचा सहभाग वाढवून निवडणूकीची टक्केवारी वाढविण्यासाठी संबंधीत ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत जनसामान्यांची "चुनाव पाठशाला" आयोजित करण्यात येणार आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालयांमध्ये लोकशाही, निवडणूक व सुशासन या विषयावर निबंध व वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. कार्यक्षेत्रातील स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने व सहकार्याने मतदार जागृती मोहिम राबविणेत येणार आहे,असे जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
000000

No comments:

Post a Comment

  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेची राज्यस्तरीय बैठक पुणे जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्व...