-पालकमंत्री गिरीश बापट
पुणे, दि.24:- ‘ग्राहक हा राजा आहे’ त्याची
फसवणूक टाळली जावी व त्याचा मान- सन्मान हा राखला पाहिजे. असे
प्रतिपादन अन्न व औषध प्रशासन, संसदीय कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री
गिरीश बापट यांनी आज येथे केले.
देशभरामध्ये दरवर्षी
24 डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने शिवाजीनगर एस.टी.बसस्थानकाच्या आवारामध्ये
ग्राहक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपजिल्हाधिकारी
विजयसिंह देशमुख, अतिरिक्त जिल्हाधिकारी चिंतामणी जोशी, उपआयुक्त (पुरवठा) श्रीमती निलीमा धायगुडे, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनिल गाढे, तहसिलदार
श्रीमती होळकर, सुनिल कोळी इ. मान्यवर उपस्थित होते.
यावेळी श्री.बापट
यांनी कायदयाच्या दबावाबरोबरच समाजाचा दबावही महत्वाचा असल्याचे सांगून ग्राहकांची
फसवणूक होऊ नये, त्यांना योग्य प्रकारे सेवा मिळावी हा त्यांचा हक्कच आहे, असे सांगितले.
उत्पादन आणि सेवांबाबत ग्राहकांमध्ये जनजागृती होणे महत्वाचे असून ग्राहकांनीही
मालाचा किंमतींविषयी खात्री करावी, तसेच त्यांनी केलेल्या तक्रारींचा शेवटपर्यंत
पाठपुरावा करावा. जेणेकरुन त्यांना योग्य सेवा व उत्पादने मिळतील. यावेळी
श्री.बापट यांनी जनजागृतीच्या या
कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या सर्व विभागांचे
कौतुक केले.
या कार्यक्रमाकरीता
शासनाच्या राज्य आरोग्य प्रयोगशाळा,अन्न व औषध प्रशासन, पिंपरी-चिंचवड
महानगरपालिका, प्रादेशिक परिवहन कार्यालय, अन्न् व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
विभाग- वैध मापनशास्त्र यंत्रणा, कृषि विभाग, हिंदुस्थान पेट्रोलियम, पीएमपीएमएल
इ. विभागांचे स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलला भेट देऊन पालकमंत्र्यांनी
माहिती घेतली.
कार्यक्रमाचे
प्रास्ताविक करताना जिल्हा पुरवठा अधिकारी सुनिल गाढे यांनी शासनाच्या विविध
विभागांमार्फत ग्राहक जागृतीविषयीची दरवर्षी केलेली कार्यवाही, ग्राहकांना असणारे
अधिकार व योजनांची माहिती एकत्रितरित्या त्यांच्यापर्यंत पोहचविण्याकरीता या
कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. यावेळी महसूल व इतर विभागातील
अधिकारी/कर्मचारी आणि नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
0000 
No comments:
Post a Comment