Thursday, July 5, 2018

श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यास प्रारंभ

पुणे, दि. 5 : श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थानाचा शुभारंभ पालकमंत्री तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री श्री.गिरीश बापट यांनी सपत्निक महापुजा करुन, आज श्री क्षेत्र देहू येथे केला. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, खासदार अमर साबळे, .संजय भेगडे, श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब ऊर्फ पंढरीनाथ मोरे, पालखी सोहळा प्रमुख सर्वश्री सुनिल मोरे, विठ्ठल मोरे, अशोक मोरे, अभिजीत बाळकृष्ण मोरे, जालिंदर मोरे, बबनराव पाचपुते,उपविभागीय अधिकारी ज्योती कदम उपस्थित होते.
            मंगलमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात श्री क्षेत्र देहू येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थान येथील मंदिरात माऊलींच्या पादुकांची पालकमंत्री गिरीश बापट यांच्याहस्ते विधीवत पाद्यपूजा करण्यात आली. शिस्तबध्द पध्दतीने वारकऱ्यांनी केलेल्या टाळ-मृदुंगाच्या गजराने यावेळी सभोवतालचा परिसर दुमदुमला होता. पालखी प्रस्थानापूर्वी करावी लागणारी नैमेत्तिक कामांची तयारी मंदिर प्रशासनाच्यावतीने पूर्ण करण्यात आली होती.
            पालखी सोहळयात सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी विविध सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. आरोग्य सेवा, पिण्याचे पाणी, इंधन इत्यादी व्यवस्था पालखी सोहळा व्यवस्थापनातर्फे करण्यात आल्या आहेत. पालखीमध्ये महाराष्ट्रासह इतर राज्यातील दिंडयाही सहभागी झाल्या आहेत. या दिंडयाच्या माध्यमातून निर्मल वारी-स्वच्छ वारी तसेच सामाजिक जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती पालखी व्यवस्थापनाने दिली.
            पालखी प्रस्थानानंतर, श्री क्षेत्र देहू येथील इनामदार वाडयात पालखीचा मुक्काम राहणार असून त्यानंतर पुढील प्रवासासाठी पालखी मार्गस्थ होणार असल्याची माहिती यावेळी विश्वस्तांनी दिली. या सोहळयास वारकरी, नागरीक, स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी, महाविद्यालयीन युवक-युवती, स्वयंसेवक मोठया प्रमाणावर सहभागी झाले होते.
                                          पान २
                                                                                       भक्त निवासाचे उदघाटन



            श्री क्षेत्र देहू येथे पालखी सोहळयासाठी, वारकरी मोठया संख्येने सहभागी होत असतात. वारकऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या भक्त निवासाचे उदघाटन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले. या भक्त निवास अठरा कक्षांमध्ये भाविकांची राहण्याची सोय करण्यात आली आहे. भक्त निवासात भोजन कक्ष, सभा मंडप, वाहनांसाठी पार्कींग इत्यादी सोयी करण्यात आल्या आहेत.
000

आषाढी वारीत अन्न सुरक्षा व स्वछता अभियान
राबविणार-पालकमंत्री गिरीश बापट

            पुणे ता. 5  :-  आषाढी वारीत अन्न  सुरक्षा व स्वछता अभियान राबवणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी आज येथे केले. श्री क्षेत्र देहू येथे पालखी अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या, श्री क्षेत्र देहू व आळंदी येथून पंढरपूरकडे जाणाऱ्या वारीच्या मार्गावरील अन्न विक्रेते व अन्न छत्र चालवणाऱ्यांच्या प्रबोधनासाठी '' परिवर्तन अन्न सुरक्षा व स्वच्छता अभियान'' सुरु करण्यात आले आहे. या्अभियानाद्वारे दोन चित्ररथांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. या चित्ररथाचा शुभारंभ पालकमंत्री यांच्याहस्ते  करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.
            देहू, आळंदी येथून निघणाऱ्या पालख्यांमध्ये महाराष्ट्रासह विविध प्रांतातून मोठया प्रमाणावर भाविक सहभागी होत असतात. या पालखीसोहळा कालावधीत पालखी मार्गावर हॉटेल,रेस्टॉरंट, फिरते विक्रेते हे अन्न पदार्थांची विक्री करत असतात. तसेच या कालावधीत सेवा भावी संस्था, सेवाभावी व्यक्ती, भाविकांना अन्न पदार्थ मोफत देत असतात. या अभियानाच्या माध्यमातून अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने अन्नछत्राच्या तपासण्या करून वारकरी व भाविकांना सुरक्षित  व स्वच्छ अन्न उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्याचबरोबर अन्न व्यावसायिकांची सुरक्षा व स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.  देहू ते पंढरपूर व आळंदी ते पंढरपूर या दोन्ही मार्गावर अन्न प्रशासन, कोकाकोला इं. लि. आणि नेस्ले इं. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने हे अभियान राबविण्यात येणार आहे. पालखी मार्गावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांना सुरक्षित अन्न पदार्थ तयार करण्याबाबत तसेच अन्न सुरक्षेबाबत तज्ञ प्रशिक्षक व अन्न सुरक्षा अधिकारी प्रशिक्षण देणार आहेत. या अन्न व्यावसायिकांना  हातमोजे, टोपी,अॅप्रन,आदींचा समावेश असलेले हायजिन किटचे मोफत वितरण करण्यात येणार आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली.
000





No comments:

Post a Comment

  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेची राज्यस्तरीय बैठक पुणे जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्व...